दक्षिण युरोपमधील स्पेनमध्ये घनदाट जंगलाला भीषण आग लागली आहे. मागील काही वर्षांमध्ये पहिल्यांदाच स्पेनमधील जंगलात एक मोठा वणवा पेटला आहे. तब्बल २ लाख ४० हजार एकरवर पसरलेल्या आगीत जंगल जळून खाक झाले आहे. स्पेनमध्ये या आगीने भयंकर रूप धारण केले आहे. आग विझवण्यासाठी उपग्रह, ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मदत घेतली जात आहे.
स्पेनमधील बार्सिलोनाच्या दक्षिणेकडे असलेल्या कॅटालोनिया पर्वतरांगेतही भीषण आग लागलेली आहे. ही आग विझवण्यासाठी तांत्रिक उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. दरम्यान, या आगीत गाढवांचा एक कळप आग विझवण्यासाठी शांतपणे काम करत आहे. ही सगळी गाढवे कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवण्यात आलेली आहेत. आग विझवण्यासाठी गाढवांच्या कळपाकडून पाणी वाहून नेले जात नसून ही गाढवे त्या पर्वतरांगेत व जंगलांमध्ये चरण्यासाठी सोडून देण्यात आली आहेत. ही गाढवे आगीला पसरण्यापासून रोखत आहेत, असे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे. गाढवांचा कळप आग नेमकं कशी विझवत आहे, हे सविस्तर जाणून घेऊ.
स्पेनमधील जंगलातील आग विझवण्यात गाढवांचा कळप अग्रेसर
कॅटालोनिया पर्वतरांगेच्या दक्षिणेला ‘तिव्हिसा डाँकी फायरफाइटर्स’ नावाची एक नॉन प्रोफीट संस्था आहे. या संस्थेने गाढवांना पाळले आहे. तसेच या गाढवांचा वापर ‘फायरफाइटर्स’ (आग विझवणारे) म्हणून केला जातो. या गाढवांमुळे जंगलात आग लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
ही संस्था गाढवांना पर्वतांवर, जंगलांमध्ये आणि गावखेड्यांमध्ये चरण्यासाठी सोडते. गाढवांचा कळप कोरडे गवत खातो त्यामुळे आग लागल्यानंतर ती आग पसरण्याची शक्यता कमी होते. ‘तिव्हिसा’ संस्थेचे संस्थापक जोआन सेडो सान्स यांनी हा प्रयोग २०२० मध्ये पहिल्यांदा केला होता. त्यावेळी त्यांच्याकडे थोडीच गाढवे होती. आज त्यांच्याकडे ६२ गाढवांचा एक कळप आहे. हा गाढवांचा कळप सरकारी तसेच खासगी जमिनीवर चरण्यासाठी सोडला जातो.

‘सीएनएन’शी बोलताना सेडो म्हणाले, “आम्ही या गाढवांबद्दल कृतज्ञ आहोत. या गाढवांना दुसरी संधी मिळायला हवी (कत्तलखान्यात जाण्याऐवजी) असे आम्हाला मनापासून वाटत होते. ही कल्पना माझ्या मनात २०१३ मध्ये आली. त्यावेळी कॅटालोनियातील माझ्या जमिनीच्या आजूबाजूला असलेले घनदाट जंगल जळून खाक झाले होते. तेव्हा ही आग पसरू नये म्हणून गाढवे जमिनीवरील कोरडे गवत किंवा पालापाचोळा खाऊ शकतात का हे मी तपासले. तेव्हा गाढवांनी सगळे गवत व तण खाल्ल्याचे आढळून आले.”
दरम्यान, सेडो हे सध्या एका लहान शहराचे महापौर आहेत. त्यामुळे त्यांनी गाढवांच्या प्रकल्पाचे काम काही व्होल्युन्टिअर्सवर सोपवले आहे. त्यातील एक व्होल्युन्टिअर जोर्डी गार्सिया म्हणाले, “या माध्यमातून आम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळते. तसेच या प्राण्यांनाही एक नवीन संधी मिळते.”
गाढवे आग कशी विझवतात?
गाढवे आग नेमकं विझवतात कशी, असा प्रश्न आपल्याला साहजिक पडू शकतो. या प्रश्नाचे उत्तर दिले आहे डॉ. जॉर्डी बार्टोलोम फिलेल्ला यांनी. डॉ. फिलेल्ला हे शाकाहारी प्राण्यांचे अभ्यासक आहेत. तसेच ते बार्सिलोना येथील विद्यापीठात प्राध्यापकही आहेत. फिलेल्ला म्हणाले, उन्हाळ्यात जंगलात वणवा पेटण्याचा सर्वाधिक धोका असतो. वाळलेले गवत आग वेगाने पसरवतात. त्यामुळे जंगल जळून खाक होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध शाकाहारी प्राण्यांना एकत्र करणे फायदेशीर ठरते. शाकाहारी प्राणी जमिनीवर वाळलेले गवत, पालापाचोळा खातात. कॅलिफोर्नियामध्ये आग लागण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या पर्वतांवर बकऱ्यांना चरण्यासाठी सोडले जाते. आग विझवणाऱ्या कंपन्या बकऱ्या किंवा मेंढ्यांना भाडेतत्त्वावर घेऊन चरण्यासाठी सोडतात, असे फिलेल्ला यांनी ‘सीएनएन’ला (CNN) सांगितले.
दरम्यान, ‘तिव्हिसा डाँकी फायरफाइटर्स’ संस्थेचे संस्थापक सेडो यांनी मात्र बकऱ्या व मेंढींपेक्षा गाढवे अधिक फायदेशीर असल्याचे सांगितले. सेडो म्हणाले, “बकऱ्या व मेंढ्या जे करू शकत नाहीत, ते गाढवे करतात. गाढवांचे वजन जास्त असते. त्यामुळे पर्वतांवर किंवा जंगलांमध्ये चालताना त्यांच्या पायामुळे पालापाचोळा किंवा वाळलेल्या गवताचे तुकडे विखुरले जातात. (जमिनीवर काही अंतराने पसरतात) त्यामुळे आगीला पसरण्यात मदत मिळत नाही. तसेच गाढवांची भूकही तुलनेने जास्त असते. त्यामुळे ते जास्त गवत व तण खातात. गाढवांच्या कळपामुळे जंगलात एक वाट तयार होते. जंगलात आग लागल्यास त्या वाटेचा वापर करून तिथपर्यंत पाणी पोहोचवता येते.”
गाढवांना चांगलं आयुष्य मिळालं?
स्पेनमध्ये गाढवांना मोठ्या प्रमाणात कत्तलखान्यात पाठवले जाते. ‘तिव्हिसा’ संस्थेचे संस्थापक सेडो यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे रॉबर्टो नावाचे एक गाढव आहे. या गाढवाचा वापर गाढवांच्या शर्यतीत केला जात होता. परंतु नंतर हे गाढव अधिक जाड झाल्याने त्याला कत्तलखान्यात पाठवले जाणार होते. आज हे गाढव कळपातील एक सदस्य आहे. सेडो यांच्याकडे पालोमा नावाचे एक गाढव असून ते अत्यंत जाड आहे. या गाढवाला त्याच्या मालकाने बिस्किट आणि शुगर क्युब (गोड पदार्थ) खाऊ घातल्याने गाढव जाड झाले. या गाढवाची प्रचंड हेळसांड होत होती, सध्या हे गाढवही सेडो यांच्याकडे आहे. या गाढवांना कत्तलखान्यापासून दूर ठेवण्यात यश मिळाल्याचे सेडो म्हणाले. दरम्यान, जंगलांमध्ये लागणारी आग विझवण्यासाठी गाढवांचा वापर करणे यात नवीन काहीच नाही, ही एक जुनी पद्धत होती, असे सेडो म्हणाले. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या पद्धतीला सरकारने मदत करावी, असेही आवाहन सेडो यांनी स्पेनमधील सरकारकडे केले आहे.
