नेमका वाद काय होता?

प्रकरणाची सुरुवात महाराष्ट्रातील शिक्षक भरती (टीएआयटी-२०२२) प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीपासून झाली. आरक्षित प्रवर्गातील काही उमेदवारांनी टीईटी ही पात्रता परीक्षा सवलतीच्या गुणांवर उत्तीर्ण केली होती; मात्र टीएआयटी या मुख्य परीक्षेत त्यांनी ‘खुल्या’ प्रवर्गातील अंतिम यादीत निवडलेल्या उमेदवारापेक्षा अधिक गुण मिळवले होते. तरीही, प्रशासनाने त्यांना ‘खुल्या’ प्रवर्गात समाविष्ट न करता त्यांच्या मूळ आरक्षित प्रवर्गातच ठेवले. या निर्णयाला आव्हान देणार्‍या संबंधित उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली; मात्र उच्च न्यायालयाने या याचिका फेटाळून लावत प्रशासनाचा निर्णय योग्य ठरवला.

त्यानंतर या उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयासमोर त्यामुळे मूळ प्रश्न असा निर्माण झाला की, पात्रता परीक्षेत (टीईटी) सवलत घेतलेल्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला, मुख्य निवड प्रक्रियेत (टीएआयटी) अधिक गुण मिळाल्यास ‘खुल्या’ प्रवर्गात स्थान मिळू शकते का? या प्रश्नाचे उत्तर देताना न्यायालयाने पात्रता आणि गुणवत्ता यांतील मूलभूत भेद स्पष्ट करत उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. सर्वोच्च न्यायालायाच्या या निकालाचे परिणाम दूरगामी ठरतील.

‘पात्रता’ व ‘गुणवत्ता’ : व्याख्या काय?

न्यायालयाने या निर्णयात अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाचा भेद अधोरेखित केला, टीईटी ही केवळ किमान पात्रता निश्चित करणारी परीक्षा आहे, तर टीएआयटी ही अंतिम गुणवत्ता ठरवणारी मुख्य परीक्षा आहे. पात्रता परीक्षेत दिलेली सवलत ही उमेदवाराला स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देते, मात्र अंतिम निवड प्रक्रियेत ती कोणताही अतिरिक्त फायदा देत नाही. सवलत ही प्रारंभीच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी असते, अंतिम स्पर्धा मात्र पूर्णपणे समानच असते.

‘खुल्या’ प्रवर्गाची संकल्पना काय?

या निर्णयातून ‘खुल्या’ प्रवर्गाची व्याख्या अधिक स्पष्ट झाली आहे. न्यायालयाने अधोरेखित केले की, खुला प्रवर्ग हा कोणत्याही विशिष्ट सामाजिक गटासाठी राखीव नाही. त्यामुळे, आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने अधिक गुण मिळवले असल्यास त्याला खुल्या प्रवर्गात स्थान मिळण्यास कोणताही कायदेशीर अडथळा नसतो. ‘ओपन’ आणि ‘जनरल’ हे समानार्थी नाहीत, ‘जनरल’ हा सामाजिक वर्ग आहे, तर ‘ओपन’ ही स्पर्धात्मक श्रेणी आहे. या दृष्टिकोनामुळे आरक्षण व्यवस्थेतील मूलभूत तत्त्व, संधीची समानता आणि गुणवत्तेचा सन्मान, यांचा समतोल राखला जातो.

कोणत्या परिस्थितीत ‘इथून तिथे’ शक्य वा अशक्य?

न्यायालयाने या प्रकरणातून ‘आरक्षित प्रवर्गातून खुल्या प्रवर्गात/वा उलट’ ये-जा करण्यासंदर्भात (मायग्रेशनसंदर्भात) काही स्पष्ट निकष मांडले आहेत. जर सवलत केवळ पात्रतेपुरती मर्यादित असेल, अंतिम निवड समान निकषांवर होत असेल, तसेच भरती नियमांमध्ये स्पष्ट मनाई नसेल, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला ‘ओपन’ प्रवर्गात जाण्याचा अधिकार मिळतो. मात्र, जर उमेदवाराने मूलभूत पात्रतेची अटच पूर्ण केलेली नसेल, किंवा सवलत थेट गुणवत्तेवर परिणाम करत असेल,वा भरती नियमांमध्ये स्पष्ट बंदी असेल, तर मायग्रेशन शक्य होत नाही. या प्रकरणात महाराष्ट्राच्या नियमांमध्ये अशी कोणतीही स्पष्ट बंदी नव्हती, त्यामुळे प्रशासनाने नंतर जारी केलेल्या सूचनांच्या आधारे उमेदवारांना वगळणे चुकीचे ठरले.

निर्णयाचा संभाव्य परिणाम काय?

या निर्णयाचे परिणाम केवळ शिक्षक भरतीपुरते मर्यादित राहणार नाहीत. विविध स्पर्धा परीक्षा आणि सरकारी भरती प्रक्रियांमध्ये पात्रता आणि गुणवत्ता यांतील भेद अधिक स्पष्टपणे मांडावा लागेल. प्रशासनाला भरती नियम अधिक स्पष्ट आणि सुसंगत ठेवावे लागतील, कारण नियमांमध्ये स्पष्ट मनाई नसताना अतिरिक्त अटी घालता येणार नाहीत, हे न्यायालयाने अधोरेखित केले आहे. तसेच, ‘सवलत म्हणजे दुहेरी लाभ’ हा युक्तिवाद भविष्यात सहजपणे ग्राह्य धरला जाणार नाही. या निर्णयामुळे आरक्षण व्यवस्थेवरील गैरसमज कमी होऊन गुणवत्ता-आधारित निवडीला अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयातून एक संतुलित आणि तर्कशुद्ध भूमिका मांडली आहे. सवलत ही संधीसाठी, तर अंतिम निवड ही केवळ गुणवत्तेसाठी असावी.