Stanford University meal plan controversy स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील एका पॉलीसीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका पदवीपूर्व विद्यार्थ्याने एक लेख लिहिला आहे. या लेखामुळेच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्टॅनफोर्डमध्ये शिक्षण घेणाऱ्या सेबॅस्टियन कॉनोली याने दावा केला आहे की, काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा सक्तीचा ‘मील प्लॅन’ टाळण्यासाठी आपण जैन धर्माचे अनुयायी असल्याचा खोटा दावा केला आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी या मील प्लॅनची किंमत तब्बल ७.१७ लाख रुपये इतकी आहे.
‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, कॉनोलीने आपल्या लेखात म्हटले आहे की, यावरून विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गैरवर्तन होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. विद्यार्थी विद्यापीठाचे नियम आणि यंत्रणांना बगल देण्याचे मार्ग एकमेकांना सांगत आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने या बातमीवर अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही; मात्र ती फेटाळलेलीही नाही. हा नेमका प्रकार काय आहे? सात लाख रुपयांच्या ‘मील प्लॅन’ने वाद का निर्माण झाला? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
नेमके आरोप काय?
कॉनोलीने आपल्या लेखात दावा केला आहे की, तो अशा काही विद्यार्थ्यांना ओळखतो, जे स्टॅनफोर्डमध्ये जेवणाच्या अटींशी तडजोड करण्यासाठी मुद्दाम जैन असल्याचे नाटक करत आहेत. कॉनोलीने पुढे नमूद केले की, हे विद्यार्थी त्यांच्या ‘मील प्लॅन’चे पैसे ‘होल फूड्स’सारख्या कॅम्पसबाहेरील स्टोअर्समध्ये खर्च करतात. त्यांच्या मते, तिथे कॅम्पसच्या डायनिंग हॉलपेक्षा अधिक चांगले पर्याय उपलब्ध असतात. त्याने पुढे स्पष्ट केले की, हे दावे वैयक्तिक संवाद, निरीक्षणे आणि इतर विद्यार्थ्यांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ कोणतीही अधिकृत आकडेवारी किंवा संस्थात्मक डेटा उपलब्ध नाही.
स्टॅनफोर्डची ‘मील पॉलिसी’ काय आहे?
विद्यापीठाच्या वेबसाइटनुसार, स्टॅनफोर्डमध्ये कॅम्पसमध्ये राहणाऱ्या बहुतेक पदवीपूर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या मील प्लॅनमध्ये नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. विद्यापीठ धार्मिक किंवा वैद्यकीय कारणास्तव यातून सूट देते. परंतु, किती जणांना अशी सवलत दिली जाते, त्यांचे पुनरावलोकन कसे केले जाते किंवा नियम मोडल्यास अधिकृत चौकशी केली जाते का, याबद्दल विद्यापीठ कोणतीही माहिती उघड करत नाही.
जैन आहार
जैन हा असा धर्म आहे, जो प्राण्यांना इजा न पोहोचवण्यासाठी कठोर आहार नियमांचे पालन करतो. त्यामध्ये मांस, अंडी, कांदा, लसूण व बटाट्यांसारख्या कंदमुळांचाही त्याग केला जातो. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, या आहारविषयक निर्बंधांमुळे स्टॅनफोर्डसह अमेरिकेतील अनेक विद्यापीठे धार्मिक कारणास्तव जैन विद्यार्थ्यांना सवलत देतात. कॅम्पसमधील भोजन व्यवस्था या गरजा पूर्ण करण्यास असमर्थ असल्याने ही सवलत दिली जाते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना मील प्लॅनमधून बाहेर पडण्याची परवानगी दिली जाऊ शकते आणि ते त्यांचे पैसे इतरत्र खर्च करू शकतात.
विद्यार्थी फायदे मिळवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारे खोटे बोलत आहेत?
सिस्टीमचा गैरफायदा घेण्यासाठी विद्यार्थी आपल्या धार्मिक श्रद्धेबद्दल खोटे बोलत असल्याचे या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे. लेखात पुढे स्टॅनफोर्डच्या विद्यार्थ्याने अशा विद्यार्थ्यांवरही प्रकाश टाकला आहे, जे अपंग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठीही खोटे बोलत आहेत. कॉलेजमध्ये ‘सिंगल रूम’ची सुविधा मिळवण्यासाठी अपंग असल्याचाही देखावा केला जात असल्याचे त्याने नमूद केले आहे.
जॉन्सन नावाच्या एका विद्यार्थिनीने म्हटले आहे की, तिच्या एका मैत्रिणीला कोणतेही अपंगत्व नसतानाही, तिने ‘ऑफिस ऑफ ॲक्सेसिबल एज्युकेशन’कडून मिळणाऱ्या सवलतींचा पुरेपूर फायदा घेतला. त्यामध्ये पात्र ठरल्यास विद्यार्थ्यांना सिंगल रूम आणि परीक्षेसाठी जास्तीचा वेळ यांसारख्या सवलती दिल्या जातात. ‘द अटलांटिक’सारख्या वृत्तपत्रांनीदेखील यापूर्वी म्हटले होते की, अग्रगण्य विद्यापीठांमध्ये केवळ फायदे मिळवण्यासाठी अपंगत्वाचा दावा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या वृत्तात असेही नमूद केले आहे की, काही विद्यार्थी ‘सोशल एन्झायटी’ असल्याचे सांगून वर्गातील चर्चेत सहभागी होणे टाळतात.
‘द अटलांटिक’नुसार, कॅलिफोर्नियातील पालो अल्टो येथील जॉन्सनच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधील ३८ टक्के पदवीपूर्व विद्यार्थ्यांची नोंद अपंग म्हणून झाली आहे. त्याचा परिणाम असा झाला की, कॅम्पसमध्ये जागा मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असूनही, २४ टक्के पदवीपूर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक किंवा निवास व्यवस्थेत सवलत मिळाली आहे. त्यात पुढे असे म्हटले आहे की, ‘ब्राऊन’ आणि ‘हार्वर्ड’सारख्या आयव्ही लीग कॉलेजेसमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त पदवीपूर्व विद्यार्थी अपंग म्हणून नोंदणीकृत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेतील कम्युनिटी कॉलेजेसमध्ये केवळ तीन ते चार टक्के विद्यार्थ्यांनाच अपंगत्वाच्या सवलती मिळतात.
एंडोमेट्रिओसिस या वेदनादायक आजारामध्ये गर्भाशयातील पेशी गर्भाशयाच्या बाहेर वाढतात.
जॉन्सनने स्वतःदेखील स्टॅनफोर्डमध्ये तिच्या एंडोमेट्रिओसिस या आजाराविषयी सांगत, अपंगत्वाच्या सवलतीची मागणी केली होती. टाइम्सच्या लेखात ती स्पष्ट करते, “हा एक वेदनादायक आजार आहे, ज्यामध्ये गर्भाशयातील पेशी गर्भाशयाच्या बाहेर वाढतात. या वेदनांमुळे मी त्रासले आहे आणि त्यावर कोणताही उपाय नाही. त्यामुळे मी कॅम्पस डॉर्ममध्ये सिंगल रूमची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपली लक्षणे आणि निदानावर चर्चा करण्यासाठी सल्लागाराबरोबर झालेल्या भेटीनंतर केवळ ३० मिनिटांत जॉन्सनची नोंदणी अपंग विद्यार्थी म्हणून करण्यात आली.

