Taiwan Opposition KMT China Visit: तैवानमधील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मागील दशकात पहिल्यांदाच चीनचा दौरा केला आहे. चीनमधील सत्ताधारी चायनीज कम्युनिस्ट पक्षाने (सीसीपी) तैवानमधील विरोधी पक्ष असलेल्या नॅशनलिस्ट पक्ष किंवा कुओमितांग (केएमटी) पक्षाला चीनमध्ये आमंत्रित केले होते. चीनने मागील काही वर्षांत सातत्याने तैवानवर दावा सांगितला आहे. त्यामुळे तैवानच्या विरोधी पक्षांचा चीन दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. सीसीपी व केएमटी हे दोन्ही पक्ष एकेकाळी चीनमध्ये मित्रपक्ष होते. वीसाव्या शतकाच्या सुरूवातीला दोन्ही पक्षांमध्ये ‘सीव्हील वॉर’ झाला. त्यानंतर सीसीपीने चीनमध्ये सत्ता स्थापन केली. केएमटी पक्षाने चीनमधून बाहेर पडून तैवानमध्ये आपला विस्तार केला. दरम्यान, केएमटी हा पक्ष आग्नेय आशियातील सर्वात जुन्या पक्षांपैकी एक आहे. केएमटी पक्षाने तैवानमध्ये काही दशकांपर्यंत सत्ता चालवली. सध्या केएमटी हा तैवानमध्ये विरोधी पक्ष आहे.
विरोधी पक्षनेत्या चेंग ली-वून आणि शि जिनपिंग भेट
चीनमधील सीसीपी व तैवानमधील केएमटी या पक्षांमध्ये टोकाचे वाद आहेत. दोन्ही पक्ष चीनवर दावा सांगतात. तैवानच्या केएमटी पक्षाला शीत युद्धापासून अमेरिकेचे पाठबळ आहे. मागील काही वर्षांत सीसीपी व केएमटी या दोन्ही पक्षांमधील वाद निवळले आहेत. केएमटी पक्षाच्या अध्यक्षा चेंग ली-वून यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची नुकतीच भेट घेतली. चीनने तैवानवर दावा केला आहे. या दाव्याचा पुनरूच्चार चेंग यांनी केला. चीन व तैवानमध्ये असलेल्या शांततेचा मते मिळवण्यासाठी कोणीही वापर करू नये, असे चेंग म्हणाल्या. त्यांचा रोख हा तैवानमधील सत्ताधारी पक्ष ‘डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षा’कडे (डीपीपी) होता. चीनने डीपीपी पक्ष फुटीरतावादी असल्याचे अनेकदा म्हटले आहे.
सीसीपी व केएमटी पक्षातील संबंध
सीसीपी व केएमटी यांचा शत्रुत्वापासून ते मैत्रीपर्यंतचा प्रवास एक अभ्यासाचा विषय आहे, असे बंगळुरूतील इंडो-पॅसिफिक अभ्यास उपक्रमाच्या ‘स्टाफ रिसर्च अनालिस्ट’ अनुष्का सक्सेना यांनी म्हटले आहे. चीनमध्ये १९११ मध्ये किंग राजेशाहीचा पाडाव झाला. त्यानंतर चीनच्या भवितव्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यावेळी डॉक्टर असलेल्या सून यात-सेन यांनी चीनमध्ये केएमटी पक्षाची स्थापना केली. सून यात-सेन यांना आधुनिक चीनचे जनक मानले जाते. केएमटी पक्षाची स्थापना राजेशाही विरोधात करण्यात आली होती. केएमटी पक्षाची राष्ट्रीयत्व, लोकशाही आणि समाजवाद ही तीन तत्वे आहेत.
तैवानमध्ये केएमटीची सत्ता
चीनमधील प्रभावी नेते माओ झेडोंग यांनी केएमटी पक्षाला समर्थन दिले होते. १९२५ मध्ये केएमटी पक्षाने चीनमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी त्यांना चायनीज कम्युनिस्ट पक्षाचा (सीसीपी) पाठिंबा मिळाला होता. सीसीपीचे नेतृत्व माओ झेडोंग यांच्याकडे होते. सून यात-सेन यांच्या निधनानंतर चियांग काई-शेक हे केएमटी पक्षाचे प्रमुख झाले. चियांग यांचे धोरण स्थानिक व्यावसायिकांच्या विरोधात जात होते. त्यामुळे चियांग यांच्याविरोधात सीसीपीमध्ये असंतोष होता. केएमटी व सीसीपी यांच्यात १९२७ मध्ये गृहयुद्ध सुरू झाले. १९४५ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले होते. त्यामुळे दोन्ही पक्ष आपापसांतील मतभेद मिटवून पुन्हा एकत्र आले. त्यानंतर १९४९ मध्ये पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना झाली. तर तैवानमध्ये केएमटीची स्थापना झाली.
चीन तैवानमधील केएमटी पक्षाकडे कसा पाहतो?
चीन तैवानवर आक्रमण करेल, अशी भीती चियांग काइ-शेक यांना होती. त्यामुळे त्यांनी तैवानमध्ये मार्शल लॉ लागू केला होता. त्यांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी १९८० मध्ये मार्शल लॉ हटवण्यात आला. पण तोपर्यंत तैवानमध्ये डीपीपी पक्ष उदयास आला होता. सक्सेना म्हणाल्या, तैवानमधील केएमटी हा एकमेव असा पक्ष आहे की, ज्या पक्षातील नेते चीनला मातृभूमी मानतात. त्याचे उदाहरण म्हणजे हो यिंग-लू ह्या आहेत. हो यिंग-लू यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये केएमटी पक्षातून राजीनामा दिला होता. चिनी बनावटीच्या टिकटॉक या अॅपवर हो-यिंग लू यांनी माओ झेडोंग यांचा फोटो असलेला टी शर्ट घालून व्हिडिओ पोस्ट केला होता. दरम्यान, चीनमधील सीसीपी व तैवानमधील केएमटी या पक्षांमध्ये १९९२ मध्ये एक सहमती झाली होती. त्यानुसार चीन व तैवान मिळून फक्त एकच देश म्हणजे चीन असेल, असे ठरवण्यात आले होते. परंतु, त्यात चीन व तैवानमधील राजकीय व्यवस्था कशी असेल त्याबाबत उल्लेख नव्हता. २०१२-१३ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केएमटी पक्षाच्या नेत्यांची १० वेळा बैठक घेतली होती.
तैवानमधील सद्यस्थिती
तैवानच्या राजकारणात वर्चस्व टिकवून ठेवण्यात केएमटीला अपयश आले आहे. २०१६ मध्ये, डीपीपी (DPP) पक्षाने राष्ट्रपती आणि संसदीय निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवला आणि तेव्हापासून डीपीपी पक्ष सत्तेत आहे. लाई चिंग-ते हे तैवानचे अध्यक्ष आहेत. लाई यांच्याशी संवाद साधण्यास चीनने नकार दिला आहे. सक्सेना यांच्या मते, केएमटी नेत्यांच्या चीन भेटीतील प्रदीर्घ अंतराचे कारण म्हणजे गेल्या दशकात केएमटीच्या राजकीय घसरणीनंतर चीनने या पक्षापासून ठेवलेले अंतर असू शकते. आज विधिमंडळात केएमटीची स्थिती मजबूत असल्याने त्यांच्याशी संबंध पुन्हा दृढ करण्याबाबत चीन अधिक आत्मविश्वासाने पावले उचलत आहे. सक्सेना पुढे म्हणाल्या, या भेटीची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे कारण तैवान सध्या मोठ्या संरक्षण खर्चाच्या प्रस्तावांवर चर्चा करत आहे. यात सुमारे ४० अब्ज डॉलर्सचे विशेष संरक्षण बजेट आणि अमेरिकन शस्त्रास्त्रांच्या खरेदीचा समावेश आहे. लाई यांच्या या योजनांमधील एकमेव अडथळा म्हणजे केएमटीचा वारंवार होणारा विरोध, ज्यातून विधिमंडळात हिंसक संघर्षही झाले आहेत.
