-ज्ञानेश भुरे

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताने चार वेगवान आणि तीन फिरकी गोलंदाजांची संघात निवड केली आहे. उपखंडात भारतीय फिरकी वर्चस्व राखत असली, तरी ऑस्ट्रेलियातील उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर फिरकीला मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा वेळी वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवर भारतीय संघाची स्पर्धेतील प्रगती अवलंबून असेल. मात्र, भारतीय संघात वेगवान गोलंदाजांची संख्या पुरेशी ठरते का, हा प्रश्न आहे. मोहम्मद शमीने गेल्या काही काळात फारसे सामने खेळलेले नसून भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात गोलंदाजांची अचूक निवड करण्याचे आव्हान संघ व्यवस्थापनापुढे असेल.

भारतीय गोलंदाजांची फळी कशी आहे?

भारताने विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी चार वेगवान आणि तीन फिरकी गोलंदाजांची निवड केली आहे. हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांची भूमिका अष्टपैलू खेळाडूची असेल. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांचे स्वरूप लक्षात घेता भारताने केवळ चार वेगवान गोलंदाजांना पसंती दिल्यामुळे क्रिकेट जाणकारांच्या भुवया उंचावल्या. त्यातच जसप्रीत बुमरा जायबंदी झाल्यामुळे भारताला स्पर्धेपूर्वीच धक्का बसला आहे. अर्थात, त्याची जागा मोहम्मद शमीने घेतली आहे. शमीच्या साथीला अर्शदीप सिंग, हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमार हे अन्य तीन वेगवान गोलंदाज असतील. अक्षरसह रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल हे फिरकीची धुरा सांभाळतील.

गोलंदाजांची निवड करताना काय आव्हान असेल?

ऑस्ट्रेलियातील हवामान आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या हे सगळे वेगवान गोलंदाजांसाठी पूरक असलेले वातावरण बघता संघात फिरकीपटूंपेक्षा अधिक वेगवान गोलंदाज असणे केव्हाही योग्य ठरते. तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाज हे समीकरण भारतासाठी आव्हानात्मक असेल. अशा वेळी हार्दिक हा भारताचा चौथा वेगवान गोलंदाज असू शकेल. मात्र, ऑस्ट्रेलियात चार वेगवान गोलंदाज खेळवणे हे धोकादायकही ठरू शकते. भारतीय संघ सध्या तरी तीन वेगवान, दोन फिरकी गोलंदाज व एक अष्टपैलू किंवा चार वेगवान, एक फिरकी गोलंदाज व एक अष्टपैलू असे समीकरण ठेवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

भारत अष्टपैलूसह पाच गोलंदाजांसह खेळू शकतो का?

अष्टपैलू खेळाडूंसह पाच गोलंदाजांना खेळवणे ही विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खूप अवघड गोष्ट असू शकते. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाज प्रतिस्पर्धी संघातील विशेषत: त्या दिवशी निराशाजनक कामगिरी करत असलेल्या गोलंदाजाला लक्ष्य करतात. दोन फिरकी आणि तीन वेगवान गोलंदाज खेळवले, तर हा धोका कमी होईल. अशा वेळी फिरकी गोलंदाजांनी फलंदाजीची वेळ आल्यावर आपली जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे ठरेल. हार्दिक संघात असल्याने भारताला सुरुवातील गोलंदाजीच्या आघाडीवर प्रयोग करता येऊ शकतात. हार्दिकची आक्रमकता आणि गोलंदाजीतील उपयुक्तता भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल. अक्षरनेही आपली भूमिका चोख बजावणे गरजेचे आहे. मात्र, अक्षर फिरकी गोलंदाज असल्याचे विसरून चालणार नाही.

भारतीय संघ व्यवस्थापनासमोर कोणते पर्याय असतील?

फलंदाजीच्या आघाडीवर भारतीय संघ भक्कम दिसत असला, तरी ते कोणते गोलंदाज खेळवणार यावर प्रतिस्पर्धी संघांच्या नजरा असतील. संघ व्यवस्थापनासमोर गोलंदाजांची मोट बांधताना कोणते पर्याय उपलब्ध असू शकतात हा चर्चेचा विषय आहे. हार्दिकला गृहित धरून दोन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाज : शमी, अर्शदीप, अश्विन आणि चहल. (भारताला गरज पडल्यास सहाव्या गोलंदाजीचा पर्याय पाहावा लागेल). दुसरा पर्याय म्हणजे तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाज : शमी, अर्शदीप, भुवनेश्वर, अक्षर, अश्विन/चहल. तसेच अन्य एक पर्याय म्हणजे चार वेगवान आणि एक फिरकी गोलंदाज : शमी, अर्शदीप, भुवनेश्वर, हर्षल, अश्विन/चहल. (हा पर्याय निवडल्यास वेगवान गोलंदाजांवर ताण पडेल.)

उत्तरार्धातील गोलंदाजीतील अचूकतेचे आणखी एक आव्हान?

अलीकडच्या काळात भारतीय संघ धावांचा बचाव करण्यासाठी संघर्ष करताना दिसून आला आहे याचे मुख्य कारण म्हणजे भुवनेश्वरसारखे अनुभवी गोलंदाजदेखील दडपणाखाली अचूकता राखण्यात अपयशी ठरले आहेत. उत्तरार्धातील त्यांच्या समस्यांवर तोडगा काढल्यास भारताला यश मिळू शकते. अर्शदीप आणि भुवनेश्वर सुरुवातीच्या षटकांत चांगली गोलंदाजी करतात. परंतु चिंतेची बाब म्हणजे त्यांची उत्तरार्धातील गोलंदाजी. शमीच्या साथीने या दोघांपैकी एकाला (भुवनेश्वरची शक्यता अधिक) नवा चेंडू हाताळण्यासाठी वापरले जाईल आणि दुसऱ्याकडे उत्तरार्धातील गोलंदाज म्हणून पाहिले जाऊ शकेल. या आघाडीवर अर्शदीपने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. परंतु अर्शदीपला कामगिरीत सातत्य राखावे लागेल.