Cancer risk sperm donor युरोपमध्ये सध्या एक गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. एका अज्ञात शुक्राणूदात्याच्या (स्पर्म डोनर) धोकादायक जनुकामुळे जन्माला आलेल्या मुलांचा जीव धोक्यात आला आहे. या एका शुक्राणूदात्यामुळे १९७ मुले जन्माला आली होती. त्यातल्या काही मुलांना कर्करोग झाल्याचे आणि काहींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती एका तपासणीतून उघडकीस आली आहे. आपल्यामध्ये कर्करोगाचा धोका वाढवणाऱ्या या शुक्राणूदात्याने आपले शुक्राणू दान केले. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे मुख्यालय असलेल्या युरोपियन स्पर्म बँक (ईएसबी)मार्फत हे शुक्राणू किमान १४ देशांतील ६७ आरोग्य केंद्रांमध्ये वितरित केले गेले होते.
शुक्राणूदात्याच्या शरीरातील धोकादायक जनुके मुलांच्या शरीरात गेल्याने म्युटेशन म्हणजेच उत्परिवर्तन झाले, त्यामुळे ली-फ्रॉमनी सिंड्रोम होतो. १९७ पैकी अनेक मुलांना आधीच कर्करोग झाला आहे आणि काही मुलांचा अगदी लहान वयातच मृत्यू झाला आहे. युरोपमधील हे प्रकरण काय? शुक्राणूदात्यामुळे मुलांना कर्करोगाचा धोका कसा निर्माण झाला? तपासणीत नक्की काय समोर आले? त्याविषयी जाणून घेऊयात…
शुक्राणू दात्यामुळे जन्मलेल्या शेकडो मुलांना कर्करोगाचा धोका
युरोपियन ब्रॉडकास्टिंग युनियनच्या (EBU) इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम नेटवर्कचा भाग म्हणून, बीबीसीसह १४ सार्वजनिक सेवा प्रसारकांनी ही तपासणी केली आहे. शुक्राणू एका निनावी दात्याचे होते, ज्याने २००५ मध्ये विद्यार्थी असताना शुक्राणू दान करण्यास सुरुवात केली आणि अनेक वर्षे तो शुक्राणू दान करीत होता. १७ वर्षांच्या कालावधीत अनेक महिलांनी गर्भधारणा करण्यासाठी त्याच्या शुक्राणूंचा वापर केला.
आरोग्य तपासणीत तो पुरुष फिट असल्याचे समोर आले होते आणि त्याने प्रमाणित दाता तपासणी उत्तीर्ण केली होती. परंतु त्याच्या काही पेशींमध्ये जन्माआधीच डीएनए बदलला होता. त्यामुळे TP53 जनुकांना प्रभावित केले. ही जनुके शरीराला असामान्य पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास आणि आपल्या शरीरातील पेशींना कर्करोग होण्यापासून रोखतात.
दात्याच्या शरीरातील बहुतांश भागांमध्ये TP53 जनुक नसले तरी त्याच्या शुक्राणूंपैकी सुमारे २० टक्के शुक्राणू हे जनुक वाहून नेतात. जर या प्रभावित शुक्राणूंमुळे एखाद्या मुलाची गर्भधारणा झाली, तर त्या मुलाच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये हे उत्परिवर्तन होईल, ज्यामुळे त्यांना कर्करोगाचा धोका वाढतो. डेन्मार्कमधील युरोपियन स्पर्म बँकेने नोव्हेंबर २०२३ मध्ये या व्यक्तीची ओळख पटवली.
ली-फ्रॉमनी सिंड्रोम
या स्थितीला ली-फ्रॉमनी सिंड्रोम म्हणतात. हा एक दुर्मीळ जनुकीय विकार आहे आणि त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. अनेकदा बालपणात ब्रेन ट्यूमर आणि सार्कोमा, तसेच प्रौढत्वात स्तनाचा कर्करोग होतो. कर्करोगाच्या धोक्यावर लक्ष ठेवण्यासाठी, या सिंड्रोम असलेल्या व्यक्तींना शरीर व मेंदूचे एमआरआय स्कॅन आणि ओटीपोटाच्या अल्ट्रासाऊंडची आवश्यकता असते.
लंडनमधील इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चमधील कर्करोग जनुकशास्त्रज्ञ प्रोफेसर क्लेअर टर्नबुल यांनी बीबीसीला सांगितले, “कुटुंबासाठी हे निदान पचवणं खूप कठीण आहे, या धोक्याबरोबर आयुष्यभर जगण्याचे ओझे आहे.” युरोपियन स्पर्म बँकेने सांगितले की, दाता आणि त्याचे कुटुंब निरोगी आहेत आणि हे बदल प्रमाणित जनुकीय तपासणीमध्ये सामान्यतः ओळखले जात नाहीत.
काही मुलांचा मृत्यू
कर्करोगाने ग्रस्त असलेल्या मुलांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी या वर्षी युरोपियन सोसायटी ऑफ ह्यूमन जेनेटिक्समध्ये चिंता व्यक्त केली. त्यावेळी ज्ञात असलेल्या ६७ मुलांपैकी त्यांना २३ मुलांमध्ये हे उत्परिवर्तन आढळले. त्यापैकी १० जणांना आधीच कर्करोगाचे निदान झाले होते. डॉक्टर व रुग्णांच्या मुलाखतींमधून हे समोर आले की, या दात्यापासून जास्त मुलांचा जन्म झाला आहे. हा आकडा किमान १९७ मुलांचा आहे; परंतु सर्व देशांकडून माहिती प्राप्त झाली नसल्याने ही संख्या वाढू शकते.
फ्रान्समधील रूएन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या कर्करोग जनुकशास्त्रज्ञ डॉ. एडविज कास्पर यांनी डेटा सादर केला. त्यांनी सांगितले, “अनेक मुलांना आधीच कर्करोग झाला आहे. काही मुलांना तर आधीच दोन वेगवेगळे कर्करोग झाले आहेत आणि त्यापैकी काहींचा खूप लवकर मृत्यू झाला आहे.” २०२० मध्ये या दात्याच्या शुक्राणूमुळे गर्भधारणा झालेल्या एका मुलाला या उत्परिवर्तनाचे निदान झाल्यावर ईएसबीला पहिल्यांदा सतर्क करण्यात आले होते. परंतु, बँकेने सुरुवातीला चाचणी नकारात्मक असल्याचे निष्कर्ष काढले आणि शुक्राणू पुन्हा बाजारात आणले. केवळ २०२३ मध्ये दुसऱ्या प्रकरणानंतर दात्याला कायमस्वरूपी या कार्यक्रमातून हटविण्यात आले.
जगभरात डोनरच्या शुक्राणूचा किती वेळा वापर केला जाऊ शकतो, याबाबत विशेष कायदा नाही. मात्र, प्रत्येक देश स्वतःची मर्यादा निश्चित करतो. ईएसबीने ७५ कुटुंबांची मर्यादा निश्चित केली होती; परंतु या तपासणीत असे आढळले की, या दात्याचे शुक्राणू ईएसबीच्या ७५ कुटुंबांच्या मर्यादेपेक्षा जास्त मुलांना जन्म देण्यासाठी वापरले गेले. त्यामुळे शुक्राणूदात्यांच्या आंतरराष्ट्रीय नियमन आणि ट्रॅकिंगच्या अभावाबाबत चिंता वाढली आहे. या आरोग्य केंद्रामध्ये ज्या पालकांनी उपचार घेतलेत, त्यांनी देशातील प्रजनन प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
