आषाढ महिना सुरू झाल्यानंतर सणासुदीचे वेध लागतात. श्रावण मास, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळीपर्यंत साखरेला उच्चांकी मागणी असते. किरकोळ बाजारातील किराणा माल दुकानदार, मिठाई विक्रेत्यांकडूनही साखरेला मागणी वाढते. नेमक्या त्याच वेळी साखरेच्या दरात वाढ झाली आहे.

साखर दराची सद्य:स्थिती काय?

गेल्या हंगामात ऊसाची लागवड कमी झाल्याने साखरेच्या उत्पादनात घट झाली. ऑगस्ट महिन्यात केंद्र शासनाने साखरेचा २२ लाख ५० हजार टन कोटा जाहीर केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने साखर दरवाढ झाली. साधारणपणे क्विंटलमागे ६०० रुपयांनी साखरेची दरवाढ झाली. घाऊक बाजारात दरवाढ झाल्यानंतर किरकोळ बाजारात साखरेचे किलोचे दर ५२ ते ५३ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. जुलै महिन्यात किरकोळ बाजारात ते ४४ रुपये किलो होते. त्यामुळे ऐन सणासुदीत सामान्यांना साखर दरवाढीची झळ बसणार आहे.

साखर दरवाढीची कारणे काय?

जुलै महिन्यापासून टप्प्याटप्प्याने साखरेचे दर वाढण्यास सुरुवात झाली. गेल्या हंगामात देशातंर्गत साखरेचे उत्पादन कमी झाले. साखरेचा हंगाम साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात सुरू होतो. मात्र, यंदा पाऊस उशिराने सुरू झाला. त्यामुळे ऊस लागवडीवर परिणाम झाला. नवीन हंगाम सुरू होण्यास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्र शासनाने उपलब्ध साखरेचा कोटा विचारात घेऊन जुलै महिन्याचा कोटा जाहीर केला. नवीन हंगामाच्या तोंडावर साखरेचा साठा कमी राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर साखर दरात तेजी येण्यास सुरुवात झाली. साखर दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने व्यापाऱ्यांवर चार हजार क्विंटल साखरसाठा ठेवण्याचे बंधन घातले. मात्र, प्रत्यक्षात साखर दर नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसून आली नाहीत.

अतिरिक्त कोट्याची मागणी पूर्ण होणार का?

सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दरात वाढ झाल्यानंतर साखर दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाने अतिरिक्त दोन लाख टनांचा साखर कोटा खुला करण्याची गरज व्यक्त केली आहे. साखरेचा अतिरिक्त कोटा जाहीर केल्यास दरवाढ नियंत्रणात येईल, तसेच घाऊक आणि किरकोळ बाजारात साखरेच्या दरात घट होईल. सणासुदीच्या काळात साखरेचे दर तेजीत राहिल्यास खरेदीवर परिणाम होईल. त्यामुळे अतिरिक्त कोटा जाहीर करण्याची मागणी होत आहे. ऑगस्ट महिन्याचा साखर कोटा १ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. त्यानंतर साखर कारखान्यांनी निविदा उघडल्या. नंतर साखर खरेदीसाठी चढाओढ झाली. श्रावण महिना, सणासुदीमुळे साखरेला मागणी वाढण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर साखर खरेदी सुरू झाली. एका ट्रकऐवजी दोन ते तीन ट्रक साखर खरेदी करण्यात आली.

अन्य राज्यांकडून मागणी किती?

देशातील अन्य राज्यांकडून महाराष्ट्रातील साखरेला चांगली मागणी आहे. अशा परिस्थितीत सट्टेबाजही सक्रिय झाले आहेत. केंद्र शासन अतिरिक्त कोट्याबाबत काय निर्णय घेणार, त्यावर पुढचे चित्र अवलंबून राहील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक आणि किरकोळ बाजारातील मागणी विचारात घेता सध्या बाजारात होत असलेली साखरेची आवक अपुरी आहे. साखर कारखानदारांकडे साखरेचा साठाही कमी आहे. व्यापारी साखरेची साठवणूक करू शकत नाहीत. तेवढी जागाही व्यापाऱ्यांकडे उपलब्ध नाही. आठवडाभरात प्रतिक्विंटल साखरेला ४९०० ते ५१०० रुपये असे दर मिळाले आहेत. घाऊक बाजारातील दर तेजीत असल्याने किरकोळ बाजारात दरवाढ झाली आहे.

वेगवेगळ्या उद्योगांकडून साखरेला मागणी का?

साखरेचे वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून साखरेला मागणी असते. अशा प्रकारच्या साखरेला ‘फार्मा शुगर’ म्हणतात. सल्फरविरहित साखर बाजारात विक्रीसाठी आणली जाते. साखरेचे प्रकार विचारात घेतल्यास मागणीही वेगवेगळी असते. मिठाई विक्रेते, आइस्क्रीम उत्पादकांकडून साखरेला मोठी मागणी असते. घरगुती ग्राहकांसह विविध उद्योगांकडून साखरेला वाढती मागणी आहे. सणासुदीच्या काळात ती आणखी वाढणार आहे. त्यामुळे साखर दरवाढीची झळ सर्वांनाच सोसावी लागणार आहे.

rahul.khaladkar@expressindia.com