स्पेनच्या स्यूटा प्रदेशात काय घडले?
स्पेनच्या ताब्यात असलेला ‘स्यूटा’ हा छोटासा प्रदेश आणि मोरोक्को दरम्यानची सीमासुरक्षा व्यवस्था अलीकडे कोलमडली आहे. मोरोक्कोमधून ५० हजारांपेक्षा अधिक स्थलांतरितांनी नुकताच स्पेनच्या या हद्दीत प्रवेश केला. चांगल्या जीवनमानाच्या शोधात युरोपात येऊ पाहणार्या स्थलांतरितांसाठी स्यूटा हे दीर्घकाळापासून एक प्रवेशद्वार मानले जाते. स्थलांतरितांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहराने आपली सीमा अधिकाधिक
सुरक्षित आणि मजबूत केली आहे, मात्र गुरुवारी अचानक हजारो निर्वासित मोरोक्कोची सीमा ओलांडून स्यूटा प्रदेशात आले, त्यावेळी प्रचंड गोंधळ उडाला आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. यात ६७ निर्वासितांना प्राण गमवावे लागले.
स्यूटा प्रदेश कोठे आहे? तो दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा का?
आफ्रिकेच्या उत्तर किनारपट्टीवर १९.९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या द्वीपकल्पीय प्रदेशात स्यूटा हे शहर आहे. स्यूटा आणि मेलिला हे स्पेनच्या मुख्य भूभागापासून वेगळे असलेले, पण स्पेनच्या ताब्यातील स्वायत्त प्रदेश आहेत. ही दोन शहरे युरोपीय महासंघाच्या आफ्रिकेलगतच्या सीमा आहेत. जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने स्पेनचा मुख्य भूभाग स्यूटापासून वेगळा होतो. शहराची लोकसंख्या ८३ हजारांहून अधिक आहे. यात ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मीयांचा समावेश असून शहरात सामान्यपणे सलोख्याचे वातावरण असते.
मोरोक्कोची स्यूटा या शहरावर नजर का?
स्पेनच्या ताब्यात असलेल्या स्यूटा आणि मेलिला या दोन्ही शहरांकडे मोरोक्को अजूनही ‘व्याप्त भूभाग’ म्हणून पाहतो. आठव्या शतकातील इस्लामी आक्रमणांचा संदर्भ देत मोरोक्को या प्रदेशांवरील स्पेनच्या सार्वभौमत्वाला आव्हान देतो. गेल्या काही वर्षांत, या वादामुळे मोरोक्कोने अनेकदा राजनैतिक तणाव निर्माण केला आहे. २००२मध्ये, स्यूटाजवळील एका लहान निर्जन बेटावर दोन्ही देशांनी आपापली सैन्यदले पाठवल्यामुळे मोरोक्को आणि स्पेन यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. मे २०२१मध्ये पश्चिम सहारा या वादग्रस्त प्रदेशावरून राजनैतिक वाद तीव्र झाला असताना, मोरोक्को सरकारने आपल्या सीमांवरील नियंत्रण शिथिल केले. परिणामी, अवघ्या दोन दिवसांत मोरोक्को आणि उप-सहारा आफ्रिकेतील देशांमधून सुमारे आठ हजार नागरिक स्यूटामध्ये घुसले. यातील काही स्थलांतरित नंतर पुन्हा मायदेशी परतले. २०२२ मध्ये स्पेनने पश्चिम सहारातील मोरोक्कोच्या स्वायत्ततेला पाठिंबा दिल्यानंतरच हा राजनैतिक तणाव निवळला.
स्यूटा स्थलांतराच्या दृष्टीने संवेदनशील का?
चांगल्या आर्थिक संधींच्या शोधात किंवा आपल्या देशातील हिंसाचारापासून सुटका करून घेण्यासाठी आफ्रिकेतून युरोपात जाणार्यांसाठी स्पेन हे एक प्रमुख प्रवेशद्वार आहे. मोरोक्को आणि आफ्रिकेच्या इतर भागांतून स्पेनमध्ये पोहोचू पाहणार्या लोकांसाठी स्यूटा आणि मेलिला ही महत्त्वाची ठिकाणे मानली जातात, त्यामुळे तिथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या शहरांत पोहोचणार्या अनेक स्थलांतरितांना त्वरित परत पाठवले जाते, तर काहींना स्पेनमध्ये आश्रयासाठी अर्ज करेपर्यंत स्थलांतरित निवारा केंद्रांमध्ये ठेवले जाते. स्यूटापर्यंत पोहोचण्यासाठी लोक अनेकदा मोरोक्कोमधील फनिदेक या शहरातून पोहत येतात आणि सुमारे पाच किमी अंतर कापतात. काही लोक जवळच असलेल्या ‘बेल्युनेच’ शहरातूनही हे अंतर पार करण्याचा प्रयत्न करतात.
न्यायालय, स्पेनच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचा परिणाम?
स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने २९ जून रोजी दिलेल्या एका निर्णयामुळे, सागरी मार्गाने स्यूटा आणि मेलिला येथे पोहोचणार्या स्थलांतरितांनी योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नसले तरी त्यांना त्वरित परत पाठवण्यापासून प्रशासनाला रोखण्यात आले. या निर्णयामुळे अनधिकृत प्रवेश कायदेशीर ठरला नसला, तरी मोरोक्कोमधील समाजमाध्यमांवर हा निर्णय मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला आणि त्यामुळे अनेकांनी स्पेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. कागदपत्रे नसलेल्या पाच लाख स्थलांतरितांना कायदेशीर दर्जा मिळवून देण्याची योजना पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी आखली आहे. या योजनेसाठी दहा लाखांहून अधिक लोकांनी अर्ज केले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे सीमेवर घुसखोरी झाली, असे तेथील विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.
