Russia India defense partnership रशियाने भारताला त्यांच्या पाचव्या पिढीच्या Su-57 स्टेल्थ फायटर जेटचे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याबाबत ऑफर दिली आहे. तसेच रशिया भारताच्या फायटर एअरक्राफ्टसंबंधित गरजांना पाठिंबा देण्यासाठी तयार आहे, असेही एका रशियन अधिकाऱ्याने सांगितले आहे. या आश्वासनावरून असे स्पष्ट होते की, पुढील महिन्यात जेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येतील, त्यांची चर्चा प्रामुख्याने संरक्षण या विषयावर होईल.

युक्रेन संकटावरून पाश्चात्त्य देश भारतावर दबाव टाकत असले तरी भारत-रशियाचे संरक्षण संबंध मजबूत राहिले आहेत. रशियाचा हा नवीन प्रस्ताव भारताची हवाई ताकद लक्षणीयरीत्या वाढवू शकतो, असे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. Su-57 भारताला देण्याबाबत रशियाने काय म्हटले? तसेच, भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले ब्राह्मोस भारतासाठी कसे गेमचेंजर ठरत आहे? ‘मेक इन नाशिक’ काय आहे? रशियाबरोबरच्या या भागीदारीमुळे भारतीय हवाई दलाची ताकद कशी वाढते आहे? त्याविषयी जाणून घेऊयात…

रशियाची भारताला ऑफर

दुबई एअर शो २०२५ मध्ये रशियाच्या संरक्षण समूह रोस्टेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्गेई चेमेझोव्ह यांनी दोन्ही देशांमधील दीर्घकाळ चाललेल्या संरक्षण भागीदारीवर जोर दिला. सर्गेई चेमेझोव्ह यांनी ‘एएनआय’ला सांगितले, “भारत आणि रशिया अनेक वर्षांपासून भागीदार आहेत. जेव्हा भारतावर निर्बंध होते, तेव्हाही आम्ही त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांना शस्त्रे पुरवली होती. आज आम्ही भारताला आवश्यक असलेली कोणतीही लष्करी उपकरणे पुरवण्यास तयार आहोत.” चेमेझोव्ह यांनी असेही सांगितले की, भारताच्या कोणत्याही नव्या गरजा पूर्ण करण्यासाठी रशिया अजूनही तयार आहे.

Su-57 स्टेल्थ फायटर जेटची वैशिष्ट्ये

सुखोई Su-57 हे रशियाचे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान आहे. याचाच प्रकार असलेले आहे फेलॉन म्हणून ओळखले जाणारे Su-57E दुबई एअर शो २०२५ मध्ये हवाई प्रदर्शनांमध्ये दाखवण्यात आले. हे दोन इंजिन असलेल्या या विमाना सुपर-मॅन्युव्हरेबिलिटी, सुपरसॉनिक क्रूझ क्षमता (ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उड्डाण करण्याची क्षमता) आहे. तसेच ते प्रगत एव्हीऑनिक्सने सुसज्ज आहे. हे विमान मॅक २ वेगाने उड्डाण करू शकते. हे विमान रडारमध्ये सहज सापडू नये यासाठी त्यात स्टील्थ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे विमान अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली वाहून नेण्यास सक्षम आहे.

दुबई एअरशोमध्ये, Su-57E ने पहिल्यांदाच विमानातील अंतर्गत शस्त्रांची माहिती दिली. त्यात Kh-58 अँटी-रेडिएशन क्षेपणास्त्र आणि R-74M2 एअर-टू-एअर क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. सुखोई डिझाइन ब्युरो युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे (UAC) मुख्य पायलट सर्गेई बोगदान यांनी टास या वृत्तसंस्थेला सांगितले, “Su-57 दोन इंजिनांनी सुसज्ज आहे, ज्यात थ्रस्ट वेक्टरिंग आहे. थ्रस्ट वेक्टरिंगमुळे हे विमान कमी वेगात आणि आक्रमणाच्या स्थितीतही गोल फिरू शकते. या क्षमता हवाई युद्धात फायद्याच्या ठरू शकतात.” Su-57 ची तुलना अमेरिकेच्या F-35 Lightning II लढाऊ विमानाशी केली जाते.

ऑपरेशन सिंदूरमध्ये सुखोई-३० मधून डागलेल्या ब्राह्मोसचे महत्त्व

संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ)चे समीर व्ही. कामत यांनी सांगितले की, २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेले प्रत्युत्तर म्हणजेच ऑपरेशन सिंदूर. या ऑपरेशनदरम्यान, सुखोई-३० एमकेआयमधून डागलेले ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे आक्रमक शस्त्र होते. त्यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “जेव्हा आक्रमक शस्त्रांचा प्रश्न येतो, तेव्हा ब्राह्मोस हे प्राथमिक शस्त्र होते, जे आम्ही वापरले.

भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र हे जगातील सर्वांत वेगवान जहाजविरोधी शस्त्रांपैकी एक आहे. त्याच्या अचूक हल्ला, सुपरसॉनिक वेग व लांब पल्ला यांमुळे भारताची प्रतिबंधक क्षमता वाढली आहे. ऑपरेशनदरम्यान, धावपट्ट्या, बंकर्स व हँगर्स यांसारख्या पाकिस्तानच्या महत्त्वाच्या लक्ष्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही ब्राह्मोसला भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक म्हटले होते.

ते म्हणाले होते, “ब्राह्मोस केवळ क्षेपणास्त्र नाही, तो भारताच्या धोरणात्मक आत्मविश्वासाचा पुरावा आहे. हे क्षेपणास्त्र आपल्या भूदल, नौदल व हवाई दल अशा तिन्ही सेनांसाठी सर्वांचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरत आहे.” त्यांनी नमूद केले होते, “पाकिस्तानचा प्रत्येक प्रदेश ब्राह्मोसच्या टप्प्यात आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान जे घडले, तो केवळ एक ट्रेलर होता.”

‘मेक इन नाशिक’चे महत्त्व

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सुखोई हे लढाऊ विमान तयार करण्याच्या योजनेवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही देश संरक्षण सहकार्य मजबूत करू पाहत असल्याने, गोपनीय चर्चेत असलेल्या या प्रस्तावाला नवीन गती मिळाली आहे. एचएएलचा नाशिक विभाग दीर्घकाळापासून Su-30MKI चे देशांतर्गत उत्पादन केंद्र आहे. गेल्या महिन्यात, ‘सीएनबीसी-टीव्ही१८’ने वृत्त दिले होते की, भारत Su-57 लढाऊ विमानांच्या उत्पादनासाठी रशियन सरकारच्या ऑफरचा विचार केला जात आहे.

एचएएलच्या नाशिक सुविधा Su-30 चे उत्पादन केंद्र असल्याने सरकार रशियाच्या ऑफरचे मूल्यांकन करत आहे. त्याचबरोबर ते भारतामध्ये पाचव्या पिढीच्या जेट इंजिन विकसित करण्याच्या योजनांचा पाठपुरावा करत आहे. संयुक्त उत्पादनाची ऑफर भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अजेंड्याला समर्थन देते. तसेच इतर आंतरराष्ट्रीय विक्रेत्यांकडून सातत्याने होत असलेला विलंब आणि दीर्घकाळ प्रलंबित चर्चा पाहता, विमानांच्या आयातीपेक्षा संयुक्तपणे ही विमाने देशांतर्गत तयार करणे अधिक फायदेशीर ठरू शकते.