Param Indigenous Robot Dog: राष्ट्रीय AI परिषदेत गलगोटियासने चिनी कंपनीचे श्रेय लाटल्याच्या वादाने सर्वांचेचचे लक्ष वेधून घेतले. पण त्याच वेळी रोबोटिक्सच्या क्षेत्रात एका भारतीय स्टार्टअपने याच क्षेत्रात घेतलेली भरारी मात्र दुर्लक्षित राहिली. चार पायांवर चालणारा, जिने चढणारा, अडथळे पार करून पुढे जाणारा आणि स्वयंचलित नेव्हिगेशन असणारा अस्सल भारतीय ‘PARAM’ नावाचा रोबोडॉग गलगोटियासच्या वादामुळे मागे पडला. खरे तर हा रोबोडॉग हे भारतीय कंपनीचे खूप मोठे यश होते.

PARAM कोण आहे?

बंगळुरूस्थित General Autonomy या स्टार्टअपने विकसित केलेला PARAM हा केवळ आयात केलेल्या प्लॅटफॉर्मवर चालणारा रोबोट नाही. तर त्याची रचना, यांत्रिक बांधणी, कंट्रोल सिस्टीम, सेन्सर फ्यूजन आणि AI-आधारित नेव्हिगेशन स्टॅक ही सर्व यंत्रणा भारतात विकसित करण्यात आली आहे. याउलट, जागतिक स्तरावर उपलब्ध असलेले Unitree Roboticsचे काही क्वाड्रुापेड रोबोट हे रेडीमेड प्लॅटफॉर्म म्हणून अधिक विकले जातात. रोबोटिक्समध्ये ‘खरेदी केलेला प्लॅटफॉर्म’ आणि ‘स्वतः विकसित केलेला प्लॅटफॉर्म’ यात जमीन- अस्मानाचा फरक असतो. PARAM हा यातील दुसऱ्या वर्गात म्हणजेच स्वतः विकसित केलेला सखोल अभियांत्रिकीवर आधारित निर्मिती असलेला रोबोट आहे.

PARAM का महत्त्वाचा?

भारत सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण- तंत्रज्ञान, स्वयंचलित यंत्रणा आणि ‘आत्मनिर्भर’ तंत्रज्ञानावर भर देत आहे. पण खऱ्या अर्थाने रोबोटिक्समध्ये क्षमता विकसित करण्यासाठी तीन मूलभूत घटक आवश्यक असतात:

PARAM Robot Dog
PARAM रोबोट डॉग
  • यांत्रिक व अ‍ॅक्च्युएशन डिझाइन
  • कंट्रोल सिस्टीम अभियांत्रिकी
  • सेन्सर-आधारित AI पद्धतीचे सुयोग्य एकत्रिकरण

चार पायांवर चालणारे रोबोट हे सर्वात क्लिष्ट यंत्रांपैकी एक मानले जातात. तोल सांभाळणे, रिअल-टाइम फीडबॅक, विविध प्रकारच्या उंच- सखल भूप्रदेशांवर चालणे आदींसाठी उच्च दर्जाचे सॉफ्टवेअर आणि हॉर्डवेअर यात समन्वय आवश्यक असतो.

PARAM ची क्षमता

  • जिने चढणे
  • अडथळे ओळखून टाळणे
  • स्वयंचलित नेव्हिगेशन
  • विविध उंच- सखल पृष्ठभागांवर तोस सांभाळणे
  • औद्योगिक तपासणी व देखरेखीमध्ये वापर
  • या वैशिष्ट्यांमुळेच परम हा केवळ प्रदर्शनीय उपकरण न राहता धोरणात्मक प्लॅटफॉर्म ठरतो.
PARAM Robot Dog
PARAM रोबोट डॉग

गलगोटियास वाद

राष्ट्रीय AI परिषदेदरम्यान गलगोटियास विद्यापीठाच्या स्टॉलवर प्रदर्शित केलेला रोबोडॉग सोशल मीडियावर चर्चेत आला. काही तज्ज्ञांनी जागतिक स्तरावर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मॉडेलशी त्याचे साधर्म्य दाखवले. त्यानंतर स्वदेशी नवकल्पनेच्या गलगोटियासने सांगितलेल्या मुद्द्यांवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. हा वाद वेगाने पसरला. मीम्स, टीका आणि सार्वजनिक चर्चांमध्ये तो केंद्रस्थानी राहिला. परंतु, या गोंधळात, खऱ्या अर्थाने संशोधनावर आधारित भारतीय स्टार्टअपने विकसित केलेला PARAM मात्र दुर्लक्षित राहिला.

भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या तीन प्रकारे रोबोट्सचा वापर केला जातो.

  • १) शिक्षणासाठी आयात केलेले प्लॅटफॉर्म
  • २) परदेशी हार्डवेअरवर आधारित सिस्टीम इंटिग्रेशन असणारे
  • ३) पूर्णपणे स्वदेशी डिझाइन व इथेच विकसित करण्यात आलेले

या तिन्ही गोष्टींचा वापर वैध आहे. पण त्याविषयी माहिती देताना वा सादर करताना ती स्पष्ट आणि अचूक असणे आवश्यक आहे.

PARAM हा यातील तिसऱ्या प्रकारचा रोबोट आहे. म्हणजेच त्यासाठीची संशोधन आणि विकास प्रक्रिया भारतातच पार पडली आहे, त्यामुळे तो वैशिष्ट्यपूर्ण आणि देशाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर आहे.

  • या रोबोटशी संबंधित बौद्धिक संपदा हक्क भारतीय कंपनीकडे आहेत
  • हा निर्यातक्षम असा रोबोट आहे
  • संरक्षण क्षेत्रात याचा चांगला वापर केला जाऊ शकतो
  • भारतीय कंपनीनेच विकसित केलेला असल्याने यासाठी इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहावे लागणार नाही

PARAM ची कथा का महत्त्वाची?

  • जागतिक स्तरावर Boston Dynamics सारख्या कंपन्यांनी आपली ओळख ‘गिमिक्स’वर नाही तर प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंगवर निर्माण केली आहे.
  • भारतामध्येही गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि संशोधक यांना अशाच सखोल तांत्रिक यशोगाथांची गरज आहे.
  • PARAM ही केवळ रोबोटची कथा नाही; ती भारतीय हार्डवेअर स्टार्टअप्स परिपक्व होत असल्याची खूण आहे.
  • योग्य पद्धतीने प्रोत्साहन मिळाले, तर अशा प्लॅटफॉर्मचा वापर इतर क्षेत्रांमध्येही होऊ शकतो- उदाहरणार्थ:
  • सीमेवरील टेहळणी
  • आपत्ती व्यवस्थापन
  • औद्योगिक तपासणी
  • स्मार्ट सिटीमधील गस्त
  • संरक्षण सहाय्यक प्रणाली

भारताच्या AI स्वप्नांसाठी…

जागतिक AI शक्ती होण्याचे भारताचे स्वप्न आहे. पण विश्वासार्हता ही केवळ घोषणांनी येत नाही; ती उच्च तंत्रज्ञानाच्या सिद्धतेने येते.

PARAM सारख्या प्रकल्पांनी हे दाखवून दिले आहे की:

  • भारतीय अभियंते क्लिष्ट रोबोटिक्स प्रणाली विकसित करू शकतात.
  • कंट्रोल सिस्टीम आणि AI एकत्रिकरणात स्थानिक कौशल्य वाढत आहे.
  • स्टार्टअप्स केवळ सॉफ्टवेअरपुरते मर्यादित नाहीत.

गलगोटियासचा हा वाद भारतीय संस्था, विद्यापीठे आणि कंपन्यांसाठी धडाच ठरावा. काही महत्त्वाच्या बाबी कंपन्यांनी लक्षात ठेवायला हव्यात.

  • केवळ स्वतःहून विकसित केलेल्या गोष्टींबाबतच दावा करा
  • तुम्ही विकसित केलेली यंत्रणा पाहून तज्ज्ञांना ठरवू देत, तुम्ही दावा करण्याच्या फंदात पडू नका
  • कारण रोबोटिक्समध्ये दोनच गोष्टी असतात. तुम्ही यशस्वी होता किंवा मग अपयशी ठरता.

तुमचा रोबो खऱ्या अर्थाने व्यवस्थित उभा राहातो किंवा पडतो. तुमचा रोबो व्यवस्थित उभा राहून त्याने नियोजित काम व्यवस्थित आणि वेळेत करण्यातच तुमचे यश सामावलेले असते.

PARAM जगासमोर उभा राहिला, त्याने त्याचे लक्ष्य साध्य अर्थात सिद्ध केले.

PARAM ची कथा ही भारताची AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उज्ज्वल भविष्याची शक्यता पुरेशी स्पष्ट करणारी आहे. आता भविष्यात अशाच अनेक यशोगाथांची भारताला गरज आहे, तर आपण पाहिलेले AI मधील प्रगतीचे स्वप्न प्रत्यक्षात येईल.