History of Sugar Trade and Slavery: महाराष्ट्रासह दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील स्थानिक बाजारपेठांमध्ये साखरेचा दर प्रतिकिलो ७० ते ७५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कोल्हापूरसारख्या प्रमुख साखर बाजारपेठांमध्येही घाऊक आणि एक्स-मिल कच्च्या साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीला ४,१०० रुपये प्रति क्विंटल असलेला दर वाढून आता ५४०० ते ६४०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. या दरवाढीमुळे साखरेच्या किमतींनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या वाढलेल्या किमतीमुळे ग्राहकांचे तोंड मात्र कडू होण्याची वेळ आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर साखरेच्या व्यापाराशी जोडलेल्या गुलामगिरीच्या इतिहासाचा घेतलेला हा आढावा.
साखर गोड; पण तिचा इतिहास मात्र कडू
वसाहतवादी कालखंडात ज्या वस्तूंच्या व्यापाराने गुलामांच्या व्यापाराला चालना दिली त्यात सर्वाधिक मागणी असलेल्या वस्तूंमध्ये साखरेचा समावेश होत होता. आज जगभरातील मानवी आहारात साखर आपले वर्चस्व गाजवत आहे. किंबहुना साखरेच्या वाढत्या वापराकडे आता एक जागतिक आरोग्यसमस्या म्हणून पाहिले जात आहे. उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार, एक व्यक्ती दररोज सुमारे १७ चमचे अतिरिक्त साखरेचे सेवन करते; म्हणजेच वर्षाला एका व्यक्तीमागे तब्बल ६६ पौंड (सुमारे ३० किलो) साखर! सकाळच्या चहा-कॉफीतील चमचाभर साखरेपासून ते प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये दडलेल्या साखरेपर्यंत, गोड पदार्थांविषयीची आपली ही सामूहिक ओढ जगभरातील साखरेच्या प्रचंड मागणीला सतत खतपाणी घालत आहे.
साखरेचा व्यापार आणि गुलामगिरी
साखरेचा शोध सर्वप्रथम भारतात लागला होता, ही बाब अनेकदा विस्मरणात जाते. अनेक शतकांपर्यंत या ‘पांढऱ्या सोन्याचे’ प्रचंड प्रमाणावर होणारे उत्पादन आणि जागतिक व्यापार यांचा गुलामगिरीशी निकट संबंध होता. हा संबंध सुरुवातीला प्रामुख्याने आफ्रिकन गुलामांशी आणि त्यानंतर भारतातून नेण्यात आलेल्या करारबद्ध ‘गिरमिटिया’ मजुरांशी होता. ‘गिरमिटिया मजूर’ (किंवा करारबद्ध मजूर) म्हणजे १९ व्या आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश, फ्रेंच व डच वसाहतींमधील उसाच्या मळ्यांवर काम करण्यासाठी करारावर परदेशी नेलेले भारतीय कामगार होय. या मजुरांना ५ वर्षांच्या सेवा-करारावर (Agreement) स्वाक्षरी करून किंवा अंगठा उठवून परदेशात पाठवले जाई. इंग्रजीतील ‘ॲग्रीमेंट’ (Agreement) या शब्दाचा उच्चार भारतीय अशिक्षित मजुरांच्या तोंडी ‘गिरमिट’ असा झाला. या ‘गिरमिट’ करारावर सही करून गेलेल्या मजुरांना पुढे ‘गिरमिटिया’ म्हटले जाऊ लागले. इतिहासातील साखरेच्या या अफाट व्यापारामुळेच जगाच्या विविध भागांत भारतीयांचे मोठे स्थलांतर झाले.
दूध आणि मधाची भूमी
मानवजातीच्या इतिहासातील बहुतांश संस्कृतीत गोडव्याचा संबंध देवत्वाशी जोडला गेला आहे. हिंदू धर्मातील पूजा-विधींपासून ते यहुदी परंपरेतील ‘दूध आणि मधाने समृद्ध’ वचनबद्ध भूमीच्या कल्पनेपर्यंत, गोड पदार्थ आणि पेये समृद्धी, शुभ-मंगलकारक आणि विपुलतेचे प्रतीक मानले गेले आहेत. एवढेच नव्हे, तर औषध म्हणूनही त्यांचा वापर केला जात असे. विशेषतः प्राचीन इजिप्त, ग्रीक-रोमन आणि इतर वैद्यकीय परंपरांत जखमा व विविध विकारांसाठी मधाचा वापर झाल्याचे पुरावे आहेत. मध्ययुगातही साखर औषधांमध्ये, सिरपमध्ये आणि औषधांची चव सुधारण्यासाठी वापरली जात असे. सुमारे ८००० ते १०००० वर्षांपूर्वी न्यू गिनी परिसरात उसाची लागवड सुरू झाली असावी. तेथील लोककथांमध्ये ऊस मानवी उत्पत्तीशीही जोडला गेला आहे; एका कथेत पहिला पुरुष आणि उसाचे कांड यांच्या संयोगातून मानवजातीची उत्पत्ती झाल्याचे म्हटले आहे.
न्यू गिनीतील साखर
न्यू गिनी हे जाड कांडे आणि अधिक साखरेचे प्रमाण असलेल्या सॅकरम ऑफिसिनॅरम (Saccharum officinarum) या ‘noble cane’ च्या लागवडीचे प्रमुख केंद्र मानले जाते. पुढे हा ऊस आग्नेय आशियातून भारतात पोहोचला. इथे त्याचा स्थानिक रानटी सॅकरम स्पॉन्टेनियम (S. spontaneum) आणि इतर उसांच्या प्रकारांशी झालेल्या प्राचीन संकरातून सॅकरम बार्बेरी (S. barberi) सारखे भारतीय ऊसप्रकार विकसित झाले असावेत.
साखरेच्या स्फटिकाचा भारताचा शोध
सुरुवातीला माणूस उसाचे कांड चावून त्यातील गोड रस ग्रहण करत असे. पुढे प्राचीन भारतात उसाचा रस उकळून गूळ आणि नंतर साखरेचे स्फटिक तयार करण्याची तंत्रे विकसित झाली. साखरेचे स्फटिकीकरण शक्य झाल्यामुळे तिची साठवणूक आणि दूरवर वाहतूक करणे सोपे झाले. त्यामुळे पुढील काळातील साखर व्यापार व उद्योगाच्या विस्ताराला मोठी चालना मिळाली. इतिहासकार मायकेल अडास यांनी आपल्या ‘Agricultural and Pastoral Societies in Ancient and Classical History’ या ग्रंथात रसापासून दाणेदार साखर तयार करण्याच्या या शोधाला ‘अत्यंत दूरगामी परिणाम करणारी घटना’ म्हटले आहे. साखरेची ही निर्मितीप्रक्रिया कित्येक शतके अत्यंत गुप्त ठेवली गेली होती. या साखरेच्या व्यापारातून भारतातील तत्कालीन राज्यकर्त्यांना मोठा आर्थिक फायदा होत असे.
भारत-चीन आणि साखरेचा संबंध
व्यापारी मार्गांद्वारे भारतामधून साखरेची लोकप्रियता परदेशातील उच्चवर्गीयांमध्ये वेगाने पसरली. मायकेल अडास यांनी म्हटले आहे की, या प्रसारात भारतीय खलाशांचे योगदान मोठे होते. त्यांच्या दैनंदिन आहारात साखर आणि तूप हे मुख्य घटक असत. भारतातून गेलेल्या बौद्ध भिक्षूंनी ऊस चीनमध्ये पोहोचवला. चीनच्या तांग राजवंशाबरोबर संबंध दृढ करण्यासाठी भारतीय दूतांनी साखरेचा वापर केल्याने ही देवाणघेवाण अधिक वाढली.
साखरेसाठी चिनी शिष्टमंडळे ७ व्या शतकात भारतात
चिनी नोंदींनुसार, साखरेच्या शुद्धीकरणाचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी इ.स. ६४७ मध्ये चीनने भारतात किमान दोन शिष्टमंडळे पाठवली होती. चिनी नोंदीनुसार तांग सम्राट ताइझोंगने मगधकडे दूत पाठवून भारतीय साखरनिर्मितीचे तंत्र जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता (Mazumdar, S. 1998, Sugar and Society in China: Peasants, Technology, and the World Market. Harvard University Asia Center).
अरब आणि भारतीय साखर
साखर (आणि ऊस) भारतातूनच अरब जगामध्येही पोहोचली. इ.स.पूर्व ५१० मध्ये पर्शियाच्या अखेमेनिड साम्राज्याचा राजा डेरियस प्रथम याने भारतावर आक्रमण केले, त्यावेळी त्याच्या सैन्याला पहिल्यांदा उसाची ओळख झाली. पुढे भारतात साखरेच्या स्फटिकीकरणाचे तंत्र शोधले गेल्यानंतर, हे तंत्रज्ञान पर्शियात पोहोचले.
बदाम, साखर आणि मशीद
त्यानंतर मुस्लिम कृषीक्रांतीच्या काळात ऊस संपूर्ण मध्यपूर्वेत पसरला; तिथे त्याला ‘पर्शियन रीड’ किंवा ‘पर्शियन काठी’ म्हणून ओळखले जाई. साखरेची लोकप्रियता इतकी वाढली की बदाम आणि साखरेच्या मऊ मार्झिपॅनपासून संपूर्ण मशिदी उभारल्याच्या कथाही प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध इतिहासकार सिडनी मिंट्झ यांनी (Sweetness and Power: The Place of Sugar in Modern History: १९८५) म्हटले आहे की, ‘अरब जिथे जिथे गेले, तिथे त्यांनी साखर आणि तिच्या उत्पादनाचे तंत्रज्ञान बरोबर नेले.’
शर्करा ते शक्कर
संस्कृतमधील ‘शर्करा’ (śarkarā) हा साखरेशी संबंधित सर्वात प्राचीन शब्दांपैकी एक मानला जातो. या शब्दाचा आरंभीचा अर्थ, खडी किंवा लहान दाणेदार कण असा होता. उसाचा रस आटवून तयार होणारे साखरेचे स्फटिक खडीसारखे दिसत असल्यामुळे पुढे ‘शर्करा’ हा शब्द दाणेदार साखरेसाठी वापरला जाऊ लागला असावा. काळानुसार संस्कृतमधील हा शब्द प्राकृत आणि इतर मध्य इंडो-आर्यन भाषांमध्ये ‘सक्खरा’, ‘सक्कर’ अशा रूपांत बदलत गेला आणि त्यातून मराठीतील ‘साखर’, हिंदी-उर्दूमधील ‘शक्कर’ तसेच इतर भारतीय भाषांतील तत्सम शब्द विकसित झाले.
साखर ते शुगर
साखरेचे उत्पादन आणि व्यापार भारतातून पश्चिम आशियाकडे पसरत असताना तिचे नावही व्यापारी आणि सांस्कृतिक संपर्कांबरोबर प्रवास करू लागले. संस्कृत ‘शर्करा’ पासून पर्शियनमध्ये ‘shakar’, पुढे अरबीमध्ये ‘sukkar’ अशी रूपे तयार झाली. अरब व्यापारी आणि इस्लामी साम्राज्यांच्या माध्यमातून साखर भूमध्यसागरीय प्रदेशात पोहोचली आणि तिच्या नावानेही युरोपीय भाषांमध्ये प्रवेश केला. मध्ययुगीन लॅटिनमधील succarum किंवा तत्सम रूपांपासून जुन्या फ्रेंचमधील sucre/sugre आणि पुढे इंग्रजीतील ‘sugar’ हा शब्द विकसित झाला. फ्रेंच sucre, इटालियन zucchero, स्पॅनिश azúcar आणि पोर्तुगीज açúcar हे शब्दही याच शब्दकुळाशी संबंधित आहेत.
साखर आणि व्यापारी मार्ग
अशा प्रकारे ‘शर्करा’, ‘साखर’ आणि ‘sugar’ हे तीन वेगवेगळे शब्द नसून एका दीर्घ भाषक प्रवासातील वेगवेगळी रूपे आहेत. विशेष म्हणजे साखरेच्या पदार्थाचा इतिहास आणि तिच्या नावाचा इतिहास जवळजवळ एकाच व्यापारी मार्गाने पुढे सरकताना दिसतो. भारतात विकसित झालेल्या साखरनिर्मितीच्या तंत्राबरोबरच तिचे भारतीय नावही पर्शिया, अरब जग आणि नंतर युरोपात पोहोचले. त्यामुळे आजचा इंग्रजी ‘sugar’ हा शब्ददेखील अप्रत्यक्षपणे प्राचीन संस्कृत ‘शर्करा’ या शब्दाशी जोडलेला आहे.
भारतीय साखर आणि युरोप
११व्या शतकापर्यंत पूर्वेकडील देश आणि युरोप यांच्यातील व्यापारात साखरेने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, त्या काळात साखरेचे उत्पादन कष्टाचे असल्याने ती अत्यंत महागडी आणि प्रतिष्ठेची वस्तू मानली जाई. त्या कालखंडात साखर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होती. १३५० च्या दशकात परिस्थिती बदलली. तांत्रिक सुधारणांमुळे एकाच उसातून मिळणाऱ्या रसाचे प्रमाण दुप्पट झाले. परिणामी इटली, स्पेन व पोर्तुगालमधील युरोपीय सत्ताधीशांना उसाच्या मोठ्या मळ्यांमध्ये गुंतवणूक करण्याची प्रेरणा मिळाली.
सायप्रस आणि सिसिली- उस लागवडीची मध्ययुगीन केंद्रे
युरोपात पोहोचल्यानंतर साखरेचे उत्पादन भूमध्यसागरीय प्रदेशातून हळूहळू अटलांटिक बेटांकडे सरकले. मध्ययुगात सायप्रस आणि सिसिली ही उसाच्या लागवडीची महत्त्वाची केंद्रे होती; पुढे पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी मादीरा, तर स्पॅनिशांनी कॅनरी बेटांवर उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू केले. या बेटांवर मोठे मळे, साखर गिरण्या, व्यापारी भांडवल आणि गुलाम मजुरी यांची सांगड अधिक घट्ट होत गेली.
साखरमळा आणि गुलाम मजुरीचे मॉडेल
विशेषतः पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळील साओ टोमे बेटावर पंधराव्या शतकाच्या अखेरीस आणि सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस आफ्रिकन गुलामांच्या श्रमांवर आधारित मोठी साखरमळा व्यवस्था विकसित झाली. पुढे याच उत्पादनपद्धतीचे तंत्र, भांडवल आणि गुलाम मजुरीचे मॉडेल पोर्तुगीजांनी ब्राझीलमध्ये नेले. त्यामुळे ब्राझीलमधील साखर आणि गुलामगिरीची व्यवस्था अचानक निर्माण झाली नव्हती; तिची पूर्वपीठिका भूमध्यसागरीय आणि अटलांटिक बेटांवरील या आधीच्या प्रयोगांत तयार झाली होती.
ऊस अमेरिकेत पोहोचला….
पोर्तुगालमार्गेच ऊस पुढे ‘नव्या जगात’, म्हणजे अमेरिकन खंडात, पोहोचला. १४९३ साली ख्रिस्तोफर कोलंबसने ऊस हिस्पानिओला बेटावर नेला. आज या बेटावर हैती आणि डॉमिनिकन रिपब्लिक ही दोन राष्ट्रे आहेत. ऊस अमेरिकेतील स्थानिक वनस्पती नसतानाही तेथील उष्णकटिबंधीय हवामानात तो विलक्षण जोमाने वाढला. त्यातील प्रचंड आर्थिक नफ्याची शक्यता लक्षात आल्यानंतर स्पॅनिश वसाहतवाद्यांनी हिस्पानिओलातून आपल्या इतर कॅरिबियन वसाहतींमध्ये उसाची लागवड सुरू केली. लवकरच ब्रिटिश, डच आणि फ्रेंच वसाहतवादीही त्याच मार्गावर गेले.
पोर्तुगीज आणि टुपी
सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत साखरेची मागणी युरोपातील श्रीमंत आणि व्यापारी वर्गात वाढू लागली होती, तरी ती अजूनही महागडी चैनीची वस्तू होती. पोर्तुगीजांनी इ.स. १५०० मध्ये ब्राझील गाठले आणि १५३० च्या दशकापासून तेथे पद्धतशीर वसाहतीकरणासह साखर उद्योगाचा विस्तार सुरू केला. साखरेचे उत्पादन वाढवून खर्च कमी करण्यासाठी पोर्तुगीजांनी स्थानिक टुपी लोकांना गुलाम करून मळ्यांवर काम करण्यास भाग पाडले. परंतु, टुपी लोक वारंवार तिथून पळून जाऊन ब्राझीलच्या घनदाट जंगलांत आश्रय घेत असत. त्यातच पोर्तुगीजांनी आणलेल्या नवीन रोगांशी कधीही संपर्क न आल्यामुळे टुपी लोकांमध्ये आजारपण आणि मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले. परिणामी कामगारांची कमतरता भासू लागली.
आफ्रिकन गुलामांची निर्यात
कामगारांच्या तुटवड्यावर तोडगा म्हणून पोर्तुगीज वसाहतवादी आफ्रिकन गुलामांच्या व्यापाराकडे वळले. आफ्रिकेतून लोकांना जहाजांमधून आणून वसाहतींतील मळेमालकांना विकले जात असे. युरोपीय रोगांशी पूर्वीच संपर्क आलेला असल्याने अनेक आफ्रिकन लोकांमध्ये त्या रोगांविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण झाली होती. गुलाम मजुरांचा अखंड पुरवठा मिळाल्यामुळे साखरेचे उत्पादन अतिशय वेगाने वाढले. हळूहळू साखर ही या वसाहतींच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत झाली. साखरेचे आर्थिक महत्त्व इतके प्रचंड होते की, १८व्या शतकात ब्रिटिश अॅडमिरल जॉर्ज रॉडनी यांनी उसाने समृद्ध जमैकाला ‘ब्रिटिश मुकुटातील सर्वोत्तम रत्न’ असे संबोधले होते.
पश्चिमेतील सर्वोत्तम संपत्ती
वसाहतवादी अर्थव्यवस्थेत साखरेचे मळे इतके महत्त्वाचे होते की, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धादरम्यान ब्रिटनने अमेरिकेतील युद्धापेक्षा जमैकाच्या संरक्षणाला अधिक प्राधान्य दिले, असे इतिहासकार मॅथ्यू पार्कर यांनी ‘Sugar Barons’ पुस्तकात म्हटले आहे. अँड्रिया स्टुअर्ट यांनी ‘Sugar in the Blood’ (२०१३) या पुस्तकात लिहिले आहे की, “कॅरिबियनमधील साखरेची बेटे मालकांसाठी केवळ मौल्यवान नव्हती, तर ती अमूल्य होती… अतोनात नफा मिळवून देण्याच्या क्षमतेमुळे अनेकांनी त्यांना ‘पश्चिमेतील सर्वोत्तम संपत्ती’ म्हटले.”
संदर्भ/Reference
- Mintz, Sidney W. (1985). Sweetness and Power: The Place of Sugar in Modern History. New York: Viking.
- Dunn, Richard S. (1972). Sugar and Slaves: The Rise of the Planter Class in the English West Indies, 1624–1713. Chapel Hill: University of North Carolina Press.
- Galloway, J. H. (1989). The Sugar Cane Industry: An Historical Geography from Its Origins to 1914. Cambridge: Cambridge University Press.
- Mazumdar, Sucheta. (1998). Sugar and Society in China: Peasants, Technology, and the World Market. Cambridge, MA: Harvard University Asia Center.
- Tinker, Hugh. (1974). A New System of Slavery: The Export of Indian Labour Overseas, 1830–1920. London: Oxford University Press.
- Northrup, David. (1995). Indentured Labor in the Age of Imperialism, 1834–1922. Cambridge: Cambridge University Press.
- Parker, Matthew. (2011). The Sugar Barons: Family, Corruption, Empire, and War in the West Indies. London: Hutchinson.
- Stuart, Andrea. (2012). Sugar in the Blood: A Family’s Story of Slavery and Empire. London: Portobello Books.
