अंतराळातील विविध गोष्टींचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना आपल्या आकाशगंगेच्या केंद्राजवळ असलेल्या वायू आणि धुळीच्या ढगात साखरेचे अंश आढळून आले. यामुळे पृथ्वीवरील सजीवनिर्मितीविषयी संशोधनात कशी भर पडली, त्यातून नक्की काय साध्य होणार याचा हा आढावा… 
अंतराळात साखर आली कशी?
आंतरतारकीय अंतराळात अनेक गोष्टी असतात. त्याचा शोध घेणाऱ्या संशोधकांना स्पेनमधील येबेस ४०-मीटर आणि इराम ३०-मीटर रेडिओ दुर्बिणींच्या साह्याने एका ढगात चार कार्बन अणूंनी बनणाऱ्या एरिथ्रुलोज नामक साखरेचे अंश आढळले. विशेष म्हणजे अशा प्रकारची साखर रास्पबेरीमध्येही आढळते. प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यांद्वारे एरिथ्रुलोजच्या संकेताची पुष्टी करण्यात आली. या ढगाला त्यांनी जी ०.६९३-०.०२७ नाव दिले आहे.

संशोधकांच्या मते सूर्यमालेबाहेर अशा प्रकारची साखर सापडण्याची पहिलीच वेळ आहे आणि यामुळे आपल्या आकाशगंगेतील पाण्यासारख्या जीवनासाठी अनुकूल घटकांना ओळखणाऱ्या संशोधनात भर पडली आहे. या संदर्भातील अहवाल ‘नेचर ॲस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झाला आहे. 

साखरेचा जीव निर्मितीशी काय संबंध?

जीव निर्मितीसाठी आवश्यक घटकांचा शोध घेताना अंतराळ संशोधक अनेकदा पाणी आणि कार्बनवर लक्ष केंद्रित करत असले तरी, साखरदेखील आवश्यक आहे. संशोधकांच्या मते साखर हे सजीव प्रणालींमधील महत्त्वाचे रेणू आहेत, जे ऊर्जा प्रदान करण्यास, महत्त्वाच्या जैविक संरचना तयार करण्यास आणि जनुकीय सामग्रीचे भाग बनण्यास मदत करतात. स्पॅनिश राष्ट्रीय संशोधन परिषदेचे संशोधक इझास्कुन जिमेनेझ-सेरा यांनी संशोधनाबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, अत्यंत संवेदनशील निरीक्षणे, विस्तृत वारंवारता व्याप्ती आणि अत्यंत अचूक अभ्यासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे अंतराळातील साखरेचा शोध लावण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, अंतराळातील विविध बाबींचा अभ्यास करताना आकाशगंगेतील रासायनिक घटकांवर अधिक लक्ष असते. ज्यामुळे अशा प्रकारचे शोध लागण्याची शक्यता वाढते, असेही त्यांनी नमूद केले. 

एरिथ्रुलोज साखरेचे महत्त्व अधिक का आहे?

एरिथ्रुलोज ही साखर जीव उत्पत्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. याचे कारण म्हणजे या साखरेतून थ्रिओजची रचना बदलते. थ्रिओज म्हणजे चार कार्बन अणू आणि एक ॲल्डिहाइड गट असलेली साधी साखर आहे. याचा मुख्य उपयोग कृत्रिम जनुकीय रेणू तयार करण्यासाठी होतो. जीवशास्त्राच्या सिद्धांतात, डीएनए आणि आरएनएच्या निर्मितीपूर्वीच्या जगात थ्रिओजचे रेणू अस्तित्वात असावेत, असा अंदाज शास्त्रज्ञांनी लावला आहे. त्यामुळे अंतराळात आढळलेली एरिथ्रुलोज साखर संशोधकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

इतर ग्रहांवरही साखर आहे? 

संशोधकांना यापूर्वी उल्का आणि लघुग्रहांच्या नमुन्यांमध्ये साखर आढळली आहे. अलीकडेच नासाने ओसिरिस-रेक्स ही अंतराळ मोहीम राबवली होती. या मोहिमेचा मुख्य उद्देश ‘बेन्नू’ नावाच्या लघुग्रहावरून माती आणि खडकांचे नमुने गोळा करून ते सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणे हा होता. संशोधकांना तेथून आणलेल्या नमुन्यांमध्ये रायबोज आणि ग्लुकोज दोन्ही आढळले. ज्यामुळे असे सूचित होते की जीवशास्त्रासाठी हे अत्यावश्यक घटक सूर्यमालेत इतरत्रही उपलब्ध आहेत. शास्त्रज्ञ पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात एरिथ्रुलोज कसे तयार झाले असेल, याचा शोध घेत होते. मात्र त्यांना त्याचे उत्तर मिळाले नव्हते मात्र नवीन शोधातून संशोधकांनी स्पष्ट केले की, प्रयोगशाळेतील प्रयोगांमध्ये जीवसृष्टीपूर्व पृथ्वीच्या पृष्ठभागावर एरिथ्रुलोजचे प्रमाण अपुरे होते. पृथ्वीसारख्या खडकाळ ग्रहांच्या सुरुवातीच्या काळात ग्रह विकसित होत असताना त्यांना आवश्यक एरिथ्रुलोज हे अंतराळातून मिळू शकते. त्यामुळे, पृथ्वी पूर्णपणे तयार होण्यापूर्वी रायबोज, ग्लुकोज आणि एरिथ्रुलोज हे पृथ्वीवरील ‘साखरेच्या साठ्याचा’ भाग असू शकते, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. यावरून असे सूचित होते की, अंतराळातील धुळीच्या कणांवरील साध्या रेणूंपासून एरिथ्रुलोज तयार होऊ शकते आणि नंतर ते अधिक जटिल रासायनिक प्रणालींचा भाग बनू शकते.

संशोधनाचा पुढचा टप्पा काय?

अंतराळातील साखरेच्या शोधामुळे अंतराळात जीवनासाठी आवश्यक असलेले बहुतेक, किंबहुना सर्वच घटक मुबलक प्रमाणात आहेत, या सिद्धांताला पुष्टी मिळल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. साखरेच्या शोधानंतर आता जटिल शर्करा आणि आरएनए व इतर जैविकदृष्ट्या महत्त्वाच्या संयुगांचे थेट पूर्वसूचक असलेल्या रेणूंचा शोध घेण्यात येणार आहे, असे जिमेनेझ-सेरा यांनी लाइव्ह सायन्सला सांगितले. ग्रह तयार होण्यापूर्वीच प्रागैतिहासिक रसायनशास्त्र किती प्रगती करू शकते आणि नव्याने तयार होणारी ग्रहमाला अंतराळातून कोणता रासायनिक साठा वारसा म्हणून मिळवतात, याचा शोध संशोधनाच्या पुढील टप्प्यात घेण्यात येणार आहे.

dharmesh.shinde@expressindia.com