Uranium in breast milk ‘सायंटिफिक रिपोर्टस्’मध्ये प्रकाशित झालेल्या नव्या वैज्ञानिक अभ्यासातून एक धक्कादायक बाब समोर आली. या अभ्यासात ४० स्तनपान करणाऱ्या मतांच्या दुधात युरेनियम आढळून आल्याचे सांगण्यात आले. मात्र, तज्ज्ञांनी या अभ्यासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बिहारमधील स्तनपान करणाऱ्या मातांच्या दुधात युरेनियम आढळल्यामुळे चिंता वाढली होती. ‘सायंटिफिक रिपोर्टस्’ या ओपन-ॲक्सेस जर्नलमध्ये गेल्या शुक्रवारी प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, बिहारमधील ४० मातांकडून घेतलेल्या स्तनांच्या दुधाच्या नमुन्यांमध्ये युरेनियम आढळले. महावीर कॅन्सर संस्थान आणि रिसर्च सेंटर-पाटणा, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी-फगवाडा आणि नवी दिल्लीच्या एम्स येथील संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, ७० टक्के बालके दुधात आढळलेल्या या युरेनियम पातळीच्या संपर्कात येऊ शकतात.
परिणामी त्यांना संभाव्यतः कर्करोग, मूत्रपिंडांवर दुष्परिणाम किंवा हाडांचे नुकसान अशा त्रासांना सामोरे जावे लागू शकते. या अभ्यासासंबंधीच्या अलीकडील वृत्तांमुळे स्तनपानाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे. ‘ब्रेस्ट फिडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया’चे संस्थापक डॉ. अरुण गुप्ता यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “या वृत्ताने अनावश्यक भीती निर्माण होत आहे आणि त्यामुळे लोक स्तनपान करणे थांबवू शकतात. आम्ही अनेक वर्षांपासून स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहोत. कारण- ते बाळांसाठी सर्वोत्तम पोषण आहे आणि ते बाळांना संसर्गापासूनही वाचवते.” हा अभ्यास काय सांगतो? तज्ज्ञांनी या वैद्यकीय अभ्यासावर प्रश्नचिन्ह का उपस्थित केले? जाणून घेऊयात…
तज्ज्ञांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे मुद्दे
तज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, आढळलेली पातळी अत्यंत नगण्य आहे आणि त्याचे वर्षानुवर्षे आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम झालेले नाहीत.
- नैसर्गिकरित्या आढळणारे युरेनियम
भाभा अणु संशोधन केंद्राचे माजी गट संचालक डॉ. दिनेश के. अस्वळ यांनी, नगण्य प्रमाणात युरेनियम आढळलेले आईचे दूध मुलांसाठी हानिकारक असू शकते, हा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, “युरेनियम हा एक नैसर्गिक घटक आहे. हा घटक नेहमीच अगदी कमी प्रमाणात प्रत्येक गोष्टीत उपस्थित असतो. जगभरातील भूजलातही काही प्रमाणात युरेनियम असतोच. चांगली गोष्ट म्हणजे युरेनियम हा जड घटक असल्याने तो शरीराच्या ऊतींना चिकटून राहत नाही आणि त्यामुळे तुम्ही सेवन केलेले बहुतेक युरेनियम अगदी कमी वेळात बाहेर फेकले जाते. लोकांनी अनेक वर्षे अत्यंत दूषित पाणी प्यायल्यावरच मूत्रपिंडावर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. खरं तर, भारतात आणि या अभ्यासाच्या लेखकांना आढळलेली पातळी फार जास्त नाही,” असेही ते म्हणाले.
जागतिक आरोग्य संघटनेने पिण्याच्या पाण्यातील युरेनियमबद्दलच्या २००१ च्या मार्गदर्शिकेत म्हटले आहे की, पाणी, अन्न आणि हवा यांच्या सामान्य सेवनातून सरासरी ९० मायक्रोग्राम युरेनियम मानवी शरीरात जात असते. त्यापैकी सुमारे ६६ टक्के सांगाड्यात, १६ टक्के यकृतात, आठ टक्के मूत्रपिंडामध्ये आणि १० टक्के इतर ऊतींमध्ये आढळते. डॉ. अस्वळ पुढे म्हणाले, “जागतिक आरोग्य संघटना भूजलातील युरेनियमची मर्यादा ३० मायक्रोग्राम प्रति लिटर इतकी ठेवते, तर फिनलंडमध्ये नैसर्गिकरीत्या उच्च पातळीचे युरेनियम आढळते आणि त्यामुळे त्यांची मर्यादा १०० मायक्रोग्राम इतकी जास्त आहे. भारतातील पातळी यापेक्षा कमी आहे. फिनलंडमधील लोक पिढ्यान् पिढ्या तेच पाणी पीत आहेत आणि त्यांच्या आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही.”
- अभ्यासात आढळलेल्या विसंगती
भारतातील पाण्यात सर्वाधिक प्रमाणातील युरेनियम कटिहार येथील नमुन्यांमध्ये आढळले, जे ५.३५ मायक्रोग्रॅम प्रति लिटर इतके होते, तर सर्वांत कमी प्रमाण नालंदा येथील नमुन्यांमध्ये आढळले, जे ५.२५ मायक्रोग्रॅम प्रति लिटर इतके होते. संशोधकांनी सुरुवातीला आईच्या दुधातून युरेनियमचा संपर्क धोकादायक पातळीवर असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी शेवटी असा निष्कर्ष काढला, ”नोंदवलेले आकडे मर्यादेपेक्षा कमी आहेत. त्यामुळे नगण्य प्रमाणातील युरेनियमच्या संपर्कातून आरोग्यास कमीत कमी धोका निर्माण होऊ शकतो.” अभ्यासाचे सहलेखक व नवी दिल्लीच्या एम्समधील बायोकेमिस्ट्री विभागातील अतिरिक्त प्राध्यापक डॉ. अशोक शर्मा म्हणाले, “युरेनियमची पातळी लक्षात घेण्यासारखी होती; पण त्यामुळे माता किंवा त्यांच्या बाळांना मोठी आरोग्य समस्या उदभवल्याचे दिसून आले नाही.
- बायोअक्युम्युलेशन आढळले नाही
संशोधकांनी नोंदवले की, युरेनियमची पातळी वयानुसार लक्षणीयरीत्या वाढली नाही. याचा अर्थ भूजलात युरेनियमची उच्च पातळी असलेल्या भागात जास्त काळ राहिल्याने युरेनियमची पातळी वाढते, याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यांनी असेही नमूद केले की, आईच्या दुधात युरेनियमचे बायोअक्युम्युलेशन खूप कमी आहे. स्थानिक भूजलातील युरेनियमचा अंश आणि आईचे दूध यांच्यात संबंध नाही. या अभ्यासासाठी संशोधकांनी २७३ भूजल नमुन्यांमधील युरेनियमची पातळीदेखील तपासली.
- आईच्या दुधात युरेनियम आढळण्याची शक्यता कमी
डॉ. अस्वळ यांच्या मते, आईच्या दुधात युरेनियम आढळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण- ते लॅक्टिक ॲसिड किंवा दुधाच्या इतर घटकांबरोबर एकत्रित होत नाही. ते पुढे म्हणाले की, युरेनियमची पातळी तपासण्यासाठी केवळ आईचे दूध हाच नमुना निवडण्यामागे कोणतेही तर्कशास्त्र नाही आणि युरेनियम शरीरातून किती बाहेर फेकले जाते हे पाहण्यासाठी लाघवीचे नमुनेदेखील तपासले पाहिजेत.
- नवजात बालकांच्या आरोग्याचे निरीक्षण केले नाही
या अभ्यासात बालकांच्या आरोग्यावर काही परिणाम झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी बालकांचे निरीक्षणदेखील केले गेले नाही. डॉ. शर्मा म्हणाले, “अभ्यासादरम्यान बालकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले गेले नाही. डॉ. अस्वळ यांनी असेही नमूद केले की, संशोधकांनी सुमारे ५ मायक्रोग्राम पातळीवर युरेनियम शोधले आहे. त्यासाठी त्यांची उपकरणे कॅलिब्रेट केलेली नव्हती. ते पुढे म्हणाले की, कॅलिब्रेशन नायट्रिक ॲसिड वापरून केले गेले होते; आईचे दूध वापरून नाही, ज्यामुळे निकालांवर परिणाम होऊ शकतो. डॉ. अस्वळ यांनी निदर्शनास आणले की, केवळ ४० नमुन्यांसह मातांचे दूध जास्त दूषित आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही, हे सांगण्यासाठी संशोधकांकडे महत्त्वपूर्ण नमुना नव्हता.
