Actor Vijay Thalapathy TVK Party Tamil Nadu Election Victory: तमिळनाडूच्या राजकारणात चित्रपट कलावतांचे प्रस्थ नेहमीच राहिले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जोसेफ विजय चंद्रशेखर या ५१ वर्षीय अभिनेत्याने असाच पराक्रम करून दाखविला. टीव्हीके या पक्षाची स्थापना केल्यानंतर केवळ दोन वर्षांत राज्यातील दोन प्रादेशिक पक्षांना मागे टाकत सत्तेचे सोपान चढून त्यांनी विक्रम केला. त्यातही स्टॅलिन यांच्यासारख्या तगड्या राजकारण्याला दिलेली मात विशेष उल्लेखनीय ठरली.
तरुण, महिलांची मते निर्णायक
विजयच्या समर्थकांनी २००९ मध्ये फॅन क्लब करत राजकारणात पदार्पण करण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले होते. सुरुवातीला त्यांनी अण्णा द्रमुकला पाठिंबा दिला होता. मात्र २०२१ मध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढत द्रमुक-अण्णा द्रमुकच्या लढतीत तिसरा पर्याय निर्माण केला. मात्र तीन वर्षांतच मोठी झेप घेत दक्षिणेतील राज्यात सत्ता आणली. तरुण तसेच महिलांचा मोठा पाठिंबा विजय यांना मिळाला. विशेषत: १८ ते ४५ वयोगटातील ६० टक्क्याच्या आसपास मते टीव्हीकेला मिळाली. एकूण मतदारांमध्ये ४० टक्के हा वर्ग आहे. महिलांची मोठ्या प्रमाणात मतेही या पक्षाला मिळाली. त्यामुळे त्यांनी मोठा विजय मिळवला. ४० ते ६० वयोगटातही त्यांना बऱ्यापैकी समर्थन मिळाले.
द्रमुकचा गड कोसळला
चेन्नई शहर आणि परिसरातील २९ जागा या द्रमुकचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जात होत्या. मात्र यंदा विजय यांनी त्यातील २६ जागांवर यश मिळवत द्रमुकला मोठा धक्का दिला. सत्ता नसतानाही यापूर्वी चेन्नई शहर परिसरात द्रमुकला यश मिळत होते. मात्र यंदा ती परंपरा खंडित झाली, ती विजय यांच्या अभूतपूर्व यशाने. दुसरीकडे राज्याचा पश्चिम भाग कोंगुनाडू पट्टा म्हणून ओळखला जातो. हा अण्णा द्रमुकचे प्रभावक्षेत्र मानले जाते. तेथेही टीव्हीकेने अण्णा द्रमुकला रोखले. किनारपट्टी भागातही टीव्हीकेला यश मिळाले. अल्पसंख्याक बहुल जागांवरही त्यांना विजय मिळाला. द्रमुकने सर्व समाजघटकांना एकत्र करून व्यापक आघाडी तयार केली होती. मात्र अल्पसंख्याक मते द्रमुकला यावेळी राखता आली नाहीत. राज्यात द्रमुक, अण्णा द्रमुकच्या तुलनेत गावपातळीवर संघटन नसतानाही विजय यांचे हे यश महत्त्वाचे आहे.
सत्ताविरोधी लाट
तमिळनाडूत दर पाच वर्षांनी सत्तांतरांची परंपराच आहे. कधी द्रमुक तर कधी अण्णा द्रमुक हे चक्र गेली सहा दशके सुरू आहे. यंदा सत्तांतर झाले पण राजकारणात नवा खेळाडू आल्याने चमत्कार घडला. द्रमुकच्या राजवटीविरोधात नाराजी होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. त्यातच सरकारवर हिंदूविरोधी असल्याचा आरोप भाजपने केला होता. द्रमुकने भाषेचा मुद्दा असेल किंवा निधीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारविरोधात प्रखर भूमिका घेतली होती. मात्र राज्यातील जनतेने त्यांना साथ दिली नाही. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकलाही त्याचा लाभ झाला नाही. विजय यांच्या टीव्हीकेची शिट्टी जोरदार वाजली. त्यांची खूण शिट्टी आहे.
आंध्र पारूपाची पुनरावृत्ती
एन.टी.रामराव यांनी आपल्या चित्रपटातील करिष्म्याच्या जोरावर १९८३ मध्ये आंध्र प्रदेशात काँग्रेसला पराभूत विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला होता. तेलुगु देशम स्थापन केल्यावर वर्षभरातच त्यांनी हे यश मिळवले होते. स्थानिक अस्मितेशी या यशाला जोडले गेले होते. विजय यांनी त्याचीच पुनरावृत्ती केली, फरक इतकाच की विजय यांनी राज्यातील दोन तगड्या प्रादेशिक पक्षांना नमवत ही किमया साध्य केली. विजय यांचे बरेचसे उमेदवार राजकारणाबाहेरचे होते. तरीही विजय यांच्या नावावर मतदारांनी कौल दिला. विजय यांच्या सभांना अभूतपूर्व गर्दी होत होती. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करावी असा काँग्रेसमधील एका गटाचा आग्रह होता. मात्र राष्ट्रीय राजकारण पाहून काँग्रेस नेतृत्त्वाने द्रमुकबरोबर जाणे पसंत केले. तमिळनाडूत एम जी रामचंद्रन, जयललिता तसेच करुणानिधी अशा चित्रपट क्षेत्राशी संबंधितांनी राजकारणावर प्रभुत्व गाजवले. आता त्याच मालिकेत विजय यांचा समावेश झाला आहे. पक्ष संघटनेचे व्यापक जाळे नसतानाही चित्रपट पडद्यावरी करिष्म्याच्या जोरावर सत्ता खेचून आणता येते हे विजय यांच्या यशाने दाखवून दिले.
