Sunrisers Hyderabad Umran Malik Kashmiri Cricketer Who can bowl at 145 kmph print exp scsg 91 | Loksatta

Premium

विश्लेषण : १४५ किमी ताशी वेगाने चेंडू टाकणारा कोण हा काश्मिरी उमरान मलिक?

त्याचे घर तावी नदीच्या तीरापासून काही अंतरावर असल्यामुळे वाळूत गोलंदाजीचा सराव करीतच तो मोठा झाला.

विश्लेषण : १४५ किमी ताशी वेगाने चेंडू टाकणारा कोण हा काश्मिरी उमरान मलिक?
गुजरात टायटन्सचा निम्मा संघ गुंडाळण्याचा पराक्रम उमरानने दाखवला (फोटो ट्विटरवरुन साभार)

प्रशांत केणी
प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या उरात धडकी भरवणारा वेगवान गोलंदाज जम्मू आणि काश्मीरचा उमरान मलिक यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये सर्वांचे लक्ष वेधत आहे. १४५ किमी ताशी किंवा अनेकदा यापेक्षा अधिक वेगवान चेंडू टाकण्याची क्षमता असलेला २२ वर्षीय उमरान हैदराबाद संघाचा आता प्रमुख गोलंदाज आहे. बुधवारी ‘आयपीएल’ गुणतालिकेत अग्रस्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सचा निम्मा संघ गुंडाळण्याचा पराक्रम उमरानने दाखवला. या निमित्ताने उमरान कोण आहे आणि त्याचा इथवरचा प्रवास कसा झाला ते समजून घेऊया.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

उमरान मलिक कोण आहे?

उमरानचा जन्म जम्मू आणि काश्मीरच्या गुज्जर नगरमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील. त्याच्या वडिलांचे फळांचे दुकान आहे. टेनिसबॉल क्रिकेटमध्ये उमरान यॉर्कर चेंडू टाकण्यात पटाईत होता. पण वयाच्या १७ व्या वर्षी रणधीर सिंग मन्हास यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या गोलंदाजीत सुधारणा झाल्या. त्याचे घर तावी नदीच्या तीरापासून काही अंतरावर असल्यामुळे वाळूत गोलंदाजीचा सराव करीतच तो मोठा झाला. त्यामुळे वेगवान गोलंदाजासाठीची शारीरिक क्षमता त्याच्यात उत्तमपणे विकसित झाली. गतवर्षीपासून तो ‘आयपीएल’ गाजवू लागला आहे. इतकेच नव्हे, तर भारतीय ‘अ’ संघाकडून दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध गतवर्षी नोव्हेंबरमध्ये त्याने प्रथम श्रेणी पदार्पण केले.

उमरान ‘आयपीएल’मध्ये कसा लक्षवेधी ठरत आहे?

उमरानने गतवर्षी ‘आयपीएल’मध्ये पदार्पण केले. याच हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात सलग पाच चेंडू १५० किमी प्रति तास यापेक्षा अधिक वेगाने टाकून सर्वांचे लक्ष वेधले होते. यंदाच्या ‘आयपीएल’ महालिलावात सनरायजर्स हैदराबादने त्याला संघात कायम राखले. १४५ किमी प्रति तासापेक्षा अधिक वेगाने सातत्याने चेंडू टाकणारा हा वेगवान गोलंदाज बऱ्याचदा १५०चा टप्पाही ओलांडतो. सध्या आठ सामन्यांत १५ बळी घेणारा उमरान ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात त्याने पाच बळी घेण्याचा पराक्रम साधला. या पाच फलंदाजांना बाद करताना त्याने शुभमन गिल (१४२.२ किमी प्रति तास), हार्दिक पंड्या (१४५.१), वृद्धिमान साहा (१५२.८), डेव्हिड मिलर (१४८.७) आणि अभिनव मनोहर (१४६.८) असे वेगवान चेंडू टाकले. १५५ किमी वेगाने चेंडू टाकण्याचे लक्ष्य असल्याचे उमरान अभिमानाने सांगतो.

उमरानचा ‘आयपीएल’पर्यंतचा प्रवास कसा झाला?

गतवर्षीच्या हंगामात राज्य संघातील सहकारी अब्दुल समादने उमरानच्या गोलंदाजीच्या चित्रफिती सनरायजर्स हैदराबाद संघाचे मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मण आणि टॉम मुडी यांना दाखवल्या होत्या. टी. नटराजनला करोनाची लागण झाल्यामुळे त्याच्या जागी उमरानला हैदराबाद संघात संधी मिळाली. या संघात त्याला वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक डेल स्टेनचे मार्गदर्शन लाभले. या संधीचे सोने केल्यामुळे गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी तो नेट गोलंदाज म्हणून भारतीय संघासमवेत होता.

नामांकित क्रिकेटपटूंनी उमरानविषयी काय म्हटले आहे?

जूनमध्ये भारतीय संघ इंग्लंडशी प्रलंबित कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी उमरानला संधी द्या. त्याला अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळाले नाही, तरी हा अनुभव त्याच्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी सूचना भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी केली आहे. उमरान हा फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरतो आहे. त्याच्या गोलंदाजीवर दडपणाचे ओझे वाढवू नका, असा सल्ला न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल व्हेटोरीने दिला आहे. चेंडू शक्य तितक्या वेगाने टाकण्यावर भर दे. चेंडूचा टप्पा आणि उंचीची फारशी तमा बाळगू नकोस, असा कानमंत्र स्टेनने त्याला दिला आहे. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी उमरान उपयुक्त ठरेल, असे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ख्रिस लिनने म्हटले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-04-2022 at 11:43 IST
Next Story
विश्लेषण: आर्थिक संकट सोडवण्यासाठी श्रीलंकन सरकार घेणार ‘गोल्डन व्हिसा’चा आधार? नेमकं काय आहे जाणून घ्या