चार वर्षीय ‘झीनत’ वाघिणीने ओडिशामधल्या सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात चार बछड्यांना जन्म दिला. यामुळे सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाला नवीन genetic impetus मिळाले आहे. यापूर्वी येथील वाघांमध्ये झालेल्या अंतर्गत संकरामुळे येथील एकाच प्रकारची वाघांची पिढी सातत्याने जन्माला येत होती. मात्र आता झीनत या बाहेरून आलेल्या वाघिणीमुळे येथील वाघांच्या गुणसुत्रांमध्ये झालेला नवा बदल पाहायला मिळेल. २०२४ मध्ये सुरु करण्यात आलेल्या या महत्वाकांक्षी व्याघ्र संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ही वाघीण २ वर्षांची असताना सिमलीपालच्या मुख्य क्षेत्रात स्थलांतरित झाली होती. सध्या तिचे बछडे साधारण तीन आठवड्यांचे असावेत, असा अंदाज आहे.
काळ्या वाघांमधील ‘इनब्रीडिंग’ रोखण्यासाठी मोहीम
सिमलीपालमध्ये सध्या ३२ वाघ आहेत, मात्र त्यातील जवळपास निम्मे (तत्कालीन २७ पैकी १३ वाघ) हे ‘स्यूडो-मेलेनिस्टिक’ (Pseudo-melanistic) म्हणजेच अत्यंत दाट काळे पट्टे असलेले ‘काळे वाघ’ आहेत. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, एकाच मर्यादित भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या वाघांमध्ये वर्षानुवर्षे झालेल्या अंतर्गत संकरामुळे (Inbreeding) हा जनुकीय दोष निर्माण झाला होता. यामुळे तिथल्या वाघांची रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूणच आरोग्य धोक्यात आले होते. हा जनुकीय धोका टाळण्यासाठी झीनतला या जंगलात आणण्याचा निर्णय झाला. आता तिच्याशी येथील वाघांच्या झालेल्या संकरामुळे आता नवीन जनुकीय संच असलेले वाघ जन्मास आले आहेत. हे नवे बछडे सुदृढ आरोग्य असलेले आणि अधिक प्रतिकारशक्ती असलेले असतील, असे अपेक्षित आहे. झीनतच्या या यशस्वी प्रजननामुळे सिमलीपालमधील येथील वाघांचे भविष्य आता अधिक सुरक्षित झाले आहे, असे वन्यजीव तज्ज्ञ मानतात.
ताडोबा ते सिमलीपाल: एखाद्या चित्रपटासारखा थरार!
झीनतचा ताडोबा ते सिमलीपाल हा प्रवास आणि त्यानंतरचा काळ अत्यंत नाट्यमय राहिला आहे. अंदाजे २ वर्षांची असताना झीनतला ताडोबातून एका विशेष वाहनातून ४० तासांचा खडतर प्रवास करून ओडिशात आणण्यात आले होते.
१५ नोव्हेंबर २०२४ रोजी झीनतला सिमलीपालच्या उत्तर विभागातील तात्पुरत्या बंदिस्त आवारात (Soft Enclosure) देखरेखीखाली ठेवले गेले. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ९:३० वाजता तिला मुख्य जंगलात (Core Area) सोडण्यात आले.
मात्र, सोडल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच, ७ डिसेंबर २०२४ रोजी झीनतने सिमलीपालची सीमा ओलांडली आणि ती बेपत्ता झाली. यामुळे ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांच्या वन अधिकाऱ्यांची झोप उडाली होती. अखेर २३ दिवसांनंतर पश्चिम बंगालच्या बांकुडा जिल्ह्यातून तिला ट्रँक्विलाइझ (बेशुद्ध) करून सुखरूप पकडण्यात आले आणि १ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा सिमलीपाल येथे आणले गेले. एप्रिल २०२५ मध्ये तिला पुन्हा जंगलात सोडण्यात आले, जिथे जानेवारी २०२६ मध्ये तिने तिथल्या स्थानिक नरासोबत प्रजनन केले.
हायटेक सुरक्षा आणि देखरेख
सध्या एक विशेष पथक सॅटेलाईट कॉलर आणि व्हीएचएफ (VHF) सिग्नलद्वारे झीनतच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे; तसेच प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात लावलेल्या ‘कॅमेरा ट्रॅप्स’च्या मदतीने बछड्यांवरही नजर ठेवली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने लगतच्या भागातील वनविभागाची गस्त देखील अधिक वाढविण्यात आली आहे.
वन, पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने या अधिवासात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सक्षम कॅमेरा यंत्रणेचे विस्तृत जाळे बसवून तिचा परिसर सुरक्षित करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. जंगलातील वणवे, बेकायदेशीर क्रिया आणि वन्यजीवांच्या हालचालींवर तत्कालीन माहितीचा वापर करून सुरक्षा मजबूत केली आहे. प्रगत अग्निशामक उपाययोजनांमुळे जंगलातील वणवे कमी झाले, तर सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात करून आणि समर्पित ‘सिमलीपाल टायगर प्रोटेक्शन फोर्स’ बटालियनची स्थापना करून शिकार विरोधी उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या.
प्रशासनाकडून कौतुक आणि आनंद व्यक्त
मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी ही बातमी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर करत, हा ओडिशाच्या वन्यजीव संवर्धन प्रयत्नांमधील एक ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सिमलीपाल येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या वाघिणींपैकी एक असलेल्या ‘झीनत’ने सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाच्या (STR) मुख्य क्षेत्रात चार सुदृढ बछड्यांना जन्म दिला आहे. हा टप्पा सिमलीपालमधील वाघांची संख्या आणि अनुवांशिक विविधता (Genetic Diversity) मजबूत करतो, तसेच हे विज्ञान-आधारित संवर्धनाचे यश आणि आपल्या वन कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांचे प्रतीक आहे.”
वनमंत्री गणेश राम सिंहखुंटिया यांनी सांगितले की, सिमलीपालमधील अनुकूल वातावरण आणि सुरक्षित अधिवासामुळे हे यश मिळणे शक्य झाले आहे. “व्याघ्र स्थलांतर प्रकल्पाने यशस्वी पिल्ले मिळवून आपले प्राथमिक उद्दिष्ट साध्य केले आहे,” असे ते म्हणाले. या घटनेनंतर सिमलीपालमधील बछड्यांची संख्या १२ वरून १६ झाली आहे, तर एकूण वाघांची संख्या ३२ आहे.
सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रकाश चंद गोगिनेनी यांनी सांगितले की, झीनत पहिल्यांदाच आई झाल्याने आता सर्व बछड्यांच्या जिवंत राहण्यावर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाळांना जन्म दिल्यानंतर, वाघीण पुढील किमान दोन ते तीन वर्षे आपला परिसर सोडण्याची शक्यता नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
