Policemen Sentenced To Death For Custodial Killing Father and Son : सगळ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या तमिळनाडूच्या सात्तानकुलम येथील पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मदुराई जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल दिला. करोना काळात एका व्यापाऱ्यासह त्याच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने नऊ पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे कोठडीतील हे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या पार्श्वभूमीवर करोना काळात नेमके काय घडले होते? कोठडीत असलेल्या बाप-लेकांची पोलिसांनी कशी हत्या केली? त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…
नेमकी घटना काय होती?
जून २०२० मध्ये करोना महामारीच्या काळात सर्वत्र टाळेबंदी असताना तमिळनाडूतील सात्तानकुलम येथील व्यापारी पी. जयराज (वय ६२) आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स (वय ३१) यांना अटक करण्यात आली होती. करोना काळात लागू केलेल्या उपाययोजनांचे उल्लंघन करून, रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत बाप-लेकाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, काही दिवसांतच त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना उघडकीस येताच तमिळनाडूसह संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली होती. २४ जून २०२० मध्ये मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली. स्थानिक पोलिसांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश दिला.
सप्टेंबर २०२० मध्ये १० पोलिसांना अटक
सप्टेंबर २०२० मध्ये सीबीआयने या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिसांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. निरीक्षक एस. श्रीधर, उपनिरीक्षक के. बालकृष्णन, उपनिरीक्षक पी. रघु गणेश, हवालदार एस. मुरुगन, हवालदार ए.सामदुराई, शिपाई एम. मुथुराजा, शिपाई एस. चेल्लादुराई, शिपाई थॉमस फ्रान्सिस, शिपाई एस. वैलमुथु अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी पोलिसांची नावे होती. या प्रकरणातील दहावा आरोपी विशेष उपनिरीक्षक पालदुराई याचा ऑगस्ट २०२० मध्ये कोठडीत असतानाच करोनामुळे मृत्यू झाला होता. ऑगस्ट २०२२ मध्ये आरोपींविरोधातील सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. सुमारे सहा वर्षांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने मार्च २०२६ मध्ये पुराव्यांच्या आधारे नऊही पोलिसांना दोषी ठरवले.
आणखी वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली? अमेरिकेच्या २५ व्या घटनादुरुस्तीत नेमके काय?
तपासात धक्कादायक बाबी उघड
सीबीआयच्या तपासातून या प्रकरणातील काही धक्कादायक बाबीही उघड झाल्या. व्यापारी पी. जयराज यांनी लॉकडाऊनच्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नव्हते. तरीही १९ जून २०२० रोजी रात्री ७:३० च्या सुमारास त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी पोलिसांनी रचलेल्या एका गुन्हेगारी कटाचा हा भाग होता. यादरम्यान जयराज यांना अटक झाल्यानंतर त्यांचा मुलगा बेनिक्स हा पोलीस ठाण्यात पोहोचला. वडिलांना झालेली मारहाण पाहून त्याने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याच वेळी आरोपी पोलिसांनी त्यालाही बेकायदा तुरुंगात डांबले आणि रात्रभर अमानुष मारहाण केली. पोलिसांशी कसे वागावे, याचा धडा शिकवण्यासाठी पिता-पुत्रांवर रात्रभर कोठडीत अत्याचार करण्यात आल्याचे सीबीआयने आपल्या अहवालात नमूद केले.
पोलिसांकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
मारहाणीनंतर गंभीर जखमी झालेल्या पिता-पुत्र अशा दोघांना त्यांच्याच जखमांमधून जमिनीवर सांडलेले रक्त पोलिसांनी साफ करायला लावले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यातील रक्ताचे डाग पुसण्यासाठी एका स्वच्छता कर्मचाऱ्याला बोलावण्यात आले, जेणेकरून मारहाणीचा कोणताही पुरावा उरणार नाही. त्या दोघांवर पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. इतक्यावरच न थांबता, त्यांना गंभीर जखमी असतानाही कोठडीत ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून बनावट फिटनेस प्रमाणपत्र घेण्यात आले. बाप-लेकाचे रक्ताने माखलेले कपडे रुग्णालयाच्या कचरापेटीत टाकून पोलिसांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासातून समोर आले.
दी इंडियन एक्स्प्रेसकडून घटनेचा उलगडा
बाप-लेकाची पोलीस ठाण्यातच हत्या झाल्यानंतर दी इंडियन एक्स्प्रेसने त्यावेळी या थरराक प्रकरणाचा उलगडा जगासमोर मांडला होता. वृत्तानुसार, ६२ वर्षीय जयराज यांनी लॉकडाऊनमध्ये दुकाने लवकर बंद करण्याच्या पोलिसांच्या सक्तीवर टीका केली होती. हाच राग मनात धरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यादरम्यान त्यांच्या मुलाने वडिलांना वाचविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांचा अहंकार आणखीनच दुखावला आणि त्यांनी दोघांनाही बेकायदा मारहाण केली. हा छळ केवळ क्रूरच नव्हता, तर त्यातील भीषणता अस्वस्थ करणारी होती. पिता-पुत्राला अटक झाल्यानंतर रात्रभर पोलीस ठाण्याबाहेर थांबलेल्या त्यांच्या नातेवाइकांनाही पोलिसांनी शिवीगाळ केली. नातेवाइकांनी सकाळी जेव्हा जयराज आणि बेनिक्स यांना पाहिले, तेव्हा दोघांचीही प्रकृती अत्यंत खालावलेली होती.

मृतांच्या नातेवाइकांचे आरोप काय होते?
नातेवाइकांच्या आरोपांनुसार, जयराज यांचे धोतर आणि बेनिक्सची पँट रक्ताने पूर्णपणे भिजलेली होती. रक्ताचे डाग दिसू नयेत म्हणून पोलिसांनी त्यांना मुद्दाम गडद रंगाची लुंगी घालायला दिली होती. इतका रक्तस्राव होत होता की, त्या दोघांना आपले कपडे सावरणेही कठीण जात होते. या प्रकरणातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा झालेला भंग. जयराज यांचे मेव्हणे एस. जोसेफ यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, पोलिसांनी जयराज आणि बेनिक्स यांना दंडाधिकाऱ्यांसमोर योग्य प्रकारे हजरच केले नव्हते. दंडाधिकाऱ्यांनीही त्या दोघांच्या जखमांची साधी चौकशीही केली नाही. एका साध्या हाताच्या इशाऱ्यावर या गंभीर जखमी पिता-पुत्राला थेट तुरुंगात धाडण्यात आले.
पिता-पुत्राचा कोठडीतच मृत्यू
जयराज आणि बेनिक्स यांना कोविलपट्टी उप-कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र, अमानुष मारहाणीमुळे त्यांची प्रकृती वेगाने खालावली. २२ जून रोजी अतिरक्तस्राव आणि अंतर्गत दुखापतीमुळे बेनिक्सचा मृत्यू झाला; तर त्याच्या पुढच्याच दिवशी वडील जयराज यांनीही जगाचा निरोप घेतला. पिता-पुत्राच्या कोठडीतील मृत्यूनंतर संपूर्ण तमिळनाडूत संतापाची लाट उसळली. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला; तर मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या पोलीस अमानुषतेचा तीव्र निषेध केला. २४ जून २०२० मध्ये मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली. स्थानिक पोलिसांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला.
हेही वाचा : लादेनचा खात्मा करणारी अमेरिकेची ‘सील टीम’ इराणमध्ये; वैमानिकाला मृत्यूच्या जबड्यातून कसे वाचवले?
गुन्ह्याचा छडा नेमका कसा लागला?
तपासादरम्यान पोलिसांनी दडपशाही करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याचे न्यायालयाला कळवण्यात आले. या प्रकरणातील आवश्यक कागदपत्रेही तपासकर्त्यांना मुद्दामहून उशिरा देण्यात आली. त्याचबरोबर घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, एका महिला हवालदाराने न्यायालयात दिलेल्या जबाबानंतर या प्रकरणाच्या तपासाने वेग घेतला. मार्च २०२१ मध्ये उच्च न्यायालयाने हा खटला सहा महिन्यांतच संपवण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाला दिले होते. न्यायाला विलंब होणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखे असल्याचे न्यायमूर्तींनी त्यावेळी स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही हा खटला अनेक वर्षे चालला.
न्यायालयाकडून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा
२०२५ पर्यंत या प्रकरणातील मुख्य साक्षीदारांच्या उलटतपासण्या पूर्ण झाल्या. या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस निरीक्षक श्रीधर याने स्वतःची शिक्षा कमी करून घेण्यासाठी माफीचा साक्षीदार होण्याची न्यायालयाकडे विनंती केली होती. मात्र, सीबीआय आणि पीडित कुटुंबाने त्याला तीव्र विरोध केला आणि न्यायालयाने त्याची ही विनंती फेटाळून लावली. अखेर सहा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर जिल्हा न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे नऊही दोषी पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आणि पीडित कुटुंबाला न्याय दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे तमिळनाडूतील जनतेने स्वागत केले आहे.
