Bruxism Symptoms and Prevention : सकाळी उठल्यावर अचानक जबडा दुखतोय? दातांमध्ये संवेदनशीलता जाणवतेय आणि डोकंही जड होतंय? दिवसभराचा ताण, झोपण्याची चुकीची पद्धत किंवा थकवा याला कारणीभूत असल्याचं वाटून अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, झोपेत नकळत दात चावण्याच्या सवयीमळे जबड्याला आणि दातांना असा त्रास होतो.
चाळीसपेक्षा अधिक वय असलेल्या लिसा शाह यांच्यासोबतही असंच घडलं. त्यांना सकाळच्या वेळेत वारंवार डोकेदुखी होत होती आणि दातांची संवेदनशीलताही वाढत होती. मात्र, झोपेत आपण दात चावतोय, याची त्यांना कल्पनाच नव्हती. दातांच्या तपासणीदरम्यान समजले की, त्यांच्या दातांची झीज झाली होती आणि त्याची त्यांना काहीच कल्पना नव्हती, असे जर्मनीस्थित दंतवैद्य आणि प्रतिबंधात्मक मौखिक आरोग्याचे अभ्यासक डॉ. बिभाकर रंजन यांनी सांगितले.
डॉ. रंजन पुढे म्हणाले, दातांच्या समस्येचे निदान होताच लिसा यांनी कस्टम-मेड नाईट गार्ड वापरण्यास सुरुवात केली आणि पुढील उपचार सुरू केले. त्यामुळे दातांची झीज थांबवता आली आणि परिणामी त्यांच्या जबड्यातील वेदनाही कमी झाल्या. झोपेत नकळत दात चावण्याच्या सवयीला ‘ब्रुक्सिझम’, असे म्हटले जाते. ही समस्या वेळीच न ओळखल्यास दातांची मोठ्या प्रमाणात झीज होऊ शकते आणि जबड्याच्या इतर समस्याही निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे रुग्णांसोबतच दंतवैद्य आणि डॉक्टरांनीही त्याबाबतची लक्षणे वेळीच ओळखून, त्यावर उपचार सुरू केले पाहिजेत आणि ’ब्रुक्सिझम’बाबत जागरूकता निर्माण केली पाहिजे. इंडियन डेंटल असोसिएशनशी (IDA) संबंधित तज्ज्ञांच्या मते, विविध वयोगटांमध्ये ’ब्रुक्सिझम’चे प्रमाण वाढत असल्याचे अनेक अभ्यासांमधून दिसून येते.
आतापर्यंतच्या अनेक अभ्यासांत आढळून आले की, भारतातील सुमारे १० ते ३० लोकांमध्ये दात चावण्याची समस्या आढळते. काही जण अधूनमधून दात चावत असतात; तर काहींच्या बाबतीत हे वारंवार घडत असतं. इंडियन डेंटल असोसिएशनचे (IDA) माजी अध्यक्ष व सल्लागार ऑर्थोडॉन्टिस्ट डॉ. जयेश राहळकर सांगतात की, चिंता, अधिकचा अभ्यास किंवा नोकरीचा ताण आणि बदलती जीवनशैली यांचा ब्रुक्सिझमशी संबंध असल्याचे दिसून आले आहे.
एखाद्या व्यक्तीला अतिरिक्त ताण असेल, तर त्यांना ब्रुक्सिझमची समस्या जाणवू शकते. उदाहरणार्थ- भारतातील काही अभ्यासांमध्ये व्यावसायिक वेटलिफ्टर्समध्ये जागेपणी दात चावण्याचे प्रमाण तब्बल ६८ टक्क्यांपर्यंत असल्याचे आढळले. तसेच वैद्यकीय प्रशिक्षणाचा ताण असलेल्या दंतवैद्यकीय विद्यार्थ्यांमध्येही ब्रुक्सिझमचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे डॉ. राहळकर सांगतात.
‘ब्रुक्सिझम’ म्हणजे काय?
आपल्या नकळत दात एकमेकांवर घासले जातात आणि त्यामुळे जबड्यात तीव्र वेदना होतात, या समस्येला वैद्यकीय भाषेत ‘ब्रुक्सिझम’ (Bruxism), असे म्हटले जाते. डॉ. राहळकर यांच्या मते, ही एक अशी स्थिती आहे, जी व्यक्ती जागी असताना किंवा झोपेत असताना अशा दोन्ही वेळी घडू शकते.
ब्रुक्सिझमची लक्षणे :
सकाळी उठल्यावर डोकेदुखी: सकाळी उठल्या उठल्या डोके दुखणे किंवा कपाळाच्या दोन्ही बाजूंना (Temples) सौम्य वेदना होणे.
जबड्याचे स्नायू दुखणे: सकाळी उठल्यावर जबड्याचे स्नायू कडक होतात आणि त्यामुळे काही वेळ वेदना होतात किंवा तोंड उघडतानाही त्रास होऊ शकतो.
दातांची संवेदनशीलता (Sensitvity): दात आंबणे किंवा अचानक थंड-गरम खाताना दातांमध्ये सेन्सिटिव्हिटी जाणवू शकते.
दातांची झीज: दातांवरील संरक्षक थर (Enamel) घासून निघणे आणि दात बारीक होणे.
डॉ. जयेश राहळकर यांनी स्पष्ट केले की, मानसिक ताणतणाव, चिंता, झोपेच्या समस्या आणि मद्यपान, तंबाखूचे सेवन किंवा कॅफिनचे (चहा-कॉफी) अतिप्रमाण यांसारख्या जीवनशैलीतील सवयींमुळे ब्रुक्सिझमची समस्या निर्माण होते. सतत दात चावल्यामुळे कालांतराने दातांना थंड आणि गरम खाताना तीव्र वेदना जाणवू शकतात. तसेच दातांना भेगा पडणे, दात तुटणे अशा त्रासदायक समस्यांना सामोरे जावे लागण्याचीही शक्यता असते, असे दंतवैद्यक नमूद करतात.
डॉ. रंजन यांच्या मते, अनेकदा लोकांना ते झोपेत दात चावतात हे माहीतच नसते. “जेव्हा जबड्यात तीव्र वेदना सुरू होतात, सकाळी उठल्यावर डोकं दुखू लागते किंवा दातांची झीज दिसून येते, तेव्हाच ते तपासणी करतात,” असे डॉ. रंजन स्पष्ट करतात.
धावपळीच्या जीवनशैलीत वाढता मानसिक ताण आणि झोपेच्या अयोग्य सवयींमुळे ‘ब्रुक्सिझम’चे प्रमाण वेगाने वाढत आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सल्लागार व एम. ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. मोहित खेऊर यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. “सध्या देशातील तब्बल २० टक्के लोकसंख्येमध्ये ही समस्या दिसून येते,” अशी माहिती डॉ. खेऊर यांनी दिली.
ब्रुक्सिझमचे दोन प्रकार
ब्रुक्सिझम मुख्यतः दोन प्रकारचा असतो, झोपेत होणारा आणि जागेपणी होणारा. स्लीप ब्रुक्सिझम असलेल्या व्यक्तीमध्ये दात चावण्याची समस्या आढळते. हे काही वेळा ठरावीक लयीत वारंवार घडत असते, तर काही वेळा बराच वेळ दात घट्ट दाबून ठेवले जातात.
अवेक ब्रुक्सिझममध्ये (जागेपणी होणारा) व्यक्ती शुद्धीत असते; मात्र ती नकळत दात घट्ट आवळून ठेवते किंवा वरचे-खालचे दात एकमेकांवर घासते. ताण, चिंता किंवा एखाद्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करताना ही सवय वाढू शकते. झोपेत होणारा ब्रुक्सिझम झोपेशी संबंधित इतर समस्यांसोबतही दिसू शकतो. याची अनेकांना कल्पनाच नसते.
नाईट गार्ड फायदेशीर आहे की नाही?
वाढत्या जनजागृतीमुळे सध्या अनेक जण दातांच्या सुरक्षेसाठी ‘नाईट गार्डस्’चा (Night Guards) वापर करतात. या गार्डसमुळे वरचे आणि खालचे दात एकमेकांवर घासले जात नाहीत. मग त्यामुळे दातांची झीज बऱ्याच अंशी कमी होऊ शकते. डॉ. रंजन यांच्या मते, ज्या रुग्णांमध्ये झीज होण्याची चिन्हे दिसू लागतात, त्यांच्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने बनवलेले ‘कस्टम-मेड नाईट गार्डस्’ अत्यंत उपयुक्त ठरतात. हे नाईट गार्डस् दातांवर एक संरक्षक थर तयार करतात; ज्यामुळे दातांचे एकमेकांवर घासले जाणे, दात तुटणे किंवा आधी केलेल्या दातांच्या उपचारांचे नुकसान होणे टळू शकते.
मात्र, हा नाईट गार्ड केवळ दातांचे रक्षण करतो, तो ब्रुक्सिझमची समस्या मुळापासून नष्ट करत नाही, असे डॉ. रंजन स्पष्ट करतात. त्यांनी पुढे नमूद केले, “नाईट गार्ड घातल्याने दात चावण्याच्या मूळ कारणावर इलाज होत नाही.” त्यामुळे केवळ गार्ड वापरण्यावर भर न देता, मानसिक ताणतणाव, चिंता किंवा झोपेच्या समस्या यांसारख्या मूळ कारणांचा शोध घेऊन, त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय सतत दात चावल्यामुळे ज्यांच्या दातांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे, त्यांच्या दातांना मूळ रूप देण्यासाठी डेंटल फिलिंग्ज किंवा क्राउन्ससारख्या उपचारांची गरज भासू शकते.
