Menstrual Leave Supreme Court decision and its impact on working women: मासिक पाळी दरम्यान महिलांना रजा देणे बंधनकारक करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचिकेवर चिंता व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली. तसे केल्यास महिलांना कोणी नोकरी देणार नाही, तसेच त्यांच्याबद्दल गैरसमजूत पसरेल, अशी शक्यता आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा समावेश असलेल्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे या प्रकरणावर सुनावणी झाली. सरन्यायाधीश म्हणाले, मासिक पाळी दरम्यान महिलांना रजा देणे सक्तीचे करण्यात आले तर त्या पुरूष सहकाऱ्यांच्या बरोबरीने काम करतात, असे त्या समजणार नाहीत. तसेच त्यांच्या करिअरसाठी हे घातक ठरू शकते.
मासिक पाळी दरम्यान रजा आवश्यक आहे का?
मासिक पाळी दरम्यान महिलांना रजा देणे सक्तीचे केले तर त्याचा परिणाम काय होईल याबाबत अनेकदा अभ्यास करण्यात आला आहे. काही अभ्यास अहवालांनुसार, तसे केल्यास महिलांना नोकरी देताना भेदभाव होण्याची शक्यता आहे. पुरूषांना प्राधान्य दिले जाऊ शकते. दरम्यान, काही संशोधनांनुसार, महिलांना पगारी सुट्टी ऐवजी कामाच्या ठिकाणी स्वच्छता व आराम करण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने हा प्रश्न सुटू शकतो, असे समोर आले आहे. तामिळनाडूतील ग्रामीण भागात या प्रश्नाबाबत एक अभ्यास करण्यात आला होता. “माइंडसेट्स अँड मेन्सेस: डिकोडिंग यंग वूमेन्स अॅटिट्यूड्स टुवर्ड्स मेन्स्ट्रुअल लिव्ह” हा अभ्यास अहवाल ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यास अहवालानुसार, मासिक पाळीदरम्यान रजा देणे सक्तीचे करण्याला तरूणी व महिलांनी समर्थन दिले आहे. या काळात स्वच्छता राखण्यासाठी तसेच होणारा त्रास यांमुळे त्यांनी रजा आवश्यक असल्याचे म्हटले आहे. १८ वर्षांवरील ९५५ विद्यार्थीनी व महिलांचा या अभ्यास अहवाल प्रक्रियेत सहभाग होता.
सर्वेक्षणातून काय समोर आले? महिलांचे म्हणणे काय?
मासिक पाळी दरम्यान काम करताना कामाच्या ठिकाणी कलंकित होण्याची भीती महिलांना वाटते. तसेच इतर सहकाऱ्यांची त्यांच्याबद्दल असलेली भावना दूषित होऊ शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मासिक पाळी दरम्यान प्रचंड वेदना होतात, असे सर्वेक्षणात सहभागी असलेल्या जवळपास सगळ्याच महिलांनी सांगितले. त्यापैकी ६५.५ टक्के महिलांनी मासिक पाळी दरम्यान आतापर्यंत रजा घेतलेली नव्हती, ५४.६ टक्के महिलांनी कामाच्या ठिकाणी स्वच्छ रूम असल्या तरी रजेलाच प्राधान्य आहे, असे म्हटले आहे. मासिक पाळी दरम्यान तब्बेत ठीक नसल्याने त्याचा कामावर परिणाम होतो, असे ४८ टक्के महिला म्हणाल्या. तर ४३.१ टक्के महिला म्हणाल्या की, त्यांना दिलेल्या पदासाठी त्या अयोग्य आहेत, असा समज मासिक पाळीत रजा दिल्याने होऊ शकतो.
रजा दिल्यास महिलांच्या नोकऱ्यांवर परिणाम? पुरूषांचा दृष्टीकोन बदलेल?
महिलांना मासिक पाळी दरम्यान रजा देणे बंधनकारक केले तर त्यांच्या प्रोफेशनल ग्रोथवर परिणाम होईल तसेच त्यांना नोकऱ्या मिळण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते, असे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्ज विभागाच्या प्रमुख प्रा. भसवती मुखर्जी म्हणाल्या. महिलांना बाल संगोपन रजा दिली जाते. काम व कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी ही रजा दिली जाते. पुरूषांना बाल संगोपन रजा मिळत नाही. महिलांना आता मासिक पाळी दरम्यान रजा देणे सक्तीचे केले तर त्याचा परिणाम कामावर होईल आणि महिलांकडे पाहण्याचा इतर सहकाऱ्यांचा दृष्टीकोन बदलेल, असे प्रा. मुखर्जी म्हणाल्या. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये आणखी एक अभ्यास अहवाल प्रकाशित झाला आहे. त्यात मासिक पाळीमुळे महिलांच्या प्रोडक्टिविटीवर (कामाच्या क्षमतेवर) परिणाम होतो, असे म्हटले आहे. ३२,७४८ महिलांचा या अभ्यास सर्वेक्षणात सहभाग होता. यात प्रामुख्याने २१ वर्षांखालील मुलींच्या कामावर अत्याधिक परिणाम होतो असे दिसून आले आहे. त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
मासिक पाळीमुळे वर्षात नऊ दिवस रजा?
इजिप्शियन पब्लिक हेल्थ असोसिएशनच्या एका अहवालानुसार, मासिक पाळीमुळे महिलांचे रजा घेण्याचे प्रमाण वाढते. त्याचा कामावर परिणाम होतो. कधी कधी महिला कामावर उपस्थित असल्या तरी त्यांच्या कामावर मात्र परिणाम झालेला असतो. जगभरात मासिक पाळीमुळे वर्षातून नऊ दिवस महिला रजा घेतात असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. दरम्यान, ही परिस्थिती काम व प्रत्येक महिलेच्या प्रकृतीनुसार वेगळी असू शकते. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे केरळमधील डॉ. राजीव जयदेवन यांनी माहिती दिली.
डॉ. जयदेवन म्हणाले, ही परिस्थिती प्रत्येक महिलेच्या बाबतीत वेगळी असू शकते. काही महिलांना मासिक पाळी दरम्यान वेदना होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होत नाही. तर काही महिलांचा मासिक पाळीत अधिक रक्तस्राव होतो. तसेच त्यांना खूप वेदना होतात. त्यामुळे त्यांना रजा घेणे भाग पडते. दरम्यान, काही अनुभवी डॉक्टरांच्या उपचारांमुळे महिलांना मासिक पाळीत वेदना कमी होऊन काम करणे शक्य होते.
“एकच गोष्ट सगळ्यांसाठी लागू होऊ शकत नाही”
प्राध्यापक भसवती मुखर्जी म्हणाल्या, प्रत्येक संस्थेत कामकाजाचे स्वरूप वेगळे असते. काम करण्याची पद्धत वेगळी असते. प्राध्यापकांना वेगळ्या स्वरूपात काम करावे लागते, तर बँक कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप देखील वेगळे आहे. त्यामुळे एकच गोष्ट सगळ्यांना लागू होईल असे नाही. मासिक पाळीवर रजा देणे हे सर्वांसाठी सकारात्मकपणे लागू होईल असे नाही. महिलांचे आरोग्य व त्यांच्या कामाची उत्पादकता वाढवण्यासाठी संस्थांनीच पुढाकार घ्यायला हवा. वर्क फ्रोम होम पॉलिसी असल्यास महिलांना लाभदायक ठरू शकते. तसेच त्यांच्यासाठी कामाच्या ठिकाणी स्वच्छ रूम उपलब्ध करून दिल्यासही फायदा होऊ शकतो, असे मुखर्जी म्हणाल्या.
