Brown line on nail cancer warning : नखावर दिसणारी एक साधी तपकिरी रेष सध्या जागतिक आरोग्य चर्चेचा विषय ठरली आहे. एका महिलेने आपल्या नखावरील फिकट रेषेकडे सुरुवातीला किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष केले; पण तपासाअंती ही रेष दुर्मिळ आणि जीवघेण्या त्वचेच्या कर्करोगाची असल्याचे तिला समजले. डेली मेलने दिलेले हे वृत्त समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाल्यानंतर जगभरातील त्वचाविकार तज्ज्ञांनी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा इशारा दिला. त्याविषयीचा हा आढावा…
देशभरात कर्करोगाचे वाढते प्रमाण
‘कॅन्सर’ असे नाव जरी ऐकले तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. गेल्या काही वर्षात देशभरात कर्करोगग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. ग्रामीण भागात तपासणीसाठी साधनसंपत्ती नसल्यामुळे अनेकांना या आजारांची लक्षणे लवकर समजत नाहीत. त्यातच आरोग्य सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे कर्करोगाचे निदान अंतिम टप्प्यात असल्यामुळे मृत्यूदराचा धोकाही वाढतो आहे. कर्करोगाची वाढती गंभीरता लक्षात घेता त्याची लक्षणे लवकरच ओळखता यावी यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. यादरम्यान नखावर दिसणारी एक साधी तपकिरी रेघ कर्करोगाचे संकेत देणारी असू शकते, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
काय आहे सबुंग्युअल मेलानोमा?
नखाखाली विकसित होणाऱ्या या कर्करोगाला ‘सबुंग्युअल मेलानोमा’ असे म्हणतात. हा आजार अत्यंत घातक असून अनेकदा त्याचे निदान चुकीचे होण्याची शक्यता असते. नखावरील छोटा डाग किंवा रेषेकडे अनेकजण सामान्य म्हणून दुर्लक्ष करतात; परंतु ही सवय भविष्यात गंभीर परिणामांना निमंत्रण देऊ शकते. ‘सबुंग्युअल मेलानोमा’ हा त्वचेच्या कर्करोगाचा एक दुर्मिळ प्रकार असून तो नखाच्या नवीन पेशींमध्ये विकसित होतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जयपूर येथील नारायणा रुग्णालयाच्या त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. डिंपल कोठारी यांनी या आजाराच्या लक्षणांवर प्रकाश टाकला आहे.
आणखी वाचा : मृत्यूनंतरही मानवी शरीर स्वतःहून हालचाल करते? वैज्ञानिक प्रयोगात नेमके कोणते रहस्य उलगडले?
सबुंग्युअल मेलानोमाची लक्षणे कोणती?
सामान्यतः सबुंग्युअल मेलानोमा नखाखाली गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाच्या रेषेसारखा दिसतो, जो काळानुसार रुंद होत जातो. कधीकधी हा रंग नखाच्या आसपासच्या त्वचेवरही पसरतो, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘हचिन्सन साइन’ म्हणतात. या आजारामुळे नखे ठिसूळ होणे, त्यांना तडे जाणे किंवा नखांचा आकार बदलणे असे प्रकार घडू शकतात. काही प्रकरणांमध्ये नखातून रक्त येणे, वेदना होणे किंवा बरी न होणारी जखम दिसू शकते. हा आजार सहसा एका नखावरच परिणाम करतो. त्यामुळे नखांमध्ये कोणताही बदल किंवा कायम राहणारा डाग दिसल्यास तातडीने आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. डिंपल कोठारी यांनी केले आहे.
सबुंग्युअल मेलानोमाची किती प्रकरणे?
जागतिक स्तरावर सबुंग्युअल मेलानोमाची फक्त ०.७ ते ३.५ टक्के इतकीच प्रकरणे आढळून येतात. त्यामुळे तुलनेने दुर्मीळ असलेल्या या कर्करोगाचे लवकर निदान न झाल्यास मृत्यूचा धोका वाढू शकतो. डॉ. कोठारी यांच्या मते, भारतामध्ये हा कर्करोग तुलनेने कमी प्रमाणात आढळतो. त्याची सुरुवातीची लक्षणे बुरशीजन्य संसर्ग किंवा नखाच्या दुखापतीसारखी दिसत असल्याने हा आजार अनेकदा दुर्लक्षित राहतो. ‘सबुंग्युअल मेलानोमा’ या आजाराचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याची लक्षणे नखांच्या इतर सामान्य समस्यांसारखीच दिसतात. त्यामुळे अनेकदा लोक याकडे साधी जखम किंवा रक्ताची गुठळी समजून दुर्लक्ष करतात. नखावर दिसणाऱ्या कोणत्याही बदलाची वेळीच तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
नखावरील प्रत्येक रेघ कॅन्सरची नसते!
डॉ. कोठारी यांनी हेही स्पष्ट केले की, नखावरील तपकिरी रेघ म्हणजे नेहमीच त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण नसते. अनेकदा पिगमेंटेशनमधील बदल, बुरशी किंवा काही औषधांच्या परिणामांमुळेही अशा रेघा दिसू शकतात. विशेषतः गडद त्वचा असलेल्या लोकांमध्ये अशा रेघा असणे सामान्य असू शकते. मात्र, जर ही रेघ फक्त एकाच नखावर असेल आणि ती काळानुसार अधिक गडद किंवा रुंद होत असेल, तर मात्र त्वरित तपासणी करून घेणे अनिवार्य आहे. कालांतराने रुंद होणारी, गडद होत जाणारी किंवा आकार बदलणारी रेघ ही धोक्याची घंटा ठरू शकते. या समस्येत केवळ डाग दिसणे महत्त्वाचे नसून, तो किती काळ टिकतो आणि कसा बदलतो हे अधिक महत्त्वाचे आहे. साधा मार लागल्याने आलेली सूज काही दिवसांत कमी होते; पण सबुंग्युअल मेलानोमाशी संबंधित रेघ मात्र कायम राहते आणि हळूहळू बदलत जाते.
भारतात त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण किती?
पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात त्वचेचा कर्करोग कमी प्रमाणात आढळतो; मात्र तो पूर्णपणे दुर्लक्षित करण्यासारखा नाही. भारतात कर्करोगांच्या एकूण प्रकारांपैकी दरवर्षी त्वचेच्या कर्करोगाचे १५ लाखांहून अधिक नवीन रुग्ण नोंदवले जातात. भारतात त्वचेच्या कर्करोगाचे- बेसल सेल कार्सिनोमा, स्क्युमस सेल कार्सिनोमा आणि मेलानोमा असे तीन प्रमुख प्रकार आढळून येतात. गडद त्वचा असलेल्या लोकांमध्ये त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण धोका पूर्वीच्या कल्पनेपेक्षाही जास्त आहे. भारतात याबद्दल पुरेशी जागरूकता नसल्यामुळे अनेकदा या आजाराचे वेळेवर निदान होत नाही, अशी चिंता गुरुग्राम येथील मरेंगो एशिया रुग्णालयाच्या त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. प्रियांका हेमराजानी यांनी व्यक्त केली.
तज्ज्ञांनी नेमका कोणता सल्ला दिला?
तज्ज्ञांच्या मते, नखांमध्ये काही विशिष्ट बदल दिसल्यास त्याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. जर कोणतीही दुखापत न होता नखावर रेघ आल्यास किंवा तिची व्याप्ती वाढतच असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. भारतीयांमध्ये मेलेनिनचे प्रमाण अधिक असल्यामुळे सूर्याच्या किरणांपासून काही प्रमाणात संरक्षण मिळते; पण तरीही नागरिकांना सूर्यापासून स्वत:चा बचाव करणे आवश्यक आहे. सबुंग्युअल मेलानोमा हा आजार होऊ नये म्हणून कडक उन्हात बाहेर पडताना टोपी व सनग्लासेस वापरावेत, शक्यतो सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत थेट उन्हात जाणे टाळावे, त्याशिवाय त्वचेसह नखांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे, जेणेकरून या आजाराची लक्षणे लवकर लक्षात आल्यास वेळीच निदान होण्यास मदत होईल, असा सल्ला डॉ. प्रियांका हेमराजानी यांनी दिला आहे.
