अंतराळात जाण्याचे स्वप्न लहानपणी अनेकांनी पाहीलेले असते. मंगळ व चंद्रावर मानवाला वस्ती करता यावी यासाठी जगातील अनेक अंतराळ संशोधन संस्था काम करत आहेत. शक्य झाल्यास जगातील काही श्रीमंत लोकांनी दुसर्‍या ग्रहावर जाण्याची तयारीही दर्शवली आहे. पण, दुसर्‍या ग्रहावर जाणे जितक्या सहजपणे म्हटले जाते तितके ते सहज साध्य होणारे नाही. तिथे वसाहत निर्माण करण्यात अनेक अडचणी आहेत. अडथळे आहेत. मानवाने दुसर्‍या ग्रहावर वसाहत निर्माण केली तरी तिथे मानवांना ‘मानव’निर्मिती करण्यात अडथळा येणार आहे. हे नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधन अहवालातून समोर आले आहे.

अंतराळात मानवाला पुनरूत्पादन प्रक्रिया करणे सध्या तरी शक्य होणार नसल्याचे एका संशोधन अहवालातून समोर आले आहे. अंतराळात सूक्ष्म गुरूत्वाकर्षण असते. त्यामुळे मानवासह इतर सस्तन प्राण्यांच्या प्रजनन प्रणालीत अडथळे येतात. तसेच शुक्राणूंना (स्पर्म) पुरूत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला प्रवास करताना अडचण येऊ शकते. ते दिशाहीन होऊ शकतात, असे संशोधनातून समोर आले आहे. संशोधन करताना नेमकं काय आढळून आले? अंतराळात गर्भधारणा झाल्यास काय होईल? ते सविस्तर जाणून घेऊयात.

अंतराळ, स्पर्म आणि गुरूत्वाकर्षण (ग्रॅव्हिटी)

शून्य गुरूत्वाकर्षण असल्यास त्याचा मानवाच्या पुनरूत्पादन प्रक्रियेवर काय परिणाम होतो याबाबतचे एक संशोधन अ‍ॅडिलेड विद्यापीठात करण्यात आले. शून्य गुरूत्वाकर्षण म्हणजे गुरुत्वीय बलाचा अभाव किंवा अत्यंत कमी प्रभाव, जिथे वजन जाणवत नाही. शून्य गुरूत्वाकर्षणाचा (Zero-G) मानवासह एकूण तीन सस्तन प्राण्यांच्या स्पर्मवर काय परिणाम होतो याबाबत शास्त्रज्ञांनी माहिती दिली आहे. स्पर्म दीशाहीन होतो, त्याचा मार्ग चुकतो, असे संशोधनात सहभागी शास्त्रज्ञांनी सांगितले.

स्पर्मची दिशाभूल का होते?

अभ्यास करण्यासाठी संशोधनकर्त्यांनी एका थ्रीडी क्लिनोस्टॅट मशिनचा वापर केला. या मशिनमध्ये शून्य गुरूत्वाकर्षणाची परिस्थिती निर्माण केलेली असते. या मशिनमध्ये टाकण्यात आलेल्या पेशी सतत उलट्यापालट्या होतात. त्यांची दिशाभूल होते. संशोधनकर्त्यांनी या मशिनमध्ये एका आर्टिफिशियल मेझमध्ये शुक्राणू पेशी (स्पर्म) टाकल्या. आर्टिफिशियल मेझ म्हणजे शुक्राणू पेशीला (स्पर्म) प्रवासात अडथळे यावेत यासाठी तयार केलेली एक व्यवस्था. पृथ्वीवर शुक्राणू स्त्रीबीजाला फलित करून गर्भधारणा होण्यास कारण ठरतात. त्यासाठी त्यांना प्रवास प्रवास करावा लागतो. संशोधनात शून्य गुरुत्वाकर्षणामुळे शुक्राणूंची (स्पर्म) दिशाभूल होते, असे आढळले. त्यामुळे अंतराळात गर्भधारणा होण्यासाठी अडचण येऊ शकते, असे संशोधनातून समोर आले.

उंदराच्या स्पर्मने ३० टक्के कमी बीजांना फलित केले

कम्युनिकेशन्स बायोलॉजी या मासिकात हा संशोधन अहवाल प्रकाशित झाला आहे. संशोधनात सहभागी बायोमेडिकल संशोधक निकोल मॅकफेरसन म्हणाले, शून्य गुरुत्वाकर्षणात खूपच कमी स्पर्म योग्य दिशेने यशस्वी प्रवास करताना आढळले. हेच निरीक्षण अनेकदा केलेल्या प्रयोगांमध्येही नोंदवले गेले. स्पर्मच्या हालचालीत बदल दिसून आला नाही. शून्य गुरुत्वाकर्षणात उंदराच्या स्पर्मने ३० टक्के कमी बीजांना फलित केल्याचे संशोधनात आढळले. दरम्यान, आव्हाने पार करून भविष्यात अंतराळात पुनरूत्पादन करणे मानवासाठी शक्य होईल असा अंदाजही मॅकफेरसन यांनी व्यक्त केला आहे.

‘स्पेस प्रेग्नन्सी’तील धोका

दरम्यान, अंतराळात गर्भधारणा झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. गर्भधारणा होऊन बाळाला जन्म दिल्यास अंतराळात त्या बाळाचे पालन पोषण करणे एक आव्हान असेल. त्याचे कारण म्हणजे अंतराळात कोणतीही वस्तू स्थिर राहत नाही. तिथे गुरूत्वाकर्षण नसते. अंतराळात जड वस्तू तरंगतात. तसेच अंतराळात वैश्विक किरणांचा (कॉस्मिक रे) धोका अधिक असतो. अंतराळात बाळ जन्माला आल्यास ते सतत तरंगत राहू शकते. त्यामुळे त्याच्यात शारीरिक अपंगता येऊ शकते. शरीराचा आकार बदलू शकतो. तसेच वैश्विक किरणे देखील बाळाच्या मेंदूवर गंभीर परिणाम करू शकतात. अंतराळात वैश्विक किरणे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे अंतराळात गर्भधारणा होणे किंवा जन्मलेल्या बाळाचे संगोपन करणे हे सध्या तरी शक्य नाही. परंतु, ते अशक्यही नाही, असा संशोधकांना विश्वास आहे.

संशोधनाचे महत्व काय?

भविष्यात मंगळ व चंद्रावर वस्ती करण्याची मानवाची महत्वाकांक्षा आहे. त्यामुळे तिथे मानवाची पुनरूत्पादन प्रक्रिया होऊ शकते का हे जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. दरम्यान, इलॉन मस्क यांनी मंगळावर वस्ती उभारणार असल्याचे अनेकदा सांगितले होते. सध्या मस्क मंगळाऐवजी चंद्रावर वस्ती उभारण्याला प्राधान्य देत आहेत. दशकभरात हे उद्दीष्ट साध्य होईल असा विश्वासही इलॉन मस्क यांनी व्यक्त केला होता.

दरम्यान, भविष्यात दुसऱ्या ग्रहावर मानवी वस्ती उभारण्यात आली तर तिथे मनुष्य अन्न म्हणून काय सेवन करू शकतो, याचाही विचार संशोधक करत आहेत. ब्राइटर साइडमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार मानव दुसऱ्या ग्रहावर पशूपालन करून अन्नाची गरज भागवू शकतो का, यावर संशोधन सुरू आहे. कोणते प्राणी अंतराळातील दुसऱ्या ग्रहावरील परिस्थितीत, वातावरणात राहू शकतात याबाबत संशोधन सुरू आहे.