गेल्या महिन्यात झालेला एअर इंडियाचा विमान अपघात अजूनही लोक विसरू शकलेले नाहीत. त्या विमान अपघाताची भीती अजूनही लोकांमध्ये कायम आहे. अशा परिस्थितीत गोव्याहून पुण्याला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या एका विमानात हवाई प्रवासाबाबत लोकांची भीती वाढवणारी आणखी एक घटना घडली आहे. स्पाइसजेटच्या विमानातील केबिनच्या खिडकीची चौकट हवेतच निखळली. ही तांत्रिक समस्या नसली तरी ते लक्षात येताच विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही आणि विमान सुरक्षितपणे पुण्यात उतरले. परंतु, घाबरलेल्या प्रवाशांनी हा थरारक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे आणखी एकदा विमान प्रवास सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नक्की ही घटना काय होती? हवेतच विमानाची खिडकी तुटल्यास काय होऊ शकते? त्यामुळे विमानातील कर्मचाऱ्यांसह प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात का? आणि अशा परिस्थितीत नक्की काय घडते? त्याविषयी जाणून घेऊ…

स्पाइसजेटच्या फ्लाइटमध्ये काय घडले?

  • स्पाइसजेट फ्लाइट SG1080, बॉम्बार्डियर Q400 या विमानाने मंगळवारी (१ जुलै) संध्याकाळी गोव्याहून पुण्याकडे उड्डाण केले.
  • उड्डाणानंतर काही वेळातच एका प्रवाशाच्या लक्षात आले की, केबिनच्या खिडकीच्या आतील बाजूचा भाग सैल झाला आहे.
  • हा व्हिडीओ संबंधित प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट केला आणि काही वेळातच तो व्हायरल झाला.
  • या व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे की, खिडकीला असणारी एक प्लास्टिकची फ्रेम हवेत लटकत आहे. या प्लास्टिक फ्रेमला शेड ट्रिमदेखील म्हणतात.
स्पाइसजेट फ्लाइट SG1080, बॉम्बार्डियर Q400 या विमानाने मंगळवारी (१ जुलै) संध्याकाळी गोव्याहून पुण्याकडे उड्डाण केले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

विमानातील एका प्रवाशाने ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “मी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोव्याला गेलो होतो आणि गोव्याहून पुण्याला परत येत होतो. माझ्या मागे एक महिला तिच्या बाळाला घेऊन बसली होती. उड्डाणानंतर अर्ध्या तासाने तिच्या जवळची खिडकी अचानक बाहेर आली. तेव्हा ती महिला खूप घाबरली होती.” त्याने पुढे सांगितले, “एअर होस्टेस यांनी घाबरलेल्या प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या महिलेला आणि तिच्या मुलाला मागच्या बाजूला एका वेगळ्या सीटवर बसवले. विमानचालकाने खिडकी काही प्रमाणात दुरुस्त केली. परंतु अचानक हवेत बसणाऱ्या धक्यांमुळे खिडकी पुन्हा पडली असती, अशी या खिडकीची अवस्था होती.”

आणखी एका विमान प्रवाशाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA)ला टॅग करत विमानाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली. त्याने विमानात असताना लिहिले, “स्पाइसजेट आज (मंगळवार) गोव्याहून पुण्याला येत आहे. संपूर्ण आतील खिडकी बाहेर आली आहे. हे विमान आता उड्डाण करून पुन्हा जयपूरला जाणार आहे. विमान पुढे उड्डाण करू शकेल का? याबद्दल चिंता आहे,” असे या प्रवाशाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले.

यावर स्पाइसजेटने काय प्रतिसाद दिला?

स्पाइसजेट एअरलाइन्सने स्पष्टीकरण जारी केले आणि म्हटले की, सुरक्षिततेला कोणताही धोका नव्हता आणि केबिनमधील दबावामध्येदेखील कोणताही बदल झाला नव्हता. आपल्या अधिकृत निवेदनात स्पाइसजेटने स्पष्ट केले की, हे सैल पॅनेल एक ‘नॉन-स्ट्रक्चरल कॉस्मेटिक विंडो फ्रेम’ होती. त्याचा वापर केवळ प्रकाश रोखण्यासाठी केला जातो. केबिन प्रेशर किंवा विमानाच्या रचनेत याची भूमिका महत्त्वाची नसते, असेही त्यांनी सांगितले. “ही फ्रेम हवेत निखळल्याने कोणत्याही प्रकारे विमानाची सुरक्षितता धोक्यात आली नाही,” असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

स्पाइसजेट एअरलाइनने पुढे म्हटले की, विमान पुण्यात उतरल्यानंतर अभियंत्यांनी काही प्रोटोकॉलचे पालन केले, तपास केला आणि ही समस्या सोडवली. परंतु, स्पाइसजेटने तपासणीबद्दल किंवा जयपूरला पुढील टप्प्यासाठी प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी विमानाची पूर्ण तपासणी झाली की नाही याबद्दल कोणतीही अतिरिक्त माहिती दिली नाही.

विमानाची खिडकी हवेत तुटल्यास काय होऊ शकते?

स्पाइसजेटच्या घटनेत विमानाची खिडकी तुटली नव्हती. व्हायरल व्हिडीओत तुटलेली वस्तू खिडकी नसून कॉस्मेटिक पॅनेल होते. परंतु, या घटनेवरून उड्डाणादरम्यान खिडकीला तडे गेले, तर काय होईल, याबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. हे समजून घेण्यासाठी विमानाच्या खिडक्या कशा तयार केल्या जातात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. विमानाच्या खिडक्यांना सामान्यतः तीन लेयर असतात. बाह्य पॅनेल हा केबिनचा दाब धरून ठेवते, मधले पॅनेल हे बॅकअप म्हणून काम करते आणि आतील प्लास्टिकच्या पॅनेलला प्रवासी स्पर्श करू शकतात. स्पाइसजेटच्या विमानात दिसत असलेली वस्तू आतील प्लास्टिकच्या पॅनेलवर बसविण्यात आलेल्या कॉस्मेटिक ट्रिमचा भाग होती.

विमानात खिडकीबाहेरील भाग सर्वांत महत्त्वाचा असतो. विमान आकाशात वर जात असताना केबिनच्या बाहेरील हवेचा दाब लक्षणीयरीत्या कमी होतो. विमानाच्या आतील परिस्थिती सुरक्षित आणि श्वास घेण्यायोग्य ठेवण्यासाठी केबिनवर कृत्रिमरीत्या दबाव येतो. याचाच अर्थ असा की, बाहेरील खिडकी मोठ्या प्रमाणात दाब रोखून ठेवते. त्यामुळेच विमानातील खिडक्या अतिशय मजबूत असतात आणि त्या दृष्टिकोनातूनच त्या डिझाईन केल्या जातात.

खिडकीच्या बाहेरील पॅनेलला तडा गेल्यास लगेच त्याचा परिणाम केबिनमधील वातावरणात होऊ शकतो आणि केबिन डिप्रेशनसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. विमानाच्या आतील हवेत बाहेरील कमी दाबाचा परिणाम होतो. परिणामी ऑक्सिजनच्या पातळीत अचानक घट होऊ शकते. या परिस्थितीत हायपोक्सिया किंवा ऑक्सिजन कमतरतेची लक्षणे काही सेकंदांतच सुरू होऊ शकतात. त्यामुळे चक्कर येणे, गोंधळ निर्माण होणे किंवा अगदी काही लोक बेशुद्धदेखील होऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा परिस्थितीसाठी प्रत्येक उड्डाणापूर्वी सुरक्षा ब्रीफिंगमध्ये ऑक्सिजन मास्कचा उल्लेख केला जातो. या स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाल्यास विमानातील ऑक्सीजन मास्क उपयुक्त ठरतात. त्यामुळे प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत ऑक्सिजन मिळू शकतो. परंतु, सहसा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून वैमानिक विमानाचे उड्डाण कमी आणि सुरक्षित उंचीवरून करतात. त्या उंचीवरील हवेत पुरेसा ऑक्सिजन असतो. स्पाइसजेटच्या प्रकरणात यावेळी कोणतेही नुकसान झाले नाही; परंतु या घटनेने पुन्हा एकदा प्रवासी विमानातील सुरक्षा तपासणीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.