St Francis Xavier Controversy: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी युट्यूबर गौतम खट्टर याला हिमाचल प्रदेशमध्ये अटक करण्यात आली. गौतम खट्टर याला रविवारी (एप्रिल २६) गोवा पोलिसांनी ताब्यात घेऊन ‘ट्रान्झिट रिमांड’वर गोव्यात आणले. गौतम खट्टर याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर गोव्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. १८ एप्रिल रोजी मोरमुगाव येथील सनातन धर्म रक्षा समितीने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात गोव्याचे वाहतूक मंत्री मावीन गोदिन्हो आणि भाजपाचे आमदार संकल्प आमोणकर व कृष्णा साळकर हे उपस्थित होते. याच कार्यक्रमात खट्टरने वादग्रस्त वक्तव्य करत वादाला तोंड फोडले.
नेमके प्रकरण काय आहे?
गौतम खट्टरच्या सोशल मीडिया प्रोफाइलनुसार तो सनातन महासंघ या संघटनेचा संस्थापक आणि “अध्यात्मिक क्षेत्रातील पत्रकार” असल्याचे म्हटले आहे. साउथ गोवामधील व्हास्को येथे ‘भगवान परशुराम जन्मोत्सवा’च्या कार्यक्रमात खट्टरने वादग्रस्त वक्तव्य केले. खट्टरचे वादग्रस्त भाषण सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. त्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. आंदोलकांनी मोर्चे काढून गोव्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांसमोर निदर्शने केली. धार्मिक भावना तसेच सामाजिक सलोखा बिघडवल्याप्रकरणी युट्यूबर खट्टरला तात्काळ अटक करा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
खट्टर उपस्थित होता, तो कार्यक्रम सनातन धर्म रक्षा समितीने आयोजित केला होता. समितीने खट्टरच्या विधानांपासून फारकत घेत जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. “सनातन धर्मावर बोलण्यासाठी त्याला आमंत्रित केले होते. संतांविषयी वादग्रस्त विधान करण्यासाठी त्याला आमंत्रित केले नव्हते. खट्टरने व्यक्त केलेले मत हे त्याचे वैयक्तिक आहे. त्याने व्यक्त केलेले मत आयोजनकर्त्यांचे नाही. गोव्यातील बंधु आणि भगिनींची आम्ही मनापासून माफी मागतो”, असे सनातन धर्म रक्षा समितीने म्हटले आहे.
गोवा आणि दमणच्या आर्चडायोसीसने (आर्चबिशपच्या अधिकाराखालील धर्मप्रांत) याबाबत एक निवेदन जारी केले आहे. गोव्यातील कॅथलिक चर्चने या घटनेबद्दल तीव्र दुःख आणि संताप व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले आहे. असत्य व द्वेष निर्माण करणारे तसेच फूट पाडणारे वक्तव्य करून गोव्यातील लाखो नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल सर्व धर्मातील लोकांना आदर आहे. सर्वांना शांत राहण्याचे तसेच संयम बाळगण्याचे आम्ही आवाहन करतो, असे निवेदनात नमूद आहे. गोव्यातील सर्वच राजकीय पक्षांनी खट्टर यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधारी भाजपा, काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांनी खट्टर यांच्या विधानाचा निषेध केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. “सामाजिक सौहार्द बाहेरील लोक बिघडवू शकत नाहीत”, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
सेंट फ्रान्सिस झेवियर कोण आहेत? त्यांचा गोव्याशी संबंध कसा?
सेंट फ्रान्सिस झेवियर हे एक संत होते. त्यांना गोव्यात ‘गोंयचो सायब’ म्हणजेच गोव्याचे ईश्वर म्हणूनही ओळखले जाते. सेंट फ्रान्सिस झेवियर हे स्पॅनिश जेसुएट मिशनरी होते. ते ‘द सोसायटी ऑफ जीजस’चे संस्थापक सदस्यांपैकी एक होते. जुन्या गोव्यातील बासिलिका ऑफ बॉम जीसस या चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस यांच्या पार्थिवाचे अवशेष १६२४ मध्ये ठेवण्यात आले आहेत. गोव्यात पोर्तुगीजांची वसाहत असताना १५४२ मध्ये सेंट फ्रान्सिस हे गोव्यात आले. सोळाव्या शतकाच्या सुरूवातीला गोव्यात आलेल्या पोर्तुगीजांमध्ये ख्रिस्ती धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी किंग जॉन तृतीयने सेंट फ्रान्सिस यांना पाठवले होते. १५५२ मध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे चीनच्या किनारपट्टीवरील शांगचुआन बेटावर निधन झाले. या बेटावरच त्यांना दफन करण्यात आले होते.
१५५३ मध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पार्थिव बाहेर काढून त्यावेळच्या मलाक्का म्हणजेच आजच्या मलेशियात नेण्यात आले. मलेशियातील सेंट पॉलमध्ये त्यांचे पार्थिव काही महिने ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव १५५४ मध्ये गोव्याला पाठवण्यात आले. जुन्या गोव्यातील सेंट पॉल कॉलेजमध्ये ते ठेवण्यात आले. जेसुएट मिशनरींनी गोव्यात बांधलेली सेंट पॉल कॉलेज ही पहिली इमारत होती. १६१३ च्या सुमारास सेंट फ्रान्सिस यांचे पार्थिव बासिलिका जवळील कासा प्रोफेसा येथे हलवण्यात आले. १६२४ मध्ये ते जुन्या गोव्यातील बासिलिका येथे ठेवण्यात आले.
दर दहा वर्षांतून एकदा गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पार्थिवाचे पवित्र अवशेष बाहेर काढले जातात. त्यावेळी सर्व धर्मांचे श्रद्धाळू, विशेषतः कॅथोलिक समुदायातील लोक आणि पर्यटक आदरांजली वाहण्यासाठी येतात. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस (Basilica of Bom Jesus) येथील थडग्यात असलेल्या चारशे वर्षे जुन्या चांदीच्या आणि काचेच्या पेटीला खाली उतरवले जाते, त्या पेटीत सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अस्थी ठेवलेल्या असतात. त्यानंतर हे अवशेष ‘से कॅथेड्रल’ येथे नेले जातात. तिथे ते ४५ दिवसांसाठी भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवले जातात. सेंट फ्रान्सिस यांचे पार्थिव बाहेर काढल्यानंतरही ते “अतिशय सुस्थितीत” असल्याचे आणि त्यावर कुजल्याच्या खुणा अगदी नगण्य असल्याचे दिसून येते. कॅथलिक समुदायाच्या श्रद्धाळूंमध्ये ही बाब एका “चमत्काराचे” प्रतीक मानली जाते.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत यापूर्वीही वादग्रस्त विधान
गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये एक वक्तव्य केले होते. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पार्थिवाची “डीएनए टेस्ट” करावी, असे वेलिंगकर म्हणाले होते. त्यानंतर गोव्यात मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. वेलिंगकर यांच्याविरोधात एफआयआर नोंद करण्यात आला. धार्मिक भावना दुखावल्याचा तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडवल्याप्रकरणी वेलिंगकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, वेलिंगकर यांनी एका श्रीलंकन पत्रकाराचा दाखला देत “डीएनए टेस्ट” करण्याची मागणी केली होती.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पार्थिव बदलण्यात आले का?
वेलिंगकर यांनी श्रीलंकन पत्रकाराचा दाखला देत सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची “डीएनए चाचणी” करण्याची मागणी केली होती. श्रीलंकन पत्रकाराच्या मते, ज्या बेटावर सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे निधन झाले, त्याच बेटावरून त्यांचा मृतदेह जहाजाने नेला जात असताना समुद्रात हरवला. त्यानंतर १५ व्या शतकात पोर्तुगीजांनी बौद्ध भिक्षू थोटागामुवे श्री राहुला थेरा यांच्या मृतदेहाला झेवियर यांचा मृतदेह असल्याचे मानले, असे श्रीलंकन पत्रकाराने म्हटल्याचे वेलिंगकर म्हणाले होते. श्रीलंकेने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या मृतदेहाची मागणी केल्याचेही सांगण्यात आले होते. पोर्तुगीजांच्या काळात सेंट फ्रान्सिस झेवियर यांनीच गोव्यात इन्क्विझिशन (धर्मन्यायालय, इतर धर्मियांवर अन्याय करणारे) आणले, त्यामुळे “गोंयचो सायब” ही पदवी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याऐवजी भगवान परशुराम यांना द्यावी, अशी मागणी वेलिंगकर यांनी केली होती.
