पश्चिम बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली. जवळपास आठवडाभराच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. विशाल श्रीवास्तव, राज सिंह आणि मयांक मिश्रा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार या तीन राज्यांच्या पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत या तिघांना जेरबंद करण्यात आले. आरोपींचा माग काढण्यासाठी डिजिटल पेमेंटने अत्यंत महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते, त्याविषयी…

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चंद्रनाथ रथ यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम येथे रात्री साडेदहाच्या सुमारास ही थरारक घटना घडली होती. प्राथमिक तपासानुसार, चंद्रनाथ रथ हे एसयूव्ही कारने त्यांच्या घराच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी सिल्व्हर रंगाच्या एका दुसऱ्या कारने त्यांच्या गाडीचा माग अडवला. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर एकापाठोपाठ एक गोळ्या झाडल्या. हत्येनंतर आरोपींनी कार तिथेच सोडून दिली आणि दुसऱ्या कारने व दुचाकीने घटनास्थळावरून पळ काढला.

‘यूपीआय’ पेमेंटमुळे कसे सापडले मारेकरी?

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, हल्लेखोरांची लाल रंगाची कार एका टोल प्लाझावरून जाताना दिसली. या कारमधील तिन्ही आरोपींनी एकत्र प्रवास करीत असताना ‘यूपीआय’द्वारे टोल नाक्यावर पेमेंट केले होते. या डिजिटल व्यवहारामुळे पोलिसांना त्या वाहनाचा नेमका मार्ग शोधता आला. ती कार टोल प्लाझा ओलांडून कोलकाताच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकले. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली चंदेरी रंगाची निसान मायक्रा कार आणि दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. त्याशिवाय एक दुचाकी अगदी घटनास्थळाच्या काही अंतरावरूनच जप्त करण्यात आली आहे, तर आरोपींनी वापरलेली दुसरी दुचाकी पश्चिम बंगालमधील बारासात येथून हस्तगत करण्यात आली आहे.

४० मिनिटे दबा धरून बसले होते मारेकरी

चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसे या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले तिघेही सराईत गुन्हेगार असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी विशाल हा बिहारच्या बक्सरचा रहिवासी असून, इतर दोन आरोपी उत्तर प्रदेशातील असल्याचे समोर आले आहे. विशाल याच्याविरुद्ध हत्या आणि दरोड्यासारखे १५ हून अधिक गुन्हे दाखल असल्याचेही सांगितले जात आहे. या तिन्ही आरोपींना आज (११ मे) पश्चिम बंगालमधील बारासात न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालक सिद्ध नाथ गुप्ता यांनी सांगितले की, गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे, परंतु तिची नंबर प्लेट बनावट असून त्यात छेडछाड करण्यात आली आहे. तसेच, हल्लेखोरांनी वापरलेली एक मोटारसायकल चोरीची होती, जी २०१२ मध्ये बिभास कुमार भट्टाचार्य यांच्या नावावर नोंदणीकृत होती, असेही तपासात स्पष्ट झाले आहे.

तीन दिवसांपासून ठेवली जात होती पाळत

पोलिसांच्या मते, चंद्रनाथ रथ यांची हत्या अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती. मारेकरी घटनास्थळी सुमारे ४० मिनिटे दबा धरून बसले होते. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, रथ यांची कार रस्त्यावरून जात असताना ती अचानक थांबली. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने कारच्या डाव्या बाजूवर अतिशय जवळून गोळ्या झाडल्या. गोळीबार करणारी व्यक्ती सराईत गुन्हेगार वाटत होती. दोन राऊंड फायर केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. एका पोलीस अधिकार्‍याने ‘न्यूज १८’ ला दिलेल्या माहितीनुसार, चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा कट गेल्या तीन दिवसांपासून रचला जात होता. “गेल्या तीन दिवसांपासून या कटाची तयारी सुरू होती. संपूर्ण योजना आखून त्याची पूर्वतयारी आणि सरावही करण्यात आला होता. चंद्रनाथ रथ यांचा पाठलाग करण्यात आला, त्यांच्या वेळापत्रकावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आणि त्यांच्या हालचालींची माहिती गोळा करण्यात आली,” असे त्यांनी सांगितले.

चंद्रनाथ रथ यांच्या कुटुंबियांचा आरोप काय?

सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या निकटवर्तीय सहकाऱ्याच्या हत्येला थंड डोक्याने आणि पूर्वनियोजित पद्धतीने केलेला खून असे संबोधले. त्यांनी असा आरोपही केला की, हल्लेखोरांनी दोन ते तीन दिवस त्यांच्यावर पाळत ठेवली होती. चंद्रनाथ रथ यांच्या आई हसिराणी रथ यांनी या हत्येसाठी थेट ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षालाच जबाबदार धरले. माझ्या मुलाच्या हत्येसाठी तृणमूल काँग्रेस आणि त्यांचे गुंडच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, तपास यंत्रणांनी या हत्येत सहभागी असलेल्या सर्व आरोपींना शोधून अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. ४१ वर्षीय चंद्रनाथ रथ हे सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. भारतीय वायुदलात सेवा बजावल्यानंतर ते अधिकारी यांच्याबरोबर भाजपाचे काम पाहत होते. रथ यांना ओळखणाऱ्या लोकांनी त्यांचे वर्णन शांत स्वभावाचे आणि शिस्तप्रिय व्यक्ती म्हणून केले आहे. त्यांच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी तिघांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.