scorecardresearch

विश्लेषण: टाटा ग्रुपसाठी प्रगतीची दारं उघडणारी ठरली टायटन, ३८ वर्षांचा इतिहास आहे तरी काय?

टाटा ग्रुपच्या टायटन या कंपनीची सुरूवात ३८ वर्षांपूर्वी झाली होती, तेव्हापासून या कंपनीने टाटा ग्रुपसाठी प्रगतीची अनेक दारं उघडली आहेत

विश्लेषण: टाटा ग्रुपसाठी प्रगतीची दारं उघडणारी ठरली टायटन, ३८ वर्षांचा इतिहास आहे तरी काय?
टायटनचा ३८ वर्षांचा इतिहास काय आहे?

टायटन हे नाव आज कुणाला माहित नाही? टाटा ग्रुपचं हे उत्पादन आपल्या जन्मापासूनच शेअर बाजारात धावतं आहे. देशात प्रदीर्घ काळ घड्याळ म्हणजे टायटन हीच संकल्पना रूजली आणि वाढली होती. ३८ वर्षांपूर्वी टायटन वॉचेस लिमिटेड ही कंपनी सुरू करण्यात आली. या कंपनीची उत्पादनांमध्ये आज फक्त घड्याळंच नाही तर इतर अनेक गोष्टी आहेत. शेअर बाजारात लिस्टेड कंपनी झाल्यानंतर गुंतवणूकदारांना या शेअर्सचा खूप फायदा झाला आहे. बिग बुल अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांचेही आवडते शेअर्स टायटनचे होते.

टायटनच्या प्रगतीची घोडदौड सुरूच

आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू २९, ०३३ कोटी रूपये इतका होता. टायटनची मार्केट कॅप सध्या २.२० लाख कोटी रूपये इतकी आहे. ८ जानेवारी २०२३ ला टायटनचा एक शेअर २५०० रूपयांवर गेला होता. अशातच कंपनी आपला कारभार वेगाने पुढे नेते आहे. त्यामुळेच २०२२ च्या डिसेंबर महिन्यापर्यंत १११ नवे रिटेल आऊटलेट कंपनीने आपल्यासोबत जोडले.

ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत ३६ नवे टायटन आय+ स्टोर्स सुरू झाले. Q2 FY23 मध्ये टायटनचा निव्वळ नफा ३३ टक्के वाढीसह ८५७ कोटी रूपये इतका होता. टायटनकडून जी घोषणा करण्यात आली त्यात हे सांगण्यात आलं की वॉचेस अँड विअरेबल्स या सेगमेंटमध्ये कंपनीची १४ टक्के वाढ झाली. त्याशिवाय आयकेअर च्या विक्रीमध्ये वर्षभरात १० टक्के फायदा अधिकचा झाला.

१९८४ मध्ये सुरू झाली होती टायटन कंपनी

२६ जुलै १९८४ ला टायटन कंपनी सुरू झाली. ही कंपनी टाटा ग्रुप आणि तामिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झाली आहे. कंपनीच्या स्थापनेनंतर दोन वर्षांनी म्हणजेच १९८६ पासून घड्याळांची निर्मिती सुरू झाली. यानंतर एक वर्षातच टायटन सगळ्या मार्केटवर अधिराज्य गाजवण्यास सुरूवात केली. त्यानंतर घड्याळ म्हटलं की टायटन हे समीकरणच बनलं.

व्यवसाय वृद्धीसाठी महत्त्वाचे बदल

देशातल्या घड्याळांच्या मार्केटवर राज्य करण्यासाठी टायटन बिझनेसने विस्तारासाठीचीही पावलं उचलली. त्यामुळेच ही कंपनी फक्त घड्याळांपुरती मर्यादित न राहता त्यांनी इतर उत्पादनंही तयार केली. कंपनी आता घड्याळांच्या उत्पादनांशिवाय इतर उत्पादनंही तयार करणार असल्याने १९९३ मध्ये कंपनीने आपलं नाव टायटन वॉचेस लिमिटेड हे बदलून टायटन इंडिस्ट्रीज लिमिटेड असं ठेवलं. नाव बदलण्यासह टायटनने आणखी एक गोष्ट केली. १९९४ मध्ये अमेरिकन ब्रांड तनिष्कसोबत सोने व्यवसायात उडी मारली.

तनिष्क ठरला टायटनचा सर्वात मोठा ब्रांड
आज टायटनचा तनिष्क हा ब्रांड सोन्याचे दागिने घडवणारा भारतातला सर्वात मोठा ब्रांड ठरला आहे. टायटनचा सुमारे ८० टक्के रेव्हेन्यू हा तनिष्कच्या दागिन्यांच्या विभागातून येतो. २०२२ पर्यंत टायटनची ज्वेलरी मार्केटमध्ये सहा टक्के भागिदारी होती. कंपनीने आता नवी उत्पादनं आणण्यासाठी विविध पावलं उचलली. तनिष्क नंतर टायटनने टायटन आय प्लस आणत आय वेअर सेक्टरमध्येही पाऊल ठेवलं. टायटन आय प्लस हा जगभरातला एक नावाजलेला ब्रांड झाला. या सगळ्या उत्पादनांसह घड्याळांची निर्मिती आजही सुरूच आहे.

Fast Track आणून टायमेक्सला टक्कर

टायटनकडून आणला गेलेला घड्याळांचा सोनाटा हा ब्रांडही खूप चर्चेत राहिला आणि तेवढाच चाललाही. आजही सोनाटा घड्याळं खरेदी करण्यासाठी ग्राहक जातात. १९९८ मध्ये कंपनीने युवकांची आवड लक्षात घेऊन फास्ट ट्रॅक हा घड्याळांचा ब्रांड आणला ज्या ब्रांडने टायमेक्सला तगडी टक्कर दिली. २०१९ पर्यंत टायटन ही घड्याळांची निर्मिती करणारी जगातली पाचव्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.

यानंतर टायटन कंपनीने मागे वळून पाहिलंच नाही. २०१३ मध्ये टायटने स्किन नावाच परफ्युम ब्रांड आणला. स्कीन हा आजही अनेकांचा आवडता परफ्युम आहे. यानंतर २०१७ मध्ये कंपनीने साड्यांच्या सेक्टरमध्ये पाऊल ठेवलं. या कंपनीच्या साडीचं नाव तनेरिया असं आहे. बंगळुरूमध्ये या साड्यांचं पहिलं दुकान सुरू झालं.

बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे आवडते शेअर्स

बिग बुल अशी ज्यांची ओळख होती त्या राकेश झुनझुनवालांचे आवडते शेअर्स होते टायटन. २००२-०३ मध्ये राकेश झुनझुनवालांनी टायटनचा एक शेअर ३ रूपये या किंमती प्रमाणे घेतले. या शेअर्सची किंमत रॉकेटच्या वेगाने वाढली. त्याचाच परिणाम हा झाला की राकेश झुनझुनवाला यांची संपत्तीही वाढली. त्यामुळेच त्यांचे आवडते शेअर्स म्हणजे टायटन असं ते कायम सांगत असत. टाटा हे नाव आजही विश्वासाने घेतलं जातं आणि त्यांच्याकडे तसंच पाहिलंही जातं. टाटाचं उत्पादन डोळे झाकून घेता येतं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 21:31 IST

संबंधित बातम्या