ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या ‘अव्वल आठ’ (सुपर एट) फेरीचे संघ आता निश्चित झाले असून भारत- श्रीलंका या दोन्ही यजमान संघांना यामध्ये स्थान मिळाले आहे. भारतीय संघ या प्रारूपातील गतविजेता असून पुन्हा एकदा जेतेपद मिळविण्यासाठी ते प्रबळ दावेदारांपैकी एक आहेत. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका यांच्या बरोबरीने झिम्बाब्वेचा भारताच्या गटात अनपेक्षित समावेश झाल्यामुळे लढाई सोपी झाली का, भारताकडून सपशेल पराभूत झालेल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला संधी किती याचा आढावा.
भारताचे सामने कधी?
भारताने आपल्या गटातील सर्व सामने जिंकताना ‘अव्वल आठ’ फेरीतील आपले स्थान निश्चित केले. यापूर्वी, संघाच्या सीडिंग करण्यात आल्यानंतर आठ संघांची चार-चार अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली. पहिला गट ‘X’ आणि दुसरा गट ‘Y’ असे संघ विभागण्यात आले. त्यामुळे भारतीय संघ ‘X’ गटात सहभागी झाला. यानंतर झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ आले. ‘Y’ गटात इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान व श्रीलंका हे संघ आले. आता भारतीय संघ २२ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिका, २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वे आणि १ मार्चला वेस्ट इंडिजशी सामना करणार आहे.
सर्वांत धोकादायक प्रतिस्पर्धी कोण?
भारताप्रमाणेच उर्वरित सर्व संघदेखील साखळी फेरीत आपले सर्व सामने जिंकत अग्रस्थानी होते. ‘अव्वल आठ’ फेरीत भारताला सर्वाधिक आव्हान दक्षिण आफ्रिकेचे असणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ हा गतउपविजेता आहे. सध्याच्या विश्वचषकातही ते चांगल्या लयीत आहेत. त्यांनी गटातील सर्वच सामन्यांत चमकदार कामगिरी केली. त्यांच्याकडे स्फोटक फलंदाजांसह चांगले अष्टपैलू आणि फिरकीपटूंची फळी आहे. त्यामुळे भारतासाठी ते सर्वाधिक आव्हान उपस्थित करतील. विश्वचषकापूर्वी भारताने त्यांच्याविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिका जिंकली होती.
‘अव्वल आठ’ फेरीतील पहिलाच सामना भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यातील विजय भारतासाठी उपांत्य फेरीच्या वाटचालीची दिशा ठरवू शकतो. दुसऱ्या गटातील संघांकडे पाहिल्यास न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीची वाटचाल करण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडला साखळी फेरीत केवळ दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हावे लागले. त्यामुळे स्पर्धेतील सध्याची लय पाहता न्यूझीलंडला संधी असेल.
झिम्बाब्वे आणखी किती धक्के देणार?
सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत कोणत्या संघाने सर्वाधिक लक्ष वेधले असेल, तर ते झिम्बाब्वेने. त्यांनी अनपेक्षित कामगिरी करताना आपल्या गटात अव्वल स्थान मिळवले. त्यांनी सहयजमान श्रीलंका आणि जागतिक क्रिकेटमधील मजबूत संघ समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला नमविले. आता ‘अव्वल आठ’ फेरीत देखील ते धक्कादायक निकाल नोंदवितात का, याकडेच सर्वांचे लक्ष असेल. सिकंदर रझा, ब्रायन बेनेट आणि ब्लेसिंग मुझराबानी यांच्यावर संघाची मदार असेल. मात्र, झिम्बाब्वेचा संघ आपले सर्व साखळी सामने कोलंबो येथे खेळला होता. ‘अव्वल आठ’ फेरीतील त्यांचे सर्व सामने हे भारतात खेळायचे आहे. त्यामुळे त्यांचे खेळाडू भारतातील वातावरणाशी कशी जुळवून घेतात हे पहावे लागेल.
वेस्ट इंडिजही फॉर्मात…
दुसरीकडे, वेस्ट इंडिज संघानेही यंदा आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. आपले सर्व सामने जिंकून ते गटात अव्वल स्थान राहिले. विंडीजचे बरेचशे खेळाडू ‘आयपीएल’मध्ये खेळत असल्याने त्यांना भारतातील मैदानांची, परिस्थितीची चांगली माहिती आहे. तसेच, २०१६ मध्ये भारतात झालेला विश्वचषक त्यांनी जिंकला होता. संघाकडे मोठे फटके मारणारे सक्षम फलंदाज आहेत. त्यातच चांगले फिरकीपटू असल्याचा फायदाही संघाला मिळाला आहे.
पाकिस्तानला संधी किती?
भारताविरुद्ध विश्वचषक सामना खेळण्यासाठी पाकिस्तानने दिलेल्या नकारानंतर स्पर्धेला वेगळेच वळण निर्माण झाले होते. मात्र, ‘आयसीसी’च्या मध्यस्थीनंतर पाकिस्तान संघ सामन्यासाठी तयार झाला. पण, भारताकडून त्यांना एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. या व्यतिरिक्त पाकिस्तानने उर्वरित सामने जिंकल्याने ते ‘अव्वल आठ’ फेरीत पोहोचले. ते या फेरीसाठी भारतासह एकाच गटात नसले, तरीही हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिल्यानंतर त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले. त्यानुसार विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक तयार करण्यात आले. पाकिस्तानलाही उपांत्य फेरी गाठणे सोपे नसेल. त्यांच्यासमोर इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंडसारख्या संघांचे आव्हान असेल. आपल्याहून कमकुवत असलेल्या नेदरलँड्सविरुद्ध खेळताना एकवेळ पाकिस्तान पराभवाच्या गर्तेत सापडला असता, मात्र निर्णायक क्षणी धावा केल्याने त्यांना विजय नोंदवता आला. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची झाल्यास आपल्या फलंदाजीवर काम करावे लागेल.
कोणत्या खेळाडूंवर विशेष लक्ष?
‘अव्वल आठ’ फेरीत भारताचा अभिषेक शर्मा, पाकिस्तानचा उस्मान तारिक, न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स, विंडीजचा शाय होप यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. यजमानांसाठी अभिषेकची लय हा चिंतेचा विषय ठरला आहे. आतापर्यंत खेळलेल्या तीनही सामन्यांत त्याला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे तो लयीत येणे भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
पाकिस्तानचा तारिक आपल्या गोलंदाजी शैलीमुळे स्पर्धेच्या सुरुवातीपासून चर्चेत आहे. या फेरीतही फलंदाज त्याचा कसा सामना करतात हे पहावे लागेल. न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्सची अष्टपैलू कामगिरी निर्णायक ठरू शकते. विंडीजचा कर्णधार होप सुरुवातीच्या काही सामन्यांत लयीत नव्हता. मात्र, नंतर त्याला सूर सापडला. आगामी सामन्यांमध्येही संघाला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.
