पाणवठ्यावर एक वाघ शांतपणे पाणी पित उभा आहे आणि त्याच्या अगदी शेजारी प्लास्टिकची बरणी, पिशव्या आणि थंड पेयाचे कॅन विखुरलेले आहेत, असे चित्रण असणारा व्हिडीओ गेल्या काही दिवसांत समाज माध्यमांवर व्हायरल झाला. या व्हिडीओतील वाघ हा ताडोबामधील ‘मामा’ वाघ असून, व्हिडीओचे चित्रण मात्र व्याघ्रप्रकल्पाच्या बाहेर करण्यात आले, असा दावा वन अधिकाऱ्यांनी केला होता. जंगलातील प्राण्यांबाबतचे असे व्हिडिओ यापूर्वीही व्हायरल झाले आहे. कधी गमबुटासोबत खेळणारा वाघ तर कधी तोंडात प्लास्टिकची बाटली पकडून फिरणारा वाघ व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले. मूळात प्रश्न असा की, काटेकोर नियम असतानाही जंगलात एवढे प्लास्टिक येते कुठून?
ताडोबातील प्लास्टिकच्या घटना
डिसेंबर २०२० मध्ये ‘जुनाबाई’ वाघिणीचे बछडे प्लास्टिक पिशवीसोबत खेळताना दिसले होते. जानेवारी २०२१ मध्ये अलीझंझा बफर क्षेत्रात वाघाचा बछडा प्लास्टिकची बाटली घेऊन फिरताना दिसला. मे २०२३ मध्ये ‘बबली’ वाघिणीचे बछडे पुन्हा प्लास्टिक बाटलीशी खेळताना दिसले. अडीच वर्षांपूर्वी ‘नयनतारा’ नावाची वाघीण पाणवठ्यावर आली असताना पाण्यात तरंगत असलेली प्लास्टिकची बाटली तोंडाने बाहेर काढताना ती दिसली होती. या चित्रफितीची दखल तर भारताच्या पंतप्रधानांनीही घेतली होती.
ताडोबात प्लास्टिक येतंय तरी कुठून?
अंधारी नदीच्या पाण्यातून अथवा इतर जलस्रोतातून प्लास्टिक ताडोबामध्ये येत असल्याचा दावा ‘माय ताडोबा’ या संकेतस्थळावरील एका ब्लॉगमध्ये करण्यात आला आहे. या ब्लॉगचे लेखक अदिब साहिल लिहितात, यामागील अजून एक महत्त्वाचे कारण बांबू वृक्षतोड करणारे कामगार असू शकतात. बफर क्षेत्रात येणारे हे कामगार स्वतःसोबत पाण्याच्या बाटल्या व इतर प्लास्टिक वस्तूदेखील आणतात. काम पूर्ण झाल्यानंतर आणलेल्या वस्तू परत नेताना ते दिसत नाहीत, त्यामुळेच अशा पद्धतीच्या कचर्यात वाढ होताना दिसते.
बफरक्षेत्रामध्ये स्वच्छतेसाठी यंत्रणा नाही. त्यामुळे या परिक्षेत्रात वाघ दिसल्यास त्याच्या सभोवताली प्लास्टिक आढळणे स्वाभाविक असते. साहिल अदीब पुढे लिहितात, कागदावरील नियम आणि वास्तव यामध्ये मोठी तफावत आहे. जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मार्गदर्शक तत्त्वांना काही अर्थ नसतो. मानवी हस्तक्षेप सुरू राहणारच आहे, पण तिथे राहणार्या ग्रामीण लोकांनीदेखील प्लास्टिकबंदी मनापासून स्वीकारल्याशिवाय जंगल स्वच्छ होणार नाही.
एसयूपी अर्थात सिंगल यूज प्लास्टिक हेच ताडोबामधील सर्वात मोठे आव्हान आहे. सिंगल युज प्लास्टिक वापर करून झाला की सहजच फेकण्यात येते, याचा पुनर्वापर करता येत नाही; त्यामुळे याचा केवळ कचरा वाढतो, यावर प्रक्रिया करता येणे शक्य नाही, अगर केल्यास ती निसर्गास हानिकारक ठरते. अशा प्रकारच्या प्लास्टिकमध्ये किराणा मालाच्या पिशव्यांपासून, खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, स्ट्रॉ, कंटेनर, कप आणि कटलरी यांचा समावेश होतो. पर्यटकांकडून अशा वस्तू बेजबाबदारपणे फेकल्या जातात, यामुळे वन्यजीवनावर मोठा परिणाम होतो. एका सर्वेक्षणानुसार केवळ १३.९३ लाख बाटल्यांमधून दरवर्षी किमान ३२ टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो. हा संपूर्ण टीएटी क्षेत्रातील रिसॉर्टस् आणि हॉटेलमध्ये निर्माण होणार्या कचर्याचा आकडा आहे.
प्लास्टिक प्रदूषणाचा वन्यजीवनावर परिणाम
फार्मा जर्नलच्या २०२२ च्या अंकात, माधवी धायरीकर, शोभा झावरे आणि निधी राजपूत यांचा ‘प्लास्टिकचा वन्यजीवांवर आणि प्राण्यांच्या अधिवासावर होणारा परिणाम’ या विषयावरील लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी पुढील बाबी नमूद केल्या आहेत-
१. प्लास्टिकचा मातीवर होणारा परिणाम- मायक्रोप्लास्टिकचे कण सर्वप्रथम सांडपाण्यात संक्रमित होतात आणि हेच पुढे मातीत मिसळतात. Pseudomonas (स्यूडोमोनास) नावाचा कीटाणू पॉलीमर आणि नायलॉनसारख्या घटकांचे भक्षण करतो. नायलॉनचे अणु तुटतात आणि त्यातून मिथेनची निर्मिती होते, ज्यामुळे तापमानात वाढ होते आणि याचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंगवर होतो. मायक्रोप्लास्टिक मातीत मिसळल्यामुळे मातीतील छिद्र बुजतात ज्यामुळे हवा आणि पाण्यासाठी हवी असलेली पोकळी जमिनीत राहात नाही. मातीतली घनता कमी होते आणि माती सुपिक राहात नाही. हेच वनस्पती आणि वन्यजीवांसाठी फार धोक्याचे ठरते. मायक्रोप्लास्टिक जमिनीतील गांडुळांवरही त्याचा परिणाम होतो. मायक्रोप्लास्टिकमुळे गांडुळांमधील प्रजनन कमी होते, आणि याचमुळे त्यांची संख्यादेखील घटते, जे त्यांच्या अस्तित्वासाठी घातक आहे.
२. प्लास्टिकचा जंगलातील प्राण्यांवरील परिणाम- अनैसर्गिक घटकांच्या संपर्कात एखादा प्राणी आल्यास किंवा त्याचे सेवन केल्यास त्याचे पचन होत नाही आणि ते दीर्घकाळ शरीरात टिकून राहते. याचा त्रास शरीरातील टिश्यूंवर होतो. या कृत्रिम पदार्थांमुळे शरीरातील टिश्यू फाटण्याची शक्यता असते. गवत खाणार्या जनावरांवर याचा परिणाम अधिक दिसून येतो.
प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न
ताडोबा-व्याघ्रप्रकल्पाचे अधिकृत नियतकालिक, ‘ताडोबा डायरिज्’च्या डिसेंबर २०२१ च्या अंकात याविषयीची माहिती मिळते. त्यात म्हटले आहे की,
१.) टीएटीआरने (ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह) एसयूपी म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिकवर पूर्ण बंदी घातलेली असून अभयारण्यात येणार्या पर्यटकांना, रिसॉर्ट मालकांना आणि स्थानिक रहिवाशांना एसयूपीच्या वापरास बंदी आहे.
२.) एसयूपीचा वापर आढळल्यास, वन्यजीव कायद्यातील तरतुदीनुसार रु. ५०००/- ते रु. २५०००/-पर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.
३.) पर्यटकांनी स्टील, ग्लास किंवा उत्तम दर्जाच्या धातूच्या बाटल्यांचा वापर करावा.
४.) सफारीदरम्यान अन्न आणण्यास किंवा खाण्यास मज्जाव आहे; खाण्याचे सामान आणण्यासाठी वापरलेल्या वस्तूंचा होणारा कचरा टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
५.) अभयारण्याच्या प्रवेशद्वारांवर तसेच मोहर्ली आणि कोलरा गावालगतच्या प्रवेशद्वारांवर ऑटोमेटिक वॉटर वेंडिंग मशिन्स बसविण्यात आली आहेत, तसेच वॉटर कुलर्सची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
६.) झिरो-वेस्ट फिल्ट्रेशन तंत्राच्या सहाय्याने ताडोबा वनातील नैसर्गिक झर्यांचे पाणीदेखील ‘झेवा’प्रकल्पांतर्गत काचबंद बाटल्यांमध्ये मिळते. मात्र, या बाटल्या प्रवाशांनी आठवण म्हणून न्याव्यात अशा तयार केलेल्या आहेत.
व्याघ्रप्रकल्प प्लास्टिकमुक्त व्हावेत यासाठी शासन कटिबद्ध असले, तरी ही नागरी जबाबदारी आहे. लोकसहभागातूनच प्लास्टिक आटोक्यात आणता येईल, यावर प्लास्टिक बंदी हा उपाय नसून माणसाने त्याच्या सवयी बदलणे हाच महत्त्वाचा भाग असणार आहे.
