नॅशनल पीपल्स पॉवर (एनपीपी) पक्षाचे नेते अनुरा कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. श्रीलंकेत २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सजीथ प्रेमदासा त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. त्यांच्यापेक्षा अनुरा कुमारा दिसानायके यांना १.२७ दशलक्षपेक्षा (१२.७ लाख) अधिक मते मिळाली. एकेडी म्हणून प्रसिद्ध असलेले, डाव्या विचारसरणीचे नेते अनुरा कुमारा दिसानायके जनता विमुक्ती पेरामुना (जेवीपी) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा पक्ष यापूर्वी श्रीलंकेत भारतविरोधी भावना भडकावण्यासाठी ओळखला जायचा. श्रीलंकेत कठोर डाव्या धोरणांचा पुरस्कार करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. अनुरा कुमारा दिसानायके कोण आहेत? त्यांच्यामुळे भारत-श्रीलंकेच्या संबंधांवर परिणाम होणार का? त्याविषयी जाणून घेऊ.

अनुरा कुमारा दिसानायके कोण आहेत?

अनुरा कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत परिवर्तनाचा उमेदवार म्हणून स्वतःचा प्रचार केला. अनुराधापुरा जिल्ह्यातील थम्बुटेगामा येथे नोव्हेंबर १९६८ साली त्यांचा जन्म झाला. ते स्वतःचे वर्णन ‘कामगारवर्गीय पालकांचा’ पुत्र म्हणून करतात. मार्क्सवादी-लेनिनवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके हे महाविद्यालयीन काळात विद्यार्थी राजकारणाचाही भाग होते. १९८७ मध्ये सरकारविरोधी बंडाच्या वेळी ते जेवीपीमध्ये सामील झाले. अनुरा कुमारा दिसानायके २००१ मध्ये पहिल्यांदा संसदेत निवडून आले होते. २०१९ मध्ये त्यांना ‘जेवीपी’मध्ये अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली. परंतु, गेल्या निवडणुकीत त्यांना केवळ ३.२ टक्के मते मिळाली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
अनुरा कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत परिवर्तनाचा उमेदवार म्हणून स्वतःचा प्रचार केला. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : One Nation, One Election: भारतात याआधी एकत्रित निवडणुका कधी झाल्या? एक देश एक निवडणुकीचे चक्र कोणी मोडले?

‘द वीक’नुसार, २०२२ च्या अरागालय चळवळीतील त्यांच्या नेतृत्वाच्या भूमिकेमुळे श्रीलंकेत त्यांची लोकप्रियता वाढली. आर्थिक संकटाच्या निषेधार्थ झालेल्या चळवळीमुळे तत्कालीन अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा दिला होता. दिसानायके यांनी कधी त्याचे श्रेय घेतले नाही. भ्रष्टाचारविरोधी नेता म्हणून त्यांनी श्रीलंकेत एक ओळख निर्माण केली. श्रीलंकेत सुशासन आणि भ्रष्टाचारविरोधी कठोर उपाययोजनांचे आश्वासनही त्यांनी श्रीलंकेच्या प्रचारात मतदारांना दिले होते. आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) बरोबर केलेला करार पुढे चालू ठेवण्याचेही त्यांनी वचन दिले. “आयएमएफ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे, त्यामुळेच आम्ही आयएमएफबरोबर पुन्हा वाटाघाटी करण्यासाठी जनतेकडून सहकार्य मागत आहोत. देशात दीर्घकालीन स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी हळूहळू आवश्यक बदल करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे एकेडी यांनी ‘द वीक’ला सांगितले. एकेडी आता श्रीलंकेचे पहिले कम्युनिस्ट अध्यक्ष ठरले आहेत.

एकेडी यांच्या विजयाचा भारतावर काय परिणाम होणार?

एकेडी हे चीनच्या जवळचे मानले जातात. चीन श्रीलंकेत आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीलंकेने याआधीच धोरणात्मक हंबनटोटा बंदर ९९ वर्षांच्या लीजवर बीजिंगला दिले आहे. डेक्कन हेराल्ड (डीडब्ल्यू)शी बोलताना, दीर्घकाळ श्रीलंकेवर नजर ठेवणारे आर. भगवान सिंग म्हणाले की, निवडणुकीत एकेडी यांचा विजय हा भारतासाठी आव्हान आहे. १९८७ मध्ये इंडियन पीसकीपिंग फोर्स (आयपीकेएफ) विरुद्ध जेवीपीच्या बंडखोरीदरम्यान एकेडी सुप्रसिद्ध झाले. त्यांचा पक्ष, जेवीपीने तत्कालीन श्रीलंकेचे अध्यक्ष जे. आर. जयवर्धने आणि भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वाक्षरी केलेल्या १९८७ च्या भारत-श्रीलंका कराराला विरोध केला. तमिळनाडूशी भौगोलिक जवळीक असल्यामुळे श्रीलंका भारतासाठी महत्त्वाचा आहे. या देशात तमिळ लोकांची लक्षणीय संख्या आहे. त्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ११ टक्के आहे.

एकेडी हे चीनच्या जवळचे मानले जातात. (छायाचित्र-पीटीआय)

जेव्हीपी पक्षाने अनेकदा भारतातून श्रीलंकेत गेलेल्या तमिळ वंशाच्या लोकांचा विरोध केला आहे. भारत १३वी घटनादुरुस्ती लागू करण्यासाठी श्रीलंकेवर दबाव आणत आहे. श्रीलंका राज्यघटनेतील ही एक तरतूद आहे, जी तमिळ लोकांबरोबर राजकीय शक्ती सामायिक करण्याशी संबंधित आहे. ‘द ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, श्रीलंकेतील तमिळांना चिंता आहे की दिसानायके १३ वी दुरुस्ती रद्द करू शकतात. भारत श्रीलंकेचा मित्र आहे, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी भारताने श्रीलंकेला चार अब्ज डॉलर्सची मदत केली. त्यानंतर श्रीलंकेत प्रलंबित असलेले अनेक भारतीय प्रकल्प सुरू करण्यात आले. आता अशी भीती आहे की, एकेडी अध्यक्ष पदावर कार्यरत झाल्यामुळे देशातील काही भारतीय समूहांच्या प्रकल्पांना धोका निर्माण होऊ शकतो. “पुढील एक वर्ष महत्त्वपूर्ण आहे आणि जर अनुराने श्रीलंकेत आपले स्थान मजबूत केले तर ते केवळ चीनच्या फायद्याचे असेल,” असे श्रीलंका निरीक्षक सिंग यांनी ‘डीडब्ल्यू’ला सांगितले.

एकेडी भारताकडे दुर्लक्ष करू शकतात का?

एकेडी भारताकडे दुर्लक्ष करू शकतात, असे संकेत सध्या तरी नाही. भूतकाळातील त्यांच्या पक्षाची भारतविरोधी भूमिका आणि चीन समर्थक झुकाव असूनही, एकेडीने भारताशी संलग्न होण्यास उत्सुकता दाखवली आहे. त्यांनी भारतविरोधी विधाने कमी केली आहेत आणि श्रीलंकेचे सार्वभौमत्व व हितसंबंध सुनिश्चित करण्यासाठी भारताशी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या आवश्यकतेबद्दलही ते बोलले आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये एकेडी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. त्यावेळी भारताने दिसानायके यांना आमंत्रित केले होते. एका भारतीय अधिकाऱ्याने फ्रंटलाइनला सांगितले की, भारत दिसानायकेबरोबर हितसंबंध मजबूत करू शकतो.

हेही वाचा : Tupperware bankruptcy: अमेरिकन महिलांमुळे टपरवेअरचे नाव पोहोचले सर्वतोमुखी; त्यामागची गोष्ट जाणून घ्या

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या चीनबाबतच्या हालचालीवर भारताचे लक्ष असेल. भारताने श्रीलंकेशी केवळ हिंद महासागरातील आपल्या धोरणात्मक हितसंबंधांमुळेच नाही तर श्रीलंकेतील तमिळ लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीही मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची गरज आहे. एकेडीला भारताच्या हितसंबंधाचे महत्त्व आहे. मात्र, विश्वासाची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांच्याकडून आणखी पावले उचलण्याची गरज आहे.

Story img Loader