Starlink Data Security Questions : टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनी गुरुवारी भारतातील प्रभावशाली धनदांडगे स्टारलिंकचा मार्ग रोखत असल्याचा आरोप केला. धनदांडग्यांना भारतीय सॅटकॉम क्षेत्रातील आपले वर्चस्व टिकवायचे आहे, असाही दावा त्यांनी केला. मात्र, केंद्र सरकारने हे आरोप फेटाळले आहेत.

दरम्यान, स्टारलिंकने भारतात सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी केल्याचे सांगितले जात आहे. कंपनीने देशात सुमारे २० गेटवे केंद्रे उभारली आहेत. भारतीय सुरक्षा नियमांचे पालन करता यावे, तसेच भारतीय ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवता यावा, यासाठीही आवश्यक व्यवस्था केल्याचा कंपनीचा दावा आहे. मात्र, स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशाची चर्चा सध्या प्रामुख्याने सॅटकॉम क्षेत्रातील स्पर्धा, सरकारी नियम आणि स्पेक्ट्रमच्या उपलब्धतेभोवती फिरत आहे. पण, त्यापलीकडेही महत्त्वाचे प्रश्न आहेत; स्टारलिंकसारख्या परदेशी सॅटेलाइट नेटवर्कला भारतात सेवा देण्याची परवानगी दिल्यास देशाच्या डेटा सुरक्षेवर आणि राष्ट्रीय सुरक्षेवर काही परिणाम होऊ शकतात का? त्यावर नियंत्रण ठेवणे कितपत शक्य आहे? एखाद्या राष्ट्रीय संकटाच्या वेळी कंपनीने इंटरनेट सेवा बंद करण्यास नकार दिला, तर भारताकडे त्यावर नियंत्रण ठेवण्याचे किती पर्याय असतील? हेच या अभ्यासातून समोर येत आहे.

एप्रिल २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तक्षशिला संस्थेच्या ‘स्टारलिंक अँड रिस्क्स फॉर इंडिया’ या अहवालात अश्विन प्रसाद राव, आदित्य रामनाथन आणि निवृत्त कर्नल दास यांनी भारताच्या सुरक्षेशी संबंधित एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. स्टारलिंकचे नेटवर्क भारतात सुरू झाले, तरी त्याच्या कामकाजावरील नियंत्रण देशाबाहेर असणार आहे, त्यामुळे भविष्यात भारतातील डेटावर परदेशी कंपनीचे नियंत्रण निर्माण होऊ शकते. तसेच या नेटवर्कमुळे भारतासमोर गंभीर सुरक्षा आव्हाने उभी राहू शकतात, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. देशाला इंटरनेट सेवेची सर्वाधिक गरज असताना स्टारलिंकने सेवा बंद केली तर काय? किंवा भारत सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव नेटवर्क बंद करण्याचे आदेश दिले, तरी कंपनीने सेवा सुरूच ठेवली तर काय? या दोन्ही परिस्थितींमध्ये भारताच्या नियंत्रणावर मर्यादा येऊ शकतात, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

नेटवर्क सुरू-बंद करण्याचे नियंत्रण कुणाकडे?

पारंपरिक इंटरनेट सेवांपेक्षा स्टारलिंकचे तंत्रज्ञान वेगळे आहे. पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत फिरणाऱ्या हजारो उपग्रहांच्या मदतीने हे नेटवर्क वेगवान इंटरनेट पुरवते. फायबर केबल टाकणे किंवा जमिनीवर दळणवळणाचे नेटवर्क उभारणे कठीण असलेल्या भागांतही ही सेवा पोहोचू शकते. तक्षशिला संस्थेच्या अभ्यासानुसार, स्टारलिंकचे १० हजारांहून अधिक उपग्रह सध्या पृथ्वीच्या कक्षेत कार्यरत असून, भविष्यात ही संख्या ४२ हजारांपर्यंत नेण्याची कंपनीची योजना आहे. एवढ्या मोठ्या नेटवर्कमुळे आणि उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या क्षमतेमुळे स्टारलिंकला प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत तांत्रिक आघाडी मिळते.

मात्र, याच क्षमतेमुळे भारतासारख्या देशांसमोर सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. स्टारलिंकची सेवा कुठे सुरू ठेवायची आणि कुठे बंद करायची, यावर भारत सरकारचे नियंत्रण मर्यादित राहू शकते, हा प्राथमिक धोका असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. भारतीय यंत्रणांना एखाद्या भागातील सेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करायची असेल, तरीही स्टारलिंकने सेवा सुरूच ठेवली तर सरकारसमोर अडचण निर्माण होऊ शकते. याउलट, युद्ध किंवा अन्य संकटाच्या काळात एखाद्या भागात कनेक्टिव्हिटी कायम ठेवण्याची गरज असताना कंपनीने ती बंद केली, त्यामुळे भारताच्या दळणवळण व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.

स्टारलिंकच्या नियंत्रणाबाबतची ही चिंता केवळ सैद्धांतिक नाही, यापूर्वीचे सुरक्षेच्या गंभीर त्रुटींचे अनेक प्रकार घडले आहेत. २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर स्टारलिंक हे युक्रेनच्या दळणवळणाचे महत्त्वाचे साधन बनले. मात्र संशोधन अहवालानुसार, त्यानंतर एलॉन मस्क यांनी अनेकदा युक्रेनमधील स्टारलिंकची सेवा मर्यादित केली. युक्रेनच्या लष्कराने क्रिमियाजवळ स्टारलिंक सेवा सुरू करण्याची विनंती केली होती ती देखील कंपनीने नाकारली. मार्च २०२५ मध्ये मस्क यांनी स्वतःच स्टारलिंक ही युक्रेनच्या लष्करातील दळणवळणाचा मुख्य कणा असल्याचे म्हटले होते. त्यांनी ही सेवा बंद केली तर युक्रेनची महत्त्वाची फळी कोसळेल, असेही त्यांनी नमूद केले होते. युक्रेनचा अनुभव भारतासाठी एक महत्त्वाचा धडा देतो. देशाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेल्या दळणवळण व्यवस्थेचे नियंत्रण परदेशी कंपनीकडे असेल तर तिचे निर्णय एखाद्या देशासाठी सामरिक दबावाचे साधन ठरू शकतात.

परकीय घटक

स्टारलिंकच्या नियंत्रणाबाबतचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकन सरकारशी असलेले स्पेसएक्सचे संबंध. अमेरिकेच्या संरक्षण आणि अवकाश मोहिमांमध्ये स्पेसएक्सची महत्त्वाची भूमिका आहे. अमेरिकेच्या नॅशनल रेकनिसन्स ऑफिस (NRO) आणि स्पेस फोर्ससाठी (USSF) उपग्रह प्रक्षेपित करण्यापासून ते क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यापर्यंत अनेक कार्य कंपनी पार पाडते.

अशा परिस्थितीत भारताच्या सुरक्षा पातळीवर चिंतादायी स्थिती निर्माण होते. भारत आणि अमेरिका यांच्यात मोठा भू-राजकीय तणाव निर्माण झाला, तर अमेरिकेचे सरकार स्पेसएक्सवर प्रभाव टाकू शकते, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. मात्र, परदेशी कंपनीच्या नियंत्रणाखालील उपग्रह नेटवर्कने आपल्या सुरक्षेच्या गरजांनुसारच काम करावे, यासाठी कंपनीला भाग पाडण्याची भारताची क्षमता मर्यादित राहू शकते. कारण स्टारलिंकचे नियंत्रण अखेरीस परदेशी सरकारच्या अधिकारक्षेत्रात येते आणि त्या सरकारचे हितसंबंधही कंपनीच्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकतात.

स्टारलिंककडे जमा होणाऱ्या डेटाच्या सुरक्षेचं काय?

स्टारलिंकचं नेटवर्क केवळ इंटरनेट सेवा पुरवत नाही, तर त्याच्या वापरकर्त्यांविषयीही विविध माहिती (डेटा) गोळा करतं. यात वापरकर्त्यांचं लोकेशन, आयपी ॲड्रेस आणि इंटरनेट कनेक्शनशी संबंधित माहितीचा समावेश असतो. तक्षशिला संस्थेच्या अभ्यासानुसार, जानेवारी २०२६ मध्ये स्टारलिंकने आपल्या गोपनीयता धोरणात बदल केला. नव्या धोरणानुसार, ग्राहकांच्या लोकेशनची माहिती, आयपी ॲड्रेस आणि महत्त्वाचा संवाद डेटा हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) व मशीन लर्निंग मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी, तसेच इतर थर्ड-पार्टी कंपन्यांसोबत शेअर करण्यासाठी वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यासाठी वापरकर्त्यांची संमती बाय-डिफॉल्ट (ऑप्ट-इन) धरण्यात आली होती, याकडेही या अहवालाने लक्ष वेधले आहे.

या पार्श्वभूमीवर संशोधकांनी एलॉन मस्क यांच्या एका जुन्या विधानाकडेही लक्ष वेधले आहे. टेस्ला, स्टारलिंक आणि ट्विटर या कंपन्यांच्या माध्यमातून जगभरातील आर्थिक घडामोडींशी संबंधित जितकी माहिती आपल्याकडे आहे, तितकी कदाचित इतिहासात कोणत्याही एका व्यक्तीकडे नसेल, असा दावा मस्क यांनी केला. भारतात स्टारलिंकचा विस्तार झाला तर या नेटवर्कमधून गोळा होणाऱ्या डेटाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढू शकते, त्यामुळे भारतीय ग्राहकांचा डेटा देशातच सुरक्षित ठेवणे, गरज पडल्यास तपास यंत्रणांना आवश्यक माहिती मिळवता येणे आणि कंपनीच्या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करता येणे महत्त्वाचे ठरते.

भारताचे कठोर नियम, पण अंमलबजावणी करणे शक्य होईल का?

भारताने सॅटेलाइट इंटरनेटशी संबंधित सुरक्षेचे धोके दुर्लक्षित केलेले नाहीत. नियमांनुसार, सॅटेलाइट कंपन्यांना खालील अटी पाळणे बंधनकारक आहे:

  • भारतीय युझर्सचा सर्व डेटा देशातील ‘गेटवे’वरूनच गेला पाहिजे.
  • सरकारला या डेटावर रिअल-टाईम नजर ठेवता आली पाहिजे.
  • भारतीय युझर्सचा कोणताही डेटा देशाबाहेर कॉपी किंवा डीक्रिप्ट (उलगडला) होता कामा नये.

आंतरराष्ट्रीय सीमा आणि किनारपट्टीपासून ५० किलोमीटरच्या भागासाठी सुरक्षेचे विशेष कडक नियम लागू असतील.
सरकारच्या मते, परवाना मिळालेल्या सर्व कंपन्यांना हे नियम पाळावेच लागतील. दूरसंचार विभागाने (DoT) हे स्पष्ट केले आहे की, केवळ परवाना (GMPCS License) मिळाला म्हणजे स्पेक्ट्रम (फ्रीक्वेंसी) मिळाले असे नाही; त्यासाठी सुरक्षेच्या सर्व अटी पूर्ण करणेच बंधनकारक आहे.

तक्षशिला संस्थेच्या अभ्यासातून भारताच्या या नियमावलीत एक मोठी त्रुटी असल्याचे अधोरेखित होते. कंपन्या या नियमांचे खरोखर पालन करत आहेत की नाही, याची स्वतंत्रपणे पडताळणी करणे भारताला दरवेळी शक्य होणार नाही.

येथे उपग्रहांमधील अंतर्गत संवादावर (Inter-satellite Links) घालण्यात आलेल्या निर्बंधांचे उदाहरण घेता येईल. स्टारलिंकची संपूर्ण रचना ही उपग्रहांमधील ‘लेझर लिंक्स’द्वारे होणाऱ्या परस्पर संवादावर आधारित आहे. अहवालानुसार, भारतीय अधिकारी जमिनीवरील ‘गेटवे’वर सहज नजर ठेवू शकतात; परंतु डेटा त्या गेटवेपर्यंत पोहोचण्यापूर्वी अंतराळातील उपग्रहांच्या जाळ्यातून (ऑर्बिटल मेश) फिरून आला आहे का नाही, हे जमिनीवरून निश्चितपणे ओळखणे अत्यंत कठीण आहे.

अभ्यासात पुढे असेही नमूद केले आहे की, डेटा हाताळणीशी संबंधित वचने केवळ कंपन्यांच्या ‘स्वयं-प्रमाणीकरणावर’ (स्वतः लिहून दिलेल्या हमीपत्रावर) अवलंबून आहेत. स्टारलिंकच्या बदललेल्या गोपनीयता धोरणाचा विचार करता, ही बाब अधिक गंभीर आणि चिंताजनक ठरते, असा तर्क या अभ्यासात मांडण्यात आला आहे.