भारत-बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. बांगलादेशमध्ये गेल्याच महिन्यात तीव्र विद्यार्थी आंदोलनासमोर झुकून तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी देशत्याग केला आणि भारताचा आश्रय घेतला. या घटनेचे प्रतिबिंब कसोटी मालिकेवर पडण्याची शक्यता आहे. बांगलादेशात हिंदूंच्या आस्थापनांवर होत असलेले हल्ले आणि हसीना यांना भारताने दिलेला आश्रय या दोन्ही परस्परसंबंध बिघडवणाऱ्या बाबी ठरताहेत. या पार्श्वभूमीवर क्रिकेट मालिकेलाही राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे.
नेत्यांमध्ये तणावाचे मालिकेवर प्रतिबिंब?
बांगलादेशाने अलीकडेच पाकिस्तानवर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका विजय मिळवला. हा विजय अनपेक्षित आणि धक्कादायक होता. या मालिकेदरम्यान आणि नंतर बांगलादेशच्या काही क्रिकेटपटूंनी राजकीय विधाने केली होती. तशीच विधाने भारताविरुद्ध मालिकेदरम्यान करण्यात आली, तर वाद निर्माण होऊ शकेल. बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत असताना त्या देशाविरुद्ध भारतात क्रिकेट मालिका खेळवण्याचे प्रयोजन काय असा प्रश्न शिवसेना ‘उबाठा’ गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहेच. शेख हसीना यांना बांगलादेशकडे सोपवले जावे, अशी बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख सल्लागार डॉ. मोहम्मद युनुस यांची मागणी आहे. या घडामोडींचे पडसाद बांगलादेश मालिकेत उमटण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा… बुलेटप्रूफ ग्लास ते पॅनिक बटण; अमेरिकेत सुरक्षित मतदानासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत?
मैदानावर वाद होण्याची शक्यता किती?
दोन्ही संघांतील पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाचा प्रयत्न पहिल्या सामन्यात विजय मिळवत चांगल्या सुरुवातीचा राहील. दुसरीकडे, बांगलादेशच्या संघाने पाकिस्तानवर मालिकाविजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे भारतासमोर नक्कीच ही मालिका सोपी नसेल. राजकीय परिस्थितीमुळे काही बांगला खेळाडू अधिक जोशात खेळताना दिसतील हे नक्की. भारतीय खेळाडू सहसा राजकीय विधाने करत नाहीत आणि राजकीय भूमिकांचे प्रदर्शनही मैदानावर करत नाहीत. विराटसारखे खेळाडू आक्रमक असले, तरी ही आक्रमकता काही क्षणांपुरती सीमित असते. याउलट आक्रमकतेच्या माध्यमातून भारतीय संघाला चिथावण्याचे डावपेच बांगला खेळाडू अंगिकारू शकतात. त्यामुळे खेळाडूंमध्ये वाद होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. तसेच प्रेक्षकांकडूनही आक्रमक प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत. त्याबाबत स्थानिक पोलीस यंत्रणांना सजग राहावे लागेल.
विराट, रोहित, पंतकडून अपेक्षा….
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा प्रयत्न या मालिकेत सर्वोत्तम कामगिरीचा असणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मायदेशी झालेल्या मालिकेमध्ये विराटने सहभाग नोंदवला नव्हता. त्यामुळे तो या मालिकेत धावा करण्यास उत्सुक असेल. घरच्या मैदानावर विराट चांगली फलंदाजी करताना दिसतो. त्यामुळे विराटला रोखण्याचे आव्हान बांगलादेश संघासमोर असेल. फिरकी आणि वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यास विराट सक्षम आहे. त्यामुळे न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी लय मिळवण्याकडे विराटचा कल राहील. भारतीय संघाचा कर्णधार व सलामीवीर रोहित शर्मा गेल्या काही काळपासून कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्या लयीत आहे. त्यातच घरच्या मैदानावर रोहितला रोखणे कठीण आहे. रोहित आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. त्यामुळे या मालिकेतही त्याचा हा आक्रमक खेळ पहायला मिळेल. तर, यावेळी सर्वांचे विशेष लक्ष ऋषभ पंतवर असेल. अपघातानंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या पंतने भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपदात आपले योगदान दिले होते. एकदिवसीय व ट्वेन्टी-२० प्रारुपात चमक दाखवल्यानंतर आता कसोटीमध्ये चमक दाखवण्यास तो सज्ज असेल. भारताच्या अनेक कसोटी विजयात पंतने निर्णायक भूमिका पार पाडली आहे. यावेळीही त्याच्याकडून सर्वाधिक अपेक्षा असतील.
हे ही वाचा… रशियन सैन्याविरोधात युद्धात उतरणाऱ्या युक्रेनच्या ‘बुचा विचेस’ कोण आहेत?
बुमरा, अश्विन, जडेजा, कुलदीपकडे लक्ष…
भारताचा तारांकित गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराचा सामना करताना अनेक फलंदाजांची भंबेरी उडते. भारतासाठी सर्वच प्रारुपात बुमरा हा महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे. बुमरा संघात असल्यास नेहमीच भारताचे पारडे जड असते. त्यामुळे बुमराच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या फलंदाजीचा चांगलाच कस लागणार आहे. चेपॉकची खेळपट्टीतून बुमराला मदत मिळाल्यास बांगलादेश संघाच्या अडचणीत भर पडू शकते. दुसरीकडे, आपल्या घरच्या मैदानावर खेळणारा भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ५००हून अधिक गडी बाद केले आहेत. त्यामुळे बांगलादेशच्या फलंदाजांसाठी आव्हान सोपे नसेल. अश्विनच्या गोलंदाजीत वैविधता असल्याने पाहुण्या फलंदाजांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. त्यातच अश्विनला लय सापडल्यास त्याला रोखणे हे कठीण आहे. तर, रवींद्र जडेजाने अष्टपैलू म्हणून गेल्या दशकभर भारतीय संघासाठी निर्णायक भूमिका पार पाडली आहे. त्यातच त्याचे चांगले क्षेत्ररक्षण ही त्याची जमेची बाजू आहे. त्यामुळे अंतिम अकरामध्ये त्याला स्थान मिळाल्यास तो प्रतिस्पर्धी संघाच्या अडचणी वाढवण्यास सक्षम आहे. भारताकडे चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचाही पर्याय आहे. त्यामुळे भारताकडे फिरकीपटूंचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे सध्या तरी भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. त्यातच भारताचे बरेचशे खेळाडू गेल्या महिन्याभरपासून विश्रांतीवर असल्याने या मालिकेपूर्वी ते ताजेतवाने असतील. याचा फायदाही संघालाम मिळू शकतो.
बांगलादेशची मदार मुश्फिकुर, लिटन, मिराजवर…
बांगलादेश संघाने भारतीय दौऱ्यावर येण्यापूर्वी पाकिस्तानला त्यांच्याच घरात पराभूत करण्याची किमया साधली. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा बांगलादेशचा प्रयत्न असणार आहे. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराज, मुश्फिकुर रहीम, लिटन दास यांनी निर्णायक भूमिका पार पाडली होती. त्यामुळे भारताविरुद्धही त्याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. मिराजने पाकिस्तानविरुद्ध (१५५ धावा व १० बळी) अष्टपैलू चमक दाखवली होती. तर, अनुभवी मुश्फिकुर रहीम (२१६ धावा) व लिटन दास (१९४ धावा) यांनीही फलंदाजीत चमक दाखवली. बांगलादेशला अडचणीत आणायचे झाल्यास भारतीय गोलंदाजांना या तीन खेळाडूंना रोखणे गरजेचे आहे. यासह गोलंदाजीत बांगलादेशकडे हसन महमूद, नाहिद राणा आणि अनुभवी शाकिब अल हसन यांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे बांगलादेश भारतासमोर आव्हान उपस्थित करु शकतात.
हे ही वाचा… विश्लेषण : लेबनॉन पेजर स्फोटांमागे इस्रायल? पॅकिंगच्या वेळीच पेजरमध्ये स्फोटके पेरली?
भारताचे पारडे जड…
भारत आणि बांगलादेश संघांमध्ये कसोटीत भारताचेच पारडे जड राहिले आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी १३ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी भारताने ११ सामन्यांमध्ये विजय मिळवले. तर, दोन सामने अनिर्णीत राहिले. त्यामुळे या मालिकेपूर्वीही भारताचे पारडे जड समजले जात आहे. भारताने गेल्या दशकभराहून अधिक काळ आपल्या घरच्या मैदानावर मालिका गमावलेली नाही. भारताची प्रयत्न आपली हीच लय कायम राखण्याचा असेल.