Social Media Mental Health Impact: सोशल मीडिया हे केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नाही; तर ते आज किशोरवयीन मुलांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. मात्र, या डिजिटल सवयींची किंमत मानसिक आरोग्याच्या रूपाने मोजावी लागते का, हा प्रश्न आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया न्यायालयात सुरू झालेला इन्स्टाग्राम आणि यूट्यूबविरोधातील खटला केवळ एका तरुणीचा वैयक्तिक संघर्ष नाही, तर संपूर्ण सोशल मीडिया उद्योगाच्या नैतिक जबाबदारीवर प्रकाश टाकणारा आणि त्याचवेळेस त्या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करणारा ठरला आहे.
चिंता, नैराश्य आणि आत्महत्या
जगभरातील सोशल मीडियाच्या किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत गंभीर चर्चा सुरू असतानाच या खटल्याच्या सुनावणीस सुरुवात होत आहे, हे विशेष. चिंता, नैराश्य आणि शरीराविषयी न्यूनगंड, त्याचबरोबर दुसरीकडे मनात आत्महत्येचे विचार आदी सर्व बाबींशी सोशल मीडियाच्या वापराचा अतिशय निकटचा संबंध असल्याचे अनेक संशोधनांतून आणि अभ्यासांमधून समोर आले आहे.
खटल्याचा केंद्रबिंदू काय आहे?
या प्रकरणातील फिर्यादी ही २० वर्षीय तरुणी असून तिने न्यायालयीन गोपनीयतेसाठी स्वतःची ओळख ‘KGM’ अशी ठेवली आहे. तिने सहाव्या वर्षी यूट्यूब वापरण्यास सुरुवात केली आणि नवव्या वर्षी इन्स्टाग्रामवर अकाउंट उघडले. त्यानंतर हळूहळू या प्लॅटफॉर्म्सनी तिचे आयुष्यच नियंत्रण करण्यास सुरुवात केली असा तिचा आणि तिच्या आईचा दावा आहे.

अल्गोरिदम, ‘लाईक्स’ आणि नोटिफिकेशन्स
इन्स्टाग्राम आणि यूट्यूबने जाणीवपूर्वक अशा डिझाइन वैशिष्ट्यांचा वापर खुबीने केला आहे, जे मानवी मेंदूतील ‘रिवॉर्ड सिस्टीम’ सक्रिय करतात. यामध्ये अखंड स्क्रोलिंग (endless scrolling), ऑटोप्ले व्हिडीओ, सतत बदलणारे अल्गोरिदम, ‘लाईक्स’ आणि नोटिफिकेशन्स यांचा समावेश आहे. हे सगळे घटक वापरकर्त्याला अॅपवर जास्त वेळ घालवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.
‘स्वाइप म्हणजे स्लॉट मशीनचे हँडलच’
फिर्यादी पक्षाचे वकील मार्क लॅनिअर यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना सांगितले की, “प्रत्येक स्वाइप म्हणजे स्लॉट मशीनचे हँडल ओढण्यासारखेच आहे. पुढे काय दिसेल, हे माहीत नसते, पण तरीही मेंदूला मिळणारे उत्तेजन निश्चित असते.”
व्यसनसदृश वर्तन तयार होते…
मानसशास्त्रज्ञांच्या मते, अशा ‘व्हेरिएबल रिवॉर्ड’ प्रणालीमुळे डोपामिनचे स्राव वाढतात आणि व्यसनसदृश वर्तन तयार होते. फिर्यादीचा दावा आहे की याच प्रक्रियेमुळे KGM ला तीव्र चिंता, शरीराबाबत न्यूनगंड निर्माण होऊन मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले.
मेटा- गुगलमधील अंतर्गत कागदपत्रे काय सांगतात?
या खटल्यात सादर करण्यात आलेली मेटा आणि गुगलची काही अंतर्गत कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. या कागदपत्रांमधून कंपन्यांना किशोरवयीन मुलांवर सोशल मीडियाचा नकारात्मक परिणाम होत असल्याची जाणीव होती, तरीही त्यांनी ‘एंगेजमेंट’ वाढवणाऱ्या फिचर्समध्ये बदल केले नाहीत, असा आरोप कण्यात आला आहे.
तरुण मुलींवर नकारात्मक परिणाम
विशेष म्हणजे, मेटाच्या अंतर्गत संशोधन अहवालांमध्ये इन्स्टाग्रामचा तरुण मुलींमध्ये शरीराबद्दल नकारात्मक परिणाम होत असल्याचा उल्लेख असल्याचे यापूर्वीच अमेरिकन सिनेटमध्ये उघड झाले होते.
कंपन्यांची बाजू काय?
मेटा प्लॅटफॉर्म्स आणि अल्फाबेट (गुगल) या दोन्ही कंपन्यांनी आरोप फेटाळले आहेत. त्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी अनेक सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक घटक जबाबदार असू शकतात; त्यासाठी केवळ सोशल मीडियाला दोष देता येणार नाही. मेटाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, “आम्ही किशोरवयीन वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी नवीन टूल्स, कंट्रोल्स आणि पॅरेंटल फीचर्स आणले आहेत.” यूट्यूबनेही आपल्या ‘डिजिटल वेलबीइंग’ उपक्रमांचा दाखला दिला आहे.
हा खटला का ऐतिहासिक ठरू शकतो?
फिर्यादीच्या बाजूने हा खटला निकालात निघाल्यास, अमेरिकेत प्रलंबित असलेल्या सुमारे १,५०० तत्सम खटल्यांना यामुळे दिशा मिळू शकते. शिवाय, सोशल मीडिया अॅप्सच्या डिझाइनवर कायदेशीर निर्बंध, किशोरवयीन वापरकर्त्यांसाठी स्वतंत्र नियम आणि सरकारकडून कडक नियमन यासाठी हा निकाल मैलाचा दगड ठरू शकतो.
झकरबर्ग- मोसेरीची साक्ष
मार्क झकरबर्ग, अॅडम मोसेरी आणि यूट्यूबचे सीईओ नील मोहन यांच्या अपेक्षित साक्षीमुळे या खटल्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मार्चपर्यंत चालण्याची शक्यता असलेला हा खटला डिजिटल युगात मुलांचे संरक्षण ही नेमके कुणाची जबाबदारी आहे, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आहे.
