दोनच दिवसांपूर्वी दहावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. गणित आणि विज्ञानाच्या ‘ट्युशन’ची धावपळ करणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मराठीचा अभ्यास म्हणजे ‘आदल्या रात्री’ उरकायची गोष्ट झाली आहे. यंदा तब्बल ९४,००० विद्यार्थी मराठी विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत. मराठी विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा हा आकडा केवळ शैक्षणिक घसरण नाही तर, मराठी संस्कृतीच्या घसरणीच्या धोक्याची घंटा आहे. या विषयाप्रती विद्यार्थ्यांचा हलगर्जीपणा आता त्यांच्या निकालावरही परिणाम करू लागला आहे. स्पर्धेच्या युगात ‘SCORING SUBJECT’कडे अधिक लक्ष देण्याच्या प्रवृत्तीमुळे भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ परीक्षेपुरता मर्यादित झाला असून, त्यातील सौंदर्य, विचार आणि अभिव्यक्ती या गोष्टी मागे पडल्या आहेत.
इंग्रजी माध्यमाचा वाढता प्रभाव आणि घरातून कमी होत चाललेले भाषिक वातावरण यामुळे आजचा विद्यार्थी मराठी भाषेच्या बाबतीत एका विलक्षण ‘भाषिक पोकळीत’ उभा आहे. निकालानंतरच्या या परिस्थितीत विद्यार्थ्याला स्वतःचे विचार स्वतंत्रपणे मराठीत मांडता येतात का, त्याचे अवांतर वाचन किती आहे आणि तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेचे स्थान काय, या मूलभूत प्रश्नांकडे आपण गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. या निकालाच्या बाबतीत अनेक कारणे तज्ज्ञांनी सांगितली असून त्याविषयी सविस्तर विचार करूयात:
- अभ्यासाचा चुकीचा दृष्टिकोन
अनेकदा विद्यार्थ्यांच्या मनात गणित आणि विज्ञानासारख्या वस्तुनिष्ठ विषयांच्या बाबतीत मनात भीती दडलेली असते. त्यातील संकल्पना आणि तंत्र समजून घ्यायला कठीण जात असल्यामुळे अनेक विद्यार्थी प्रामुख्याने या दोन विषयांसाठी वर्षभर ट्युशनची धावपळ करतात आणि त्यांचे पालकही याला प्रोत्साहन देतात. आजच्या पालकांमध्ये एक विचित्र विरोधाभास दिसतो. आपलं मुल इंग्रजी फाडफाड बोलतंय याचा त्यांना अभिमान वाटतो, पण त्याला धड मराठी वाचता येत नाही याविषयी अस्वस्थता नसते. मराठी ही मातृभाषा आहे, ती येईलच या अतिआत्मविश्वासामुळे तिचा अभ्यास करणे ही आदल्या दिवशीची बाब समजली जाते. अनेक विद्यार्थी मराठीच्या उत्तरांचे पाठांतर करून परीक्षा देतात. यामध्ये अनेकदा ‘digest’ मधले उपयोजित मराठीचे निबंध जसेच्या तसे छापलेले दिसतात, पण यामुळे भाषेचे आकलन होत नाही. संज्ञा पाठ केल्या जाऊ शकतात, पण संकल्पना समजून घेण्याकडे दुर्लक्ष केले जाते.
- अभिव्यक्तीला मर्यादा
अनेकांकडून या घसरलेल्या निकालाचे खापर ‘बदललेल्या प्रश्नपत्रिकेवर’ (कृतिपत्रिका) फोडले जात असले, तरी मुळात या घसरणीमागे अनेक कारणे आहेत. मर्यादित शब्दसंग्रहामुळे आणि मराठी व्याकरणाच्या नियमांचे अज्ञान यामुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला मर्यादा येतात. केवळ ‘गाईड्स’ आणि ‘नोट्स’च्या आधारे अभ्यास करणाऱ्या या पिढीची विचारप्रक्रिया विकसित झालेली नाही. बऱ्याचदा त्यांच्या लेखनामध्ये सुसंगती आणि संवेदनात्मकतेचा अभाव दिसतो.
मुलांच्या हातात पुस्तकांऐवजी मोबाईलची स्क्रीन आल्यामुळे त्यांची दीर्घकाळ वाचण्याची क्षमता संपत चालली आहे. एका ‘search engine’च्या क्लिकवर सेकंदांमध्ये उपलब्ध होणारी माहिती यामुळे साहित्यातील आशय आणि सौंदर्य समजून घेण्याइतका संयम विद्यार्थ्यांकडे उरलेला नाही. परिणामी, त्यांच्या लेखनात सखोलपणा आणि संवेदनात्मकतेचा अभाव जाणवतो.
- वेळेचे नियोजन
विद्यार्थ्यांना उपयोजित मराठीचे प्रश्न वेळेत सोडवणे कठीण जाते त्यामुळे ते प्रश्न अपूर्ण राहतात. मुळात लिखाणाचा सराव नसल्यामुळे आणि भाषेच्या प्रश्नपत्रिकेचा आवाका दीर्घ असल्यामुळे भाषेच्या परीक्षा अनेकदा अर्धवट सुटतात. याचबरोबर, प्रश्नपत्रिकेतील सर्वाधिक मूल्यांकन उपयोजित मराठीचे असल्याने विद्यार्थ्यांचे गुण कमी होतात.
- भाषिक सरमिसळ
तंत्रज्ञानाच्या युगात, टेक्स्टिंग करताना मराठी शब्दांसाठी रोमन लिपीचा (लिप्यांतर) वापर वाढला आहे. यामुळे शुद्धलेखन आणि प्रमाण भाषेचा विसर पडत असून, उत्तरपत्रिकेत अनेकदा अनौपचारिक भाषेत लेखन केलेले आढळते. घरात कितपत मराठी भाषेचा वापर केला जातो यावरून मुलांच्या लिखाणातील मराठी शब्दांच्या वापराचा अंदाज लावता येतो. साध्या साध्या शब्दांना पर्यायी शब्द न सुचणे, ही आजच्या पिढीची मोठी समस्या आहे.
मराठी अध्यापन- पद्धती आणि शिक्षकांचा दृष्टिकोन
आजही मराठी शिकवताना जुन्या, पारंपरिक पद्धतीचाच वापर केला जातो. कविता शिकवताना, त्यातील आशय सांगण्याऐवजी शब्दशः अर्थ स्पष्ट करण्याकडे अधिक कल असतो. त्यातील भाषक घटक समजण्यात हे विद्यार्थी मागे पडतात त्यामुळे हा विषय रटाळ वाटू लागतो. अनेकदा मराठी शिक्षकांचा या विषयाकडील कल परीक्षेपुरता मर्यादित दिसतो. परीक्षेसाठी गरजेचे प्रश्न तयार करून ते उत्तीर्ण होतील असा ‘शॉर्टकट’ घेतला जातो.
इतर विषयासाठी explainer videos, podcasts उपलब्ध असतात. मराठी विषयांवरही अशा काही चित्रफिती तयार केल्या जातात पण त्याचे प्रमाण कमी आहे. विषय शिकवताना दृश्यात्मक मांडणी मुलांना अधिक समजायला आणि लक्षात राहायला सोपी असते. त्याचा वापर मराठीचे शिक्षक क्वचित करतात.
अनेकदा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी शिक्षकांना दुय्यम वागणूक दिली जाते किंवा तशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाल्यामुळे याचा परिणाम त्यांच्या शिकवण्याच्या उत्साहावर होतो. शिक्षकाचा स्वतःचा कल उत्साही नसेल तर विद्यार्थ्यांमध्ये भाषेबद्दल प्रेम कसे निर्माण करणार, ही महत्त्वाची त्रुटी आहे.
भाषा हा आपल्या जगण्याचा आणि अस्तित्वाचा मूलभूत घटक आहे. वर्गातल्या चार चौकटीत बसून भाषेच्या उत्तरांचे पाठांतर करता येऊ शकते, मात्र त्या भाषेचे सौंदर्य त्यातील भाषिक घटकांमधून आणि त्यातील बांधणींमधून उलगडत जाते, मराठी भाषेसंबंधी कार्यक्रम, कार्यशाळा, भाषिक खेळ किंवा ग्रंथभेट या विविध उपक्रमांमधून मुलांच्या मनात मराठी भाषेविषयी आदर आणि गोडी लागू शकते. मात्र या उपक्रमांचा अभाव शालेय शिक्षणात प्रकर्षाने जाणवतो.
१० वी २०२५-२०२६ च्या निकालाची आकडेवारी:

तज्ज्ञांचे मत:
निकालाच्या या आकडेवारीवर भाष्य करताना शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी मराठीच्या मुळाशी असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे:
भाषेचे कुपोषण आणि सामाजिक वास्तव:
या निकालाकडे केवळ गुणांची घसरण या अनुषंगाने न पाहता एका मोठया संकटाचे लक्षण म्हणून पहिले पाहिजे असे मत मराठी अभ्यास केंद्राचे संचालक, प्रा. दीपक पवार यांनी व्यक्त केले. ते सांगतात, “ही मातृभाषेच्या नुकसानीची लक्षणं आहेत. हे केवळ एका परीक्षेचं अपयश नाही, तर हे भाषिक कुपोषण आहे.”
मराठी व्याकरणाचे ज्येष्ठ अभ्यासक, प्रकाश परब यांनी सांगितले की “प्रथम भाषेतील भाषिक क्षमता कमी होणे ही भाषेच्या भवितव्याच्या दृष्टीने फार वाईट गोष्ट आहे. जर तरुण पिढीमध्ये ही क्षमता कमी झाली तर पुढच्या १० वर्षांत भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल.”रुपारेल महाविद्यालयातील अध्यापिका, डॉ. अनघा मांडवकर आपले मत मांडताना सांगतात, “भाषा आधी कुटुंबात आणि मग शिक्षण व्यवस्थेत शिकली जाते. आता घरीदारी सगळं वातावरण बदलतंय. मराठी भाषक कुटुंबातील मुलं मराठी विषय घेतायत आणि तरीही त्यांना ते जमत नाहीये, हे भाषिक कुपोषणाचेच लक्षण आहे.”
अभ्यासाचा दृष्टिकोन: ‘प्रतिष्ठा’ विरुद्ध ‘परीक्षा’
मराठीला दुय्यम स्थान देण्याच्या मानसिकतेवर तज्ज्ञांनी प्रहार केला आहे-
प्रा. दीपक पवार सांगतात, “मराठी माध्यमाच्या शाळांकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. सरकारचं सगळं लक्ष फक्त इंग्रजी शाळांकडे आहे आणि मराठी शाळांना वाऱ्यावर सोडलं गेलं आहे.”
प्रकाश परब म्हणतात, “पालकांना वाटते मुलाला इंग्लिश आले पाहिजे, एबीसीडी आली पाहिजे. मराठी आपलीच आहे, ती येईलच, असा एक समज असतो. मातृभाषा आहे म्हणून काय अभ्यास करायचा, असाही एक दृष्टिकोन असतो.”
डॉ. अनघा मांडवकर यांनी सांगितले, “मराठी समाजाला, मराठी कुटुंबांना, त्यातल्या आई-वडिलांना मराठी ही प्रतिष्ठेची भाषा वाटत नाही… शिक्षण क्षेत्रातही त्यांनी इंग्लिश शिकावं फ्रेंच शिकावं, जपानी शिकावं पण मराठी कशाला? मराठी तर आहेच ना आणि त्यातून काय मिळणार, असं वाटणारा एक मोठा वर्ग आहे.”
शैक्षणिक त्रुटी आणि पाठांतराचा रट्टा:
शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धतीत दोष असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले आहे-
प्रा. दीपक पवार म्हणाले, “शिक्षकांना शिकवू दिलं जात नाही. जनगणनेपासून ते इतर सर्व अशैक्षणिक कामांमध्ये मराठी शिक्षकांना अडकवून ठेवलं जातं. मग त्यांनी वर्गात जाऊन मुलांना भाषेची गोडी कशी लावायची?”प्रकाश परब यांच्या मते, “ही घसरण केवळ १० वीची नाही, तर ही पहिलीपासूनची प्रक्रिया आहे. तिसरी-चौथीच्या मुलांना मराठी वाचता येत नाही, असेही अहवाल आहेत. आठवीपर्यंत कोणालाही नापास न केल्यामुळे हा ‘बॅकलॉग’ दहावीत उघड पडतो. ही दहावीच्या मागील दोन वर्षांची समस्या नसून शालेय शिक्षणातील मराठीच्या अध्ययनाचा प्रश्न आहे.”
डॉ. अनघा मांडवकर यांच्यामते, “शाळांमध्ये ‘गप्प बसा’ संस्कृती असते. शिक्षक जे लिहून देतील तेवढं पाठ करा, परीक्षेपुरतं तेवढं आवश्यक आहे असं सांगितलं जातं. भाषेची गोडी लावण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न केले जातात? ‘इतना रट्टा मारो और लिखा दो’ ही पद्धत मुलांच्या भाषिक क्षमता मारून टाकते.”
शासनाकडे केलेली मागणी:
प्रा. दीपक पवार यांनी सांगितले, “या निकालाच्या घसरणीची कारणं शोधण्यासाठी शासनानं तातडीने एका तज्ज्ञ समितीची किंवा अभ्यास गटाची नेमणूक करायला हवी.” ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रकाश परब यांनीही या मागणीस पाठिंबा व्यक्त केला. डॉ. अनघा मांडवकर यांनी सांगितले की, “एनसीआरटी किंवा बालभारती सारख्या यंत्रणांनी पहिलीपासूनच्या मराठी शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरं ठेवली पाहिजेत. व्याकरण कसं शिकवायचं आणि मुलांकडून लिखाणाचा सराव कसा करून घ्यायचा, याचे अधिकृत मार्गदर्शन शासनाने शिक्षकांना उपलब्ध करून द्यायला हवे.”
दहावीच्या निकालातील मराठी विषयाची आकडेवारी ही केवळ गुणांची घसरण नसून आपल्या भाषिक जागरूकतेची धोक्याची घंटा आहे. विद्यार्थी मराठीत उत्तीर्ण होत असले तरी, त्यांच्यातील भाषिक समृद्धी आणि अभिव्यक्तीची क्षमता कमी होत चालली आहे, याला तज्ज्ञांनी ‘भाषिक कुपोषण’ असे म्हटले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी पालकांनी मराठीला उपजीविकेचे (career) साधन म्हणून आणि व्यक्तिमत्व विकासाचा पाया म्हणून स्वीकार करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, शिक्षकांनी पाठांतराच्या रट्ट्याऐवजी आधुनिक डिजिटल साधनांचा वापर करून मुलांमध्ये भाषेची गोडी निर्माण करावी आणि शासनानेही मराठी शाळांमधील त्रुटी दूर करण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. जोपर्यंत आपण मराठीला आपल्या दैनंदिन व्यवहारात आणि प्रतिष्ठेचे स्थान देऊन ती अभिमानाने ‘जगायची’ भाषा करत नाही, तोवर मराठीचा प्रश्न सुटणार नाही!
