Uddhav Thackeray Shiv sena Split : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दोन मोठ्या फुटींना सामोरे जावे लागले. त्यातील पहिली फूट २०२२ मध्ये पडली; तर दुसरी फूट जून २०२६ मध्ये झाली. सलग बसलेल्या या राजकीय धक्क्यांमुळे ठाकरे गटाला आपले राजकीय असित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या चार वर्षांत शिवसेनेतील किती नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली? त्यामागची नेमकी कारणे काय होती? त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांचे बंड
२०२२ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना एकसंध शिवसेनेत बंड झाले होते. त्यावेळी ठाकरे यांचे अतिशय विश्वासू मानले जाणारे एकनाथ शिंदे पक्षातील ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघून गेले. त्यांच्याबरोबर १४ खासदारही गेल्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. परिणामी विधानसभेतील संख्याबळ कमी झाल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे शिंदे यांनी भाजपाशी हातमिळवणी करून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रिपद आपल्या पदरात पाडून घेतले. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे अनुक्रमे नऊ खासदार आणि २० आमदार निवडून आले होते. त्यातील सहा खासदारांना आपल्या गोटात खेचून आणण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ऑपरेशन टायगरची मोहीम राबवली.
एकनाथ शिंदेंचे ऑपरेशन टायगर
गेल्या महिन्यात ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंड पुकारत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामध्ये धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर, वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा समावेश होता. या सर्व खासदारांनी पक्ष सोडताना मतदारसंघातील विकासकामांचे कारणे दिली होती. या बंडखोर गटाकडून नाशिक खासदार राजाभाऊ वाजे यांनाही आपल्या गोटात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यांनी ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला उपस्थिती लावली आणि पक्षाबरोबरची आपली निष्ठा दाखवून दिली. त्या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय राऊत हेदेखील उपस्थित होते.
ठाकरे गटातील आमदारही फुटणार?
यादरम्यान फुटीर खासदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघात पक्षांचा मेळावा आणि सभाही घेतल्या; पण त्याचवेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निष्ठावान मानले जाणारे ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही अधिकृतपणे शिंदेसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांची बिनविरोध निवडही झाली. सध्या ठाकरे गटातील अनेक आमदारांसह नगरसेवकही आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदेसेनेतील नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. २०२२ पासून राज्यात शिंदे गटाचे राजकीय वर्चस्व वाढले असून ठाकरेंची शिवसेना खिळखिळी झाल्याचे दिसून येत आहे.
ठाकरे गटातील नगरसेवही शिंदेसेनेत
२०२२ मध्ये एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार आणि खासदारांसह अनेक नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची कास धरली. मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरे गटातील जवळपास ५५ विद्यमान नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्याशिवाय मागाठाणे परिसरातील दोन माजी नगरसेवकांसह काही लहान गटांनीही अलीकडेच शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. गेल्या चार वर्षांत धुळे, नवी मुंबई, पालघर आदी भागांतील शेकडो नगरसेवक, जिल्हाप्रमुख आणि युवासेनेचे पदाधिकारी यांनीही टप्प्याटप्प्याने शिंदे गटाची वाट धरली आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे गटासमोर मोठे राजकीय आव्हान निर्माण जाले आहे. सध्या पक्षांतर केलेल्या सहा लोकसभा खासदारांना तातडीने अपात्र ठरविण्याची औपचारिक मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे गटाचे प्रभावशाली नेते संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्याबाबतचे निवेदनही सादर केले आहे. पक्षातून फुटून गेलेल्या गटाला स्वतंत्र गट किंवा विलीनीकरणाची मान्यता देऊ नये, अशी मागणी त्यांनी लोकसभा सचिवालयाकडे केली आहे.
उद्धव ठाकरेंचा पक्ष कसा दुभंगत गेला?
१९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रावर या पक्षाने आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली. मराठी माणूस आणि भूमिपुत्रांना न्याय हाच शिवसेनेचा मुख्य अजेंडा होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावशाली नेतृत्वाच्या काळातही शिवसेनेला मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागला. १९९१ मध्ये मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी शिवसेनेत पहिले मोठे बंड केले. त्यावेळी पक्षातील जवळपास १८ आमदारांना घेऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर १९९९ मध्ये गणेश नाईक आणि २००५ साली नारायण राणे यांनीही शिवसेनेची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. लागोपाठ झालेल्या या बंडांमुळे शिवसेनेची अवस्था काहीशी खिळखिळी झाली होती; पण बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा पक्षाची मोट बांधण्याचे काम सुरू केले. मात्र, २००६ मध्ये बाळासाहेबांचे पुतणे व शिवसेनेचे अत्यंत लोकप्रिय नेते राज ठाकरे यांनी अंतर्गत मतभेदांमुळे शिवसेना सोडली आणि स्वतःचा ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) हा पक्ष स्थापन केला. हा शिवसेनेसाठी सर्वांत मोठा धक्का मानला गेला.
उद्धव यांनी पक्षाला कशी बळकटी दिली?
१७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. या धक्क्याने संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला होता. त्यानंतर पक्षाची पूर्ण धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. उद्धव यांनी शिवसेनेच्या आक्रमक शैलीला अधिक संयमी आणि संघटनात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांचे भाजपाबरोबरचे संबंध काहीसे ताणले गेले आणि शिवसेनेने विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला; मात्र निवडणुकीनंतर भाजपा – शिवसेनेत पुन्हा युती झाली आणि दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले. मात्र, २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेत पुन्हा दुरावा निर्माण झाला. तरीदेखील २०१९ मध्ये दोन्ही पक्षांनी विधानसभेची निवडणूक एकत्रित लढवली; पण मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपाबरोबरची युती तोडली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि या पदावर विराजमान होणारे ते ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती ठरले. करोना काळात ठाकरे यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत जबाबदारीने हाताळली; पण त्यानंतर २०२२ मध्ये झालेल्या बंडामुळे शिवसेनेची दोन गटात विभागणी झाली.
