Teenage sexual attraction and breast curiosity in puberty: मुलांचे वय १३- १४ वर्षे झाले की त्यांच्या शरीरात आणि मनात अनेक नैसर्गिक बदल घडून येतात, ज्याला आपण पौगंडावस्था म्हणतो. या अवस्थेत मुलांच्या मनात लैंगिक आकर्षण निर्माण होते. अनेकदा हे आकर्षण आजूबाजूला असणाऱ्या नातेवाईकांच्या बाबतीत असतं. त्याचवेळेस मुलांना नैतिक प्रश्नही पडतात आणि अनेकदा ते निराशेच्या दिशेने जातात किंवा मग विकृतीच्या दिशेने. म्हणूनच हे प्रश्न संवेदनशीलतेने हाताळायला हवेत.
गैरसमजामुळे दुष्प्रवृत्ती वाढते
खरं तर आपल्याकडे प्राचीन काळी लैंगिकतेबद्दल आणि प्रत्यक्षात लैंगिक संबंधांबद्दलही चांगला अभ्यास झाला आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात या गोष्टी निषिद्ध मानण्याची परंपरा सुरू झाली. समाजाच्या दृष्टिने ती अतिशय घातक आहे. कारण त्यामुळे लैंगिकतेबद्दल मोकळी चर्चाच होत नाही आणि मग गैरसमज वाढीस तर लागतातच पण पलीकडच्या बाजूस गैरसमजामुळेच समाजातील लैंगिक दुष्प्रवृत्तीही वाढीस लागतात. त्यामुळे या गोष्टी वेळीच संवेदनशीलतेने हाताळायला हव्यात.
शास्त्रीय चर्चा व्हायला हवी
लैंगिक समस्या आणि प्रश्नांबद्दल खुलेपणाने चर्चा व्हायलाच हवी. अनेकदा असे होते की, पलीकडच्या बाजूसही अनेकांना तुमच्याच सारख्या समस्या भेडसावत असतात. परंतु, त्या व्यक्तीकडे बोलण्याचे धाडस नसते. तुम्ही ते धाडस करता आणि सेक्सॉलॉजिस्टनी दिलेल्या शास्त्रीय उत्तरानंतर तुमच्या आणि त्यांच्या मनातील भीती दूर जाते आणि त्यांना मार्ग सापडतो. म्हणूनच मी माझ्याकडे समस्या घेऊन आलेल्या व्यक्तींची नावे टाळून त्यांच्या समस्या आणि त्यावर उपाय किंवा त्यातील मुद्द्यांवर शास्त्रीय पद्धतीने चर्चा करतो.

मुलाला स्तनांचे आकर्षण
काही वर्षांपूर्वी अशाच एक ३८ वर्षांच्या विधवा बाई माझ्याकडे समस्या घेऊन आल्या. त्यांनी त्यांच्या १४ वर्षांच्या मुलाबद्दलची एक गोष्ट मला सांगितली. त्याला मुलींच्या किंवा स्त्रीच्या स्तनांबद्दल खूप आकर्षण वाटतं होतं व महिलां स्तनांचेच विचार सतत त्याच्या मनात येत आणि या गोष्टीमुळे तो खूपच एकलकोंडा व उदास झाला होता. त्याच्या या गोष्टीचा अभ्यासावरही परिणाम होऊ लागला होता आणि त्याला यातून कसे बाहेर काढावे, ही समस्या त्या बाईंसमोर आ वासून उभी होती. या विचाराने त्यांचीही झोप उडाली होती.
पौंगडावस्थेत हे साहजिकच
त्यावर मी त्यांनी सांगितलं की, मुलं वयाच्या १३-१४ व्या वर्षी पौगंडावस्थेत येताच त्यांचं विशेष लक्ष स्त्रीच्या स्तनांकडे जाऊ लागतं. स्तन जितके उन्नत (voluptuous ), सुडौल (shapely) तितकं त्यांना त्यांच्याबद्दल वाटणारं लैंगिक आकर्षण अधिक वाटू लागतं. स्त्रीचे अनावृत स्तन पाहावे, त्यांना स्पर्श करावा अशी प्रबळ इच्छा- वासना त्यांच्या मनात येऊ लागते आणि हे सारे नैसर्गिक आहे
शरीराबाबतच्या जाणिवा तीव्र होतात
सुंदर स्त्रियांची चित्रं, ज्यामध्ये त्यांच्या स्तनांना पूर्णपणे किंवा अर्धवट उघड्या अवस्थेत दाखवलेलं असतं, अशी चित्रं पाहावीशी वाटतात. ती पाहून निर्माण होणाऱ्या लैंगिक उत्तेजनेचा आनंद घेणं, अशा चित्रांना समोर ठेवून किंवा त्यांची कल्पना करून हस्तमैथुन करणं; हा प्रकार मुलांमध्ये घडू लागतो. अनेकदा मुलांना स्वतःलाच याचं आश्चर्य वाटतं की वर्षा-दोन वर्षांपूर्वी ज्याकडे मुद्दाम लक्षही जात नव्हतं, ज्या गोष्टी फारशा ध्यानातही येत नव्हत्या अशा स्त्रीच्या शरीराबाबतच्या त्यांच्या जाणिवा अचानक काही पटींनी तीव्र झाल्या आहेत. त्यांच्या नजरा सतत स्त्रियांच्या अंगप्रत्यांगाकडे जात आहेत.
योग्य वयात माहिती मिळायला हवी
हे बदल मुलांमध्ये अगदी नैसर्गिकरीत्या घडतात. याबद्दलची योग्य माहिती योग्य वयात योग्य प्रकारे मिळालेली असेल तर मग या बदलामधून जात असताना मुलं फारशी उद्विग्न, विचलित (disturbed) होत नाहीत. एकदा का स्वतःत होणारे हे बदल ‘नैसर्गिक’ आहेत हे कळलं की, मग हे स्थित्यंतर जाणीवपूर्वक जगणं अवघड राहत नाही. पण दुर्दैवाने अनेक जणांमध्ये असं घडत नाही.
अशा विचारांनी मुलं विचलित होतात
“आपलं लक्ष सारखं स्त्रियांच्या स्तनांकडे जातंय, स्तनांना अनावृत अवस्थेत पाहायला मिळावं, त्यांना स्पर्श करायला मिळावा या इच्छा सतत आपल्या मनात उचंबळून येत आहेत,” या गोष्टींमुळे अनेक मुलं पौगंडावस्थेतून जाताना फार विचलित होतात. अनेकदा असे विचार जवळच्या नात्यातल्या किंवा रोजच्या संपर्कातल्या स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात येतात. त्यात मावशी, बहिणी, काकू, वहिनी, शिक्षिका, मोलकरीण, शेजारच्या घरांमध्ये राहणाऱ्या स्त्रिया; एवढंच नव्हे तर स्वतःच्या आईबद्दलही असे विचार येऊ शकतात.
नैतिक बांधणीमुळे अवघड जातं
त्यांच्या मनात नैतिक बांधणीमध्ये हा प्रकार बसणं अवघड असतं, साहजिकच त्यांच्या मनात या गोष्टीमुळे तणाव निर्माण होऊ लागतो. असे विचार बोलून दाखवण्याचीसुद्धा भीती व लाज त्यांना वाटत असते. अशा वेळी मनाचा संतप्त कोंडमारा होण्याच्या अनुभवातून अनेक मुलं जातात. त्यांच्या बाबतीत जे घडतंय ते अगदी ‘नैसर्गिक’ आहे व सर्वांच्या बाबतीत घडणार आहे, हे त्यांना सांगणं अशा वेळी अत्यंत गरजेचं असतं. पण याची सोय (facility) व जाणीव (awareness) या दोन्हींबाबत अजूनही समाज कमी पडतो आहे. म्हणूनच लैंगिक शिक्षण ही स्वस्थ समाजाची एक अपरिहार्य अशी गरज आहे.
नॉर्मल आहोत, याची जाणीव महत्त्वाची
त्यांना मला हे पटवून द्यावं लागलं की, तुमच्या मुलाच्या बाबतीत जे घडतंय ती अत्यंत नॉर्मल गोष्ट आहे. त्यात चुकीचं किंवा अघटित असं काहीच नाही. त्याला ‘आपण नॉर्मल आहोत’ याची जाणीव करून देणं, हे या अवस्थेत महत्त्वाचं आहे. तुम्ही या गोष्टींमुळे विचलित होऊ नका. त्याला या अवस्थेतून जाऊ द्या. आपल्या मनात जे घडतंय ते नॉर्मल आहे; हे कळताच हळूहळू तो त्यामुळे उदास, उद्विग्न होणार नाही व मग अभ्यासाकडेही त्याचं लक्ष लागू शकेल. मला वाटतं की, आई म्हणून त्यांच्यासाठीही मुलाला समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं होतं. आणि त्या योग्य वेळी माझ्याकडे आल्या होत्या. आई- वडिलांनाही खास करून मुलं पौगंडावस्थेत असताना या बाबी जबाबदारीने आणि शास्त्रीय पद्धतीने हाताळायला हव्यात.
(२६ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध झालेला लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.)
