Understanding Super El Nino and India Heatwave impact on monsoon and global temperature rise: ‘सुपर अल निनो’मुळे जागतिक तापमानात मोठी वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामानात टोकाचे बदल झालेले पाहायला मिळू शकतात. हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता वाढल्याचे मत अमेरिकन हवामान अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. ‘सुपर अल निनो’ चा प्रभाव १८७७-१८७८ मध्ये होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा तो सर्वाधिक तीव्र असू शकतो, असा इशारा हवामानशास्त्रज्ञांनी दिला आहे. १८७७-१८७८ दरम्यान जगभरात कोट्यवधी लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. भारत सध्या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. अनेक ठिकाणी तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. ‘सुपर अल निनो’मुळे परिस्थिती आणखी बिघडेल का? तापमान आणखी वाढेल का? याबाबत जाणून घेऊ.
एल निनो म्हणजे काय?
एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ आहे लिटिल बॉय म्हणजे लहान मुलगा. एन निनो हा हवामानशास्त्रीय घटक आहे. हा हवामान घटक विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सर्वसाधारणपणे दोन ते सात वर्षांनी विकसित होतो. एल निनो विकसित होणे म्हणजे, प्रशांत महासागराच्या मध्य आणि आग्नेय भागातील तापमान वाढते. एल निनो त्याच्या तटस्थ अवस्थेत असताना वारे विषुववृत्ताच्या बाजूने पश्चिमेकडे वाहतात आणि दक्षिण अमेरिकेतील उबदार पाणी आशियाकडे घेऊन जातात. मात्र एल निनो स्थितीवेळी वारे कमकुवत होतात (किंवा उलटही घडू शकते) आणि पूर्वेकडून (दक्षिण अमेरिका) पश्चिमेकडे (इंडोनेशिया) वाहतात. या स्थितीत वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना उबदार पाण्याचे प्रवाह मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरात जाऊन पश्चिम अमेरिकेच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचतात. अशा वेळी विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असते. एल निनो हा घटक तीव्र उष्णतेच्या लाटा, पूर आणि दुष्काळाशी संबंधित आहे. एल निनोमुळे जगभरातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका आणि दुष्काळाचा धोका वाढू शकतो, असे एनओएएच्या हवामान अंदाज विभागाने म्हटले आहे.
पृथ्वीगोलावरील उत्तर दक्षिण या भौगोलिक ध्रुवांपासून सर्वत्र समान अंतरावर असणाऱ्या, पूर्व-पश्चिम दिशेने जाणाऱ्या व पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन समसमान भाग करणाऱ्या काल्पनिक वर्तुळास ‘विषुववृत्त’ (भौगोलिक किंवा भौतिक) असे म्हणतात.
‘सुपर एल निनो’ म्हणजे काय?
‘सुपर’ किंवा ‘मेगा’ एल निनो म्हणजे अशी स्थिती जेव्हा हवामान बदल अत्यंत तीव्र स्वरूपाचा असतो. कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटीचे सहाय्यक राज्य हवामानशास्त्रज्ञ मॅथ्यू सिटेल यांच्या मते, जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा किमान २ अंश सेल्सिअसने वाढते, तेव्हा त्याला ‘सुपर एल निनो’ असे म्हटले जाते. ही एक दुर्मिळ घटना असून १९५० पासून आतापर्यंत केवळ चार वेळा अशी स्थिती ओढवली आहे. ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, समुद्राचे तापमान २.५ अंश सेल्सिअसच्या वर गेल्याची नोंद आतापर्यंत फक्त एकदाच झाली आहे. NOAA च्या अंदाजानुसार, यावर्षीची ही स्थिती “शक्तिशाली” किंवा “अत्यंत शक्तिशाली” स्वरूपात विकसित होण्याची ५० टक्के शक्यता आहे. यापूर्वी २०१५ मध्ये ‘सुपर एल निनो’ची नोंद झाली होती. त्याचा प्रभाव २०१६ मध्ये संपला.
हवामान तज्ज्ञांच्या मते, या ‘सुपर एल निनो’मुळे पुढील वर्षी जागतिक तापमान विक्रमी पातळीवर पोहोचू शकते. युनिव्हर्सिटी ऑफ मियामीचे सहयोगी शास्त्रज्ञ डॉ. अँडी हेझेलटन यांनी ‘एक्स’ वर लिहिले, “सर्व निरीक्षणे एकसारखेच अंदाज दर्शवत आहेत. यावर्षी अत्यंत शक्तिशाली एल निनो निर्माण होणार असून त्याचे जागतिक हवामानावर गंभीर परिणाम होतील.” हवामानशास्त्रज्ञ रायन माऊ यांनीही याबाबत इशारा देताना म्हटले की, हा “मेगा एल निनो” १८७७-१८७८ नंतरचा सर्वात शक्तिशाली असू शकतो. १८७७-१८७८ च्या एल निनोमुळे आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या मोठ्या भागात भीषण उष्णतेची लाट आणि दुष्काळ पडला होता. तर दुसरीकडे, दक्षिण अमेरिकेतील काही भागांना अतिवृष्टी आणि महापुराचा सामना करावा लागला होता.
भारतावर काय परिणाम होणार?
‘एल निनो’मुळे भारतात यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी पडू शकतो. याचा थेट फटका कृषी क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे. कारण भारतातील कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. यामुळे तापमानात मोठी वाढ, तीव्र उष्णतेच्या लाटा आणि दीर्घकाळ चालणारा दुष्काळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाण्याच्या साठ्यावर प्रचंड ताण येऊ शकतो. AQI.in ने २२ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, एल निनो पूर्णपणे सक्रिय होण्यापूर्वीच जगातील २० सर्वात उष्ण शहरांपैकी १९ शहरे एकट्या भारतात आहेत. पश्चिम बंगालमधील मेदिनिपूर येथे ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून ते या यादीत अव्वल स्थानी आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश यांसारख्या उत्तर भारतीय राज्यांसह पूर्व आणि मध्य भारतात उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा दिला आहे.
सध्याच्या टोकाच्या हवामानाला मुख्यत्वे ‘हीट डोम’ (Heat Dome) जबाबदार आहे. दरम्यान, डोंगराळ भागात बर्फ आणि मैदानी भागात पाऊस पाडणारे ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ देखील यावर्षी कमकुवत आणि विरळ झाले आहेत. सुपर एल निनोमुळे मान्सून पावसाच्या स्वरूपात मोठे बदल होऊ शकतात. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, शक्तिशाली एल निनो म्हणजे प्रत्येक वेळी टोकाचे हवामान असेलच असे नाही. NOAA ने स्पष्ट केले आहे की, “शक्तिशाली घटनांचा अर्थ नेहमीच मोठा हवामान परिणाम असा होत नाही, परंतु अशा घटनांमुळे काही विशिष्ट परिणाम घडण्याची शक्यता नक्कीच वाढते.” IMD ने या आठवड्यात उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवला असून, नागरिकांना पुरेसे पाणी पिण्याचे (हायड्रेटेड राहण्याचे), कडक उन्हात बाहेर जाणे टाळण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
