Thailand King Maha Vajiralongkorn Rama 10 royal family polygamy history: थायलंडच्या एका राणीने ‘ग्रिपेन’ (Gripen) लढाऊ विमानाचे एकहाती उड्डाण करून साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. ही अनेक राजकीय, लष्करी आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना आहे. ‘साब जेएएस ३९ ग्रिपेन’ (Saab JAS 39 Gripen) हे स्वीडनने तयार केलेले चौथ्या पिढीचे अत्यंत प्रगत आणि स्वनातीत (सुपरसॉनिक) वेगात जाणारे लढाऊ विमान आहे. ग्रिपेन लढाऊ विमान चालवणे हे सामान्य प्रवासी विमान चालवण्यासारखे नाही. यासाठी कठोर प्रशिक्षण, तांत्रिक ज्ञान आणि प्रचंड ‘जी-फोर्स’ (G-Force) सहन करण्याची शारीरिक व मानसिक क्षमता लागते. एका राणीने कोणतीही मदत न घेता (solo) हे विमान चालवणे, हे तिच्या असामान्य कौशल्याचे आणि फिटनेसचे प्रमाण आहे.

राणी सुथिदा असे त्यांचे नाव. त्या थायलंडचे राजे महा वजिरालोंगकोर्न (रामा १० वे) यांच्या चौथ्या पत्नी आहेत. राणी सुथिदा ग्रिपेन विमानातून जेव्हा खाली आल्या, तेव्हा थायलंडचे विद्यमान राजे महा वजिरालोंगकोर्न (रामा १० वे) त्यांच्या स्वागतासाठी फुलांचा गुच्छ घेऊन अत्यंत आदराने उभे होते.

थायलंडच्या राजांना ‘रामा’ (उदा. रामा ५ वा, रामा १० वा) या नावाने संबोधले जाते. यामागे भारत आणि थायलंडचे अत्यंत प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध दडलेले आहेत. थायलंडच्या (पूर्वीचे सयाम) सध्याच्या ‘चक्री’ राजवंशाची स्थापना झाल्यानंतर, राजाला भगवान विष्णूचा अवतार आणि प्रभू रामचंद्रांचे प्रतीक मानण्याची प्रथा रूढ झाली. भारतातील ‘रामायण’ हे थायलंडमध्ये ‘रामकियेन’ (Ramakien) या नावाने राष्ट्रीय महाकाव्य म्हणून स्वीकारले गेले आहे.

प्राचीन थाई राजधानीचे नावही रामाच्या अयोध्येवरून ‘अयुथया’ (Ayutthaya) असे ठेवण्यात आले होते. सुप्रसिद्ध इतिहासकार ए. एल. बाशम (A. L. Basham) यांच्या ‘द वंडर दॅट वॉज इंडिया’ (The Wonder That Was India) या ग्रंथात म्हणतात की, “आग्नेय आशियातील राजेशाहीने भारतीय संस्कृतीतील ‘राम’ या आदर्शाला केवळ एक देव म्हणून नव्हे, तर ‘आदर्श राजा आणि धर्मरक्षक’ म्हणून राजकीय व नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.”

असे असले तरी भगवान राम हे एकपत्नीव्रत स्वीकारणारे होते तर थायलंडच्या राजांना ‘राम/रामा’ म्हणून संबोधले जात असले तरी आजही तिथे बहूपत्नीत्व ही प्रथा अस्तित्त्वात आहे. या प्रथेनुसार राजाची एक मुख्य पत्नी असते. तर इतर स्त्रियांना रॉयल कन्सॉर्ट्स किंवा उपपत्नी म्हटले जाते.

सयामचा ऐतिहासिक वारसा आणि बहुपत्नीत्वाची राजकीय गरज

प्राचीन कालखंडात थायलंड हे सयाम म्हणून ओळखले जात होते. थायलंडमध्ये राजघराण्यात अधिकृत उपपत्नी किंवा अनेक पत्नी ठेवण्याची परंपरा जुन्या सयामच्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. या परंपरेमागे केवळ वैयक्तिक सुख नसून, राजवंशाचा वारसा अखंड चालवणे आणि शक्तिशाली घराण्यांबरोबर राजकीय युती करणे हा प्रमुख हेतू होता. इतिहासकार डेव्हिड के. व्याट (David K. Wyatt) यांनी त्यांच्या ‘थायलंड: अ शॉर्ट हिस्ट्री’ (Thailand: A Short History) या ग्रंथात या परंपरेचे सखोल विश्लेषण केले आहे. ते लिहितात की, “सयामच्या प्राचीन राजेशाहीत राजाचा मोठा जनानखाना आणि अनेक उपपत्नी असणे, ही एक अत्यंत गरजेची राजकीय व्यवस्था होती. या माध्यमातून राजा विविध प्रादेशिक सरंजामदार आणि शक्तिशाली घराण्यांशी सोयरीक जुळवून राज्यावरील आपली पकड अबाधित ठेवत असे.” राजा रामा पाचवा (१८६८ ते १९१०) यांच्या अनेक पत्नी आणि उपपत्नींमधून त्यांना तब्बल ७७ अपत्ये झाली होती होती.

आधुनिकतेकडे वाटचाल आणि एकपत्नीत्वाचा धोरणात्मक स्वीकार

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपीय वसाहतवादाचे वारे आशियात पसरू लागले. त्यामुळे सयामवर आपल्या पारंपारिक प्रथा बदलण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला. सयामने स्वतःला एक आधुनिक आणि प्रगत राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी अनेक धोरणात्मक बदल करण्यास सुरुवात केली. रामा पाचवा यांचे उत्तराधिकारी असलेल्या राजा वजिरावुध (रामा सहावा) यांनी हळूहळू या बहुपत्नीत्वाच्या प्रथेपासून स्वतःला दूर ठेवले. त्यानंतर, १९२० च्या दशकात राजा प्रजाधिपोक (रामा सातवा) यांच्या कार्यकाळात थाई राजेशाहीने युरोपीय प्रभावाखाली अधिकृतपणे ‘एक पती आणि एक पत्नी’ या आधुनिक तत्त्वाचा कायदेशीर स्वीकार केला आणि ही जुनी प्रथा खंडित केली.

राजा महा वजिरालोंगकोर्न आणि परंपरेचे नाट्यमय पुनरुज्जीवन

सध्याचे राजे महा वजिरालोंगकोर्न यांनी गादीवर आल्यानंतर या जुन्या आणि लुप्त झालेल्या बहुपत्नीत्वाच्या परंपरेचे पुनरुज्जीवन केले. २०१९ साली मे महिन्यात राणी सुथिदा यांच्याशी विवाह केल्यानंतर (हे त्यांचे चौथे लग्न होते), अवघ्या दोन महिन्यांतच त्यांनी सिनीनात वोंगवजिरापाकडी यांना ‘रॉयल नोबल कन्सॉर्ट’ (Chao Khun Phra) हा उच्च पदवीचा किताब बहाल केला. या अनिर्बंध सत्तेविषयी भाष्य करताना पॉल हँडले (Paul Handley) त्यांच्या ‘द किंग नेव्हर स्माइल्स’ (The King Never Smiles) या पुस्तकात म्हणतात की, “थायलंडची राजेशाही सामान्य कायद्यांच्या बंधनात अडकत नाही; त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसलेली अमर्याद ताकद आहे.” २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात सिनीनात यांच्यावर राणीशी स्पर्धा केल्याचा ठपका ठेवून त्यांच्या सर्व पदव्या हिरावून घेण्यात आल्या, मात्र पुन्हा २०२० साली राजवाड्याने आदेश काढून त्यांना निर्दोष ठरवत त्यांच्या पदव्या परत केल्या.

बव्हेरियातील जनानखाना आणि सत्तेच्या पटावरील ‘इतर स्त्रिया’

आंतरराष्ट्रीय पत्रकार अँड्र्यू मॅकग्रेगर मार्शल यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे की, राजा वजिरालोंगकोर्न यांनी २००७ साली जर्मनीतील बव्हेरिया येथे स्वतःचा एक खास जनानखाना तयार केला. राजावरील आपली निष्ठा आणि प्रेम दाखवण्यासाठी या जनानखान्यातील सर्व स्त्रियांना त्यांचे केस खूप लहान ठेवण्याची सक्ती केली जाते. मार्शल यांनी २०२४ मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, या गटातील सर्वात तरुण असलेली ओरानोंग सुवण्णाश्री (जन्म १९९२) ही राजाची सर्वात लाडकी आहे. याच वर्षी राजाने आपल्या मर्जीतल्या पाच स्त्रियांना ‘विशेष रॉयल गार्ड्स’ करून थेट ‘मेजर जनरल’ हे मोठे लष्करी पद दिले. यात ओरानोंगचाही समावेश आहे. या खास बढतीमुळे वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी ती थायलंडच्या लष्करातील सर्वात तरुण महिला जनरल ठरली आहे.

आधुनिक तंत्रज्ञान आणि जुन्या मानसिकतेचा संघर्ष

अलीकडील काही घटनांवरून ओरानोंग यांचे राजघराण्यातील वाढते प्रस्थ स्पष्ट होते. गेल्या महिन्यात, राणी सुथिदा यांच्या अनुपस्थितीत ओरानोंग यांनी राजाबरोबर बँकॉकच्या वात बोरोम्निवास आणि वात बेंचमाबोफिट येथे जाऊन राजा चुललांगकॉर्न (रामा पाचवा) यांच्या स्मरणार्थ आयोजित अधिकृत कार्यक्रमांना हजेरी लावली. राणी सुथिदा यांचे लढाऊ विमानाचे उड्डाण हे एकीकडे थायलंडच्या राजघराण्याची पुरोगामी प्रतिमा जगासमोर उभी करते, तर दुसरीकडे उपपत्नींची अधिकृत नियुक्ती, लष्करी पदव्यांची खैरात आणि राजवाड्याबाहेरील गुप्त जनानखाना हे वास्तव राजेशाहीच्या अमर्याद सत्तेचे दर्शन घडवते. थायलंडची राजेशाही विसाव्या शतकातील आधुनिकतेचा मुखवटा धारण करत असली तरी, तिच्या मुळाशी आजही जुनी, सत्ताकेंद्रित बहुपत्नीत्वाची परंपरा कायम आहे.