scorecardresearch

Premium

स्टॅच्यु ऑफ वननेस: आद्य शंकराचार्य कोण होते?

प्रकल्प उज्जैन, महेश्वर आणि मांडू या धार्मिक शहरांसह एक महत्त्वाचे पर्यटन सर्किट असेल.

'Statue of Oneness' unveiled by Chief Minister of Madhya Pradesh
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'स्टॅच्यू ऑफ वननेस'चे अनावरण (सौजन्य: इंडियन एक्स्प्रेस)

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी २१ सप्टेंबर रोजी ओंकारेश्वर येथे आद्य शंकराचार्यांच्या १०८ फूट उंचीच्या ‘स्टॅच्यू ऑफ वननेस’चे अनावरण केले.

शंकराचार्य १२ वर्षाचे असताना ओंकारेश्वरला गेले होते, त्यामुळे या मूर्तीत आद्य शंकराचार्यांना लहान बटूच्या रूपात दर्शविण्यात आले आहे. खांडवा जिल्ह्यातील मांधाता बेटावर असलेल्या मंदिर शहराचा विकास करण्यासाठी सरकारने २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा प्रकल्प उज्जैन, महेश्वर आणि मांडू या धार्मिक शहरांसह एक महत्त्वाचे पर्यटन सर्किट असेल.

Shalu Kolhe, Sarita Meshram, Kavita Mauje
ग्रासरूट फेमिनिझम : ‘‘विद्या, मती, गती आणि वित्तही आमचेच! ’’
Summons Ranbir Kapoor
विश्लेषण : महादेव बुक बेटिंग ॲप प्रकरणी रणबीर कपूरला समन्स का? बॉलिवुड कलाकारांचा या प्रकरणाशी काय संबंध?
Saurabh Chandrakar
विश्लेषण : फळांचा रस विक्रेता ते ‘महादेव’ बेटिंग ॲप निर्माता… ‘बॉलिवुडमित्र’ सौरभ चंद्राकरचे पाकिस्तानातही जाळे!
wardha
वर्धा: अवैध वृक्षतोड निषेधार्थ पर्यावरणप्रेमीने फेसबुक लाईव्ह करीत घेतली विहिरीत उडी, मग प्रशासनाने…

आद्य शंकराचार्य कोण होते?

आद्य शंकराचार्यांचा जन्म इसवी सन ७८८ ते ८२० या कालखंडादरम्यान केरळमध्ये पेरियार नदीच्या काठी वसलेल्या कलाडी येथे झाला. ते लहान वयातच संन्यासी झाले आणि गृहत्याग केला. त्यानंतर त्यांनी ओंकारेश्वरला जाण्याचा मार्ग पत्करला अशी आख्यायिका आहे. येथे त्यांनी त्यांचे गुरू ‘गोविंद भागवतपद’ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले आणि लवकरच बौद्ध आणि जैन धर्मासह प्रचलित तात्विक परंपरांना आव्हान देत अद्वैत वेदांताचे ते समर्थक झाले. ३२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी कांची (तामिळनाडूमधील कांचीपुरम) ते कामरूप (आसाम), काश्मीर , केदार , बद्रीधाम, शृंगेरी, उज्जैन, काशी, पुरी आणि जोशीमठ अशा त्या काळातील सर्व महत्त्वाच्या आध्यात्मिक केंद्रांना भेटी दिल्याचे उल्लेख सापडतात. त्यांना ११६ ग्रंथाचे कर्ते मानले जाते. त्यापैकी त्यांनी १० उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि गीता यावरील लिहिलेली भाष्ये सर्वात लक्षणीय आहेत.

आणखी वाचा: Ganesh festival Ganpati Gauri: कोण आहे ही ‘निर्ऋती’?; जी ठरली ‘ज्येष्ठागौरी’!

मांधाता बेट हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ का मानले जाते?

नर्मदा नदीवर वसलेले मांधाता बेट हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी ओंकारेश्वर आणि अमरेश्वर या दोन ज्योतिर्लिंगांसाठी प्रसिद्ध आहे. हे तीर्थक्षेत्र वायव्येस ११० किमी अंतरावर असलेल्या उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ आहे. या बेटावर १४ व्या आणि १८ व्या शतकातील शैव, वैष्णव आणि जैन मंदिरे आहेत. ‘ओंकारेश्वर’ हे नाव बेटाच्या आकारावरून आले आहे, हे बेट ‘ओम’ या पवित्र अक्षरासारखे दिसते आणि त्याच्या नावाचा अर्थ ‘ओंकाराचा परमेश्वर’ असा होतो.
पौराणिक संदर्भानुसार, ‘भगवान शिवाने जगाला प्रकाशाचा अंतहीन स्तंभ म्हणून छेद दिला’, त्याला ज्योतिर्लिंग म्हणतात. भारतात १२ ज्योतिर्लिंग स्थळे आहेत ज्यांना शिवाचे स्वरूप मानले जाते. उज्जैनमधील महाकाल व्यतिरिक्त, यामध्ये गुजरातमधील सोमनाथ आणि नागेश्वर, आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन, मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर, उत्तराखंडमधील केदारनाथ, महाराष्ट्रातील भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर, वाराणसीमधील विश्वनाथ, झारखंडमधील बैद्यनाथ आणि तामिळमधील रामनाथ यांचा समावेश आहे.

ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीच्या तीन प्रचलित कथा

मांधाता येथील ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीच्या तीन कथा प्रचलित आहेत. पहिल्या पौराणिक कथेनुसार, विंध्य पर्वतराजीतील देवता विंध्याने आपल्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी भगवान शिवाची पूजा केली. त्याच्या उपासनेने प्रभावित होवून शिव ‘ओंकारेश्वर आणि अमरेश्वराच्या’ रूपात प्रकट झाले. दुस-या कथेत, राजा मांधाताने शिवाची भक्तिभावाने पूजा केली होती, त्यामुळे शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि तिसर्‍या कथेत, राक्षस विजयी झाल्यानंतर राक्षसांचा पराभव करण्यासाठी शिव ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले.

प्रकल्पाची संकल्पना कशी तयार झाली?

९ फेब्रुवारी २०१७ रोजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ओंकारेश्वर येथे एका कार्यक्रमादरम्यान १०८ फूट उंच आद्य शंकराचार्य यांचा पुतळा, शंकर संग्रहालय आणि आचार्य शंकर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अद्वैत वेदांत बांधण्याची घोषणा केली. त्या वर्षाच्या शेवटी, राज्यात धातू संकलन मोहीम राबवण्यात आली आणि २३,००० हून अधिक ग्रामपंचायतींमधील लोकांकडून हा पुतळा तयार करण्यासाठी धातू गोळा करण्यात आला. ४ जून २०२२ रोजी, लार्सन आणि टुब्रोला ‘स्टॅच्यू ऑफ वननेस’ बांधण्यासाठी अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम (EPC) कंत्राट देण्यात आले. स्टॅच्यू ऑफ वनेस ५०० वर्षांहून अधिक काळ टिकून राहण्याचा हेतू आहे, तर संग्रहालय इमारत १०० वर्षे सेवा पुरवणारे ठरावे या उद्देशाने बांधण्यात आले आहे.

आणखी वाचा: चिंचेच्या झाडाखाली झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या निषिद्ध का मानले जाते?

१०८ फूट पुतळा बनवण्यासाठी काय केले?

नर्मदा नदीकडे -दक्षिणेकडे तोंड करून उभा मांधाता पर्वत टेकडीवर मिश्र-धातूचा आद्य शंकराचार्यांचा पुतळा स्थापित केला आहे. १०० टन वजनाच्या या पुतळ्याची संकल्पना भारतीय कलाकार, शिल्पकार आणि अभियंते यांच्या पथकाने तयार केली होती. मेटल कास्टिंग चीनच्या नानचांग शहरात करण्यात आले होते आणि अनेक तुकड्यांमध्ये सागरी मार्गाने मुंबईला पाठवण्यात आले. या मूर्तीचे वजन १०० टन असून, ती ७५ फूट उंचीच्या मंचावर बसवण्यात आली आहे. ही मूर्ती कांस्यापासून बनलेली आहे, ज्यामध्ये ८८% तांबे, ४% जस्त आणि ८% कथील आहे आणि त्याची अंतर्गत रचना उच्च-गुणवत्तेच्या पोलादाने बनलेली आहे, मूर्तीच्या पायथ्याशी शंकर स्तंभ आहे, ज्यामध्ये लाकडी घुमट आणि दगडी खांब आहेत, ज्यावर “शंकराचार्य यांच्याशी संबंधित ३२ कथांचे कोरीव काम आहे.” गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी, तामिळनाडूमधील तिरुवल्लुवर पुतळा आणि भगवान मुरुगन पुतळा, कर्नाटकातील गोम्मटेश्वरा पुतळा आणि मुरुडेश्वराची शिवप्रतिमा’ यासह भारतातील सर्वात प्रसिद्ध पुतळ्यांच्या पंक्तीत सामील होण्याची अपेक्षा आहे. मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर आणि विख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी पुतळ्याचे वैचारिक रेखाटन आणि चित्र तयार केले आहे.

कामत यांनी केरळच्या कलाडी येथे शंकराचार्यांच्या जन्मस्थानाला भेट दिली, जिथे त्यांनी “त्या काळातील पुरुषांच्या कपड्याची शैली, नद्या, घरे, त्यांची स्थापत्य रचना” यांचा अभ्यास करून शंकराचार्यांच्या चित्रासाठी प्रेरणा घेतली. या शिवाय त्यांनी ११ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांच्या चेहऱ्यांचाही अभ्यास केला. विख्यात शिल्पकार तसेच जे.जे चे माजी विद्यार्थी भगवान रामपुरे यांची २० शिल्पकारांच्या यादीतून निवड करण्यात आली. त्यांनी मुख्य मूर्तीच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी ३.५ फुटाचे प्रतिकात्मक मॉडेल तयार केले. तसेच मुख्य मूर्ती तयार करण्यापूर्वी त्यांनी अनेक संत, कलाकार आणि अभियंत्यांचा सल्ला घेतला. इतकेच नाही तर डिझाईन अंतिम झाल्यानंतर, त्यांनी मेटल कास्टिंगच्या कामासाठी नानचांग शहराला भेट दिली आणि या प्रकल्पासाठी १०० चिनी कामगारांचे पर्यवेक्षण केले. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागला.

आणखी वाचा: शाही भारतीय नौदलाचे बंड १९४६: डाव्यांमुळे खरंच भारताला स्वातंत्र्य मिळणार होते का, जे काँग्रेस आणि मुस्लिम लीगला नको होते?

इतर प्रकल्प कोणते?

या पुतळ्यासोबत तेथे ‘एकात्म धाम’ देखील असेल, ज्यात अद्वैत लोक संग्रहालयाचा समावेश असेल, जे “अद्वैत वेदांताचा संदेश प्रतिबिंबित करणार्‍या प्रदर्शनांद्वारे आचार्य शंकराचे जीवन आणि तत्त्वज्ञान दर्शविण्यासाठी बांधण्यात आले आहे,” असे प्रकल्प अधिकाऱ्याने सांगितले. एकात्म धाममध्ये “नागर, द्रविडियन, ओरिया, मारू-गुर्जरा, होयसळा, उत्तर भारतीय-हिमालयी आणि केरळ” या स्थापत्य शैलीतील मंदिरांची प्रतीकं असतील. संग्रहालयात एक 3D होलोग्राम प्रोजेक्शन दालन, नऊ प्रदर्शन दालने, एक इनडोअर वाइड-स्क्रीन IMAX थिएटर आणि अद्वैत नर्मदा विहार नावाची सांस्कृतिक बोट राइड समाविष्ट असेल, जी शंकराचार्य आणि यांच्या शिकवणींद्वारे अभ्यागतांना दृकश्राव्य प्रवासात घेऊन जाईल असे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आचार्य शंकर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अद्वैत वेदांत ही संस्था “अद्वैत वेदांताचा अभ्यास आणि समज वाढवण्यासाठी” बांधली जात आहे आणि ते २२.१ हेक्टरमध्ये पसरले आहे. या संस्थेची सात केंद्रे असतील, त्यातील चार संशोधनासाठी, एक ग्रंथालय, एक विस्तार केंद्र आणि एक गुरुकुल असेल.
या संशोधन केंद्रांमध्ये अद्वैत तत्त्वज्ञान केंद्रांचा समावेश आहे, ज्यात “ओरिया मंदिरांची अलंकृत विशिष्ट शैली” दर्शविली जाईल, येथील विज्ञान केंद्र गुजरातमधील द्वारका मंदिराच्या धर्तीवर बांधले जाईल, सामाजिक विज्ञान केंद्र “होयसळा आणि द्रविड शैली” या धर्तीवर बांधले जाईल. आणि साहित्य, संगीत आणि कला केंद्र “उत्तर भारतीय-हिमालयीन शैली” मध्ये बांधले जाईल. महर्षी वेदव्यास अद्वैत ग्रंथालय हे “अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या विद्वानांसाठी सर्वसमावेशक संसाधन केंद्र आणि संदर्भ ग्रंथालय” असेल. ध्यानाचे ठिकाण शोधणाऱ्या पर्यटकांसाठी ३६ हेक्टर जंगलाचीही उपयोजना करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Statue of oneness unveiled by chief minister of madhya pradesh svs

First published on: 29-09-2023 at 13:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×