डॉ. देवदत्त पोखरकर
Discovery of Mitrephora rashmiae Tejas Thackeray: अलीकडेच मुंबईतील संशोधकांच्या एका पथकाने पूर्व भारतातील अरुणाचल प्रदेशातील घनदाट, सदाहरित जंगलांमधून एका अत्यंत दुर्मिळ आणि देखण्या फुलझाडाचा शोध लावला. या शोधमोहिमेत वन्यजीव संशोधक आणि शिवसेना पक्षप्रमुख (UBT) उद्धव ठाकरे यांचा सुपुत्र तेजस ठाकरे यांचाही महत्त्वाचा सहभाग होता. निसर्गाच्या या नव्या चमत्काराला त्यांनी आपल्या आईच्या प्रदीर्घ पाठिंब्याबद्दल आणि तिच्या सन्मानार्थ ‘Mitrephora rashmiae’ (मैट्रिफोरा रश्मीए) असे नाव दिले. एका मुलाने विज्ञानाच्या व्यासपीठावरून आपल्या मातेला दिलेली ही अनोखी मानवंदना जितकी भावनिक आहे, तितकीच ती वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची ठरली आहे.
या घटनेने पर्यावरणमित्रांच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण केलेले असले, तरी सामान्य माणसाच्या मनात मात्र अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. पृथ्वीवर दरवर्षी हजारो नवीन प्रजाती शोधल्या जातात, मग या नवीन वनस्पतींना किंवा प्राण्यांना अधिकृत नाव देण्याचा अधिकार नक्की कोणाला असतो? संशोधक आपल्या मर्जीने कोणतेही नाव ठेवू शकतात का? की जागतिक स्तरावर यासाठी काही नियमावली अस्तित्वात आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या नामकरणाच्या मागे काम करणारे ‘टॅक्सोनॉमी’ (Taxonomy – वर्गीकरण शास्त्र) हे विज्ञान नक्की कसे काम करते?

द्विनाम नामकरण पद्धती
या सर्व प्रश्नांची उत्तरे द्विनाम नामकरण (Binomial Nomenclature) या वैज्ञानिक पद्धतीमध्ये दडलेली आहेत. जगभरातील प्रत्येक प्रदेशात सजीवांना स्थानिक भाषेनुसार वेगवेगळी नावे असतात. एकाच प्रकारच्या सजीवाला वेगवेगळ्या राज्यांत किंवा देशांत वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. अशा परिस्थितीत वैज्ञानिक संशोधनामध्ये गोंधळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे जगभरातील सर्व शास्त्रज्ञांनी प्रत्येक सजीवाला एकच सार्वत्रिक नाव देण्याची पद्धत स्वीकारली. यालाच द्विनाम नामकरण म्हणतात.
आधुनिक वर्गीकरणशास्त्राचे जनक: कार्ल लिनियस
ही पद्धत अठराव्या शतकातील स्वीडिश वनस्पतिशास्त्रज्ञ कार्ल लिनियस यांनी विकसित केली. आधुनिक वर्गीकरणशास्त्राचे जनक म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी प्रत्येक सजीवाला दोन शब्दांचे वैज्ञानिक नाव देण्याची पद्धत सुरू केली. आज जगातील सर्व देशांमध्ये हीच पद्धत वापरली जाते.
इ.स. १७५३ साली कॅरोलस लिनियस यांनी ‘Species Plantarum’ हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथाद्वारे त्यांनी वनस्पतींच्या द्विनाम नामकरण पद्धतीचा (Binomial Nomenclature) पहिला यशस्वी आणि शास्त्रीय वापर सुरू केला. या पद्धतीनुसार, प्रत्येक वनस्पतीला दोन शब्दांचे एक विशिष्ट वैज्ञानिक नाव दिले जाते: पहिला शब्द: वनस्पतीचा ‘वंश’ (Genus) दर्शवितो. दुसरा शब्द: वनस्पतीची ‘प्रजाती’ (Species) दर्शवितो. या पद्धतीमुळे जगभरातील शास्त्रज्ञांना वनस्पतींची अचूक आणि एकसमान ओळख पटवणे शक्य झाले. यामुळेच ‘Species Plantarum’ हा ग्रंथ आधुनिक वनस्पती नामकरणशास्त्राचा (Botanical Nomenclature) प्रारंभबिंदू मानला जातो.
द्विनाम नामकरणामध्ये प्रत्येक वैज्ञानिक नाव दोन भागांचे असते. उदाहरणार्थ, आंब्याचे वैज्ञानिक नाव Mangifera indica आहे. येथे Mangifera हा वंश असून indica ही प्रजाती आहे. त्याचप्रमाणे कडुनिंबाचे Azadirachta indica आणि पिंपळाचे Ficus religiosa अशी वैज्ञानिक नावे आहेत. नव्याने शोधलेल्या वनस्पतीचे नाव Mitrephora rashmiae असे आहे. यात Mitrephora हा आधीपासून ज्ञात वंश आहे, तर rashmiae ही नव्याने वर्णन केलेली प्रजाती आहे.

वैज्ञानिक नावे लिहिण्याचेही काही ठरावीक नियम आहेत.
१. Binomial nomenclature (द्विनाम नामकरण पद्धती) मध्ये वैज्ञानिक नावे प्रामुख्याने लॅटिन (Latin) भाषेत असतात किंवा ग्रीक (Greek) शब्दांचे लॅटिनीकरण (Latinization) करून तयार केली जातात. या पद्धतीत वंशाचे नाव नेहमी मोठ्या अक्षराने सुरू होते, तर प्रजातीचे नाव लहान अक्षराने लिहिले जाते. छापील मजकुरात ही नावे तिरक्या (Italic) अक्षरात लिहिली जातात, तर हस्तलिखितात प्रत्येक शब्द स्वतंत्रपणे अधोरेखित (underline) केला जातो. त्यामुळे जगभरातील वैज्ञानिक एकाच पद्धतीने ही नावे वापरू शकतात.
२. एखाद्या वनस्पतीचा शोध लागला की, तिला लगेच नवीन नाव दिले जात नाही. प्रथम संशोधक त्या वनस्पतीचा अत्यंत बारकाईने अभ्यास करतात. तिची पाने, फुले, फळे, बिया, खोड, परागकण, अधिवास आणि अनेकदा तिच्या डीएनएचीही तपासणी केली जाते. त्यानंतर या सर्व वैशिष्ट्यांची तुलना जगभरात आधीपासून ज्ञात असलेल्या प्रजातींशी केली जाते. जर ती कोणत्याही ज्ञात प्रजातीशी जुळत नसेल, तरच तिला नवीन प्रजाती म्हणून घोषित केले जाते.
३. त्यानंतर त्या वनस्पतीचे सविस्तर वर्णन लिहिले जाते. तिची ओळख पटविणारी सर्व वैशिष्ट्ये, ती सापडलेले ठिकाण, तिच्या नमुन्यांची माहिती आणि इतर वैज्ञानिक तपशील संशोधन निबंधामध्ये प्रकाशित केले जातात. हा शोधनिबंध मान्यताप्राप्त वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाल्यानंतरच त्या नावाला अधिकृत मान्यता मिळते.
४. वनस्पतींना नावे देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर International Code of Nomenclature for algae, fungi, and plants (ICNAFP) ही नियमावली लागू आहे. या नियमांनुसार नाव आधीपासून अस्तित्वात नसावे, ते योग्य लॅटिन व्याकरणानुसार असावे आणि त्यामागील कारण स्पष्टपणे नमूद केलेले असावे. त्यामुळे कोणालाही मनाप्रमाणे नाव देता येत नाही.
नामकरण विज्ञानातील पद्धती
नवीन प्रजातीचे नाव ठेवताना संशोधक अनेक गोष्टींचा विचार करतात. काही वेळा त्या वनस्पतीच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारावरून नाव दिले जाते. काही वेळा तिच्या रंगावर, सुगंधावर किंवा फुलांच्या रचनेवरून नाव दिले जाते. अनेकदा ती ज्या प्रदेशात सापडते त्या प्रदेशाचे नाव प्रजातीमध्ये समाविष्ट केले जाते. काही वेळा एखाद्या प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या, संशोधकाच्या किंवा समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या सन्मानार्थही प्रजातीचे नामकरण केले जाते. अशा प्रकारचे नामकरण विज्ञानामध्ये अनेक वर्षांपासून मान्य आहे.
मैट्रिफोरा-Mitrephora
Mitrephora rashmiae हे नावही याच परंपरेतून देण्यात आले आहे. Mitrephora हा सीताफळ कुलातील वनस्पतींचा एक सुप्रसिद्ध वंश आहे. या वंशातील फुलांची आतील तीन पाकळ्या एकत्र येऊन मुकुट किंवा घुमटासारखी रचना तयार करतात. इंग्रजीतील Mitre म्हणजे मुकुट किंवा धार्मिक शिरोभूषण. त्यावरून या वंशाला Mitrephora हे नाव देण्यात आले आहे.

रश्मीए-rashmiae
या नव्या प्रजातीचे दुसरे नाव rashmiae हे रश्मी ठाकरे यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. लॅटिन भाषेच्या व्याकरणानुसार एखाद्या स्त्रीच्या सन्मानार्थ प्रजातीचे नाव ठेवताना अनेकदा -ae हा प्रत्यय जोडला जातो. त्यामुळे ‘Rashmi’ या नावाचे रूपांतर rashmiae असे झाले. अशा प्रकारे हे नाव त्या व्यक्तीचा सन्मान व्यक्त करते, मात्र याचा अर्थ त्या व्यक्तीने वनस्पतीचा शोध लावला किंवा ती त्यांची मालकी आहे, असा होत नाही.

मैट्रिफोरा रश्मीए-अॅनोनेसी
या वनस्पतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती अॅनोनेसी (Annonaceae) अर्थात सीताफळ कुलातील आहे. याच कुलामध्ये सीताफळ, रामफळ आणि इतर अनेक महत्त्वाच्या वनस्पतींचा समावेश होतो. मैट्रिफोरा रश्मीएची फुले सहा पाकळ्यांची असून बाहेरील तीन पाकळ्या मोठ्या आणि पसरट असतात. आतील तीन पाकळ्या एकत्र येऊन आकर्षक घुमटासारखी रचना तयार करतात. गुलाबी, पांढरा, पिवळा किंवा क्रीम रंगांच्या पाकळ्यांवर लालसर-जांभळे ठिपके दिसतात आणि फुलांना मंद, गोड सुगंध असतो. ही वैशिष्ट्ये या वंशाची ओळख मानली जातात.
आधुनिक जीवशास्त्राचा मूलभूत पाया
आजच्या काळात नवीन प्रजातींचा शोध केवळ शास्त्रीय उत्सुकतेपुरता मर्यादित नाही. जैवविविधतेचे संवर्धन, औषधी संशोधन, पर्यावरणीय संतुलन आणि हवामान बदलाच्या अभ्यासासाठी अशा प्रजातींचे दस्तऐवजीकरण अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या वनस्पतीचे अचूक वैज्ञानिक नाव निश्चित झाल्यावरच तिच्यावर जगभरात एकसारखे संशोधन करता येते. त्यामुळे द्विनाम नामकरण ही केवळ नाव देण्याची पद्धत नसून आधुनिक जीवशास्त्राचा मूलभूत पाया आहे.
Mitrephora rashmiae (मैट्रिफोरा रश्मीए) या नव्या वनस्पतीचा शोध हा भारतीय वनस्पतिशास्त्रासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. त्याचबरोबर हा शोध आपल्याला विज्ञानातील शिस्तबद्ध नामकरण प्रक्रियेची ओळख करून देतो. प्रत्येक वैज्ञानिक नावामागे अनेक वर्षांचे संशोधन, सूक्ष्म निरीक्षण, आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन आणि निसर्गाविषयीचा आदर दडलेला असतो. त्यामुळे एखाद्या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव हे केवळ ओळख नसून विज्ञान, इतिहास आणि जैवविविधतेचे जतन करणारा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज असतो.
