Stray Dog Poisoning Telangana : तेलंगणात भटक्या कुत्र्यांच्या सामूहिक हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही आठवड्यांत राज्यातील किमान सहा गावांमध्ये शंभरहून अधिक भटक्या कुत्र्यांना मारण्यात आले आहे. राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांना तपासाचे निर्देश दिले आहे. आतापर्यंत राज्यात ३५४ हून अधिक कुत्र्यांच्या हत्यांची अधिकृत नोंद झाल्याचे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे. मात्र, काही अहवालांत संपूर्ण राज्यात जवळपास ९०० हून अधिक कुत्र्यांना ठार मारल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण नेमके आहे तरी काय? भटक्या कुत्र्यांची सामूहिक हत्या का करण्यात आली? त्याविषयीचा हा आढावा…
कुत्र्यांच्या हत्येचे नेमके प्रकरण काय?
तेलंगणातील कामारेड्डी व जगित्यालसह इतर चार जिल्ह्यांत भटक्या कुत्र्यांच्या सामूहिक हत्याकांडाच्या घटना घडल्या. हैदराबादपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या जगित्याल जिल्ह्यातील पेगाडापल्ली गावात सुमारे ३०० कुत्र्यांचे मृतदेह आढळून आल्यानंतर ही संतापजनक बाब उघडकीस आली. या कुत्र्यांना विष आणि प्राणघातक इंजेक्शन देऊन मारण्यात आल्याचा दावा प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी बीबीसीशी बोलताना केला आहे. याप्रकरणी काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी सरपंच व ग्रामसेवकासह इतर नऊ जणांना अटक केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांच्या हत्या का करण्यात आल्या, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. प्राथामिक तपासानंतर त्यामागे काही धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.
निवडणूक जिंकण्यासाठी कुत्र्यांची हत्या?
तेलंगणातील भटक्या कुत्र्यांच्या सामूहिक हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या घटनांमध्ये निवडणुकांचे राजकारण असल्याचे समोर येत आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, डिसेंबर २०२५ मध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत काही पुढाऱ्यांनी गावातील भटक्या कुत्र्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन मतदारांना दिले होते. याच आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी कुत्र्यांच्या सामूहिक हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. याप्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून सरपंचासह ग्रामसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्ट्रे-अॅनिमल फाउंडेशन ऑफ इंडियाच्या प्रीती मुदावथ यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जग्तियाल जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला मोठ्या संख्येने कुत्र्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांना विष कोणी आणि का दिले हे अद्यापही पूर्णपणे स्पष्ट झाले नसल्याने त्याबाबतचा सविस्तर तपास सुरू आहे.
आणखी वाचा : इस्लामाबादमधील मशिदीतील स्फोटाबद्दल प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं? पाकिस्तानमधले दहशतवादी कोण?
हत्याकांडाची घटना कशी उजेडात आली?
प्रीती मुदावथ यांनी २३ जानेवारी रोजी पेगाडापल्ली गावाला भेट दिली असता त्यांना एका खड्ड्यात कुत्र्यांचे मृतदेह आढळून आले. याबाबत त्यांनी आजूबाजूच्या परिसरात विचारणा केल्यानंतर दोन महिलांनी भटक्या कुत्र्यांना प्राणघातक इंजेक्शन दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सुरुवातीला खड्डा अर्धा भरलेला होता; मात्र संध्याकाळपर्यंत तो ७५ टक्के कुत्र्यांच्या मृतदेहांनी भरला गेला. त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने ट्रॅक्टरद्वारे कुत्र्यांचे मृतदेह गावापासून दोन किलोमीटर अंतरावर नेऊन पुरण्यात आले, असे मुदावथ यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले. त्याच आठवड्यात रंगा रेड्डी जिल्ह्यातील याचराम गावातही अशाच प्रकारची घटना समोर आली. येथील सरपंचांनीही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना विष दिल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी राचकोंडा पोलिसांनी संबंधित सरपंचासह दोन जणांविरोधात एफआयआर दाखल केला.
कोणकोणत्या जिल्ह्यांत कुत्र्यांची हत्या?
पोलिसांनी या घटनेचा सविस्तर तपास सुरू केल्यानंतर कामारेड्डी, जग्तियाल, हनुमकोंडा आणि रंगा रेड्डी या जिल्ह्यांतही अशाच सामूहिक हत्याकांडाच्या घटना उघडकीस आल्या. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हनुमकोंडामध्ये सुमारे ३००, कामारेड्डीत २००, रंगा रेड्डीत १०० आणि जग्तियालमध्ये ३० कुत्र्यांचे मृतदेह आढळून आले. मात्र, राज्यभरात एकूण किती भटके कुत्रे मारले गेले, याचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर झालेला नाही. भटक्या कुत्र्यांना भूल देण्याचे इंजेक्शन देण्यात आल्याची कबुली एका ग्रामपंचायत सदस्याने पोलिसांना दिली. या अमानुष कृत्यामुळे तेलंगणासह संपूर्ण देशात खळबळ उडाली आणि याप्रकरणाच्या सविस्तर चौकशीची मागणी झाली. आतापर्यंत काही प्रकरणांमध्ये नऊ जणांना अटक झाली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : जम्मू-काश्मीरबाबत पाकिस्तानची चिथावणीखोर भाषा; भारतासाठी धोक्याची घंटा? पाकव्याप्त काश्मीरमध्ये काय घडले?
भारतातील भटक्या प्राण्यांची समस्या
देशात कुत्र्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर हत्या होणे ही दुर्मीळ घटना आहे, त्यामुळे याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. भारताच्या अनेक भागांमध्ये भटके प्राणी ही एक नेहमीची समस्या मानली जाते. भटक्या प्राण्यांमध्ये मुख्यत: कुत्र्यांचा समावेश असतो. मात्र, त्यात गुरे आणि माकडांचादेखील समावेश आहे. पिकांचे नुकसान करणे आणि वाहतुकीतील अपघात यासाठी भटक्या प्राणांना नेहमीच दोष दिला जातो. या समस्येसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. भटके कुत्रे हे दैनंदिन आयुष्याचा भाग झाले आहेत. त्यांच्यावरील क्रौर्याबद्दल प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी वारंवार आवाज उठवला आहे. भटक्या कुत्र्यांवर होणारे क्रौर्य रोखण्यासाठी कठोर कायदे व शिक्षा लागू करावी, अशी विनंती प्राणीप्रेमींकडून केली जात आहे.
भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात न्यायालयाचे ताशेरे
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात गंभीर चिंता व्यक्त केली होती. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास किंवा कुत्र्याच्या हल्ल्यात नागरिक जखमी किंवा मृत्युमुखी पडल्यास राज्य सरकारला मोठी नुकसान भरपाई द्यावी लागेल, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने १३ जानेवारीला केली. न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली होती. यावेळी खंडपीठाने राज्य सरकार आणि कुत्र्यांना अन्न भरविणाऱ्यांना सुनावले होते. प्राणीप्रेमींना जर इतकीच काळजी असेल तर त्यांनी कुत्र्यांना आपल्या घरी घेऊन जावे. लोकांना घाबरविण्यासाठी आणि चावा घेण्यासाठी कुत्र्यांना रस्त्यावर सोडले आहे का? असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला होता.

