अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक वित्तीय बाजारपेठांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. सर्व जागतिक भांडवली बाजारांमध्ये गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि दलाल स्ट्रीटदेखील यापासून अलिप्त राहिलेली नाही. दलाल स्ट्रीटवरील गुंतवणूकदारांमध्ये चिंता असून, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) देशांतर्गत शेअर बाजारातून पैसे काढत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यात आतापर्यंत सुमारे १५,८०० कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्री केले आहे. या अस्थिर वातावरणात गुंतवणूकदारांचे वर्तन कसे असावे, याविषयी जाणून घेऊया.

शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती काय?

पश्चिम आशियातील पेटलेल्या युद्धामुळे पिंपामागे १०० डॉलरवर तापलेल्या तेलाच्या किमतीने शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख शेअर निर्देशांकांना विक्रीच्या माऱ्याचा जबर फटका बसला. गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण नोंदवत सेन्सेक्स ७५ हजारांखाली गडगडला. जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश असलेल्या भारतासाठी सध्याचे ऊर्जासंकट हे महागाईचा भडका आणि आर्थिक विकासाचा वेग मंदावण्याची भीती निर्माण करणारे आहे. युद्धाचा भडका उडाला त्या २७ फेब्रुवारीपासून आतापर्यंत, सेन्सेक्स ६,७२३.२७ अंशांनी (किंवा ८.२७ टक्क्यांनी) गडगडला आहे. या कालावधीत, मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार मूल्य ३३.६८ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ४२९.८२ कोटी रुपयांवर (४.६५ ट्रिलियन डॉलर) उतरले आहे. २०२६ मध्ये आतापर्यंत भारताच्या एकूण बाजार भांडवलात ५३३ अब्ज डॉलरहून अधिक म्हणजेच सुमारे १० टक्के घट झाली आहे. ही गत १५ वर्षातील म्हणजे, २०११ नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. २०११ मध्ये भारतीय कंपन्यांचे बाजार मूल्य वर्षभरात सुमारे ६२५ अब्ज डॉलर्सने कमी झाले होते, यंदाच्या तिमाहीतच ते त्या पातळीवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, भारताच्या बाजार भांडवलात झालेली ही घट मेक्सिको, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, फिनलंड, व्हिएतनाम आणि पोलंड यांसारख्या देशांच्या एकूण बाजार भांडवलापेक्षाही अधिक आहे. तसेच, चिली, ऑस्ट्रिया, फिलिपिन्स, कतार आणि कुवेत यांसारख्या देशांच्या बाजार भांडवलाच्या तुलनेत ही घट जवळपास दुप्पट आहे.

बाजारात संयम का आवश्यक?

भांडवली बाजारात गुंतवणूक केल्यांनतर संयम राखणे आवश्यक आहे आणि तात्पुरत्या घसरणीने घाबरून विक्री करण्याऐवजी सध्याच्या स्थितीत बाजारात टिकून राहणे गरजेचे आहे. बऱ्याचदा पडझडीच्या वेळेस पोर्टफोलिओ नकारात्मक होतो, मात्र हा कागदावरील तोटा अर्थात नोशनल लॉस असतो. मात्र तो बघून गुंतवणूक विकल्यास तो तोटा वास्तविक बनतो. केवळ तात्काळ तरलतेची गरज भासल्यास समभाग विक्री करणे हा अखेरचा उपाय असावा. बाजारात अनेक प्रकारच्या संकटांनंतर सावरला आहे. यासाठी गुंतवणूकदारांनी अल्पकालीन तोट्याकडे न बघता अॅसेट अलोकेशनवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कारण अस्थिर काळात इक्विटीमधून बाहेर पडणे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून चुकीचे ठरू शकते. अस्थिरतेच्या काळात इक्विटी अर्थात समभाग संलग्न गुंतवणूक योजनांमधून बाहेर पडणे पूर्णपणे चुकीचे असून ते पोर्टफोलिओला हानी पोहोचवू शकते.

एसआयपी तारणार?

युद्ध आणि भू-राजकीय तणावाच्या काळात, शेअर बाजार अनेकदा तीव्र प्रतिक्रिया देतो आणि अस्थिरता शिगेला पोहोचते. भीतीमुळे गुंतवणूकदार त्यांचे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) थांबवतात किंवा खालच्या पातळीवर म्हणजेच बाजार जेव्हा नीचांकी पातळीवर असतो तेव्हा गुंतवणूकीतून बाहेर पडतात. अनेक गुंतवणूकदारांसाठी, अशी अचानक घसरण अस्वस्थ करणारी ठरते. मात्र म्युच्युअल फंडातील शिस्तबद्ध गुंतवणूक पर्याय असलेल्या एसआयपी गुंतवणूकदारांसाठी, बाजारातील घसरण ही खरोखर एक संधी असू शकते. जेव्हा युद्ध किंवा तणावामुळे शेअर बाजारात पडझड होते, तेव्हा म्युच्युअल फंडातील विविध योजनांचा नेट अॅसेट व्हॅल्यू (एनएव्ही) कमी होत असल्याने, एसआयपीच्या माध्यमातून होणाऱ्या गुंतवणुकीतून अधिक म्युच्युअल फंड अधिक प्राप्त होतात. जेव्हा बाजार अखेरीस सावरतो, तेव्हा हे अतिरिक्त युनिट्स संपत्ती निर्मितीला गती देतात. कारण तेजीच्या काळात एनएव्हीचे मूल्य वाढते. या काळात पुढे काय होईल याचा अंदाज घेण्यापेक्षा गुंतवणूक शिस्त आणि संयम महत्त्वाचा असतो. जेव्हा बाजार घसरतो तेव्हा तेवढ्याच निधीमध्ये अधिक युनिट्स खरेदी करता येतात. कालांतराने, हे गुंतवणुकीचा एकूण खर्च कमी करण्यास मदत करते. म्युच्युअल फंडातील चक्रवाढ ही प्रत्यक्षात दीर्घकालीन संपत्ती निर्माण करते. वर्ष २०२५ मध्ये देशातील एसआयपीचा प्रवाह ३.३४ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला, जो मागील वर्षी २.४७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होता, यामुळे  गुंतवणूकदार अस्थिरतेतही शिस्तबद्ध पद्धतीने गुंतगवणूक करत असल्याचे ते निदर्शक आहे.

जोखीम क्षमता जाणून घेणे आवश्यक

गुंतवणूक करण्यापूर्वी  त्यातील जोखीम समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. याचा अर्थ असा आहे की, घाबरून न जाता बाजारातील किती चढ-उतार हाताळण्यास सक्षम आहोत हे जाणून घेणे. जर उच्च अस्थिरतेचा सामना करण्यास असमर्थ असल्यास, गुंतवणूक अधिक आक्रमक मालमत्तेकडे जास्त झुकली जाऊ नये. इक्विटी (समभाग) किंवा समभाग संलग्न योजना, कर्ज-रोखे आणि कमॉडिटीजमध्ये योग्य विविधीकरण पोर्टफोलिओमध्ये स्थिरता आणते. मालमत्ता वाटप यासाठी जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. शिवाय पोर्टफोलिओमध्ये सोन्यासारखी सुरक्षित गुंतवणूक हेज म्हणून ठेवल्याने  पोर्टफोलिओमधील अस्थिरतेचे व्यवस्थापन करण्यास मदत होते.  बाजारातील अस्थिरता तात्पुरती असते, म्हणून घाबरून एसआयपी थांबवता म्युच्युअल फंडातील चक्रवाढ दीर्घकालीन काम करेल. मात्र याबरोबरच पुरेसा आपत्कालीन किंवा आकस्मिक निधी बाजूला राखणे आवश्यक आहे.

या टिप्स सीएफए श्वेता शास्त्री यांनी सादर केल्या आहेत. बाजारातील चढ-उतार तात्पुरते असतात. जेव्हा बाजार स्थिर होतो, तेव्हा शिस्तशीर गुंतवणूक करणारे म्हणजेच अखंडीत एसआयपी सुरू ठेवणारे गुंतवणूकदार सामान्यतः नफा मिळवतात.

एकरकमी गुंतवणूक टाळणे का आवश्यक?

अस्थिर काळात इक्विटी अर्थात समभाग अथवा समभाग संलग्न गुंतवणूक साधनांमध्ये एकरकमी पैसे गुंतवण्याची योजना आखणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एकाच वेळी सर्व काही गुंतवण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याची शिफारस तज्ज्ञ करतात. शिवाय सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅनद्वारे गुंतवणूक दुसऱ्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. यामुळे बाजारात आणखी पडझड झाल्यास निर्देशांक अथवा एखाद्या कंपनीचा समभाग शिखरावर असताना बाजारात प्रवेश करण्याचा धोका कमी करता येतो. टप्प्याटप्प्याने एकरकमी गुंतवणूक केल्यास बाजारातील अस्थिरता गुंतवणूकदारांच्या बाजूने फायदेशीर ठरू शकेल.

सुरक्षित साधनांमध्ये गुंतवणूक किती?

भू-राजकीय तणावाच्या काळात गुंतवणूकदारांना सोने आणि कर्ज रोखे साधनांसारख्या सुरक्षित मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. मात्र गुंतवणूकदारांनी मालमत्ता वाटपावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. इक्विटी अर्थात शेअर, म्युच्युअल फंड, कर्ज रोखे  आणि सोने-चांदी यासारख्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे, कारण या मालमत्तांचा सामान्यतः इक्विटीशी कमी किंवा व्यस्त संबंध असतो. मात्र या काळात सर्व गुंतवणूक एकाच साधनामध्ये करणे चुकीचे आहे. सोने जागतिक अनिश्चिततेपासून निश्चितच बचाव करते, मात्र सर्व गुंतवणूक सोन्यात वळवणे जोखीमयुक्त होईल. या मालमत्ता पोर्टफोलिओ स्थिर करण्यास नक्कीच मदत करतील, पण गुंतवणूकदारांनी इक्विटीपासून पूर्णपणे दूर जाणे हितकारक ठरणार नाही.

वर्ष २०२५ मध्ये सोन्याच्या किमतीत जवळजवळ ६७ टक्के वाढ झाली आहे, जी १९७९ नंतरची सर्वात मोठी वाढ आहे, देशांतर्गत दर प्रति १० ग्रॅम १.६० लाख रुपयांवर पोहोचले आहेत. जागतिक धक्क्यांदरम्यान एकूण गुंतवणुकीच्या तुलनेत सोन्यामध्ये १०-१५ टक्के गुंतवणूक केल्यास पोर्टफोलिओ स्थिरता मिळू शकते. 

gaurav.muthe@expressindia.com