दक्षिण तमिळनाडूतल्या एका शवागारात आकाश डेलिसन या २६ वर्षीय तरूणाचा मृतदेह मागील १०० दिवसांपासून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी तुरूंगात बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे, असा आरोप करत नातेवाईकांनी आकाशला न्याय मिळाल्याशिवाय त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर बुधवारी मद्रास उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आकाशच्या मृतदेहाचा अंत्यविधी करण्यात आला. तमिळनाडूत चर्चेत असलेलं हे गंभीर प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊयात.
मागील १०० दिवसांपासून मृतदेह शवागारात का?
आकाश डेलिसन या २६ वर्षीय दलित तरूणाचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांनी स्वीकारण्यास नकार दिला होता. पोलिसांनी तुरूंगात आकाशला अमानुष मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे, त्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली होती. मदुराई येथील राजाजी हॉस्पिटलच्या शवागारात मृतदेह मागील १०० दिवसांपासून ठेवण्यात आला होता. मृतदेह अनिश्चित कालावधीसाठी शवागारात ठेवता येऊ शकत नाही, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सरकारी अधिकाऱ्यांनी कडक पोलीस बंदोबस्तात आकाशचा मृतदेह शवागारातून बाहेर काढला व थाथानेरी स्मशानभूमीत नेला.
त्याचे पालक, बहीण व काका यांना त्याच्या मृतदेहाबरोबर स्मशानभूमीत जाऊन अंत्यविधी करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु, मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांनीच त्याचा अंत्यविधी केला. दरम्यान, आकाशचा मृतदेह शवागारातून बाहेर काढताना नातेवाईकांनी प्रचंड विरोध केला होता. १४ नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याचा मृतदेह आणखी कालावधीसाठी ठेवावा अशी मागणी नातेवाईक करत होते. जबरदस्तीने अटक केली जाईल, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोप काही नातेवाईकांनी केला आहे.
आकाश डेलिसन याला ६ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून नातेवाईक व सरकार यांच्यात सुरू झालेल्या संघर्षाचा एक टप्पा बुधवारी संपला. तुरूंगात अमानुष छळ झाल्याचा आरोप मागील काही वर्षांत तामिळनाडू पोलिसांवर झाला आहे.
आकाश डेलिसनसोबत नेमकं काय घडलं?
आकाश डेलिसन हा मानामदुराई जिल्ह्यातील कृष्णराजपुरम येथील रहिवासी आहे. खूनाचा प्रयत्न केल्याच्या एका प्रकरणात आकाशसह आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पी. जयकुमार आणि आर. अझगर या दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप दोघांवर होता. पळून जात असताना पुलावरून उडी मारल्याने डेलिसनच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेले हे स्पष्टीकरण आकाशला झालेली अमानुष मारहाण लपवण्यासाठी दिले जात आहे, असे कुटुंबियांचे म्हणणे होते.
“पायावर मारताच तात्काळ हाड तुटले”
मानामदुराई व शिवगंगा येथील सरकारी रूग्णालयांमध्ये आकाशला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला सरकारी रूग्णालय असलेल्या राजाजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्याचा ८ मार्च रोजी मृत्यू झाला होता. दरम्यान, त्याआधी आकाशने तुरूंगात काय झाले होते, याबाबत न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला होता. आकाशने नोंदवलेल्या जबाबानुसार, अधिकाऱ्यांनी त्याच्या डोळ्यांवर आधी पट्टी बांधली. त्यानंतर त्याच्या गुडघ्याखाली व तळपायाच्या घोट्याखाली दगड ठेवले. त्यानंतर त्याच्या पायांवर ओले पोते टाकले व लोखंडाच्या रॉडने त्यावर प्रचंड जोरात मारहाण केली. “पायावर मारताच तात्काळ हाड तुटले आणि बाहेर आले. रक्तस्राव झाला”, असे त्याने जबाबात सांगितले.
पोलिसांकडून मारहाणीसाठी होणाऱ्या ओल्या पोत्याच्या वापराला तमिळनाडूत वकिलांनी व मानवाधिकार कार्यकर्त्यांनी यापूर्वी प्रचंड विरोध केला आहे. ओले चिंब झालेले पोते टाकून मारहाण केल्याने वळ कमी प्रमाणात उमटतात. परंतु, अशा मारहाणीने हाड तुटणे, शरीरात अंतर्गत रक्तस्राव होणे, पेशींना, नर्व्ह्सना आणि रक्तवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ही मारहाणीची क्रूर पद्धत मानली जाते.
आकाश डेलिसनचे वडील ए. राजेशकन्नन म्हणाले, पोलिसांनी माझ्या मुलाचे पाय दोन दगडांदरम्यान ठेवून त्याला मारहाण केली. त्यामुळे त्याचा रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला. दरम्यान, शवविच्छेदनानंतर कुटुंबियांनी आकाशचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. आकाशच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सर्व १६ पोलिसांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या प्रकरणी सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सीआयडीकडे (गुन्हे अन्वेषण विभाग) सोपवण्यात आला आहे.
शवविच्छेदन अहवालातून काय समोर आलं?
पोलिसांच्या निलंबनाने डेलिसन कुटुंबियांचे समाधान झाले नाही. रूग्णालयाच्या शवागाराबाहेर डेलिसन कुटुंबियांचे आंदोलन सुरू होते. आकाशचे शवविच्छेदन न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीने पोलिसांच्या भूमिकेवरील संशय आणखी बळावला. आकाशच्या पायावर २४ हून अधिक जखमा आढळून आल्या. त्याच्या पायावर फ्रॅक्चर्स झाल्याचेही आढळले. त्याच्या पायाच्या पेशींचे मोठे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच कोपराव गुडघ्यावर जखमा व ओरखडे आढळले.
४५ सेमी बाय १२ सेमी एवढ्या आकाराची एक जखम आकाशच्या जखमी पायावर आढळून आली. प्राथमिक वैद्यकीय तपास आणि शवविच्छेदन अहवाल यात तफावत आढळून आल्याचेही फोरेन्सिक अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, आकाशला झालेल्या दुखापती पुलावरून पडल्याने झाल्या आहेत का? याचा तपास केला जात आहे. आकाश डेलिसन याचा छळ करण्यात आलेला नाही, अशी भूमिका तमिळनाडू सरकारने घेतली आहे. मद्रास उच्च न्यायालयात सरकारी वकिलाने सांगितले की, आकाश डेलिसनला मानामदुराई पोलिस ठाण्यात नेलेच नाही. पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला जखमा झाल्या आहेत. कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून कायद्याने सहा लाख रूपयांची मदत देण्यात आली आहे.
न्यायालयाने काय म्हटलं?
मृतदेह शवागारात अनिश्चित कालावधीसाठी ठेवता येणार नाही, असा निर्णय न्यायाधीश एल. विक्टोरिया गोवरी यांनी मंगळवारी दिला. शवविच्छेदन झाले आहे. इतर वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. नमूने जतन करण्यात आले आहेत. तसेच तपास एका स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे, असे न्यायाधीशांनी नमूद केले. सन्मानपूर्वक अंत्यविधी किंवा दफनविधी होणे आवश्यक आहे. मृतदेह अनिश्चित कालावधीसाठी ठेवल्याने त्याचा अवमान होतो, असेही त्यांनी नमूद केले. पुराव्यांसाठी मृतदेहाचे फोटो, व्हिडिओ काढून ठेवावेत. कुटुंबांची जी प्रथा आहे त्यानुसार अंत्यविधी करावा. अंत्यविधीमुळे सीआयडीच्या तपासात अडचणी येणार नाही, याची खात्री करावी, असेही न्यायाधीश गोवरी यांनी स्पष्ट केले होते.
या प्रकरणाचे राजकीय पडसाद मानामदुराईच्या पलीकडेही उमटले आहेत. कोठडीतील मृत्यू आणि पोलिसांच्या अत्याचाराचे आरोप हे तत्कालीन द्रमुक (DMK) सरकारवर लागलेले वारंवारचे डाग बनले होते. त्यामुळे द्रमुकच्या सामाजिक न्याय आणि मानवी प्रशासनाच्या दाव्यांना धक्का पोहोचला होता. निवडणुकीतील पराभवापूर्वी, विरोधी पक्षांनी प्रशासनाला बेजबाबदार दर्शवण्यासाठी ज्या मुद्द्यांचा वापर केला, त्यापैकी हे देखील काही मुद्दे होते. मात्र, डेलिसनच्या कुटुंब अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
