Pedro Sanchez vs Donald Trump West Asia conflict : पश्चिम आशियात युद्धाचा वणवा पेटला असतानाच अमेरिकेचा मित्रदेश असलेल्या स्पेनने सोमवारी एक महत्वाची घोषणा केली. इराणबरोबरच्या युद्धादरम्यान अमेरिकन लष्कराला स्पेनचे हवाई क्षेत्र किंवा संयुक्तपणे चालवले जाणारे लष्करी तळ वापरण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्पेन सरकारच्या या निर्णयामुळे पश्चिम आशियातील मोहिमांसाठी अमेरिकेला युरोपमधून मिळणारी महत्त्वाची रसद आणि मार्ग आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थितीत अमेरिकेला त्यांच्याच मित्रराष्ट्रांकडून विरोधाचा सामना का करावा लागतोय? असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्याविषयीचा हा आढावा…
स्पेनची मनाई नेमकी कशासाठी?
स्पेनचे संरक्षण मंत्री मार्गारीटा रोब्लेस यांनी इराणबरोबरच्या युद्धादरम्यान अमेरिकन लष्कराला आपले हवाई क्षेत्राचा वापर करण्यास मनाई केली. या निर्णयाची घोषणा करताना त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनावर कठोर शब्दात टीका केली. पश्चिम आशियात सध्या सुरू असलेल्या या युद्धाचे वर्णन त्यांनी ‘पूर्णपणे अवैध आणि अन्यायकारक’ असे केले. स्पेनच्या रोटा आणि मोरोन येथील लष्करी तळांचा वापर करण्यापासून अमेरिकन सैन्याला आधीच दूर ठेवण्यात आले असून हा नवीन निर्णय त्याच धोरणाचा पुढचा भाग असल्याचे स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले. स्पेनचे अर्थमंत्री कार्लोस कुएर्पो यांनीदेखील या निर्णयाचे समर्थन केले. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उघडपणे उल्लंघन करून एकतर्फी सुरू करण्यात आलेल्या या युद्धात सहभागी न होण्याचा निर्णय स्पेनने घेतला असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी स्थानिक माध्यमांना दिले.
स्पेन-अमेरिकेच्या संबंधात दरी?
स्पेन आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंधांमध्ये अलीकडच्या काळात मोठी दरी निर्माण झाल्याचे दिसून आले. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ आणि त्यांच्या पक्षाने स्वतःला ‘अँटी-ट्रम्प’ गटाचे प्रमुख नेतृत्व म्हणून मांडले. त्यांनी नाटो सदस्य देशांनी संरक्षणासाठी पाच टक्के बजेट खर्च करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावाला ठाम विरोध केला होता. तसेच, अमेरिकेने यावर्षी व्हेनेझुएलावर केलेल्या लष्करी कारवाईलाही त्यांनी उघडपणे विरोध केला होता. ट्रम्प प्रशासनाने व्यापार बंदी आणि वाढीव टॅरिफची धमकी दिल्यानंतरही पेड्रो सांचेज यांनी आपली अमेरिकेविरोधी भूमिका कायम ठेवली. या पार्श्वभूमीवर अमेरिकेला उघडपणे विरोध करून स्पेनला नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला.
स्पेनच्या निर्णयाचा अमेरिकेला फटका
स्पेनने केवळ अमेरिकन लष्कराच्या विमानांनाच आपल्या हवाई हद्दीतून प्रवास करण्याची बंदी घातली आहे. इतर कोणत्याही विमानांवर किंवा द्विपक्षीय करारांनुसार चालणाऱ्या कारवायांवर याचा परिणाम होणार नसल्याचे तेथील सरकारने स्पष्ट केले आहे. स्पेनच्या या निर्णयामुळे अमेरिकन लष्करातील लष्करी विमानांना फ्रान्स आणि जर्मनी हद्दीतून प्रवास करावा लागत आहे. या परिस्थितीत अमेरिकेने ब्रिटनमधील फेअरफोर्ड एअरबेसचा पर्याय निवडला असून, पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्या परवानगीनंतर तेथून आपली लष्करी कारवाई सुरू ठेवली आहे. मात्र, या तळाचा वापर केवळ संरक्षणात्मक मोहिमांपुरता मर्यादित ठेवण्यात आला आहे. सध्या अमेरिकन लष्कराच्या विमानांना हवेत इंधन भरण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळेच पश्चिम आशियातील हे युद्ध अमेरिकेसाठी आणखीनच खर्चिक झाले आहे.
स्पेनच्या भूमिकेमागील कारणे काय?
अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेच्या लष्करी मोहिमेत फ्रेंचने अडथळा आणणे हा एक मोठा भूराजकीय धोका मानला जात आहे. मात्र, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांचा हा निर्णय केवळ स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी घेतल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अलीकडील काळातील सर्वात कमकुवत जनादेश असलेले सांचेज यांचे सरकार सध्या तेथील विरोधकांच्या रडारवर आहे. त्यांच्या अल्पमतातील आघाडी सरकारमध्ये मध्यम-डाव्या विचारसरणीचे पक्ष आहेत. त्यामुळे संसदेत कोणताही निर्णय बहुमताने घ्यायचा असल्यास त्यांना आपल्या मित्रपक्षांच्या पाठिंब्यावरच अवलंबून राहावे लागते. याशिवाय सांचेझ यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर ‘Koldo प्रकरण’ या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे सावट आहे, ज्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आहे.
स्पेनच्या पंतप्रधानांची काय रणनीती?
देशांतर्गत धोरणे प्रभावीपणे राबवण्यात अपयश आल्याने पंतप्रधान सांचेज यांनी आपले लक्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. त्यांनी अमेरिकेविरोधात घेतलेली उघड भूमिका ही स्पेनच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण म्हणून मांडली जात आहे. या भूमिकेचे दोन महत्त्वाचे राजकीय फायदेही त्यांना होताना दिसत आहे. पहिले म्हणजे, फ्रेंच सरकारला पाठिंबा देणारे डाव्या विचारसरणीचे युद्धविरोधी भूमिका मांडणारे मित्रपक्ष सध्यातरी समाधानी आहेत. पक्ष जागतिक स्तरावर त्यांच्या विचारसरणीला पाठिंबा देणाऱ्या सरकारला खाली खेचण्याचा धोका पत्करू शकत नाहीत. दुसरे म्हणजे, अमेरिकेला उघडपणे विरोध करून पंतप्रधान सांचेझ हे स्वतःला एक खंबीर नेता म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेच्या कुठल्याही दबावाला फ्रेंच सरकार बळी पडणार नसल्याचे दाखवून ते जनतेची मने जिंकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ट्रम्प यांच्याविरोधात स्पेनमध्ये नाराजी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापार धोरणांमुळे आणि लष्करी हस्तक्षेपाच्या भूमिकेमुळे स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सांचेज यांनी अमेरिकाविरोधी घेतलेली स्पष्ट आणि ठाम भूमिका त्यांच्या विरोधकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, सांचेज यांच्या विरोधकांसमोर एकतर स्पेनच्या निर्यातीला धोका निर्माण करणाऱ्या अमेरिकन धोरणांना पाठिंबा द्यावा किंवा सांचेज यांच्या नेतृत्वाला अप्रत्यक्ष मान्यता द्यावी, असे दोनच पर्याय उरले आहेत. यादरम्यान देशातील उजव्या विचारसणीच्या पक्षांची कोंडी करण्यासाठी सांचेज यांनी अमेरिकेलाही अडचणीत टाकल्याची चर्चा जागतिक पातळीवर रंगली आहे. त्यामुळे स्पेनच्या या भूमिकेनंतर डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
