रशियाचा गुप्तहेर मानला जाणारा बेलुगा व्हेल शनिवारी (३१ ऑगस्ट) नॉर्वेच्या समुद्रात मृतावस्थेत आढळून आला. या व्हेलचे नाव ‘व्हाल्दिमिर’. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या नावावरून या व्हेलचे नाव ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. नॉर्वेजियन सार्वजनिक प्रसारक ‘एनआरके’ने दिलेल्या वृत्तानुसार, बेलुगाचे मृत शरीर दक्षिण नॉर्वेमधील रिसाविका खाडीत मासेमारीसाठी निघालेल्या एका पिता-पुत्राच्या जोडीला तरंगताना आढळले. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. व्हाल्दिमिरचे वय केवळ १५ वर्षे असते; परंतु सामान्यतः बेलुगा व्हेल ६० वर्षांपर्यंत जगतात. कोण होता व्हाल्दिमिर? प्राण्यांना हेरगिरीसाठी कसे तयार केले जाते? ते जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ह्वाल्दिमीर-एक गुप्तहेर

ग्रीनलँड, कॅनडा, अलास्का, उत्तर नॉर्वे व रशियाच्या आसपासच्या आर्क्टिक महासागराच्या अतिथंड पाण्यात बेलुगा व्हेल गटांमध्ये फिरतात आणि सामान्यत: उत्तरेकडे राहतात. २०१९ मध्ये नॉर्वेच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर जेव्हा व्हाल्दिमिर पहिल्यांदा दिसला, तेव्हा त्याला पाहण्यास स्थानिक लोक उत्सुक होते. कारण- या भागात बेलुगा व्हेल आढळत नाही. व्हाल्दिमिरवर काही दिवस नजर ठेवण्यात आली. त्याची जवळून पाहणी केली असता, त्याच्या गळ्याभोवती एक पट्टा होता; ज्यावर ‘इक्विपमेंट सेंट पीटर्सबर्ग’ असे लिहिलेले होते. त्या पट्ट्यावर कॅमेरादेखील बसविण्यात आला होता. त्यामुळे व्हाल्दिमिर हा रशियन गुप्तहेर असल्याचे आणि त्याला नॉर्डिक किनाऱ्यावर शोध मोहिमेवर पाठवले गेले असल्याचे स्पष्ट झाले. व्हाल्दिमिरला त्याचे नाव ‘व्हाल’ व ‘दिमिर’ या दोन शब्दांपासून मिळाले आहे. व्हाल हा व्हेलसाठी नॉर्वेजियन शब्द आहे आणि दिमिर हा व्लादिमिर पुतिन यांच्या नावातील शब्द आहे. मात्र, मॉस्कोने हा व्हेल रशियाचा गुप्तहेर असल्याच्या चर्चांना कधीही प्रतिसाद दिला नाही.

ग्रीनलँड, कॅनडा, अलास्का, उत्तर नॉर्वे आणि रशियाच्या आसपासच्या थंड आर्क्टिक पाण्यात, बेलुगा व्हेल गटांमध्ये फिरतात. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?

व्हाल्दिमिर गुप्तहेर असला तरी तर तो अतिशय शांत स्वभावाचा होता. बऱ्याच वर्षांमध्ये बेलुगा व्हेल नॉर्वेजियन किनारपट्टीवर दिसले. अनेकदा ते लोकांशी खेळत होते, असे वृत्त ‘एनआरके’ने दिले आहे. डॉल्फिनप्रमाणे बेलुगा व्हेलने लोकांच्या हातांच्या काही संकेतांना प्रतिसाद दिला, असेही सांगितले गेले. स्ट्रॅण्डने ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले की, बेलुगा त्याच्या आयुष्यातील बराच काळ बंदिवासात होता. स्ट्रॅण्ड हे स्वयंसेवी संस्था ‘मरीन माईंड’चे संस्थापक आहेत. जेव्हापासून व्हेल पहिल्यांदा दिसले तेव्हापासून स्ट्रॅण्ड व्हेलच्या हालचालींचा मागोवा घेत होते. ‘मरीन माइंड’च्या वेबसाइटनुसार, व्हाल्दिमिर रशियन पाण्यातून ओलांडून नॉर्वेला पोहोचला जिथे तो कदाचित बंदिवासात होता. व्हाल्दिमिरच्या वर्तनावरून अशीही शंका व्यक्त केली जात आहे की, तो कदाचित गुप्तहेरऐवजी थेरपी व्हेल असावा.

ह्वाल्दिमीर गुप्तहेर असला तरी तो अतिशय शांत स्वभावाचा होता. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेरगिरीसाठी प्राण्यांचा वापर

व्हाल्दिमिर गुप्तहेर होता की नाही, याबाबत अनेक प्रश्नचिन्हे आहेत. मात्र, हेरगिरीच्या जगात पशू-पक्ष्यांचा वापर केला जाणे ही काही आता नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. पहिल्या महायुद्धादरम्यान कबुतरांचा वापर केवळ संदेश पोहोचवण्यासाठीच केला जात नव्हता, तर त्यांच्या पायांत छोटे कॅमेरेही बसवले जात होते. गुप्तहेर कबुतरे शत्रूच्या ठिकाणांवरून उडत असत आणि त्यांच्या पायांंवरील कॅमेरे खालील जमिनीची छायाचित्रे क्लिक करीत असत. त्यांचा वेग आणि त्यांना दिल्या गेलेल्या प्रशिक्षणामुळे त्यांची वाढलेली हेरगिरीची क्षमता यांमुळे अशा ९५ टक्के मोहिमा यशस्वी झाल्या, असे ‘इंटरनॅशनल स्पाय म्युझियम’च्या अहवालात म्हटले आहे.

कबूतर आणि इतर पक्षी अजूनही हेरगिरीसाठी वापरले जाऊ शकतात. मे २०२३ मध्ये मुंबई पोलिसांनी एका कबुतराला ताब्यात घेतले होते; ज्याच्या पायांत दोन अंगठ्या बांधल्या होत्या. त्यावर चिनी भाषेसारखे शब्द दिसून येत होते. तैवानमधील काही बंदिस्त पक्ष्यांची सुटका करण्यात आली होती आणि त्यानंतर हे पक्षी भारतात पोहोचले होते. मार्च २०२३ मध्ये ओडिशाच्या पुरीमध्ये दोन कबुतरे हेरगिरीच्या संशयाखाली पकडले गेली. त्यांच्या पायांना कॅमेरे जोडलेले होते.

हेरगिरीच्या जगात पशुपक्ष्यांचा वापर करणे नवलाईची गोष्ट नाही. (छायाचित्र-रॉयटर्स)

शीतयुद्धाच्या काळात पश्चिम आणि सोविएत युनियन या दोन्हीकडील देशांनी त्यांच्या हेरगिरी कार्यक्रमांमध्ये विविध प्राण्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, अमेरिकन नेव्हीने १९६० च्या दशकात पाणबुड्या आणि पाण्याखालील खाणी शोधण्यासाठी डॉल्फिनला प्रशिक्षित केले होते. ‘बिझनेस इनसायडर’ या नियतकालिकानुसार, नि:शस्त्र खाणी आणि इतर साहित्य मिळविण्यासाठी नौदलाने सागरी सिंहांनाही (सी लायन्स) प्रशिक्षण दिले होते. सेंट्रल इंटेलिजेन्स एजन्सी (सीआयए)ने १९६० च्या दशकात क्रेमलिन आणि सोविएत दूतावासांवर हेरगिरी करण्यासाठी काही उपकरणांसह मांजरी तैनात करण्याचा प्रयत्न केला. त्याला ‘प्रोजेक्ट अकौस्टिक किट्टी’ असे नाव देण्यात आले होते; ज्यासाठी २० दशलक्ष डॉलर्स इतका खर्च आला होता.

हेही वाचा : पृथ्वीवरील ‘गेटवे टू हेल’ म्हणून ओळखला जाणारा रहस्यमयी खड्डा काय आहे? त्याचा आकार वाढणं धोक्याचा इशारा आहे का?

सीआयएला त्यांच्या गुप्तहेर मांजरींवर नियंत्रण ठेवणे कठीण गेले होते. त्या मांजरी बाहेर फिरत आणि आदेशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून आल्यानंतर तो प्रकल्प बंद करण्यात आला. खारींचादेखील हेरगिरीसाठी वापर केला जातो. २००७ मध्ये इराणने अणुसंवर्धन प्रकल्पाजवळ १४ खारी पकडल्या होत्या. त्यांच्यावर हेरगिरी करणारी उपकरणे बसवण्यात आली होती; परंतु या घटनेसंबंधीचा तपशील अद्याप अस्पष्ट आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspected russian spy whale hvaldimir spy animals rac
Show comments