तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या दोन वर्षांपूर्वी (२ फेब्रुवारी २० २४) स्थापन झालेल्या पक्षाने तमिळनाडूत सत्ता मिळवली. गेली सहा दशके द्रमुक व अण्णा द्रमुक यांच्या भोवतीच सत्तेचे राजकारण सुरू होते. त्याला या निकालाने शह बसला. यातून निव्वळ सत्ता परिवर्तन नव्हे तर राज्याच्या राजकारणाचा बाज बदलला. ‘टीव्हीके’चे सर्वेसर्वा सी.जोसेफ विजय यांनी १० मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सत्तेत आल्यावर विजय यांनी आपले स्थान बळकट केले असून, राज्यात द्रमुक-अण्णा द्रमुकविरोधात नवी तिसरी आघाडी आकारास येत आहे.

पारंपरिक राजकारणात बदल

सत्तेत आल्यावर दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत टीव्हीकेने ऐकेकाळचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकचे सात आमदार फोडून सरकार भक्कम करण्याकडे वाटचाल सुरू ठेवली. विधानसभेत त्यांना बहुमत नव्हते. सर्वप्रथम काँग्रेसने पाठिंबा दिला. मग व्हीसीके, मुस्लीम लीग यांचे समर्थन लाभले. सत्तारुढ टीव्हीके विरूद्ध प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुक यांच्यात आरोपांच्या रोज फैरी झडत आहेत. आता नव्याने एकमेकांवर आमदार फोडण्यासाठी धनशक्तीचा वापर केल्याचे आरोप झाला आहे. सत्ता गेल्याने द्रमुक अस्वस्थ आहे. त्यातही त्यांचा जुना मित्र काँग्रेस पाठोपाठ ‘एमडीएमके’ पक्षानेही साथ सोडली. राज्यात नव मतदारांनी बहुसंख्येने टीव्हीकेला साथ दिली. त्यामुळे द्रमुक व अण्णा द्रमुक यांना पारंपरिक चौकटीबाहेर राजकारणाचा विचार करावा लागेल. मतदारांच्या बदललेल्या अपेक्षा समजावून घेतल्या तरच राजकारणात टिकून रहाणे शक्य होईल असा संदेश या निवडणुकीने दिला. घराणेशाहीचाही या निकालात पराभव झाला. त्याच बरोबर अण्णा द्रमुकसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वलयांकित नेतृत्वाअभावी या पक्षातील अनेक नेते, आमदार पक्षाची साथ सोडत आहेत.

नव्या आघाडीचे संकेत

मुख्यमंत्री विजय यांनी सरकारला पाठिंबा देणाऱ्या मित्र पक्षांची चेन्नई येथे पहिली बैठक नुकतीच घेतली. त्यात या नव्या प्रस्तावित आघाडीसाठी नावेही सुचवली. राज्यात द्रमुकच्या नेतृत्वातील आघाडी विरोधात अण्णा द्रमुकला केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय लोकशाही आघाडी असा सामना होता. मात्र आता टीव्हीकेप्रणित नवा पर्याय उदयास येईल. त्यात काँग्रेस, एमडीएमके, व्हीसीके, मुस्लीम लीग हे पक्ष असतील. यातून सामाजिक समीकरणही भक्कम होईल. ‘व्हीसीके’ला दलित समुदायातून पाठिंबा आहे. अण्णा द्रमुकच्या आतापर्यंत सात तसेच मुख्यमंत्री विजय हे दोन मतदारसंघांतून विजयी झाले होते. त्यांची एक अशा आठ जागा रिक्त आहे. या सर्व ठिकाणी विजय मिळवण्याचे सत्तारूढ पक्षाचे ध्येय असून, यातून स्वबळावर बहुमताच्या ११८ आकड्यापर्यंत पोहचण्याचा टीव्हीकेचा प्रयत्न आहे. विधानसभा निकालानंकर अण्णा द्रमुकचे आमदार ४७ वरून ४१वर आले. पोटनिवडणूक जाहीर होईपर्यंत आणखी किती आमदार टीव्हीकेमध्ये सहभागी होतील हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. पक्षाचे सरचिटणीस पलानीस्वामी यांना पक्षात एकजूट राखण्यात यश आलेले नाही.

राष्ट्रीय स्तरावर परिणाम

राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाचे पडसाद राष्ट्रीय स्तरावरही उमटले. विरोधकांच्या देशव्यापी ‘इंडिया’ आघाडीत काँग्रेसचा द्रमुकचा महत्त्वाचा साथीदार. मात्र टीव्हीके सरकारला काँग्रेसने पाठिंबा देताच, पक्षाने पाठीत खंजीर खुपसल्याची प्रतिक्रिया द्रमुकने दिली. आता काँग्रेसपासून ते दूर आहेत. त्यातच काँग्रेसने खासदार बी. मणिकम टागोर यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. द्रमुकची आघाडी तोडून टीव्हीकेबरोबर निवडणुकीत युती या मताचे ते होते असे सांगितले जाते. राज्यातील काँग्रेसची सूत्रे टागोर यांच्याकडे आल्याने टीव्हीकेबरोबरील आघाडी भक्कम करण्याचा संदेशच श्रेष्ठींनी दिला आहे. यातून द्रमुक व काँग्रेस यांच्यातील कटुता वाढण्याची चिन्हे आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन या महिन्यांत सुरू होत. आहे. द्रमुकने यापूर्वीच लोकसभेत आसन व्यवस्थेत बदलाची मागणी केली असून, काँग्रेस सदस्यांशेजारी बसण्यास ते आता राजी नाहीत. आता ‘टीव्हीके’ला ‘इंडिया’ आघाडीत स्थान मिळणार काय, हा मुद्दा आहे.

टीव्हीके सरकारचा निर्णय धडाका

अभिनेते विजय हे त्यांच्या चित्रपटातील प्रतिमेच्या जोरावर निवडणूक जिंकले खरे, मात्र त्यांना मुख्यमंत्रीपद सांभाळता येईल काय, असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. मात्र सरकारचे गेल्या दीड ते दोन महिन्यांतील निर्णय पाहता विजय यांची सुरुवात तर दमदार दिसते. दोनशे युनिटपर्यंत मोफत विजेचा निर्णय किंवा मंदिर तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील मद्यविक्री दुकाने बंद करण्याचा आदेश महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक जिल्ह्यांत अमलीपदार्थ विरोधी पथक स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री हे सचिवालयात सोमवार ते शुक्रवार सलग सात तास उपस्थित असतात. याखेरीज राज्याची अर्थव्यवस्था २०३५ पर्यंत दीड लाख कोटी डॉलरची करण्याच्या दृष्टीने आराखडा सादर केला. याखेरीज इतरही कल्याणकारी निर्णय त्यांनी जाहीर केले. यातून प्रशासनावर विजय यांनी पकड निर्माण केली.

भाजपपुढे आव्हान

राज्यातील टीव्हीके सरकार काही महिन्यांत कोसळेल असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केले होते. विधानसभा निवडणुकीतील पराजयानंतर तृणमूल काँग्रेस, अण्णा द्रमुक या पक्षांमध्ये फूट पडत असताना द्रमुक त्याला अपवाद आहे. विचारसरणीच्या जोरावर त्यांनी पक्षात एकजूट राखली. निवडणुकीत फटका बसूनही द्रमुकमधून कोणी महत्त्वाचा नेता बाहेर पडला नाही हे महत्त्वाचे. मात्र विधानसभा निवडणुकीत स्टॅलिन पराभूत झाले. त्यांचे पुत्र उदयनिधी हे विरोधी पक्षनेते आहेत. विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशात उदयनिधी आणि विजय यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. विजय यांनी सभागृहात भाषण संपवताना केलेले नाट्यमय हावभाव समाजमाध्यमावर लोकप्रिय झाले. स्टॅलिन यांच्या पराभवावरून त्यांना डिवचले. यातून टीव्हीके विरुद्ध द्रमुक यांच्यातील संघर्ष वाढत आहे. रोज नवनवे आरोप होत आहेत. दुसरीकडे, राज्यात भाजपला विशेष स्थान नाही. अण्णा द्रमुकशी आघाडी करूनही त्यांचा एकच आमदार विधानसभेत पोहचला. माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनीही भाजपला रामराम ठोकत सवतासुभा मांडला. या परिस्थितीत राज्यातील राजकीय स्थिती भाजपसाठी खूपच आव्हात्मक आहे. अण्णा द्रमुकला गळती लागल्याने त्याचा फायदा भाजप उठवणार काय, हा मुद्दा आहे. द्रमुकचा काँग्रेसविरोधातील संताप पाहता संसदेत काही विधेयकांना त्यांचा पाठिंबा मिळणार का, हे प्रश्न राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीत विचारले जात आहेत.