आपल्याला नोकरीच्या मुलाखतीसाठी एक प्रश्न नेहमी विचारला जातो – “तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यायला सांगितली, तर स्वतःबद्दल काय सांगाल? मला आठवतंय, मलासुद्धा जेव्हा ‘लोकसत्ता’मध्ये लागण्यापूर्वी माझ्या वरिष्ठांकडून हा प्रश्न येणार याची खात्री होती. त्यापूर्वी या प्रश्नाच्या उत्तराचा विचारसुद्धा मी करून ठेवला होता. मात्र, नंतर त्या उत्तरावर विचार केला तेव्हा मला समजलं की मी जितक्या वेळा माझ्याबद्दल सांगायचं प्रयत्न केला तितक्या वेळा मी माझा संबंध कोणाशी तरी जोडून सांगत होते. मी उत्तराची सुरुवात याप्रमाणे केली होती – ‘माझं नाव पृथा राजिवडेकर, मी अमुक ठिकाणी राहते, माझी मातृभाषा मराठी आहे आणि त्याचबरोबर मला इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलता येते, आई-वडील आणि बहीण/भाऊ हे माझं कुटुंब आहे, अमुक माझी शाळा, तमुक माझं कॉलेज, अमुक गोष्टींमध्ये माझं सामर्थ्य आहे, तर तमुक गोष्टी माझ्यातल्या कमतरता/उणिवा आहेत.

आपलं अस्तित्व एका वर्तुळाप्रमाणे आहे. त्यामुळे आपण जेव्हा आपली ओळख करून देत असतो तेव्हा आपण मुख्यत्वे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक, अशा तीन स्तरांचं प्रतिनिधित्त्व करत असतो. आपण जितके त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूच्या जवळ जातो, तितके आपले इतरत्र गोष्टींशी असलेले संबंध उलगडतात. त्याचबरोबर इतरत्र गोष्टींपासून आपण कसे वेगळे आहोत हेही या वर्तुळातून उलगडतं. हे कसं घडतं ते आपण थोडक्यात समजून घेऊया…

अस्तित्त्वाचं वर्तुळ

आपल्या अस्तित्वाचे सगळ्यात ठळक लक्षण कोणते? – सजीव
पण जर आपण स्वतःला सजीव म्हटलं तर – पक्षी, प्राणी, कीटक, जलप्राणी आणि माणूस हे एकाच गटातले आहेत, असं आपण म्हणू शकतो का? – हे शक्य नाही. मग समजा आपण असं म्हटलं की, आपण प्राणी आहोत. तर प्राणी आणि माणूस यांच्यात तंतोतंत साम्य आहे का? प्राण्यांमध्ये माणसाप्रमाणे भाषिक उत्क्रांती झाली आहे का? – नाही. त्यामुळे आता प्राण्यांच्या गटापासून स्वतःला वेगळे काढून, आपलं अस्तित्व नक्की काय आहे, हे आपल्याला शोधायचं आहे. त्यामुळे प्राणी या गटापासून उत्क्रांती होऊन वेगळा तयार झालेला गट म्हणजे – मानवी प्राणी/मनुष्य. मग त्या बाहेरच्या वर्तुळातून आपण अधिक खोल खोल जातो जिथे आपले नातेसंबंध, सामाजिक ओळख, आर्थिक स्तर व सांस्कृतिक गटाचा परिचय होतो. त्यामुळे आपलं अस्तित्व हे इतरत्र गोष्टींशी प्रस्थापित संबंधांच्या बळावर तयार होतं.

समाज म्हणजे काय?

विशिष्ट हितसंबंध बाळगून एकत्र आलेल्या व्यक्तींचा समूह म्हणजे ‘समाज’. समाज म्हणजे लोकांचा असा समूह की, ज्यांची समान संस्कृती आहे, जे एखाद्या विशिष्ट भूभागावर राहतात, ज्यांच्यामध्ये ऐक्यभाव आहे, ज्यांच्यात पारस्परिक संबंधांची एक ठरावीक व्यवस्था आहे, ज्यांचे वर्तन त्या त्या समूहाच्या सामाजिक नियमांना आणि मूल्यांना अनुसरून होते; अशा समूहांना ‘समाज’ म्हणतात.

समाजाची उत्पत्ती

आपल्या पूर्वजांची कल्पना करा. एक घनदाट जंगल, चहुबाजूंना गडद काळोखी रात्र पसरली आहे. शिकारीला निघालेल्या आपल्या पूर्वजांना या अंधारात वस्तीच्या दिशेनं परतता येत नाही आहे. म्हणून जंगलाच्या मधोमध शेकोटी पेटवून त्यांनी आडोसा घेतला आहे. पण, सगळे जण शेकोटीभोवती कोंडाळं करून बसले आहेत. काही जण झोपले आहेत; तर काही जण मशाल पेटवून आजूबाजूला लक्ष ठेवून आहेत. कोणालाही जंगली प्राण्यांची भीती नाही; पण असं का? त्यांच्याकडे धारदार सुळे आहेत म्हणून? – नाही! हा निश्चिंतपणा विश्वासातून आला आहे. ते एकमेकांमध्ये विभागले गेले नव्हते. जर कोणाला इजा झाली, तर १० हात पुढे मदतीला यायचे. पाठीमागून वार होत असेल, तर ते समोरच्याला सावध करायचे; तिथे कोणी आपल्या पराभवाचा व्हिडीओ काढत बसत नव्हते.

मानव हा सामाजिक प्राणी आहे. तो अलिप्तपणे, एकाकी जीवन जगू शकत नाही. त्यामुळे सामाजिकता (sociality) हा उपजत मानवी गुण आहे आणि समाजाची उत्पत्ती ही उत्क्रांतीच्या प्रक्रियेतूनच झाली आहे. विकासवादी विचारवंतांच्या मते अगदी प्रारंभी कुटुंब आणि नीतिसंस्था ही मानवाला परस्परांशी जोडणारा पहिला समाज होता. त्यानंतर खेड्यांचा, जमातींचा विकास झाला. अशा प्रकारे साध्या अवस्थेपासून समाजाची उत्क्रांती होत होत आजच्या गुंतागुंतीच्या समाजरचनेपर्यंत समाजाचा विकास झाला. मात्र, या विकासाच्या प्रवासात काही त्रुटी उरल्या नाहीत, असं ठामपणे सांगता येणार नाही. आजही अतिमागास समाज आणि अतिप्रगत समाज यामध्ये मोठी दरी आहेच.

माणसांना जोडणारी नाळ – संस्कृती

एखाद्या विशिष्ट मानवी समाजाची पिढ्यान् पिढ्या चालत आलेली जीवनपद्धती, विचारसरणी, मूल्ये, श्रद्धा, चालीरीती, भाषा, कला आणि आचार-विचार यांच्या समग्र संकलनाला ‘संस्कृती’ म्हणतात. संस्कृती हा शब्द संस्कार, व्यवस्थापन, विशिष्ट जीवनशैली यांच्याशी साधर्म्य साधणारा आहे. ‘प्रकृती’ म्हणजे निसर्ग. नैसर्गिकरीत्या जगणे आणि सांस्कृतिक जीवन जगणे यात अंतर असते. निसर्गावर आवश्यक संस्कार करून, व्यवस्थापन करून मानवाने घडवलेली जीवनशैली म्हणजे संस्कृती, असे म्हणता येईल. मानववंशशास्त्रकार डॉ. इरावती कर्वे यांनी संस्कृतीची व्याख्या करताना म्हटले आहे, “मनुष्य समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी, पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती.”

पण मग आज ही नाळ कुठे तुटतेय?

इरावती कर्वे यांनी ज्या ‘मनोमय सृष्टी’चा उल्लेख केला आहे, ती सृष्टी प्रत्यक्षात टिकून राहण्यासाठी माणसांनी एकमेकांना प्रत्यक्ष भेटणं, एकमेकांच्या डोळ्यांत पाहणं आणि एकत्र राहणं गरजेचं आहे. मात्र, गेल्या तीन दशकांत मानवी इतिहासात एक अभूतपूर्व बदल घडून आला. आपण प्रत्यक्ष समोरासमोर (Face-to-face) संवाद साधण्याऐवजी थेट स्क्रीनसमोर (Screen-to-screen) आभासी जगात स्थलांतरित झालो.

एपिडेमिओलॉजिस्ट व अर्थतज्ज्ञ रामानन लक्ष्मीनारायण यांनी त्यांच्या ‘Bacteria to Buddha: How Cooperation Shaped Consciousness’ या पुस्तकात एक अतिशय भेदक निरीक्षण नोंदवले आहे. ते म्हणतात, “आज आपण दिवसभरात एकाही माणसाला प्रत्यक्ष न भेटता, जगभरात कोणाशीही एका ‘क्लिक’मुळे जोडू शकतो. आपण अवतीभवती हजारो सेवांनी (services) वेढलेले राहून जगू शकतो आणि मरूही शकतो; पण समूहाच्या (community) खऱ्याखुऱ्या स्पर्शापासून पूर्णपणे वंचित राहतो.”
ज्या तंत्रज्ञानाने आपल्याला जगाशी जोडण्याचं आश्वासन दिलं होतं, त्याच तंत्रज्ञानानं नकळत आपलं ‘सामाजिक अस्तित्व’ संकुचित केलं. आपण अशा पिढ्यांमध्ये रूपांतरित झालो आहोत, ज्यांना एकेकाळी अशक्य असणाऱ्या बहुतांश गोष्टी उपलब्ध आहेत; पण मनात कमालीची असुरक्षितता आणि अस्वस्थता (anxiety) आहे.

मेंदूचे जैविक गणित : अलिप्ततेचा आघात

आपल्याला वाटतं की, आजकाल वाढलेला एकटेपणा हा निव्वळ एक मानसिक किंवा भावनिक मूड आहे; पण ही भावना इतकी सरळ नसून, तिचा परिणाम म्हणजे आपल्या संपूर्ण जैविक रचनेवर झालेला आघात आहे.
इतिहासकार रुटगर ब्रेगमन यांच्या ‘Humankind: A Hopeful History’ या पुस्तकानुसार, मानवाची खरी उत्क्रांती ही ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या तत्त्वावर झालीच नाही; ती ‘सहानुभूती आणि सामूहिक सहकार्य’ यावर झाली. आपला मेंदू समूहात जगण्यासाठी ‘डिझाइन’ केलेला आहे. जेव्हा आपण प्रत्यक्ष माणसांमध्ये वावरतो, तेव्हा आपल्या मेंदूत ‘ऑक्सिटोसिन’ (Oxytocin) नावाचे संप्रेरक पाझरतं, जे सुरक्षिततेची भावना निर्माण करतं आणि ताण वाढवणारं ‘कॉर्टिसोल’ (Cortisol) कमी करतं.

मात्र, जेव्हा संपर्क केवळ काचेच्या स्क्रीनपुरता उरतो, तेव्हा या मेंदूची हालचाल मंदावते. मेंदूला वाटतं की, आपण समूहापासून तुटलो आहोत, म्हणजेच आपण धोक्यात आहोत. त्यातूनच सातत्यपूर्ण ताण, भीती आणि संशय जन्माला येतो. ‘नॅशनल मेंटल हेल्थ सर्व्हे’च्या आकडेवारीनुसार, भारतातील सुमारे ५% लोक (सुमारे ७.५ कोटी) डिप्रेशन आणि चिंतेचा सामना करीत आहेत. विशेषतः शहरांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे,. कारण- तिथेच माणसांचे पारंपरिक सामाजिक ताणेबाणे सर्वाधिक विस्कळीत झाले आहेत.

‘मानसिक आजार’ आणि ‘मानसिक स्वास्थ्य’ यातली सीमारेषा

इथे ‘मानसिक आजार’ (Mental Illness) आणि ‘मानसिक स्वास्थ्य’ (Mental Wellness) यामधला फरक समजून घेणं गरजेचं आहे. मानसिक आजार हा शारीरिक आजाराप्रमाणेच खरा असतो आणि त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची किंवा वैद्यकीय मदतीची गरज असते. पण ‘मानसिक स्वास्थ्य’ ही प्रत्येकाची गरज आहे. जसं शरीराला अन्नाची आणि व्यायामाची गरज असते, तसेच मनाला माणसांच्या सहवासाची आणि विश्वासाची गरज असते. आज शहरांमधील कोट्यवधी लोकांना जाणवणारा ताण किंवा एकटेपणा, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दोष नाही; तर ती एका अस्वाभाविक जीवनपद्धतीला त्यांच्या मेंदूनं दिलेली नैसर्गिक प्रतिक्रिया आहे.

‘मी’कडून ‘आम्ही’कडे: आजच्या काळाची गरज

जागतिक मानसिक आरोग्य दिनाची यंदाची संकल्पना आहे – ‘Lived experiences heard: Real voices, real change’ (अनुभवातून आलेले आवाज ऐकणे). मानसिक अस्वास्थ्याचा सामना करणाऱ्या व्यक्तींचे अनुभव केवळ सहानुभूतीने ऐकणे पुरेसे नाही, तर त्यांनी भोगलेल्या या एकाकीपणाची मुळं आपल्या समाजरचनेत कुठे आहेत, हे शोधणं गरजेचं आहे. बेंगळुरूच्या ‘मनोत्सवा’ परिषदेत प्रख्यात मानसशास्त्रज्ञ रिची डेव्हिडसन यांनी मांडलेल्या संशोधनानुसार, जसं व्यायामामुळे शरीर सुदृढ करता येतं, तसंच ‘करुणा’ (Compassion) व ‘सजगता’ (Mindfulness) यांचा नियमित सराव केल्यानं आपला मेंदू नव्यानं घडू शकतो. स्वामी सच्चिदानंद यांनी एका वाक्यात स्पष्ट केले होते या समस्येचं मूळ आणि उपाय… :

“ ‘I’ (मी)च्या जागी ‘We’ (आम्ही) आणा, मग ‘Illness’ (आजारपण) आपोआप ‘Wellness’ (स्वास्थ्य) मध्ये बदलेल.”

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मानवी संपत्ती कोणती?

आज आपण अशा उंबरठ्यावर उभे आहोत जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आपल्या आयुष्यातील विश्लेषण, निर्णय आणि व्यवहार हाताळू लागली आहे. अशा वेळी, ‘माणूस म्हणून आपल्याकडे असं काय उरलं आहे, जे यंत्र कधीच करू शकणार नाही?’ हा प्रश्न केवळ तांत्रिक उरत नाही, तो अस्तित्वाचा प्रश्न बनतो. त्याचं उत्तर आपल्या त्याच आदिम शेकोटीत दडलेलं आहे. यंत्र हिशोब करू शकतं; पण एखाद्याच्या दुःखात पाठीवर हात ठेवून ‘मी आहे तुझ्यासोबत’ हा विश्वास देऊ शकत नाही. आपल्या अस्तित्वाची खरी व्याख्या ‘मी’ या बंदिस्त वर्तुळात कधीच नव्हती; ती ‘आम्ही’ या पसरलेल्या पटात होती. जोपर्यंत आपण स्क्रीनच्या पलीकडे जाऊन पुन्हा माणसांचे चेहरे वाचायला, त्यांच्याशी जोडले जायला शिकत नाही, तोपर्यंत एकाकीपणाचा हा अंधार हटणार नाही.