विनायक परब

नव्वदच्या दशकात भारतीय नौदलामध्ये नव्या युद्धनौका आणि पाणबुड्यांची निर्मिती फारशी झाली नाही. मनमोहन सिंग सरकारच्या काळातही हा वेग मंदावलेलाच होता. मात्र नंतरच्या कालखंडात हा वेग वाढविण्यात आला. कारण भारताला अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर परिसरात आपले वर्चस्व कायम राखायचे असेल तर आवश्यक तेवढ्या तरी पाणबुड्या आणि युद्धनौका आपल्याकडे असणे ही गरज आहे. पांरपरिक पद्धतीने ही निर्मिती वेगात होणे शक्य नाही. त्यामुळेच आता भारतीय नौदल नव्या बांधणी पद्धतीचा वापर करत असून मंगळवारी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते जलावतरण झालेल्या सुरत व उदयगिरी या दोन्ही युद्धनौका हे नव्या बांधणीचे क्रांतिकारी पाऊल ठरल्या आहेत, त्याविषयी…

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
28 kg of on single use plastic seized by nmmc in navi mumbai
नवी मुंबईत २८ किलो एकल वापर प्लास्टिक जप्त, ९० हजार रुपयांचा दंड वसूल
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 

युद्धनौकांच्या बांधणीचे हे नवे तंत्र नेमके काय आहे?

पूर्वी पारंपरिक पद्धतीमध्ये युद्धनौकांची बांधणी एकाच गोदीमध्ये पूर्ण केली जायची. मात्र आता वेगवान युद्धनौका बांधणी गरजेची असल्याने त्यासाठी मोड्युलर पद्धतीची बांधणी वापरण्यात आली. या तंत्रामध्ये युद्धनौकेचे वेगवेगळे घटक हे वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेस तयार केले जातात. त्यामुळे बांधणी वेगात होते आणि अखेरीस ते एकाच गोदीत आणून तिथे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे एकत्र केले जातात. मंगळवारी जलावतरण करण्यात आलेल्या उदयगिरी या स्टेल्थ फ्रिगेट तर सुरत या स्टेल्थ विनाशिकेची निर्मिती याच अद्ययावत पद्धतीने करण्यात आली आहे.

या नव्या बांधणीत स्वयंपूर्णता आहे का?

होय, दोन्ही युद्धनौकांच्या तळाचा भाग, त्यासाठी वापरण्यात आलेले स्टेल्थ गुणधर्म असलेले स्टील आणि त्याची जोडणी हे देशातच झाले. या युद्धनौकांच्या तळाच्या भागासाठी वापरण्यात आलेल्या विशिष्ट पोलादाची निर्मिती स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाने केली आहे. हे पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे. त्याचप्रमाणे तळाची निर्मिती विविध भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी देशभरात करण्यात आली आणि त्याची अंतिम जोडणी मुंबईतील माझगाव गोदीमध्ये करण्यात आली. हे भाग एकत्र पद्धतीने जोडले जाणे हा अतिकौशल्याचा भाग आहे. कारण या तळावर युद्धनौकांचा सारा भार असतो. नौकांच्या वजनाचा भार आणि शिवाय समुद्राच्या पाण्याचा निर्माण होणारा दाब हे सारे या पोलादाने आणि त्याच्या जोडणीने सहन करावे लागते तेही दीर्घकाळ. जगभरात फार कमी देशांना हे कौशल्य प्राप्त झाले आहे. त्यात आता भारताचा यशस्वी समावेश झाला आहे.

स्टेल्थ म्हणजे नेमके काय?

स्टेल्थ हा धातू आणि डिझाईन या दोन्हींचा गुणधर्म आहे. युद्धनौका सुरू असताना त्यातील यंत्रणा सुरू असतात, त्यातून विविध लहरी बाहेर पडतात. त्या लहरी रडार किंवा पाण्याखाली कार्यरत असलेले सोनार टिपते आणि शत्रूला माहिती मिळते. हे टाळण्यासाठी स्टेल्थ गुणधर्म असलेला धातू वापरला जातो. या धातूमध्ये काही रडार व सोनारमधून येणारी प्रारणे शोषली जातात तर काही बाहेर विविध दिशांनी फेकली जातात. त्यामुळे शत्रूच्या यंत्रणेस चकवा मिळतो आणि युद्धनौका किंवा पाणबुड्यांची माहिती मिळत नाही. अथवा ती मिळेपर्यंत युद्धनौका किंवा पाणबुड्यांनी कार्यभाग साधलेला असतो. स्टेल्थ भाग डिझाईनमध्येही समाविष्ट असतो. स्टेल्थ बांधणीमध्ये सरळरेषेतील कोन डिझाईनमध्ये टाळले जातात. त्यामुळे स्टेल्थ डिझाईन नजरेस वेगळे जाणवते. रंगांमध्येही आता स्टेल्थ गुणधर्म आले असून त्याच्या निर्मितीमध्येच त्यांचा समावेश केला जातो. अशा रंगांवर पडलेली प्रारणेही स्टेल्थ गुणधर्माचेच ते शोषण्याचे किंवा बाहेर फेकण्याचे काम करतात.

प्रकल्प १५ बी काय आहे?

प्रकल्प १५ बी हा विशाखापट्टणम वर्गातील अद्ययावत स्टेल्थ विनाशिकांच्या निर्मितीचा प्रकल्प आहे. यातील पहिली स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस विशाखापट्टण २८ ऑक्टोबर २०२१ रोजी नौदलाकडे हस्तांतरीत करण्यात आली. दुसरी मार्मुगोवाच्या सध्या सागरी चाचण्या सुरू आहेत. तर तिसरी इन्फाळ सध्या निर्मितीच्या टप्प्यात आहे. मंगळवारी जलावतरण झालेली सुरत ही या वर्गातील चौथी युद्धनौका विनाशिका वर्गातील आहे. हा तब्बल ३५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.

प्रकल्प १७ ए काय आहे?

प्रकल्प १७ ए हा निलगिरी वर्गातील स्टेल्थ फ्रिगेट्सचा प्रकल्प असून यातील पहिली आयएनएस निलगिरी २८ सप्टेंबर २०१९ रोजी हस्तांतरित करण्यात आली. उदयगिरी ही या वर्गातील दुसरी स्टेल्थ फ्रिगेट आहे. हा प्रकल्प ४५ हजार कोटी रुपयांचा आहे.

या प्रकल्पांचे महत्त्व काय?

सध्या अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर या परिसरामध्ये चीनच्या नौदलाचा वावर खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्याला आळा घालण्यासाठी भारतीय नौदलाकडे तुल्यबळ सामर्थ्य असणे गरजेचे आहे. सध्या तरी भारतीय नौदल या तुलनेत खूपच मागे आहे. वेगवान युद्धनौका निर्मितीच्या माध्यमातून आपण या त्रुटीवर मात करू शकतो. शिवाय यात स्वयंपूर्ण बनावटीचा भागही मोठा असल्याने तेही महत्त्वाचे यश मानले पाहिजे.