Stomach Cancer Causes and risk factors: राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आपल्या पोटाच्या कर्करोगामागे ‘स्लो पॉयझनिंग’ (हळूहळू दिलेले विष) असल्याचा संशय व्यक्त केला आहे. शिवाय, या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही त्यांना ‘टॉक्सिक टेस्ट’ करून घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पोटाचा कर्करोग आणि विषबाधा हे विषय सध्या चर्चेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पोटाचा कर्करोग नेमका कशामुळे होतो याबाबत आजवरचे संशोधन काय सांगते? याचा घेतलेला हा आढावा.

हेलिकोबॅक्टर पायलोरी (H. pylori)

पोटाच्या कर्करोगामागील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे ‘हेलिकोबॅक्टर पायलोरी’ (Helicobacter pylori किंवा H. pylori) या जिवाणूचा दीर्घकालीन संसर्ग. जागतिक आरोग्य संघटनेची ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ (IARC) ही संस्था H. pylori ला पोटाच्या कर्करोगाचे (Gastric cancer) प्रमुख कारण मानते.

H. pylori हा जिवाणू पोटाच्या आतील आवरणात दीर्घकाळ राहिल्यास तिथे सतत दाह निर्माण होऊ शकतो. काही रुग्णांमध्ये यामुळे पुढे क्रॉनिक गॅस्ट्रिटिस (Chronic gastritis), ॲट्रॉफिक गॅस्ट्रिटिस (Atrophic gastritis), इंटेस्टाइनल मेटाप्लेजिया (Intestinal metaplasia), डिस्प्लेजिया (Dysplasia) आणि अखेरीस पोटाचा कर्करोग असे टप्प्याटप्प्याने पेशींमध्ये बदल होत जातात. ही संपूर्ण प्रक्रिया अनेक वर्षे चालू असते.

अर्थात, H. pylori चा संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीला कर्करोग होतोच असे नाही; मात्र याचा प्रभाव प्रचंड मोठा आहे. संशोधक मार्टिन प्लमर (Martyn Plummer) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या विश्लेषणात, जगभरातील ‘नॉन-कार्डिया गॅस्ट्रिक कॅन्सर’च्या (Non-cardia gastric cancer) सुमारे ८९ टक्के प्रकरणांसाठी H. pylori चा संसर्गच कारणीभूत असू शकतो, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. म्हणजेच, पोटाचा कर्करोग आणि H. pylori यांच्यातील संबंध हा केवळ एक संशय नसून तो मोठ्या प्रमाणावरील साथरोगशास्त्रविषयक पुराव्यांवर (Epidemiological evidence) आधारित सिद्ध झालेला घटक आहे.

३ कोटींहून अधिक लोकांवर केलेले संशोधन काय सांगते?

पोटाच्या कर्करोगाच्या जोखीम घटकांचा अभ्यास करण्यासाठी २३२ अभ्यासांतील तब्बल ३ कोटी ३८ लाखांहून अधिक लोकांची पाहणी करण्यात आली. ‘पुरोलाजल’ (Poorolajal) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या एका मोठ्या सिस्टिमॅटिक रिव्ह्यू आणि मेटा-ॲनालिसिसमध्ये (Systematic review & Meta-analysis) यासंदर्भात अनेक महत्त्वाची तथ्ये समोर आली आहेत.

या संशोधनात पोटाचा कर्करोग आणि एच. पायलोरीचा संसर्ग यांच्यात अत्यंत महत्त्वाचा संबंध आढळला. या जिवाणूचा संसर्ग असलेल्या व्यक्तींमध्ये पोटाच्या कर्करोगाचा ऑड्स रेशिओ (Odds Ratio) २.५६ नोंदवला गेला. सध्या धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्करोगाचा ऑड्स रेशिओ १.६१, तर भूतकाळात धूम्रपान केलेल्या व्यक्तींमध्ये (Ex-smokers) तो १.४३ आढळला. तसेच, जास्त प्रमाणात लोणची किंवा खारवलेल्या भाज्यांचे सेवन करणाऱ्यांमध्ये कर्करोगाची जोखीम अधिक आढळली, तर नियमितपणे ताज्या फळांचे आणि भाज्यांचे सेवन करणे हा जोखीम कमी करणारा भाग असल्याचेही दिसून आले.

लोणचे खाल्ले किंवा धूम्रपान केले म्हणजे त्या व्यक्तीला कर्करोग होणारच, असा निष्कर्ष या आकडेवारीमधून काढता येत नाही. हे आकडे लोकसंख्येच्या पातळीवर (Population-level) जोखीम किती पटीने वाढते ते दर्शवते. यावरून एखाद्या विशिष्ट व्यक्तीला कर्करोग होण्याचे ‘निश्चित कारण’ ठरवता येत नाही, तर केवळ घटकांमधील सहसंबंध (Association) स्पष्ट होतो.

धूम्रपानाचा संबंध किती महत्त्वाचा?

२०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका मोठ्या सिस्टिमॅटिक रिव्ह्यू आणि मेटा-ॲनालिसिसमध्ये धूम्रपान आणि पोटाच्या कर्करोगावरील २०५ स्वतंत्र अभ्यासांचा समावेश करण्यात आला होता. संशोधक मॅटिओ रोटा (Matteo Rota) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कधीही धूम्रपान न केलेल्या लोकांच्या तुलनेत सध्या धूम्रपान करणाऱ्यांमध्ये पोटाचा कर्करोग होण्याचा सापेक्ष धोका (Relative Risk) १.५३ पट अधिक असल्याचे आढळले.

विशेष म्हणजे, पोटाच्या वरच्या कार्डिया (Cardia) भागातील कर्करोगासाठी ही रिलेटिव्ह रिस्क २.०८ पट, तर डिस्टल स्टोमॅक कॅन्सरसाठी (Distal Stomach Cancer) १.४८ पट होती. यावरून असे स्पष्ट होते की, धूम्रपान (Smoking) हा पोटाच्या कर्करोगाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनशैलीत सुधारणा करून बदलता येण्याजोगा (Modifiable) जोखीम घटक असल्याचे भक्कम पुरावे उपलब्ध आहेत.

आहाराची भूमिका काय?

आहार आणि पोटाचा कर्करोग यांच्यातील संबंध वैद्यकीय संशोधनात वारंवार सिद्ध झालेला आहे. विशेषतः आहारात जास्त प्रमाणात मीठ, खारवलेले (Salt-preserved foods), रासायनिक प्रक्रियेने टिकवलेले (Preserved foods) आणि लोणच्यासारखे (Pickled foods) पदार्थ यांचे अतिसेवन या बाबी कर्करोगाची जोखीम लक्षणीयरीत्या वाढवू शकतात. शास्त्रीय अभ्यासानुसार, जास्त मीठ खाल्ल्यामुळे पोटाच्या आतील मऊ आणि संवेदनशील आवरणाला (Mucosal barrier) थेट इजा पोहोचू शकते; तसेच यामुळे ‘एच. पायलोरी’ जिवाणूमुळे निर्माण होणारी दाहाची किंवा जळजळीची (Inflammatory process) प्रक्रिया अधिक तीव्र होण्याचा धोका असतो.

परंतु, या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची वैद्यकीय मर्यादा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. केवळ ‘एखादा विशिष्ट पदार्थ खाल्ल्यामुळेच थेट कर्करोग झाला’ अशी सरसकट मांडणी करता येत नाही. पोटाचा कर्करोग हा एका रात्रीत किंवा एकाच घटकामुळे उद्भवत नाही. याउलट, आहारातील चुकीच्या सवयी, ‘एच. पायलोरी’चा दीर्घकालीन संसर्ग, धूम्रपान, आनुवंशिकता आणि जीवनशैलीतील इतर विविध घटक अनेक वर्षे एकत्रितपणे शरीरावर प्रतिकूल परिणाम करत राहतात आणि त्यातूनच पुढे कर्करोग बळावत जातो.

आनुवंशिकता आणि कौटुंबिक इतिहास

कुटुंबात पोटाच्या कर्करोगाचा इतिहास असणे हा या आजाराचा आणखी एक महत्त्वाचा जोखीम घटक (Risk factor) मानला जातो. रॉकास (Rokkas) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या एका मेटा-ॲनालिसिसमध्ये ८० हजारांहून अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या ३२ अभ्यासांचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार, ज्यांच्या जवळच्या नातेवाईकाला पोटाचा कर्करोग झालेला आहे, अशा व्यक्तींमध्ये हा कर्करोग होण्याचा धोका (Relative risk) सुमारे २.३५ पट अधिक असल्याचे आढळले.

तसेच, ‘स्टॉप प्रोजेक्ट कन्सोर्टियम’च्या (StoP Project Consortium) १७ अभ्यासांतील १८ हजारांहून अधिक व्यक्तींवर केलेल्या विश्लेषणातही, पहिल्या रक्ताच्या नातेवाईकाला (First-degree relative – आई, वडील, भाऊ, बहीण किंवा मूल) पोटाचा कर्करोग असल्यास ही जोखीम वाढल्याचे दिसून आले. यामागे केवळ आनुवंशिक उत्परिवर्तनच (Genetic mutations) नाही, तर एकाच कुटुंबात राहिल्यामुळे असणारा समान आहार, एकसारखी जीवनशैली आणि ‘एच. पायलोरी’ जिवाणूचा एकत्र आलेला संपर्क हे घटकही कारणीभूत असू शकतात. दरम्यान, काही अत्यंत दुर्मीळ प्रकरणांमध्ये ‘CDH1’ (CDH1 Gene) या जनुकातील उत्परिवर्तनामुळे ‘हेरिटरी डिफ्यूज गॅस्ट्रिक कॅन्सर’ (Hereditary Diffuse Gastric Cancer) सारखा आनुवंशिक कर्करोग सिंड्रोमही उद्भवू शकतो.