औद्योगिक पट्ट्यातून जाणाऱ्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (एमएसआयडीसी) चार पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी समांतर रस्ते करण्यात येणार आहेत. त्याला राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मान्यता दिली आहे. हा प्रकल्प नेमका काय आहे, या प्रकल्पाचा चाकण औद्योगिक वसाहतीला काय आणि कसा फायदा होईल, याविषयी…
काय आहे प्रकल्प?
तळेगाव ते चाकण (५४८-डी) या राष्ट्रीय महामार्गावरील २६ किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग आणि जमिनीला समांतर चार पदरी रस्ता विकसित केला जाणार आहे. याच महामार्गावरील चाकण ते शिक्रापूरदरम्यान ४३ किलोमीटर लांबीमध्ये चार पदरी जमिनीस समांतर रस्ता करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (एमएसआयडीसी) चार पदरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. हे काम सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्याला मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने नुकतीच मान्यता दिली.
वाहतूक कोंडी सुटणार का?
तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग हा रस्ता रांजणगाव, चाकण, तळेगाव दाभाडे, मुंबई एमआयडीसीतील प्रवासी, औद्योगिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व अवजड व स्थानिक वाहतूक या रस्त्यावरून होते. त्यामुळे प्रंचड वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीने उद्योजकांसह नागरिक त्रस्त आहेत. या मार्गावर पादचारी, दुचाकीस्वारांचे अपघात, गॅस टँकर धोकादायक वळणांवर उलटणे, वाहने एकमेकांवर आदळणे, रस्ता दुभाजक नसल्याने वाहनांची समोरासमोर धडक होणे असे प्रकार सातत्याने होत आहेत. या अपघातांमध्ये काही जणांना प्राण गमावावे लागले आहेत. आता या मार्गाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर चाकण, तळेगाव दाभाडे परिसरातील औद्योगिक वसाहतीतील मोठी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. अपघातांमध्येही घट होईल. सेवा रस्ते रुंद होतील. अरुंद रस्ते, नागमोडी वळणे आणि अपघातजन्य ठिकाणी सुधारणा होऊन सुरक्षितताही वाढण्यास मदत होईल.
चाकण एमआयडीसीतील सद्यःस्थिती काय?
चाकण औद्याोगिक वसाहत हे वाहननिर्मिती उद्याोगाचे महत्त्वाचे केंद्र असून, सात हजार एकरांवर विस्तारले आहे. औद्याोगिक वसाहतीत सुमारे ३० लाख कामगार काम करतात. सुमारे चार हजार कंपन्यांचे जाळे आहे. यामध्ये बजाज ऑटो, महिंद्र फोक्सवॅगन, मर्सिडीज बेंज, ह्युंदाई, सॅनी इंडिया, जीई, गॅब्रिएल, स्पायसर, लॉरिएल, एअर लिक्विड, फिलिप्स, बॉश अशा छोट्या- मोठ्या राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. बजाज ऑटो कंपनी येथे आल्यानंतर, तसेच कुरूळी येथे भारत फोर्जचा प्रकल्प झाला, त्यानंतर औद्योगीकरणाने वेग घेतला. कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे लघु उद्योगाला चालना मिळाली. कंपन्यांना माल पुरवणारे, वाहनांसाठी सुटे भाग पुरविणारे लघुउद्योग वाढले, विस्तारले. अमेरिका, इटली, फ्रान्स यांसह जगभरातील कंपन्या चाकणमध्ये आहेत. असे असले, तरी पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर या मार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येथील उद्याोगांचा श्वास कोंडला आहे. कोंडीमुळे उद्योजकांकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
तळेगाव दाभाडे एमआयडीसीलाही फायदा?
तळेगाव एमआयडीसी पुणे-मुंबई महामार्गापासून अगदी जवळ आहे. मुंबई, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टशी (जेएनपीटी) वेगवान ‘कनेक्टिव्हिटी’ आहे. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड, बोर्गवॉर्नर उत्सर्जन, ओग्निबेन इंडिया, शेफलर इंडिया, मॅग्ना इंटरनॅशनल, कॉस्मा इंटरनॅशनल इंडिया, सिंटरकॉम, हुस्को हायड्रॉलिक्स या कंपन्या ऑटोमोबाइल उद्योगाशी संबंधित आहेत. तळेगाव एमआयडीसीत दोन लाखांहून अधिक कामगार काम करत आहेत. या मार्गाचे विस्तारीकरण झाल्यास तळेगाव एमआयडीसीलाही फायदा होईल.
औद्योगिक विकासाला चालना?
तळेगाव ते चाकण आणि चाकण ते शिक्रापूरदरम्यान चार पदरी उन्नत मार्ग आणि जमिनीस समांतर मार्ग झाल्यास याचा उद्योजकांना मोठा फायदा होईल. वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळेल. मुंबई-पुणे महामार्गासह प्रमुख राष्ट्रीय, राज्य महामार्गांशी थेट जोडणी मिळून प्रवासाचा वेळ तसेच खर्चात बचत होईल. दळणवळण सुलभ होईल. मालाची आयात व निर्यात जलदगतीने होण्यास मदत होईल. पायाभूत सुविधा सुधारल्यामुळे परिसरात नवीन गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी?
तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग औद्योगिक वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी उन्नत मार्ग होणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांपासून या मार्गाची केवळ चर्चा सुरू असून, तो लालफितीत अडकला होता. या मार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी तळेगाव दाभाडे, चाकण परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलनेही केली. आता मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला कधी सुरुवात होईल, याकडे या परिसरातील नागरिकांसह उद्योजकांचे लक्ष लागले आहे.
ganesh.yadav@expressindia.com
