What is the Temple of Heaven? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चीन दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टन आणि बीजिंगमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, गेल्या नऊ वर्षांतील अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. या दौऱ्याचे उद्दिष्ट केवळ दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची भेट नसून, या भेटीसाठी निवडलेली ठिकाणे आणि त्यामागचा तपशीलही महत्वाचा आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘टेम्पल ऑफ हेवन’ या युनेस्को जागतिक स्थळाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
ट्रम्प बीजिंगमध्ये पोहोचल्यावर दोन्ही नेत्यांनी या मंदिराला भेट दिली आणि शासकीय मेजवानीला उपस्थित राहिले. या भेटीद्वारे वैश्विक सुव्यवस्था आणि राजकीय अधिकाराचा संदेश दिला जाण्याची शक्यता आहे. शतकानुशतके उभे असलेले हे मंदिर या भेटीच्या केंद्रस्थानी असण्याचे कारण काय? याचाच घेतलेला हा आढावा.
टेम्पल ऑफ हेवन काय आहे?
१५ व्या शतकाच्या पूर्वार्धात (मिंग राजवटीच्या काळात) बांधलेले ‘टेम्पल ऑफ हेवन’ हा भव्य वास्तूंचा समूह आहे. या ठिकाणी सांस्कृतिक आणि धार्मिक विधी पार पाडले जात. हे मंदिर पाईनच्या घनदाट वृक्षांनी वेढलेले आहे. या संपूर्ण संरचनेची मांडणी पृथ्वी आणि स्वर्ग (मानवाचे जग आणि ईश्वराचे जग) यांच्यातील नात्याचे प्रतीक आहे. चीनमध्ये या वास्तूचे सांस्कृतिक महत्त्व प्रचंड आहे.
हा वास्तुसमूह बीजिंगच्या चोंगवेन जिल्ह्यात स्थित आहे. आज हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि सार्वजनिक उद्यान आहे. इथले स्थानिक लोक येथे ‘टाई ची’चा (चिनी परंपरा ज्यात सौम्य आणि प्रवाही हालचाली, दीर्घ श्वासोच्छ्वास आणि मानसिक एकाग्रतेचा सराव केला जातो) सराव, बुद्धिबळ किंवा नृत्यासाठी एकत्र येतात.
या मंदिराचे जागतिक मूल्य काय?
या संरचनेतील इमारती अधिष्ठानावर समांतर रेषेत बांधलेल्या आहेत. मंदिराच्या मध्यभागी ‘हॉल ऑफ प्रेयर फॉर गुड हार्वेस्ट’ (उत्तम पिकांसाठी प्रार्थनेचे ठिकाण) आहे. ही तीन मजली, शंकू आकाराचे निळे छप्पर असलेली गोलाकार इमारत आहे. या इमारतीभोवती प्रदक्षिणा मार्ग देण्यात आलेला आहे. मिंग आणि चिंग राजवटींचे सम्राट येथे येऊन चांगल्या पिकासाठी धार्मिक विधी करत असत. यात स्वर्गस्थ शक्तींना बळी अर्पण करणेही समाविष्ट होते.
संकुलाच्या पश्चिम भागात ‘हॉल ऑफ ॲबस्टिनन्स’ (संयम कक्ष) आहे. येथे विधीपूर्वी सम्राट उपवास आणि ध्यान करत असत. ही संपूर्ण रचना दुहेरी भिंत आणि पाईनच्या झाडांनी वेढलेली आहे. या वास्तूच्या परिसरात एकूण ९२ प्राचीन इमारती आणि ६०० खोल्या आहेत. ‘टेम्पल ऑफ हेवन’ हे चीनमधील संपूर्णपणे अस्तित्वात असलेले शाही बलिदानाचे संकुल आहे. तसेच स्वर्गाला बळी अर्पण करण्यासाठी जगातील सर्वात मोठे हयात असलेले वास्तुशिल्प आहे.
‘टेम्पल ऑफ हेवन’ नाव कसे पडले?
मिंग सम्राटाच्या देखरेखीखाली इसवी सन १४२० मध्ये ‘फॉरबिडन सिटी’च्या दक्षिण भागात ७ किलोमीटर अंतरावर याचे बांधकाम पूर्ण झाले. सुरुवातीला याचे नाव ‘ऑल्टर ऑफ हेवन अँड अर्थ’ होते. मात्र, इसवी सन १५३० मध्ये सम्राट जियाजींगने स्वर्ग आणि पृथ्वीसाठी स्वतंत्र विधी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे हॉलच्या दक्षिण बाजूला स्वर्गाला बळी अर्पण करण्यासाठी ‘सर्क्युलर माउंड ऑल्टर’ बांधण्यात आले. त्यानुसार, इसवी सन १५३४ मध्ये सम्राट जियाजींगच्या राजवटीच्या १३ व्या वर्षी ‘ऑल्टर ऑफ हेवन अँड अर्थ’ हे नाव बदलून ‘टेम्पल ऑफ हेवन’ असे ठेवण्यात आले. सध्याचा २७३ एकरचा विस्तार हा इसवी सन १७४९ मध्ये किंग सम्राट कियानलाँग आणि गुआंग्शू यांच्या कालखंडात झाला.
मंदिराची काही खास वैशिष्ट्ये:
- प्रतिध्वनी भिंत (Echo Wall):
‘इम्पेरियल व्हॉल्ट ऑफ हेवन’च्या भोवती असलेली ही भिंत इतकी गुळगुळीत आणि गोलाकार आहे की, एका टोकाला हळू आवाजात बोललेले दुसऱ्या टोकाला स्पष्ट ऐकू येते.

- ९ अंकाचे महत्त्व:
चिनी तत्त्वज्ञानात ९ हा अंक पवित्र मानला जातो. येथील संगमरवरी पायऱ्या, दगडांची संख्या आणि वर्तुळांची मोजमापे ९ च्या पटीत आहेत. ‘सर्क्युलर माउंड ऑल्टर’च्या मध्यभागी एक गोलाकार दगड आहे, ज्याला ‘टाईजी’ दगड म्हणतात. हे स्वर्गाचे केंद्र मानले जाते.

- रंगसंगतीचा अर्थ:
मंदिराचे दरवाजे, भिंती आणि खांब लाल आहेत, जे राजघराण्याचे प्रतीक आहेत. छतावरील निळी कौले आकाश आणि स्वर्गाचे प्रतिबिंब मानली जातात.

‘हॉल ऑफ प्रेयर’च्या तीन थरांच्या छताला पूर्वी वेगवेगळे रंग होते; स्वर्ग, सम्राट आणि पृथ्वी यांचे दर्शन घडवण्यासाठी अनुक्रमे निळा, पिवळा आणि हिरवा रंग वापरला गेला होता. मात्र चिंग राजवटीत हे सर्व रंग बदलून केवळ ‘स्यान’ (cyan: गडद निळसर हिरवा) रंग वापरण्यात आला. यातून निसर्गशोभा आणि उत्तम हवामानाचे महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या संकुलातील झाई पॅलेस (zhai palace) या वास्तूत विधी दरम्यान सम्राट वास्तव्यास असत. सम्राटाचा महाल असल्याने त्याचे छत नियमानुसार पिवळ्या कौलांचे असायला हवे होते, परंतु प्रत्यक्षात ते निळ्या रंगाचे आहे. स्वर्गाबद्दल असलेला आपला निस्सीम आदर व्यक्त करण्यासाठी स्वतः सम्राटानेच या रंगाची निवड केली होती.
‘टेम्पल ऑफ हेवन’ ही केवळ एक वास्तू नसून प्राचीन चिनी परंपरा आणि संस्कृतीचा अजोड वारसा आहे. या मंदिराचे स्थान, त्याची भव्य रचना, तिथे पार पडणारे विधी आणि सुरावटींमधून प्राचीन चिनी श्रद्धांचे दर्शन घडते.
महत्त्वाचे पैलू:
चिनी सम्राटांना ‘स्वर्गाचे पुत्र’ मानले जात असे. हे सम्राट पृथ्वीवर दैवी अधिकारांचे प्रतिनिधित्व करतात, या श्रद्धेचे हे मंदिर एक जिवंत प्रतीक आहे.
या ऐतिहासिक वास्तूचे जतन ‘चीनच्या सांस्कृतिक वारसा संरक्षण कायद्या’द्वारे केले जाते.
या मंदिराचे ऐतिहासिक मूल्य ओळखून, १९६१ मध्ये राज्य परिषदेने याचा समावेश ‘राज्य प्राधान्य संरक्षण’ असलेल्या पहिल्या विशेष गटात केला आहे.
‘टेम्पल ऑफ हेवन’मधील ऐतिहासिक वास्तूंचे जतन अत्यंत कौशल्याने करण्यात आले आहे. सध्या या परिसरातील ‘हॉल ऑफ प्रेयर फॉर गुड हार्वेस्ट’, ‘द सर्क्युलर माउंड आल्टर’, ‘द फास्टिंग पॅलेस’ आणि ‘द डिव्हाइन म्युझिक ॲडमिनिस्ट्रेशन’ या स्थळांचे त्यांच्या मूळ स्वरुपात जतन करण्यात आले आहे.
वास्तूचे राजनैतिक महत्त्व:
या ऐतिहासिक वारशाचा उपयोग केवळ पर्यटनासाठी न होता, तो चीनच्या सामर्थ्याचे प्रतीक म्हणूनही केला जात आहे. राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे ‘टेम्पल ऑफ हेवन’मध्ये केलेले भव्य स्वागत हे केवळ आदरातिथ्य नव्हते, तर ते चीनची सांस्कृतिक प्रगल्भता आणि सहनशक्ती (Resilience) जगासमोर मांडणारे एक प्रभावी व्यासपीठ ठरले.
