Swollen Legs in Pregnancy : गरोदरपणात शरीरात अनेक बदल होतात. कारण- गर्भात वाढणाऱ्या बाळाला आधार देताना शरीर त्या स्थितीशी जुळवून घेत असतं. यादरम्यान पाय आणि घोटे सुजणे ही अनेक महिलांना जाणवणारी सामान्य समस्या आहे. विशेषतः गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात ही सूज अधिक जाणवू शकते; पण ही सूज नेमकी का येते, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

अमेरिकेतील मेरीलँड येथील भूलतज्ज्ञ व इंटरव्हेन्शनल पेन मेडिसिनचे डॉक्टर कुणाल सूद यांनी सांगितले की, गर्भधारणा होताना शरीर जास्त रक्त आणि द्रव साठवून ठेवतं. यावेळी पायांकडून हृदयाकडे रक्तप्रवाह होण्याच्या प्रक्रियेत काही प्रमाणात अडथळा येतो. त्यामुळे पाय आणि घोट्यांच्या भागात द्रव साचतो आणि सूज येऊन पाय जड वाटू लागतात.

गर्भावस्था जसजशी पुढे जाते, तसतशी पायांमध्ये द्रव साचण्याची समस्या वाढू शकते. डॉक्टर कुणाल सूद यांच्या मते, गर्भावस्थेत शरीरात रक्त आणि द्रवाचं प्रमाण वाढतं. त्याच वेळी हार्मोन्समुळे रक्तवाहिन्या सैल होतात आणि वाढत्या गर्भाशयामुळे पायांकडून हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह मंदावतो. त्यामुळे द्रव पायांमध्ये साचतो आणि सूज येते. ही सूज दिवसभरात हळूहळू वाढू शकते आणि त्यामुळे पायांमध्ये अस्वस्थता जाणवू शकते.

ही सूज कमी करण्यासाठी रोजच्या जीवनात काही सोपे उपाय करता येतात, असं डॉक्टर सूद यांनी सांगितलं आहे.

पायांची सूज कमी करण्यासाठी काय कराल?

डॉक्टर कुणाल सूद यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत. या उपायांमुळे पायांमधील रक्तप्रवाह सुधारण्यास आणि सुजेमुळे होणारा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

  • विश्रांती घेताना पाय थोड्या उंचीवर ठेवा
  • कंप्रेशन सॉक्स वापरा, विशेषतः दिवसाच्या सुरुवातीला वापरल्यास उपयुक्त ठरतं
  • हळू चाला आणि घोट्यांची हालचाल करत राहा
  • पुरेसं पाणी प्या
  • जास्त मीठ आणि पॅकेज्ड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा
  • पायाला आरामदायी अशी, थोडी सैल चप्पल किंवा शूज वापरा

डॉक्टर सूद यांच्या मते, दररोजच्या छोट्या सवयींमुळे सूज पूर्णपणे कमी झाली नाही तरी त्यामुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो.

गरोदरपणात पायांची सूज का वाढते?

गरोदर महिलेला सुरुवातीला पायांना कमी सूज येऊ शकते. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत अधिक वाढू शकते. बोन अँड बर्थ क्लिनिक आणि रेनबो हॉस्पिटल, बन्नेरघट्टा रोड येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गाना श्रीनिवास यांच्या मते, गर्भधारणेदरम्यान आईच्या शरीरात रक्त आणि इतर द्रवाचं प्रमाण वाढतं.

शरीरात रक्ताचं प्रमाण लक्षणीय वाढल्यामुळे अतिरिक्त द्रव शरीराच्या ऊतींमध्ये (Tissues) साचू शकतो. हा द्रव विशेषतः पाय आणि घोट्यांच्या भागात जमा झाल्याने तिथे सूज दिसू लागते. त्यामुळे गर्भावस्था पुढे जात असताना पायांची सूज वाढणं ही अनेक महिलांमध्ये दिसणारी सामान्य बाब आहे.

गरोदरपणात पायांना सूज येण्यामागे वाढतं गर्भाशय हेही एक महत्त्वाचं कारण आहे. डॉ. गाना श्रीनिवास यांच्या मते, गर्भाशयाचा आकार वाढत गेल्याने त्याचा ओटीपोटातील रक्तवाहिन्यांवर आणि इन्फेरिअर व्हेना कावा या मोठ्या रक्तवाहिनीवर दबाव येतो. ही रक्तवाहिनी शरीराच्या खालच्या भागातून रक्त हृदयाकडे पोहोचवते. दबाव वाढल्यामुळे पायांमधून रक्त वर जाण्याचा वेग कमी होतो आणि द्रव खालच्या भागात साचू लागतो.

त्याशिवाय गर्भावस्थेतील हार्मोन्समुळे रक्तवाहिन्या सैल होतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील द्रव आसपासच्या ऊतींमध्ये जाण्याची शक्यता वाढते आणि पायांची सूज आणखी वाढू शकते.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

गर्भावस्थेच्या आठव्या किंवा नवव्या महिन्यात घोट्यांना सौम्य ते मध्यम सूज येणं सामान्य असू शकतं. बराच वेळ उभं राहिल्यानंतर किंवा दिवसभर हालचाल केल्यानंतर ही सूज अधिक जाणवते. उष्ण हवामानातही पायांची सूज वाढू शकते. त्यामुळे केवळ पायांना हलकी सूज आली म्हणून घाबरण्याची गरज नसते.

मात्र, सूज अचानक वाढली किंवा नेहमीपेक्षा खूप जास्त जाणवू लागली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः चेहरा, हात किंवा डोळ्यांभोवती सूज आली असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं डॉ. गाना श्रीनिवास सांगतात. सुजेसोबत तीव्र डोकेदुखी, धूसर दिसणं, पोटाच्या वरच्या भागात दुखणं किंवा रक्तदाब वाढणं, अशी लक्षणं दिसत असतील, तर हे प्री-एक्लेम्पसियाचे संकेत असू शकतात. अशा वेळी वेळ न दवडता वैद्यकीय तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.

त्याशिवाय फक्त एका पायाला अचानक सूज आली असेल आणि त्यासोबत दुखणं, लालसरपणा किंवा पाय गरम जाणवत असेल, तर ते रक्ताची गाठ म्हणजेच ब्लड क्लॉट होण्याचा संकेत असू शकतो. अशा वेळी दुर्लक्ष न करता, तातडीनं डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, असं डॉ. गाना श्रीनिवास सांगतात.

गर्भावस्थेत पायांची सूज सामान्य असली तरी सूज अचानक वाढत असेल किंवा नेहमीपेक्षा वेगळी लक्षणं जाणवत असतील, तर ती स्वतःहून सामान्य समजू नये. अशा वेळी आपल्या डॉक्टरांकडून तपासणी करून सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.